कोरोनाच्या संकटात आध्यात्मिक बुवाबाजी फोफावेल का?

अ‍ॅड. रंजना गवांदे - 9850491611

डिसेंबर महिन्यात चीनमध्ये ‘कोविड-19’ने आक्रमण केले व त्यानंतर तो न थांबता जगभर पसरला. ‘कोविड-19’चा होणारा संसर्ग, वाढणार्‍या रुग्णांची संख्या, यामुळे संपूर्ण जगच भयभीत झाले. अनेक देशांचे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. अनेक देशांत लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम राहिले नाही. काही ठिकाणी जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला, तर काही ठिकाणी तुटवडा कृत्रिमरित्या दाखवण्यात आला. भारतातही या आजाराने प्रवेश केला. त्यावेळी त्याचे स्वरूप अतिशय नगण्य होते; परंतु हळूहळू त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. जसजसा ‘कोविड-19’मुळे होणारा कोरोना वाढत गेला, तसतशी लोकांमध्ये असुरक्षितता वाढत गेली. त्या असुरक्षिततेचा गैरफायदा घेत अनेक वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटले. अनेक अवैज्ञानिक उपचारांच्या जाहिरातींना सुरुवात झाली. कुणी गोमूत्र पार्टी केली, तर कुणी सार्वत्रिकरित्या गोवर्‍यांचा धूर केला व करण्याचे सल्ले दिले. अनेक बुवा-बाबा, महाराज, त्यांचे चेले लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले.

एकीकडे, जगभर शास्त्रज्ञ अहोरात्र कष्ट उपसत ‘कोविड-19’वर लस शोधण्याच्या कामात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे बुवाबाजी करणारे संधी समजून पुढे सरसावले आहेत. खरं तर संपूर्ण देशभरात बुवा-बाबांनी आपली ‘दुकानदारी’ जोरदारपणे थाटली आहे. कधी प्रत्यक्ष चमत्कार दाखवून, तर कधी अध्यात्माच्या नावावर सामान्यपणे असंभव, अशक्य वाटणार्‍या घटनेस व कृतीस चमत्कार म्हटले जाते. या घटना मानवी बुद्धीच्या मर्यादा ओलांडून जातात. म्हणून त्या अलौकिक समजल्या जातात. जनमानसांत त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य आणि जिज्ञासा असते. चमत्कार करणार्‍या व्यक्तीबद्दल लोकांमध्ये कमालीचा आदर, पूज्यभाव आणि श्रेष्ठत्वाची भावना असते; परंतु अनेक बुवा-बाबा कोणताही चमत्कार करत नाहीत, तरीही अशा लोकांच्या मागे लोकांचा समुदाय असतो. ‘जेथे विज्ञान संपते, तेथे अध्यात्म सुरू होते,’ हे वाक्य आवर्जून वापरणारे, आध्यात्मिक यशस्वी जीवन हेच जीवनसार्थक आहे, असा डांगोरा पिटणारे अनेक आध्यात्मिक (?) बुवा-बाबा, माता कार्यरत आहेत. लोकांची असहाय्यता, असुरक्षितता, अज्ञान, अंधश्रद्धा हेच यांचे भांडवल आहे.

