प्रिय डॉक्टर, तुम्ही आयुष्यात आल्यानंतरचं आयुष्य !

विशाल विमल - 7276559318

प्रिय डॉक्टर,

तुम्हाला स्मृतिदिनानिमित्त अभिवादन! हे सारं बोलताना वाईट वाटतंय. तुम्ही जाऊन आज सात वर्षेझाली. या सात वर्षांत थोरामोठ्यांनी तुमच्याबद्दल खूप काही बोललं, लिहिलं आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील तुमच्याबाबत बोलणं, हे अधिक संयुक्तिक होईल. डॉक्टर, मी तुमच्याबरोबर अर्थात विवेकवाहिनी, साधना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत गेली नऊ वर्षे काम केलं. आजही कमी-जास्त प्रमाणात आहेच.

मी नववीत असताना विपुल गोसावी या मित्राने मला तुमचं ‘ऐसे कैसे झाले भोंदू़?’ हे पुस्तक वाचायला सुचवलं. तोपर्यंत मी तुमचं नावही ऐकलं नव्हतं. त्याला कारण – ना वर्तमानपत्र वाचायची सवय, ना घरी टीव्ही, ना आजूबाजूला पुरोगामी लोकांचं वर्तुळ; त्यामुळं तुम्ही आणि तुमचं काम त्या वयात मला माहीत नसेल. तुमचं पुस्तक वाचून मी भारावून तर गेलोच; मात्र मला एक दिशाही मिळाली. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक प्रश्नांची उकल कशी करायची आणि त्यावर उपाय काय? या प्रश्नाभोवती विचार करण्यात मी माझे शालेय दिवस खूप खर्च केलेत. व्यसनाधिता कशी कमी करायची? गरिबीवर उत्तर काय? देव-धर्म करून खरंच माणूस सुखी होईल काय, असे प्रश्न मला पडायचे. या प्रश्नांवर राजकीय उत्तर हे गोलगोल असायचं. या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात मी वारकरी संप्रदाय, धननिरंकार, वामनराव पै, अण्णा हजारे, ग्राहक संरक्षण समिती, हॅप्पी थॉट्स, मराठा सेवा महासंघ या सगळ्यांच्या आसपास जाऊन आलो; पण यांची उत्तरं माझं समाधान करू शकली नाहीत. डॉक्टर, मी तुमचं अंधश्रद्धेबाबत पुस्तक वाचायच्या आधी संत गाडगेबाबा, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या विचारांनी प्रभावित होतोच; पण तुमचं पुस्तकं वाचल्यामुळं मला एक प्रकारची दिशा मिळाली, उत्तर सापडले. खरे तर हे पुस्तक बुवाबाजीवर आहे; मात्र मला पडणारे प्रश्न हे बुवाबाजीच्या पलिकडले होते, तरीदेखील मला समस्या कशा सोडवायच्या, याचं उत्तर या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्याकडून मिळालं. डॉक्टर, या पुस्तकात तुम्ही समस्या सोडविण्याचं आणि खरं तर समस्या निर्माण होऊ न देण्याचे सूत्र, नियम सांगितला आहे. ते सूत्र, तो नियम म्हणजे कार्यकारणभाव म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. कार्य घडते, त्याच्यामागे काही ना काही कारण असते, यालाच कार्यकारणभाव अर्थात वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात. या सृष्टीमध्ये आपोआप काही घडत नसते; पण अनेक गोष्टींची कारणे आपल्या बुद्धीला समजत नाहीत, म्हणून आपण ते आपोआप घडले, दैवी चमत्कार झाला, नशिबात होते म्हणून घडले, जे घडले ते विधिलिखित आहे, असे म्हणत असतो आणि आयुष्य पुढे ढकलतो; पण या सृष्टीत लहानापासून ते मोठी कोणतीही घटना, बदल, समस्या निर्माण होते, त्याच्यामागे कारण आहे आणि अर्थात ही संपूर्ण सृष्टी कार्यकारणभावाने बद्ध आहे, हेच ते तुम्ही सांगितलेलं सूत्र मला भारावून गेले. या पुस्तकात बुवा-बाबांच्या घटना जरी असल्या तरी त्या सांगताना तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. समस्या कशा निर्माण झाल्या आणि त्या कशा सोडवायच्या, याचे उत्तर मला तुम्ही सांगितलेल्या या वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळाले. उदाहरण सांगायचे झाल्यास व्यसन कसे लागते, याला काहीतरी कारण असते; तसेच ते व्यसन न सुटण्याचे देखील काही कारण असते. हे कारण एकदा सापडले की व्यसन कोणत्या कारणाने सोडवायचे, याला उत्तर आहे. हाच कार्यकारणभाव समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त आहे, हे माझ्या लक्षात आले आणि मी समाधान पावलो. डोक्यातील प्रश्नांचा गोंधळ कमी झाला.

