रुपाली आर्डे-कौरवार -

जातीय अत्याचारांच्या विरोधातील संघर्षांचा मार्ग
आधुनिक भारताच्या इतिहासात जातिव्यवस्थेविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह तसेच नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह यांना जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात जातिव्यवस्थेविरोधात झालेल्या संघर्षात केरळमधील त्या वेळच्या त्रावणकोर संस्थानातील ‘वायकोम’ या छोट्याशा गावी मंदिराभोवतीच्या रस्त्यावरून दलितांना वावरण्यास किंवा जाण्या-येण्यासही असलेल्या बंदीच्या विरोधात झालेला सत्याग्रह हाही अतिशय महत्त्वाचा आहे. या सत्याग्रहाला त्या अर्थाने नेतृत्व नव्हते. तो स्वयंस्फूर्त होता. हा सत्याग्रह ३० मार्च १९२४ ते २३ नोव्हेंबर १९२५ पर्यंत तब्बल ६०३ दिवस चालला. या सत्याग्रहाला ३० मार्च २०२४ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने केरळ आणि तमिळनाडू सरकारने १ एप्रिलला वर्षभर चालणार्या वायकोम सत्याग्रहाच्या शताब्दी समारंभाची सुरुवात केली आहे.
वायकोम येथील या शिवमंदिराची सुरुवात दुसर्या शतकाच्या सुरुवातीस झाल्याचे मानले जाते. हे मध्य केरळमधील प्रमुख ब्राह्मणी मंदिरांपैकी एक मंदिर जरी असले तरी, त्या मंदिराला केरळमधील इतर ब्राह्मणी मंदिरांच्या तुलनेत दुय्यमच मानले जात होते. जेथे दक्षिणा भरपूर मिळे आणि भजनासाठी लोक येत, तीच देवळे महान व पवित्र मानली जात. इतर मंदिरांप्रमाणे वायकोमलाही अस्पृश्यांना प्रवेश नव्हताच. उलट मंदिराच्या आसपासचे मार्ग फक्त राजघराण्यातील लोक आणि ब्राह्मणांनाच खुले होते, दलितांना त्यावरून वावरण्यास तसेच येण्या-जाण्यासही बंदी होती; पण त्या भागात ब्राह्मणेतरांची लोकसंख्या खूपच जास्त होती. जसेजसे रोख पैसे देणार्या पिकांची शेती वाढू लागली तसतसे तेथील ब्राह्मणेतर जातीचा सामाजिक-आर्थिक स्तरही वाढू लागला. परिणामी, सवर्ण-अवर्ण यात संघर्षही होऊ लागला.
सन १८०६ मध्ये प्रथमच इझवा या दलित जातीच्या २०० युवकांनी वायकोम मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी वेलूथप्पी हा त्रावणकोरचा प्रधानमंत्री होता. त्याचा जवळचा साथीदार वैकाथू पद्मनाभ पिलाईच्या नेतृत्वाखाली त्या नि:शस्त्र २०० दलितांवर शस्त्रानिशी हल्ला करण्यात आला, त्यात अनेक इझवा युवक जखमी झाले, तर कित्येक मृत्युमुखी पडले; पण त्यानंतर मंदिर प्रवेशाची मागणी घेऊन कोणतीही घटना घडल्याचा पुरावा नाही किंवा मंदिर प्रवेशाची मागणी पुढे आली नाही. मात्र मंदिरांच्या भोवतालच्या रस्त्यावरून येण्याजाण्यास दलितांना जी बंदी होती त्याबाबत मात्र प्रचंड असंतोष होता.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मल्याळी कवी आणि समाजसुधारक कुमारन आशान, कुनजू पन्नीकर, कोचू कुंजन सन्नार या इझवा समाजाच्या तिघांनी मिळून अस्पृश्यांना सार्वजनिक रस्त्यांवरून चालण्याच्या अधिकाराची मागणी पुन्हा केली; पण धार्मिक रूढींच्या नावाखाली ती अमान्य करण्यात आली. १९२०-२१ साली आशान यांनी पुन्हा हीच मागणी त्रावणकोर विधानसभेत केली. या वेळेस त्यांना आश्वासन देण्यात आले; पण बराच काळ ते फक्त आश्वासनच राहिले.
याच काळात जातिप्रथा, अस्पृश्यताविरोध, रस्त्यावरून वावरण्याचे चालण्याचे, मंदिरात प्रवेश करण्याचे, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचे स्वातंत्र्य, सामुदायिक भोजन समारंभ, आंतरजातीय विवाह, शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी याबाबतच्या सामाजिक चळवळींनी त्रावणकोर आणि केरळच्या इतर भागांतही जोर धरला होता. दलित, ब्राह्मणेतर जातीबरोबर नायर, नंबुद्री सारख्या जातीतूनही संघटना निर्माण होऊ लागल्या होत्या. या जातीय संघटनांची वेगवेगळी उद्दिष्टे असली, तरी वरील मागण्या या सर्वांसाठी समानच होत्या. कारण यातील सर्वच जणांना कमी अधिक प्रमाणात त्यांची झळ पोहोचलेली होतीच. त्यातूनच मग वकील असणार्या व इझवा समाजाचे नेते असलेले टी. के. माधवन यांनी १९२३ च्या काँग्रेसच्या काकिनाडा अधिवेशनात अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला. जो मंजूर करण्यात आला. काँग्रेसने या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी कमिटी नेमत वायकोम सत्याग्रहाचे नेतृत्व काँग्रेसकडे घेतले.