‘कोविड-19’चा प्रसार रोखण्यासाठी शासनही प्रयत्नात आहे. विषाणू पसरू नये, तो नष्ट व्हावा, म्हणून वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर पाळणे, समूहाने एकत्र न येणे, यासाठी जाहिरात, सूचना व प्रत्यक्ष अंमलबजावणीचा भाग म्हणून लॉकडाऊनचा आदेश लागण झालेल्या लोकांवर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय ही सर्व आरोग्य यंंत्रणा रात्रंदिवस राबून उपचार करत आहे. हे सर्व सुरू असतानाच गोमूत्र पार्टीसारखे फंडे तर आले; परंतु उपचारासंबंधात अनेक अफवा पसरू लागल्यावर त्या उपचारांवर विसंबून लोकांचे बळी जाऊ नये, म्हणून शासनाने त्या संबंधात खास पत्रक काढून उपचारासंबंधात भ्रामक, चुकीच्या गोष्टी पसरविणे गुन्हा मानण्यात आला आहे. असे असतानाही जनतेच्या असुरक्षित मानसिकतेचा गैरफायदा उठवत वेगवेगळ्या नावांनी अनेक आध्यात्मिक बुवा-बाबांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. जनतेच्या असुरक्षिततेच्या काळात खरं तर त्यांना जीवनावश्यक गरजांबरोबर खरा मानसिक आधार व गरज पडल्यास वैद्यकीय उपचारांची गरज आहे; परंतु ‘स्वामी समर्थ’सारख्या संस्था व त्यांचे चालक त्यांच्या चाहत्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी, कोरोनाला पळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धातूचे दिवे, वेगवेगळ्या तेलांचे दिवे लावण्याचा सल्ला देतात, वेगवेगळे जप करण्यास सांगतात, गायीच्या गोवर्‍यांचा धूर करण्यास सांगतात; तर संभाजी भिडेंसारखा गुरू (…?) गायीच्या तुपाचा व गोमूत्राचा वापर कोरोनाबाधित रुग्णावर करायला सांगतो.

गजानन महाराजांचा भक्त असलेला गोव्यातील शालेय शिक्षक महेश देवगेकर हा सांगतो की, गजानन महाराज मला गेल्या आठ वर्षांपासून दिव्य दर्शन देतात. महाराजांनी मला दिव्य दर्शन देऊ सांगितले की, लिंबू आणि आल्याचा रस, बडीशेप, लसणाच्या पाकळ्या व कारल्याचा रस हे एकत्र तीन दिवस घेतल्यास कोरोनाबाधित रुग्ण बरा होईल. सहाव्या दिवशी व्यक्ती पूर्ण बरी होईल आणि खेदाची बाब म्हणजे या अशा हास्यास्पद गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोकही आपल्याकडे आहेत. त्यात समावेश आहे आपले केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक. त्यांनी केंद्रीय मंत्रालयाकडे वैज्ञानिक मान्यता देण्यासाठी हे सूत्र पाठविणार असल्याचे सांगितले. खरं तर गृह मंत्रालयाने कोरोनासंबंधात फसव्या उपचारांचा प्रचार-प्रसार करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधात 1 एप्रिल 2020 रोजी आदेश काढला असताना प्रत्यक्ष कारवाई मात्र होत नाही. परंतु अप्रत्यक्षपणे फसव्या उपचारांना व भोंदूगिरीला मान्यता दिली जाते आहे.

