राजीव देशपांडे -

२०२४ हे वर्ष रशिया युक्रेन युद्ध, इस्त्रायलकडून गाझामध्ये होत असलेला निष्पापांचा नरसंहार, मणिपूरमधील हिंसाचाराने जसे ग्रस्त होते, तसेच जगभरातच निवडणुकांचे वर्ष म्हणून गाजत आहे. नुकत्याच अमेरिका, शेजारील श्रीलंका येथील निवडणुका पार पडल्या. तसेच भारतातही जूनमध्ये सार्वत्रिक आणि हा वार्षिक अंक प्रसिद्ध होत असताना नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही पार पडली. इतर देशातील निवडणुकांचा मुद्दा आपण बाजूला ठेवू; पण महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराची सुरुवातच ‘बटेंगे तो कटेंगे’सारख्या हिंसाचारी घोषणांनी झाली आणि मग इतर सर्व भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या सारखे जनतेच्या जीवनमरणाचे प्रश्न मागे पडत निवडणूक प्रचार फक्त मुस्लीम समाजाविरोधात धार्मिक द्वेष पसरवण्याभोवती केंद्रित झाला. एखाद्या समाजाविरोधात काल्पनिक, अर्धसत्य, खोट्या घटनांतून भीती निर्माण करायची आणि त्या भीतीचा प्रचार आपल्या ताब्यात असलेल्या प्रसारमाध्यमातून प्रचंड प्रमाणावर करत धार्मिक द्वेष निर्माण करायचा व मतांचे ध्रुवीकरण करत आपली पोळी भाजून घ्यायची, अशी एक निवडणूक प्रचाराची पद्धतच काही पक्षांनी तयार केली आहे. त्याचा पुरेपूर वापर विवेकी सुसंस्कृत भाषेच्या सर्व मर्यादा ओलांडत या निवडणुकीत केला गेला. या सर्वांचा परिणाम समाजजीवनात एक प्रकारचे अवैज्ञानिक, अविवेकी, असुरक्षित, जाती, धर्मात दुभंगलेले वातावरण निर्माण करण्यात होत आहे व त्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेच्या विकासाची गती, प्रगतीच रोखली जात आहे. याचे ‘भान’ही या उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय विकासाचे हितसंबंध सांभाळणार्या राजकीय पक्षांना असणे केवळ अशक्य आहे.
पण हे ‘भान’ न सोडणारे अनेक तरुण आज प्रत्येक धर्मात कार्यरत आहेत. ते त्यांचे धार्मिक जीवन आणि त्याच्याशी संबंधित वर्तन त्यांच्या चिकित्सक नजरेतून पाहत आहेत आणि त्यात बदल व्हावा यासाठी विधायक काम करत आहेत. आजच्या या इतर धर्मांबद्दलच्या द्वेषपूर्ण वातावरणात ही प्रक्रिया कशी प्रत्यक्षात येत आहे, याबद्दल प्रत्यक्ष उदाहरणे देऊन इस्लाम, ख्रिस्ती, बौद्ध, लिंगायत, जैन धर्मातील तरुणांनी त्या त्या धर्माच्या विधायक आणि कृतिशील धर्मचिकित्सेचे परिसंवादात केलेले विवेचन वाचकांना नक्की भावेल.
तमिळनाडूतील द्रविड कळघम या सामाजिक चळवळीचे भारताच्या सामाजिक इतिहासात खूपच महत्त्व आहे. तिचा केवळ दक्षिणेतील समाजकारण किंवा राजकारण यावरच प्रभाव पडला असे नव्हे तर, संपूर्ण भारतभरातील पुरोगामी चळवळीवर प्रभाव पडलेला आहे. त्या चळवळीचा अंनिवाच्या टीमने प्रत्यक्ष तेथे जाऊन भेटी देऊन, मुलाखती घेऊन लिहिलेला रिपोर्ताज अंनिसच्या कार्यकर्त्यांना आणि अंनिवाच्या वाचकांना नक्कीच स्फूर्ती देऊन जाईल.
टेलिपथीभोवती अद्भुततेचे आणि चमत्काराचे वलय आहे. या टेलिपथीच्या पुनरुत्थानाचा महत्त्वाकांक्षी प्रयोग प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी हाती घेतला आहे, त्याबद्दल लिहीत आहेत शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी. आजकाल अनेक बुवा बाबा सीलिंग फॅन थांबविण्यासारखे चिल्लर चमत्कार करत सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी मिळवत आहेत, अशा बाबाबद्दल विजय रणदिवे यांनी लिहिलेला लेख वाचकांच्या माहितीत नक्कीच भर घालेल.
अंनिवाच्या प्रसारासाठी झटणारे धाराशीवचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत उळेकर गुरुजी यांचा जीवनप्रवास अंनिसच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल. प्रसिद्ध कवयित्री निरजा यांच्या कविता वाचकांच्या संवेदनशीलतेला नक्कीच साद घालतील.
जानेवारी २०२५ ला नवी दिल्ली येथे होणार्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नाटक, कला, साहित्य, स्त्रीजीवन यांचा लोकसंस्कृतीच्या अंगाने सांस्कृतिक भक्तिभाव बाजूला सारत आढावा घेणार्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासक ताराताई भवाळकर यांची निवड झाली. ताराताई भवाळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी अगदी सुरुवातीपासून जोडलेल्या आहेत. त्यामुळे ताराताईंची अध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमित्ताने अंनिवाच्या वार्षिक अंकासाठी मुलाखत घेणे साहजिकच होते. ताराताईंनीही अतिशय व्यग्र असूनही लोकसंस्कृतीच्या अंगाने श्रद्धा-अंधश्रद्धा, रूढी—परंपरा यांचे नाते सांगणारी ही प्रदीर्घ मुलाखत अंनिवासाठी मुक्ता दाभोलकर आणि नीलम माणगावे यांना दिली. ही मुलाखत म्हणजे या वार्षिक अंकाचे एक प्रमुख आकर्षण आहे. अंनिवाच्या वाचकांसाठी ही एक बौद्धिक मेजवानीच आहे.
अंनिवाच्या या वार्षिक अंकात लिहिणारे लेखक, चित्रकार, वार्तापत्राचे हितचिंतक, देणगीदार, जाहिरातदार, वार्तापत्रासाठी अतिशय कष्टाने देणग्या, वर्गणीदार, जाहिराती गोळा करून आर्थिक भार सांभाळणारे चळवळीतील कार्यकर्ते, वार्तापत्राच्या कार्यालयातील सर्व सहकारी या सर्वांचे संपादक मंडळातर्फे मन:पूर्वक आभार! अंनिवाचा हा वार्षिक अंक सर्वांच्या पसंतीस उतरेल अशी आशा व्यक्त करतो.