दीपक जाधव -
महाराष्ट्रात जटानिर्मूलन, देवदासी प्रथेला विरोध आदी समाजसुधारणेचे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून केले जात आहे. स्वातंत्र्यानंतर ही पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवला तसेच अनेकवेळा आंदोलने केली. जटानिर्मूलनाच्या या कामाला खर्या अर्थाने सक्रिय चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले ते २०१३ पासून आणि त्याच्या कर्त्याधर्त्या राहिल्या आहेत त्या नंदिनीताई जाधव. केवळ प्रबोधनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष हातात कात्री घेऊन जटा काढण्याच्या कामाला नंदिनी यांनी सुरुवात केली.
आतापर्यंत महाराष्ट्रातील २५७ महिलांच्या डोक्यातील जटा काढून एकप्रकारे त्यांच्या आयुष्यातील गुंता दूर करण्याचे तसेच त्यांना नवे आयुष्य मिळवून देण्याचे काम नंदिनी यांनी केले आहे. डोक्यात जटा होणे ही बाब संपूर्णतः धार्मिकतेशी, देव-देवतांशी जोडली गेली आहे. त्यामुळे २१ व्या शतकातही त्या काढायचा साधा विचार करणे ही महाभयंकर पाप समजले जाते. त्या परिस्थितीत डोक्यात जटा झालेल्या महिलेचे, तिच्या कुटुंबियांचे, नातेवाईकांचे तसेच तिच्या गावातील लोकांचे मत परिवर्तन करण्याचे अत्यंत अवघड काम नंदिनी करत आहेत. आज शेकडो महिलांच्या डोक्यातील जटा काढल्यानंतरही कोणतेही संकट त्या महिलांच्या कुटुंबावर ओढवले नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आज डोक्यात जटा होणे ही कोणत्याही देवीची देण नसून केसांची निगा नीट न राखल्यामुळे ते होते हा विचार समाजमान्य होण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक सुधारणेच्यादृष्टीने ही एक मोठी उपलब्धी मानवी लागेल.
नंदिनी या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर गावच्या आहेत. त्यांना लहानपणापासून खेळांमध्ये खूप रुची राहिलेली आहे. विशेषतः मुलांचे मानले जाणारे विटी-दांडू, गोट्या, झाडावर चढणे आदी खेळ त्या हिरारीने खेळायच्या. त्यांच्या आईने ही त्यांना जाणीवपूर्वक एका मुलाप्रमाणेच वाढवले. त्यांचे केस लहानपणापासून मुलांसारखेच लहान ठेवले. याचे कारण त्यांच्या बालपणातील एका घटनेत दडले आहे.
नंदिनी दोन वर्षांची असताना त्यांना एका लमाणी बाईने पळवून नेले होते. त्याचा त्यांच्या आईला मोठा धक्का बसला होता. खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर काही दिवसांनी त्या सापडल्या. पळवून नेलेल्या महिलेच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यात आली. मात्र या घटनेचा त्यांच्या आईच्या मनावर खोलवर परिणाम झाला. मुलीच्या सुरक्षितेच्या भावनेतून, काळजीपोटी आईने त्यांना मुलासारखे वाढवण्याचे ठरवले आणि अधिकाधिक कणखर केले.
जयसिंगपूरच्या बळवंतराव झेले हायस्कुलमधून नंदिनी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर सांगलीच्या कस्तुरबाई वालचंद कॉलेजमधून त्यांनी बी.ए. पूर्ण केले.
शाळा व कॉलेजमध्ये असताना त्या अभ्यासापेक्षा विविध खेळांमध्येच जास्त रमल्या. त्यांनी अॅथलेटिक्स (वैयक्तिक), भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी, सायकलिंग अशा स्पर्धेत राज्य पातळीवर भरपूर यश मिळवले. तर सांघिक खेळात व्हॉलीबॉल, शूटिंग बॉल, हॅण्डबॉल या खेळात राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे.
लग्नानंतर नवर्याच्या नोकरीमुळे त्यांना ठाण्याला जावे लागले. तिथे त्यांनी सतत नवे काहीतरी शिकण्याचा धडाका लावला. एक झाला दुसरा, त्यानंतर तिसरा असे अनेक कोर्सेस करण्यास त्यांनी सुरुवात केली. विविध क्राफ्टचे १५० कलाप्रकार त्यांनी आत्मसात केले. त्यानंतर ब्युटीपार्लरचा सिडेस्कोचा (cidesco) लंडनचा कोर्स केला. हे सगळं शिकल्यानंतर ते लगेच दुसर्या मुलींना शिकवण्याचे काम ही त्यांनी सुरू केले. त्यांच्या घरीच त्याचे प्रशिक्षण वर्ग चालू लागले.
