तिमिरभेद : धांडोळा मुस्लिम अंधश्रद्धांचा

अनिल चव्हाण -

डॉ. शमशुद्दीन तांबोळी संपादित, ‘तिमिरभेद’ हे पुस्तक नुकतेच ‘शम्स पब्लिकेशन्स’ने प्रसिद्ध केले आहे.

डॉ. तांबोळी हे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, विद्यमान अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक आणि सेवानिवृत्त उपप्राचार्य आहेत.

मुस्लिम समाजात प्रबोधनाचे वारे वाहावेत, या समाजात आधुनिकता, धर्मनिरपेक्षता आणि संवैधानिक मूल्यांचा प्रसार आणि अंगीकार व्हावा, यासाठी हमीद दलवाई यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसमवेत २२ मार्च १९७० रोजी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली. तत्पूर्वी, १९६८ मध्ये प्रा. अ. वि. शाह यांच्यासमवेत ‘इंडियन सेयुलर सोसायटी’ची स्थापना केली होती. हमीद दलवाई यांच्या निधनानंतरही ‘इंडियन सेयुलर सोसायटी’ आणि ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ंने धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून लेखन, निवेदन, व्याख्याने, शिबिरे, मेळावे आयोजित केले. या कार्यक्रमात बुद्धिप्रामाण्यता, विवेक आणि विज्ञानवादाचा सातत्याने समावेश होता.

हिंदू समाजात चार्वाकांपासून गाडगेबाबा, दाभोलकर यांच्यापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाची मोठी परंपरा आहे, तरी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत.

मुस्लिम समाजातील अंधश्रद्धांविषयी फारशी चर्चा होत नाही, असा एक आक्षेप घेण्यात येतो. ‘मुस्लिम सत्यशोधक’ याला अपवाद आहे. मंडळाने सातत्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाठपुरावा आणि प्रसार केला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून बकरी ईदनिमित्त रक्तदान अभियान राबवून विज्ञान आणि विवेकाचा संदेश मंडळ देत आहे. मंडळाने स्वतंत्र असे विभाग – मंच – तयार केले आहेत. यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ‘तिमिरभेद मंच’ कार्यरत आहे. या मंचाच्या कार्यकर्त्यांनी काही विषय निवडून त्यावर लेखन केले. त्यांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.

तिमिर म्हणजे अंधार. तो नष्ट करायचा तर त्यासाठी सत्य हवे. सत्य शोधणे म्हणजेच तिमिर दूर करणे. म्हणून पुस्तकाला ‘तिमिरभेद’ हे नाव दिले आहे.

पुस्तकात दहा लेखकांचे तेरा लेख समाविष्ट केलेले आहेत. पुस्तकाला लोकेश शेवडे यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘तिमिरातून तेजाकडे’ या लेखात डॉ. शमशुद्दीन तांबोळी म्हणतात, प्रत्येक गोष्टीला त्या-त्या काळात काही अर्थ आणि उपयुक्तता असते. त्यामुळे त्या अस्तित्वात येतात; पण आज त्याची उपयुक्त आहे का, हे तपासले पाहिजे.

ज्या समाजाने विज्ञानाचा आधार घेऊन टिकाऊ आणि टाकाऊ फरक केला, तो समाज प्रगतिपथावर गेला. एके काळी ‘अजान’चा आवाज लोकांना पवित्र वाटायचा. त्या आवाजात मुस्लिमेतरांना गोडवा जाणवायचा. आज तो इतरांना कर्कश वाटत असेल किंवा ध्वनिप्रदूषणास कारणीभूत वाटत असेल, तर बदललेल्या परिस्थितीत त्याची योग्यायोग्यता तपासली पाहिजे. त्याचबरोबर व्यक्तिगत पातळीवर एखादी कृती दुसर्‍यांच्या हितसंबंधाला उपद्रव करीत नसेल तर अशा कृतीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये.

