व्ही. टी. जाधव -
छंदोमयी दालन, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक येथे दि. ३ मार्च ते ६ मार्च २०२३ कसोटी विवेकाची या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता पुण्याहून टेम्पो/ट्रक प्रदर्शन साहित्यासह नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकाजवळ येऊन पोचल्याचा निरोप सुहास जोशी यांचेमार्फत ‘कसोटी विवेकाची’ या व्हॉटस्अॅप गु्रपवर संदेश मिळाला. सकाळी ९.३० वाजता स्वयंसेवकांना विनंतीवजा सूचना देण्यात आली. त्याप्रमाणे सकाळी १० पासूनच ट्रकमधून प्रदर्शन साहित्य सुहास जोशी यांचे मार्गदर्शनाप्रमाणे उतरवून घेतले. लगेच प्रदर्शन साहित्य मांडणीचे काम सुरू झाले. संध्याकाळी ५ वाजता प्रदर्शन (नियोजित) उद्घाटनाची वेळ होती; परंतु दु. २.३० वाजता प्रदर्शन मांडणी करून हॉल सुसज्ज झाला होता. सुहास (ऊर्फ उत्साह) जोशी यांचे मार्गदर्शन, धावपळ, मदत यामुळे एवढे परिश्रम होऊनही कामाचा ताण वाटलाच नाही.
सायंकाळी ६ वाजता अॅड. सुरेश भटेवरा (ज्येष्ठ पत्रकार व लेखक) यांचे हस्ते ऑक्सिजनच्या झाडाला ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ असे शब्द लिहून पाटी फांदीला लावून अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले. नव्या पिढीला मानवतेची, विवेकाची आणि संवेदनशीलतेची शिकवण देणारे हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल, असे या प्रसंगी सुरेशजी भटेवरा म्हणाले. या प्रसंगी त्यांच्या समवेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार विश्वस्त लोकेश शेवडे, अॅड. विलास लोणारी, तसेच म. वि. प्र. समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाच्या चित्रशिल्प कलांबाबतची माहिती मान्यवरांना फ्रेंडस् ऑफ दाभोलकरांच्या अश्विनी कुलकर्णी यांनी करून दिली. अॅड. सुरेश भटेवरा, अॅड. नितीन ठाकरे, अॅड. विलास लोणारी आदी मान्यवरांनी पोस्टकार्ड अभिप्राय लिहून दिला. डॉ. नरेंद्र दाभोलकर ही एक व्यक्ती नव्हे, तर विचार होता. स्वार्थासाठी अंधश्रद्धा पसरविणार्यांना डॉ. दाभोलकर यांच्या पुरोगामी व विज्ञाननिष्ठ विचारांच्या प्रचार-प्रसाराची गरज असल्याचा मान्यवरांनी अभिप्राय व्यक्त केला. त्यानंतर उद्घाटक अॅड. सुरेश भटेवरा यांचे ‘गांधी नेहरू शोध पर्वाचा’ या विषयावर व्याख्यान झाले. रात्री साडेआठ वाजेपर्यंत प्रदर्शन उपस्थित श्रोते प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले होते. ६ मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सुमारे अडीच हजार विद्यार्थी/नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट दिली. सुमारे १७५ लोकांनी पोस्टकार्डवर अभिप्राय लिहून दिले. प्रदर्शनात हत्या आणि तपास, डॉ. दाभोलकर व्यक्तिपरिचय, चळवळ, प्रबोधन आणि परिवर्तन अशा पाच विभागांत मांडले होते. त्यासाठी पोर्ट्रेटस्, शिल्पे, बायोस्कोप, एम्बॉसिंग इ. कला माध्यमात होती. त्याची माहिती देण्यासाठी अश्विनी कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांना आधीच प्रशिक्षण दिले होते. इम्पॅलियर स्कूलचे ७० विद्यार्थी-शिक्षक, आनंदनिकेतन शाळेचे सर्व विद्यार्थी-शिक्षक व पालक, प्रगती अभियान समूह, एकलव्य गट, लोकनिर्णय सामाजिक संस्था आदींसह अनेक मान्यवर प्रदर्शन पाहून, अभिप्राय देताना डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा जीवनपट नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशीच भावना अनेकांनी व्यक्त केल्या. ५ व ६ मार्च रोजी अंनिसचे ज्येष्ठ स्नेही-साथी गणेश चिंचोले सर, प्रा. प्रवीण देशमुख यांनी नाशिकला उपस्थित राहून योग्य ते मार्गदर्शन केले. प्रदर्शनाचा समारोप त्यांच्याच उपस्थितीत पार पडला. ७ मार्च २०२३ ला प्रदर्शन साहित्य आवरून, व्यवस्थित पॅकिंग करणे, इथपर्यंत त्यांची उपस्थिती खूपच मार्गदर्शक ठरली. स्वयंसेवकांना माधव पळशीकर यांनी “विज्ञानाने मला काय दिले?” हे विनोद शिरसाठ संपादित (साधना प्रकाशन) पुस्तक भेट दिले. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत (७ मार्च) अतिशय परिश्रमपूर्वक व्यवस्थित कामे करून प्रदर्शन साहित्यासह सुहास जोशी यांना औरंगाबादकडे प्रयाण करण्यासाठी निरोप देण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेचे डॉ. मिलिंद वाघ, सचिन माळेगावकर, प्रेमनाथ सोनवणे, माधव पळशीकर, अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटचे रणजित गाडगीळ, आनंदनिकेतनच्या दीपाताई, अश्विनीताई अशा अनेकांचे सहकार्य लाभले.
– व्ही. टी. जाधव, नाशिक