त्यानंतर त्या पुण्याला शिफ्ट झाल्या. ठाण्यातला मुलींना शिकवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यामुळे त्यांनी पुण्यात ’गोल्डन ग्लोरी’ नावाचे ब्युटीपार्लर व मुलींसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. पार्लरचा अभ्यासक्रम कमी खर्चात व कमी वेळात शिकवण्याच्या हेतूने त्या काम करू लागल्या. इतरांच्या तुलनेत खूपच माफक फीमध्ये त्या ब्युटीपार्लरचा कोर्स शिकवत असल्याने त्यांना खूप मोठा प्रतिसाद मिळू लागला. बाहेरगावाहून अनेक मुली त्यांच्याकडे या कोर्ससाठी येऊ लागल्या.
अर्थात, इथेही त्यांचे वेगळेपण दिसून येते. त्यांनी अशा महिलांना प्रशिक्षण दिले ज्यांना कधीही बाहेर संधी मिळाली नव्हती , ज्या आर्थिकदृष्ट्या कमजोर होत्या. प्रशिक्षणासाठी येणार्या स्त्रिया पहिल्या दिवशी एक अक्षरही बोलू शकत नसत, पण प्रशिक्षणानंतर त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झालेला दिसे. यातून अनेक विधवा , परित्यक्ता महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळाले.
आता नंदिनी यांची मुले मोठी झाली होती. व्यवसायात त्या चांगल्या स्थिरावल्या होत्या. महिना दीड लाख रुपयाचे उत्पन्न त्यांना ब्युटीपार्लर व प्रशिक्षण केंद्रातून मिळत होते. त्याचवेळी आपण आणखी व्यापक पातळीवर सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्याचवेळी २०११ साली वर्तमानपत्रात आलेले अंनिसच्या बैठकीचे एक निवेदन त्यांच्या वाचनात आले. निवेदनात दिलेला पत्ता शोधत त्या अंनिसच्या बैठकीला पोहचल्या. तिथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी नंदिनी यांची भेट झाली. त्या नियमित दर सोमवारी अंनिसच्या बैठकीला येऊ लागल्या. त्यावेळी जादूटोणाविरोधी कायदा व्हावा, यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विविध आंदोलने करत होते. त्यामध्ये नंदिनी यांनी सहभाग घेतला.
आपला व्यवसाय सांभाळून अंनिसच्या कामाला वेळ देण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. त्याचदरम्यान २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. या घटनेचे राज्यभर तसेच देशात ही पडसाद उमटले. डॉ. दाभोलकरांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला. नंदिनी यांनी ब्यूटी पार्लरला टाळं ठोकल आणि अंनिसच्या कामासाठी पूर्णवेळ वाहून घेण्याचा निर्णय घेतला. हा खर्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
डॉक्टरांच्या खुनानंतर त्यांच्या मारेकर्यांना लवकरात लवकर पकडले जावे यासाठी सातत्याने अंनिसच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला. त्यामध्ये नंदिनी यांचा मोठा सहभाग राहिला आहे. चमत्कार सादरीकरण, स्त्री व अंधश्रद्धा, जादूटोणा विरोधी कायदा याविषयी त्यांनी महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांत १२०० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. जादूटोणा कायद्याच्या प्रसारासाठी त्या महाराष्ट्रभर सलग ४९ दिवस फिरल्या. अनेक बाबाबुवा, बोगस डॉक्टरांचा त्यांनी पर्दाफाश केला आहे.
अंनिसच्या कामामुळे त्यांच्यात उपजत असणार्या कार्यकर्तेपणाला खर्या अर्थाने दिशा मिळू लागली होती. त्याचदरम्यान त्यांच्याकडे जटेबाबतची पहिली केस आली. जनवाडी येथील १६ वर्षाच्या मुलीच्या डोक्यात जट आली होती. त्यामुळे कुटुंबियांनी घाबरुन तिची शाळा बंद करून घरी बसवलं होतं. त्या मुलीच्या मैत्रिणींनी ही माहिती शिक्षकांना सांगितली. त्यांनी ती अंनिसपर्यंत पोहचवली.
नंदिनी अंनिसच्या कार्यकर्त्यांसह त्या मुलीच्या जनवाडी येथील घरी गेल्या. सुरूवातीला तिच्या कुटुंबियांनी हा आमच्या घरातला मामला आहे असे सांगून त्यांचे काहीही ऐकून घेण्यास नकार दिला. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्या दिवसभर त्यांच्या घरी बसून राहिल्या. त्यांना जट कशी येते सांगितले. देवीचा कोप होत नाही हे समजावलं, बराच काथ्याकुट केला. शेवटी ते तयार झाले आणि ती १६ वर्षांची मुलगी पुढच्या आयुष्यभराच्या भयंकर त्रासापासून वाचली.
त्यानंतर याच्या बातम्या विविध माध्यमांमधून प्रकाशित झाल्या. त्या वाचून आणखी काही जटांच्या प्रकरणांची माहिती नंदीनींना मिळू लागली. त्यानंतर सुरू झाला तो जटानिर्मूलनाचा प्रवास. एखाद्या महिलेच्या केसात जटा असल्याची माहिती मिळाली की, त्यांना भेटणे. तिला, तिच्या कुटुंबियांना जटा काढण्याबाबत सांगणे. त्यांचे मन वळवण्याचा अथक प्रयत्न करणे. त्यासाठी न थकता पाठपुरावा करणे सुरू झाले. काही प्रकरणात तर त्यांनी २-२ वर्षे पाठपुरावा करून त्या कुटुंबांना जटा काढण्यासाठी तयार केले.