‘जीवनात दुःख आहे, ते कमी करण्यासाठी नामस्मरण करा,’ असे काही जण मला आधी सांगायचे; पण ते मला पटत नव्हतं. तंबाखू, गुटखा खाऊन तोंड सडायला लागले आणि मग नामोच्चार तरी कसा करायचा आणि नामस्मरण तरी कसं करायचं, हा प्रश्न मला पडायचा. काही संघटना असे सांगायच्या की समाजात जे काही प्रश्न आहेत, त्यातील बहुतांश प्रश्न कालच्या आणि आजच्या कर्मठ ब्राह्मणांमुळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही कर्मठ ब्राह्मणशाही नष्ट केल्याशिवाय प्रश्न संपणार नाहीत. पण ही मांडणी मला पटत नव्हती, ती अतार्किक वाटायची. घरातील एखादी व्यक्ती दारू पिते, आम्ही गरीब आहोत, याला कथित ब्राह्मणशाही कशी काय जबाबदार, हे मला कधी समजलं नाही; पण डॉक्टर, तुम्ही जो सिद्धांत सांगितलात की, कार्य घडतं त्याच्यामागे कारण असतं. प्रत्येक घटनेमागे कार्यकारणभाव असतो, वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, हे मात्र मला पटलं. कुणी देव, बुवा-बाबा, राजकारणी, पैसेवाला येईल आणि जादूने समस्या सोडवेल, यावरचा माझा विश्वास उडाला. कुणी जरी समस्या सोडवायला आले, तरी कार्यकारणभावाच्या सूत्रानुसार पुढे गेल्याशिवाय मूळ समस्या सुटणार नाही, यावरचा माझा विश्वास वाढला. समस्या कशा सोडवायच्या, हे समजून घेण्यासाठी मी नामस्मरणापासून ते अनेक बुवा-बाबा आणि संप्रदायांमध्ये फिरून आलोय; पण मला तिथे समस्या सोडवायचे उत्तर मिळाले नाही. ते उत्तर मला तुमच्या ‘ऐसे कैसे झाले भोंदू?’ या पुस्तकाने दिले आणि माझी वणवण थांबली. खरं तर डॉक्टर, तुम्ही पुस्तकात सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन हाच मला शाळेत मूल्यशिक्षण आणि विज्ञानाच्या विषयातही होता; पण या दोन्ही विषयांतील वैज्ञानिक दृष्टिकोन सृष्टीचे सूत्र असल्याचे शिक्षकांनी कधी शिकविलेच नाही आणि आजही शिकविले जात नाही. भारतीय राज्य घटनेत देखील वैज्ञानिक दृष्टिकोन नमूद आहे, तोही अभ्यासात कितपत शिकवला जातो, हा मोठा प्रश्न आहे.

प्रश्न कोणताही असो; तो गंडे-दोरे, उदी, भस्म, नशीब, प्रारब्ध, संचित, उपास-तापास, नवस यांनी सुटणार नाहीत. ते प्रश्न सोडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार आणि कृती करावी लागेल, हे पक्के लक्षात आले. त्यामुळे विचारांची आणि जगण्याची दिशाच बदलली. मग तर रडण्या-हसण्यात देखील वैज्ञानिक दृष्टिकोनाचं सूत्र वापरलं, प्रेम की आकर्षण हे समजून घ्यायलाही, हेच सूत्र वापरलं. सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांची उकल करायला हे सूत्र वापरलं; पण रोजच्या जगण्यातील सर्व गोष्टींना हे सूत्र लावून, जगणं व्यवस्थित आखून घेतलं. त्यामुळं फायदा हा झाला की, सामाजिक पातळीवर कुणाकडून आर्थिक फसवणूक होऊ शकली नाही, स्वतःचे निर्णय स्वतः जास्तीत जास्त अचूक घेण्याची क्षमता निर्माण झाली. अंधश्रद्धेच्या आहारी न गेल्याने पैशांची, वेळेची बरबादी झाली नाहीच; पण कुणा बुवा-बाबा, धर्मांध पुढार्‍यांचे मानसिक गुलाम झालो नाही. हाच दृष्टिकोन कुटुंबात झिरपला. एकंदरीत, कुटुंबाची वाटचाल योग्य दिशेने सुरू राहिली.