जगात अस्तित्वात आलेले धर्म आणि धर्मसंस्थापक त्या-त्या काळातील समस्या सोडविण्याच्या हेतूने प्रेरित होते. प्रस्थापितांच्या विरोधातील हे एक बंड होते, म्हणून प्रस्थापितांनी अशा प्रेषित आणि धर्मसंस्थापकांचा छळ केला आहे.

‘कुराण’ आणि ‘हादीस’ हे इस्लामचे मूलाधार आहेत. हे मूलाधार सर्वकाळ सत्य आहेत, अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे. तिला अंधश्रद्धा म्हणून संबोधले तर तो ‘काफर’ किंवा धर्मद्रोही ठरवला जातो.

भारतातील बहुसंख्य म्हणजे जवळपास ९० टक्के मुसलमान हा स्थानिक जाती-जमातीतून धर्मांतरित झालेला आहे. यातील बहुसंख्य मुस्लिम हिंदू आहेत आणि हिंदू समाजातील अनेक अंधश्रद्धा मुस्लिम समाजाकडून पाळण्यात येतात.

मुस्लिम अंधश्रद्धा या दुसर्‍या लेखात ते म्हणतात – ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात मोठे योगदान देणारे डॉ. दाभोलकर यांनी मला ‘मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा’ या विषयावर अभ्यास करण्याचे सुचवले होते. त्यानुसार मी या विषयाकडे वळलो आणि लेख लिहिले. मुस्लिमांमधील अनेक अंधश्रद्धांचा त्यांनी या लेखांमध्ये ऊहापोह केला आहे.’ ‘हिजाबचा हिसाब’ या लेखात त्यांनी ‘हिजाबबंदी’वरील वादाचे मोहोळ कसे वाढले, याचा उहापोह केला आहे. प्रा उम्मीद शेख ‘अंधश्रद्धांची चिकित्सा’ या लेखात म्हणतात, श्रद्धा हा जसा धर्माचा अविभाज्य भाग आहे, तसा अंधश्रद्धाही प्रत्येक धर्माचा अविभाज्य भाग आहे.

‘कुर्बानी’बद्दल ते म्हणतात, गोरगरिबांना अन्नदान करण्यासाठी बकरीची कुर्बानी दिली जात नाही; ती दिली जाते, ती फक्त अल्लाहला खूष करण्यासाठी. पण अल्लाह प्राण्यांच्या बळीने खूष होत नाही. ‘कुराणा’त म्हटले आहे की, बळी दिलेल्या प्राण्याचे मांस अल्लाहपर्यंत पोचतच नाही. मग असे असताना अल्लाहच्या नावावर प्राण्यांचा बळी देणे ही अंधश्रद्धा नव्हे काय? प्राण्यांची कुर्बानी देण्यापेक्षा त्याग आणि समर्पण या मूल्यांची महती सांगणारा दिवस, म्हणून बकरी ईद साजरी करता येईल. त्या दिवशी गरजेनुसार इतर अनेक विधायक पर्याय सुचवता येतील. जसे की रक्तदान, नेत्रदान किंवा देहदान. समाजातील गोरगरिबांना आर्थिक मदत करणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, शैक्षणिक उपक्रम राबवणे इत्यादी. बकरी ईदच्या कुर्बानीला असा नवा अर्थ देण्याचा प्रयत्न मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या दहा वर्षांपासून करत आहे.