जटा कापणं हे काम जितकं कौशल्याचं आणि जिकिरीचं आहे त्याहून जास्त अवघड काम आहे ते जटा कापण्यासाठी त्या महिलेची आणि तिच्या कुटुंबियांची मानसिक तयारी करणे. जट कापली तर त्या महिलेच्या घरातील नवरा, मुलं मरतील अशांसारख्या समजुती समाजात घट्ट रुजलेल्या आहेत. त्या दूर करणं हे खरं आव्हान असायचे. त्या महिलेचं, तिच्या कुटुंबीयांचं आणि गावकर्यांचे समुपदेशन करताना अनेकदा वादावादीचे, भांडणाचे प्रसंग येत. वातावरण तणावपूर्ण होत. नंदिनीताई विरोध करणार्या नातेवाईकांना समजावून सांगत, “तुमच्या केसांना एक छोटा दगड दिवसभर बांधून बघा, म्हणजे काय त्रास आहे ते कळेल.” वर्षानुवर्षं ती जट बाळगल्यामुळे त्या महिलेच्या हालचालींना मर्यादा येतात, त्यामुळे खांदे, मान आणि पाठ प्रचंड दुखते. जटेमुळे त्या महिलेच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न कसे निर्माण होतात हे नंदिनी कुटुंबीयांना पटवून देतात.
अनेक वर्षं जट तशीच राहिल्याने केसांच्या जटेमध्ये उवा, लिखा प्रचंड असतात. काही वेळा तर अळ्या, झुरळांची पिल्लंसुद्धा त्यात वास्तव्य करतात. त्यामुळे त्या बाईच्या डोक्यावर लहान-मोठ्या जखमा झालेल्या असतात. जट कापली की या सगळ्याची स्वच्छता करावीच लागते. जखमा छोट्या असतील तर तात्पुरते औषधोपचारही करावे लागतात. मोठ्या जखमांसाठी बळजबरीने डॉक्टरांकडे पाठवावं लागतं. हे सगळं केल्यानंतर त्या महिलेच्या चेहर्यावर उमटलेलं हसू आणि तिला जटेच्या त्रासातून मिळालेली मुक्ती ही नंदिनी यांना पार्लरच्या लाखो रुपयांच्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त समाधान देते आहे.
केवळ आपल्या कामाची चौकट ठरवून तेवढ्या पुरतेच काम करणे हे नंदिनी यांना मान्य नाही. त्यामुळे त्या जिथे आपली गरज वाटेल तिथे सरळ उडी घेतात. पाणी फाऊंडेशनच्यावतीने दुष्काळग्रस्त भागात वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत होती. उदाची वाडी येथे ७-८ मुले एकत्र येऊन चर खोदण्याचे काम करत आहेत. त्यांना गावातून इतर कोणाचाच सपोर्ट मिळत नसल्याचे त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये वाचले. त्यानंतर त्यांनी लगेच आपली बुलेट काढली आणि त्यांच्या घरापासून ३७ किमी अंतरावर असलेली उदाची वाडी गाठली. या गावात त्या मुलांसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर गावकरी देखील श्रमदानात सहभागी झाले. त्यांनी स्वतः ५२ दिवस या गावात जाऊन श्रमदानात सहभाग घेतला. उदाची वाडीला त्या वर्षीचा “सत्यमेव जयते वॉटर कप” स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला.
कंजारभाट समाजात नववधुची कौमार्य चाचणी घेण्याची एक चुकीची प्रथा आहे. याविरोधात कंजारभाट समाजातील तरुण-तरुणींचे प्रबोधन करून त्यांना नंदिनी यांनी एकत्र केले. त्यांच्या पाठीशी उभे राहून, वेळप्रसंगी मीडियाची मदत घेऊन त्यांनी ही प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्न केले.
सामाजिक बहिष्कृत कायदा झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बहिष्कृत कुंटुबाना बरोबर आतापर्यंत जातपंचायतीच्या विरोधात ९ केसेस त्यांनी दाखल केल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन आतापर्यंत त्यांना विविध संस्था संघटनांकडून ८७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
जटानिर्मूलनासाठीचा आलेला फोन असो की बुवाबाजी विरोधातील तक्रार, एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांसमोर चमत्कारांचे सादरीकरण करणे असो की अधिकार्यांना जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण त्यासाठी नंदिनी कायम तयार असतात. २०१२ पासून त्यांनी अंनिससोबत काम सुरू केले, त्यानंतर अवघ्या १० वर्षात त्यांनी मोठं सामाजिक काम उभे केले आहे तसेच अनेक कामांना हातभार लावला आहे.
दीपक जाधव, पुणे संपर्क – ९९२२२०११९२
नंदिनी जाधव संपर्क : ९४२२३०५९२९