शास्त्रज्ञ अहोरात्र कोरोनावरील उपचाराबाबत संशोधन करत आहेत. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल. आवश्यक ती खबरदारी, औेषधोपचार, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. त्यांच्या कामाचे चीज नक्कीच होंईल. यापूर्वीही भारतात प्लेगसारख्या साथीच्या आजाराने हजारो लोकांचा बळी घेतला होता. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. मानवी आयुष्यात वारंवार अनेक संकटे येत असतात. काही नैसर्गिक असतात, तर दुसर्‍या महायुद्धासारखे मानवनिर्मित असते. परंतु या सर्व संकटांवर माणूस मात करीत पुन्हा सुरळीत आयुष्य जगत मानवी विकास साधत आला आहे. परंतु ही सर्व विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोनाची किमया आहे. अनेक आपत्ती, संकट दूर सारत माणूस ताठ मानेने पुन्हा उभा राहतो; परतुं माणसावर आलेले संकट, आपत्ती, निर्माण झालेले प्रश्न या गोष्टींचा गैरफायदा उठवत स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न करणार्‍या अपप्रवृत्ती नेहमीच संधी साधत आपली ‘दुकानदारी’ वाढवतात. कोरोनासारखी महाआपत्ती येण्यापूर्वी या अध्यात्माचा बाजार मांडणार्‍या, चमत्कार करणार्‍या किंवा भविष्याचे कोडे उलगडून सांगणार्‍या या सर्वच शक्क्ती होत्या कुठे, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेने त्यांना विचारायलाच हवा. त्यांना जर सर्वच समजते, तर येणार्‍या संकटाची चाहूल यांना लागली नव्हती का? कर्नाटकातील एका 11 वर्षांच्या मुलाने कोरोनाबाबत भविष्य वर्तविले होते, असा सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत होता. त्या व्हिडिओबाबत पडताळणी झाली असता तो व्हिडिओ पूर्णपणे असत्य असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नष्ट झाल्यानंतरही जनजीवन सुरळीत होण्यासाठी मोठा कालावधी जाईल. उद्योगधंदे, नोकरी-व्यवसाय, दळणवळण या सर्वच गोष्टी पूर्वपदावर येता-येता काही उणिवा जाणवतील. दरम्यानच्या काळात मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. याच काळात आध्यात्मिक बुवाबाजीचे पीक फोफावण्याची दाट शक्यता आहे. भारतीय समाजात बुवाबाजीचे स्वरूप हे महाभयानक आहे. चमत्कार करणार्‍या बुवा-बाबा, मातांबरोबरीने आध्यात्मिक बुवाबाजीनेही जोर धरला आहे. रामरहीम, आसाराम यांसारखे भोंदू गजाआड केले आहेत; परंतु तरीही जनमानस बदलत नाही, असे दिसते आहे. चमत्कार न करणारे बाबा अथवा महाराज परमार्थ, ईश्वरभक्ती, ईश्वरप्राप्ती, ब्रह्मज्ञान या नावाने भोंदूगिरी करत असतात, लोकांना भुलवत असतात. या भोंदूंकडे मोठ्या प्रमाणात लोक जातात. त्या सर्वांना बाबा, महाराज, माताजी हे आपले तारणहारच वाटतात. अशा प्रकारची भोंदूगिरी आज समाजात वाढताना दिसत आहे. अनेक आध्यात्मिक बुवा-बाबा, माता लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. या आध्यात्मिक बुवांच्या पावलावर पाऊल ठेवून काही राजकारणीही मन मानेल, तशी अवैज्ञानिक व फसवी वक्तवे करत आहेत. परवाच, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन या म्हणाल्या की, ‘महामृत्युंजय’ मंत्र जपणे व गोमूत्र प्राशन केले, तर कोरोनासारख्या आजारातून मुक्ती मिळेल. भारतीय संविधानाच्या विरोधात व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेली अशी अवैज्ञानिक व बेकायदेशीर वक्तव्ये लोकसभेच्या अध्यक्षासारखी व्यक्ती करत असेल, तर बुवाबाजीला नक्कीच बळ मिळेल. या राजकीय व्यक्तीवर खरं तर ताबडतोब गुन्हे दाखल होणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. त्यामुळेही या व्यक्तींना अप्रत्यक्षपणे समर्थन मिळते.

चमत्कार दाखवून जनतेची लुबाडणूक करणारे, समाजात दहशत निर्माण करून फसवणूक करणार्‍या बुवाबाजीविरोधात जादूटोणाविरोधी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक व अन्य राज्यांतूनही या कायद्याची मागणी झाली. कर्नाटकात त्या मागणीला यश आले; परंतु आध्यात्मिक बुवाबाजीबाबत मात्र देशपातळीवर असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. परंतु ड्रग्ज अ‍ॅन्ड मॅजिक रेमेडिज अ‍ॅक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट, आपत्ती व्यवस्थापन अ‍ॅक्ट या कायद्यानुसार सद्यःपरिस्थितीत या बुवा-बाबा, माताजी व अन्य कोरोनाविषयी भ्रम निर्माण करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो; परंतु कोरोनासारख्या आजारावर मात करण्यास शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमातून यश येईल. परंतु त्यानंतरच्या काळातही समाजात पसरलेली असुरक्षिततेची भावना, अनेकांचे गेलेले रोजगार, बुडलेले धंदे, आर्थिक मंदी या कारणांमुळे विस्कळीत झालेले समाजजीवन पूर्वपदावर येण्यास खूप मोठा कालावधी जाणार आहे. ते प्रयत्नातून सहजशक्य आहे. त्यासाठी माणसाला उपयोगी पडेल, त्याची चिकाटी, विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन. अवैज्ञानिक दावे करून समाजाची फसवणूक करणार्‍या बुवाबाजीवर विश्वास न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करत संकटावर मात करत पुन्हा उभे राहणे, यातच आपले हित आहे.