डॉक्टर, एक सूत्र जर सापडलं तर काय-काय घडतं, याचं हे उदाहरण आहे. तुम्हाला पुरेपूर माहीत होतं की लोकांनी नक्की कसा विचार केला तर त्यांचे प्रश्न लवकर सुटतील, म्हणून तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ते विवेकवाद अशी मांडणी केलीत.

डॉक्टर, तुम्ही मला अधिक समजलात ते प्रा. सुभाष वाघमारे यांच्यामुळे. मी ज्या अण्णासाहेब आवटे कॉलेजला (मंचर) शिकलो, तेथे वाघमारे सर प्राध्यापक होते. येथूनच ‘विवेक वाहिनी’चं काम सुरू झालं. मग मला तुम्ही भेटलात. ‘आयुका’च्या शिणोली केंद्राला भेट द्यायला तुम्ही आला होतात. आपली पहिली भेट घोडेगावला झाली. श्याम मानव यांच्यावर नुकताच हल्ला झाल्यानंतर तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते, त्यांच्याशी जो वादविवादाचा पत्रव्यवहार केला होता, तो मी तुम्हाला दाखवला. तेव्हा मी कॉलेजला होतो; पण माझी तडफ पाहून तुम्ही मला ‘गुड’ अशी शाब्बासकी दिली होती. यानंतर तर मी ‘विवेकवाहिनी’चं काम खूपच जोमाने करू लागलो. आवटे कॉलेजला काम केलंच; पण डॉक्टर, आपण मोहोळ, सातारा, पुणे येथे शिबिरं, परिषदा घेतल्या. ‘विवेकवहिनी’च्या वाढीसाठी तासन्तास बैठका घेतल्या. हमीद देखील या कामात सहभागी झाला. कामाचा विस्तार झाला. अनेक विवेकी तरुण तयार झाले; पण काही मर्यादांमुळे काम पुढं गेलं नाही. यावर देखील आपण खूप चिंतन केलं; पण काही मर्यादा नाही ओलांडता आल्या.

माझे कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला पत्रकारितेत करिअर करायचं होतं, म्हणून मी पत्रकरितेच्या शिक्षणासाठी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. मला नोकरी करून शिक्षण करायचं होतं, म्हणून तुम्ही मला ‘साधना’त काम दिलं. मग शिक्षण, साधना, अंनिस, विवेकवाहिनी असं काम सुरू झालं. नंतर आपली आठवड्यातून एकदा भेट व्हायला लागली. आनंद भोजनालयात जेवायलाही एकत्र असायचो. तुमचं काम जवळून पाहता आलं. तुमच्या बारीक-सारीक गोष्टी मी टिपत गेलो, प्रतिप्रश्न करत राहिलो. सोमवारच्या ‘अंनिस’च्या मीटिंगमध्ये ठरवून आम्ही काहीजण तुम्हाला अडवळणाचे प्रश्न विचारायचो. यातून खूप काही शिकत गेलो. डॉक्टर, तुम्ही केवळ कार्यकर्ता कधीच नव्हता, तर तुम्ही लेखक, संयोजक, व्यवस्थापक, संघटक, वक्ते आहात; पण त्याहून अधिक वैचारिक संगोपन करणारे पालक देखील आहात.

डॉक्टर, कॉलेज जीवनापासून ते तुमचा खून होण्याच्या आदल्या दिवसापर्यंतच्या नऊ वर्षांत तुमच्याबरोबर काम करता आले. माझ्यातील कार्यकर्ता घडत गेला. तुमच्यामुळे माझ्या वैचारिकतेला दिशा मिळाली. माझ्या लेखन, भाषणाच्या शैलीवर तुमचा काही प्रमाणात प्रभाव पडला. तुम्ही सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन माझ्या जगण्याचा आधार झाला. मात्र आज डॉक्टर तुम्ही नाहीत. स्वतःचाच अवयव गळून पडल्याची ती भावना सोबत घेऊन जगतो आहे. ‘काय रे विशाल?’ हे शब्द आता ऐकायला मिळत नाहीयेत.

तुमचा

विशाल विमल


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]