‘देशाभिमानी’ या मल्याळी वर्तमानपत्राचे संपादक आणि काँग्रेसचे प्रमुख नेते जॉर्ज जोसेफ, मातृभूमीचे संपादक के. पी. केशव मेनन सारखे अनेक नेते या आंदोलनात सहभागी होण्यास उत्सुक होते. त्यांनी १२ मार्च १९२४ ला गांधींना आंदोलनाची सूचना दिली. गांधींनी आंदोलन अहिंसक पद्धतीने करण्याची परवानगी दिली आणि ३१ मार्च १९२४ ला आंदोलन चालू झाले. काही दिवसांतच प्रमुख नेत्यांना अटक झाली आणि आंदोलन करणार्यांना कुशल नेतृत्वाची गरज भासू लागली.
काँग्रेसचे प्रमुख नेते जॉर्ज जोसेफ यांनी त्या वेळच्या मद्रास काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेल्या पेरियार रामासामी यांना आंदोलनाचे नेतृत्व करण्यासंबंधी पत्र लिहिले. प्रश्न केवळ मंदिर प्रवेशाचा नव्हता, तर सार्वजनिक रस्त्यावरून चालण्यास दलितांना बंदी घालण्याचाही होता. नागरी स्वातंत्र्याचाही होता. पेरियारनी ताबडतोब होकार दिला आणि ते १३ एप्रिलला वायकोमला पोहोचले. तेथे पोहोचल्यावर जोरदार भाषण देताना ते म्हणाले, “अस्पृश्यांना मंदिराकडे जाणार्या रस्त्यावरून जाऊ दिले तर ते अपवित्र होतील. मी विचारतो, वायकोमचा देव किंवा ब्राह्मण केवळ अस्पृश्यांच्या उपस्थितीने अपवित्र होत असतील तर ते देवता नाहीत, तर फक्त एक दगड आहे. ज्याचा उपयोग मळलेले कपडे धुण्यासाठी केला पाहिजे.”
पेरियार यांच्या अशा भाषणांनी उत्तेजित झालेले लोक सत्याग्रहात हिरिरीने भाग घेऊ लागले. आंदोलनाला चहूबाजूंनी पाठिंबा मिळू लागला. संपूर्ण राज्यातून तसेच राज्याबाहेरूनही सत्याग्रहासाठी लोक वायकोमला येऊ लागले. एप्रिल ते सप्टेंबर या काळात पोलिसांनी बळाचा वापर करून परिसरात कडेकोट बंदोबस्त केला तरी, आंदोलनाची धग दूरवर पसरली. आंदोलकांनी मंदिराच्या तटबंदीच्या समोर बसून उपोषण सुरू केले. देशभक्तिपर गाणी गात, घोषणाबाजी करत आंदोलनाचे वातावरण तयार होत होते. त्या वेळच्या राष्ट्रीय माध्यमांनीही आंदोलनाची दखल घेतली. सरकारने धोका ओळखला आणि सहाव्या दिवशीच पेरियारना अटक झाली. महिनाभर जेलमध्ये आणि तेथून सुटल्यावर त्रावणकोरमधून हकालपट्टी करण्यात आली; पण पेरियारनी माघार घेतली नाही. त्यांच्या भाषणात काहीच फरक पडला नाही. त्यांना परत सहा महिन्यांची शिक्षा झाली. मद्रास काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी सोडले. सरकारने त्यांना दाबण्याचा भरपूर प्रयत्न केला; पण पेरियारनी वायकोम आंदोलनाला द्रविड अस्मितेचा मुद्दा बनवला. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली.
त्रावणकोरचा राजा अचानक गेला. राणीने वायकोम सत्याग्रह संपावा म्हणून पेरियार यांची मुक्तता केली. अखेर महात्मा गांधी मद्रासला आले. पेरियार यांच्याबरोबर बोलले व अखेर दलितांना चारपैकी तीन रस्त्यांवरून जाण्या-येण्यास परवानगी देण्यात आली व एक रस्ता ब्राह्मणांसाठी राखीव ठेवण्यात आलाच. पण गांधी आणि काँग्रेसबद्दल पेरियार यांच्या मनात अढी निर्माण झाली. तरीही कॉँग्रेसला कांचीपुरम आधिवेशनात पेरियार यांना ‘वायकोमचा हिरो’ म्हणून सन्मानित करावे लागले. ख्रिस्ती, मुस्लीम, पंजाबी असे सगळे या जातीय अत्याचारविरोधी सत्याग्रहात सहभागी होण्यास उत्सुक होते; पण गांधींनी ही बाब हिंदू धर्माच्या आंतरिक बाब मानली व या आंदोलनाची मागणी फक्त मंदिराभोवतालच्या रस्त्यांवरून जाण्या-येण्याचे स्वातंत्र्य देण्याची आहे, त्यामुळे ती इतरांची होऊ शकत नाही, असे नमूद करत त्यांना नाउमेद केले व देशभर पसरणार्या आंदोलनाला मर्यादित केले.
वायकोम सत्याग्रहाने काय दिले?
तर वायकोम सत्याग्रह केरळमधील लोकशाहीवादी राजकारणाचा दूत ठरला. शोषित जातींनी आधीच दिलेली मुक्तपणे वावर करण्याच्या अधिकाराची घोषणा या सत्याग्रहाने अधिकच बुलंद केली. शक्य तितका व्यापक सहभाग, पाठिंबा सामावून घेणारा संघटनात्मक ढाचा या सत्याग्रहाने विकसित केला आणि या सत्याग्रहात सहभागी होताना सवर्णातील काही विभागांनी आपल्या जातीच्या मर्यादा ओलांडल्या. या सत्याग्रहाने जातीय अत्याचारांच्या विरोधातील संघर्षांना मार्ग दाखवला जो देशभरातील अनेक संघर्षात वापरला गेला.