डॉ. प्रगती पाटील -
वरील छायाचित्र आहे दक्षिण कोरियातील एका धर्मगुरुचे. शिंकोंजी (shincheonji) चर्चचा हा 88 वर्षांचा प्रमुख धर्मगुरू आपले वय, पद यांचा अहंभाव दूर सारून पश्चातापदग्ध होऊन जनतेची माफी मागतोय. असा कुठला गुन्हा घडलाय त्याच्या हातून? सार्या जगाला दहशत घालणार्या र्लेींळव 19 (कोरोना वायरस) ला कोरियात पसरविण्यात त्याच्या धार्मिक पंथाचा सिंहाचा वाटा आहे. कोरियात जे 4000 पेक्षा अधिक कोरोना वायरसबाधित रुग्ण आहेत त्यापैकी 50% अधिक रुग्ण त्याच्या धार्मिक पंथाचे आहेत. याचाच अर्थ असा की याच्या पंथामध्ये (सार्वजनिक स्वच्छतेचे निकष न पाळता) जे धार्मिक कार्यक्रम झाले त्यातून कोरोना वायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. कोरियात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तो फैलावू नये यासाठी सरकारकडून ज्या सूचना नागरिकांना दिल्या त्यांचे पालन त्याच्या पंथाच्या लोकांनी केले नाही आणि त्याची विषफळे आता पूर्ण देशाला चाखावी लागत आहेत. (भारतात जसे गोबर आणि गोमूत्रामुळे सर्व आजार बरे होतात असे मानणारे लोक आहेत तशीच काहीशी वेगळ्या प्रकारची अवैज्ञानिक धारणा त्याच्या पंथाची असेल आणि त्यामुळेच त्यांनी नियमांचे पालन न करता सार्वजनिक प्रार्थना वगैरे आयोजित करून विषाणू पसरवला असेल). आता हा मनुष्य पश्चातापदग्ध आहे, पण त्याचा विलाप मेलेल्यांचे प्राण परत आणू शकतो का? एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवारातील ज्या अनेकांची जीवने उद्ध्वस्त होतात ती तो सावरू शकतो का? भारतातही कोरोनाचा शिरकाव झालाय आणि लोकसंख्येचा भस्मासूर झालेल्या, सार्वजनिक नियम, स्वच्छता न पाळणार्या समाजात ही वस्तुस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
मास्क वापरणे तर फार दूरची गोष्ट, पण येथे सर्दी खोकला झालेले (साक्षर-निरक्षर सर्वच) लोक शिंकताना, खोकताना चेहर्यासमोर साधा हातरुमालही न धरता बिनधास्तपणे समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर खोकतात. जेथे जागा मिळेल तेथे थुंकतात. Isolation चे महत्त्व कितीही सांगितले तरी जे लोक आपल्या गोवर, कांजण्या झालेल्या बालकांना (अथवा प्रौढ माणसांना) घेऊन सर्वत्र सहजगत्या वावरतात ते quarantine चे महत्त्व उमजून त्याचे पालन करतील? त्यातच आपल्या समाजात फोफावणारे हे छद्मविज्ञान (pseudo science). अग्निहोत्र, गोमूत्र, गोबराने सारे आजार बरे होण्याचे अचाट, अशास्त्रीय दावे करणारे झोलाछाप, लबाड भोंदू, त्यावर चटकन विश्वास ठेवणारे भोळसट, बावळट लोक, सोशल मीडियावरून जाणता-अजाणता पसरणार्या अफवा… आपले एकंदर सामाजिक अज्ञान, आरोग्यविषयक अनास्था किती गंभीर आहे आणि ते आपल्याला किती महागात पडणार याची आपल्याला कल्पना आहे का? कोरियातील हा धर्मगुरू निदान जाहीर माफी मागतोय, पण आपल्याकडील मस्तवाल, निर्ढावलेले नेते, धर्मगुरू, बोगस डॉक्टर्स कुणाचीही माफी न मागता आपलंच घोडं पुढे दामटत लोकांच्या जीवाशी खेळत राहतील.
परिस्थितीचे गांभीर्य वेळीच ओळखून लोकांनी सार्वजनिक जागेवर गर्दी करणे टाळायला हवे. मुलांना शाळेसाठी आणि प्रौढांना रोजगारासाठी घराबाहेर जावेच लागेल. पण त्याव्यतिरिक्त नको त्या कारणाने नको तेथे जमावडा टाळायला हवा. सर्दी खोकला झालेल्या रुग्णांनी मास्क वापरायला हवेत आणि केमिस्टकडून गोळ्या घेण्याचा शॉर्ट कट महागात पडण्याअगोदर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायला हवेत. योग्य आहारविहार, व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणावाचे व्यवस्थापन याद्वारे आपली रोगप्रतिकारकशक्ती (immunity) वृद्धिंगत करायला हवी. आणि काहीच करता येत नसेल तर किमान सोशल मीडियाद्वारे तुमच्या छद्मविज्ञानाचे तुणतुणे वाजवू नका. दिवस (विषाणू) वैर्याचे आहेत. सावध रहा..