‘उगम आणि प्रसार’ या लेखात युसूफ शेख म्हणतात, ‘मुळात धर्म हीच एक अंधश्रद्धा आहे. ज्या नदीच्या उगमाजवळच अंधश्रद्धेचा मोठा डोह आहे, त्या नदीला नंतर फुटणार्‍या उपनद्या वेगळ्या काय असणार आहेत?’ सर्वच धर्मांत बुवाबाजी आणि भूत-पिशाच या अंधश्रद्धा आहेत. पण याशिवाय इस्लाममध्ये खास अशा अंधश्रद्धा आहेत. सामान्य माणूस या धर्माविषयी कसलीही शंका-कुशंका व्यक्त करू शकत नाही. कुराणाविरुद्ध ब्र ही उच्चारू शकत नाही. समाजातील सुशिक्षित लोकही यापासून मुक्त नाहीत. या अंधश्रद्धांना भूगोलाच्या सीमा लागू नाहीत. दूरवरच्या खेड्याप्रमाणेच अमेरिकेतल्या मुस्लिमांमध्येही अशा अंधश्रद्धा दिसून येतात. मुस्लिम समाज अगोदरच शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. आधुनिक जगात वावरण्याकरिता जे शिक्षण आवश्यक आहे, त्यापासून तो वंचित आहे. धार्मिक शिक्षणाच्या प्रभावाखाली आहे. मुला-मौलवी आपले पोट भरण्याकरिता त्यांना अज्ञानीच ठेवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून जोपर्यंत मुस्लिम धर्मात शिक्षणाचा प्रसार सर्वदूर होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मनावरील अंधश्रद्धांचा पगडा दूर होणार नाही.

बेनझीर काझी यांनी अंधश्रद्धांच्या विळख्यातील धार्मिक सणांची माहिती दिली आहे. त्या म्हणतात, ‘अलिकडे सणांचा ‘बाजार’ झाला आहे. इफ्तार पार्ट्यांचे स्तोम माजले आहे. लहान मुले, वृद्ध माणसे; तसेच विविध व्याधी असणारे रमजानचा रोजा ठेवतात. त्यामुळे शारीरिक तक्रारी वाढतात. अनेकांचा मृत्यू होतो. पण त्यांना ‘जन्नत’ हासील झाली, असे समजतात. या सणांच्या काळात महिला वर्गाचे फार हाल होतात. त्या आजारी पडतात. याकडे गांभीर्याने पाहावे.’

मोहरम हा निषेध करायचा सण आहे. आपण भांडणे, राग, द्वेष वाईट गोष्टींचा निषेध करावा. अल्ताफ हुसेन नबाब यांनी ‘सुंता’संबंधी विविध अंधश्रद्धांचा ऊहापोह त्यांच्या लेखामध्ये केला आहे. अफरोज इनामदार यांनी, ‘तहारत’ या लेखामध्ये त्यासंबंधीच्या अंधश्रद्धा सांगितल्या आहेत. ‘तहारत’ ठेवणे म्हणजे दरवेळी मूत्रविसर्जन केल्यानंतर ‘ती’ जागा पाण्याने धुणे. ती स्वच्छता जर पाळली नाही तर आपण नमाजपठण, कुराणपठण किंवा इतर कोणत्याही धार्मिक विधीमध्ये भाग घेऊ शकत नाही.

याबाबतीतल्या समस्या म्हणजे अस्वच्छ पाणी व अस्वच्छ स्वच्छतागृहे वापरल्याने पसरणारी रोगराई आणि गुप्तांगाची जागा ओली राहिल्यामुळे होणारे त्वचारोग.

अल्ताफ हुसेन नवाब यांनी ‘बुरखा’ हा लेख लिहिला आहे. याशिवाय ‘मुस्लिम स्त्रियांमधील अंधश्रद्धा आणि परंपरा’ हा यदुनाथ थत्ते आणि ‘धर्म ः अंधश्रद्धा आणि तुम्ही-आम्ही’ या पु. ल. देशपांडे यांच्या लेखांचाही समावेश पुस्तकात करण्यात आलेला आहे.

विषयाला साजेसे मुखपृष्ठ पुस्तकाला असून १०२ पानांच्या पुस्तकाचे मूल्य फक्त रुपये १५०/- ठेवण्यात आलेले आहे. या पुस्तकास मा. कमलताई विचारे यांजकडून त्यांचे सासरे सत्यशोधक केशवरावजी विचारे यांच्या स्मरणार्थ अर्थसाह्य प्राप्त झाले आहे.

पुस्तकासाठी संपर्क : प्रा. शमशुद्दीन तांबोळी

फोन : ९८२२६ ७९३९१


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]