-
यवतमाळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भांडाफोड : महिलेने अफवा पसरविल्याची दिली कबुली
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरातील अंबिकानगरात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मी उभी झाल्याचा चमत्कार पाहण्यासाठी नागकिांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र यवतमाळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांत तक्रार देताच महिलेने अफवा पसरविल्याची कबुली दिली. त्यामुळे तो चमत्कार नव्हे तर अफवा होती, हे स्पष्ट झाले आहे.
दारव्हा येथील अंबिकानगरातील एका महिलेच्या घरी २१ सप्टेंबर रोजी गौरी आवाहनाच्यादिवशी एक महालक्ष्मी चमत्कारीतरित्या उभी राहिल्याची अफवा परिसरात पसरवली गेली. त्यामुळे तीन ते चार दिवस हा चमत्कार पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागला. अंबिकानगरात यात्रेचे स्वरुप आले होते. मात्र या प्रकारानंतर परिसरातील काही नागरिक तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी प्रकाश आंबिलकर, पवन भारस्कर यांनी पोलीस स्टेशनला २५ स्पटेंबर रोजी तक्रार दिली. ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना ही माहिती दिली. अधिकारी व पदाधिकार्यांनी महिलेच्या घरी जावून चौकशी केली. त्यावेळी महिलेने महालक्ष्मी आपोआप उभी राहिल्याचे सांगितले. मात्र तक्रार आली असून, जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगताच घरी कुठलाही चमत्कार झाला नसून, देवी स्वतःहून उभी राहिलेली नाही. देवी उभी राहिल्याची अफवा पसरविल्याची कबुली त्या महिलेने दिली. त्यानंतर तत्काळ विधीवत पूजा करून देवीचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यावर पडदा पडला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व बळी पडू नये, असे आवाहन ठाणेदार विलास कुलकर्णी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यवतमाळ यांनी केले आहे.