प्रतीकांचे राजकारण

सुभाष थोरात - 9869392157

सुप्रसिद्ध कवी, समीक्षक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघातर्फे त्यांच्या एकंदर साहित्यिक कामगिरीबद्दल ‘जीवनव्रती’ पुरस्कार घोषित केला गेला. त्यांनी हा पुरस्कार यासाठी नाकारला की, पुरस्कार वितरण कार्यक्रमात विद्येची देवता समजल्या जाणार्‍या सरस्वतीची पूजा होणार होती. खरे तर तो विदर्भ साहित्य संघाचा आजवर चालत आलेला रिवाज आहे. त्यांचे घोषवाक्य या देवीला उद्देशूनच आहे. डॉ. यशवंत मनोहर यांनी आक्षेप घेतला नसता, तर ही बाब कोणाच्या लक्षात आली नसती.

खरे तर अशा स्वरुपाच्या चर्चा महाराष्ट्रात नव्या नाहीत; पण आजच्या सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवर डॉ. मनोहर यांच्या भूमिकेला खूपच महत्त्व आहे. जेव्हा रामराज्याची गर्जना करणार्‍या राजकीय शक्ती सत्तेवर आहेत; ज्यांना आपण प्रतिगामी शक्ती म्हणतो, ज्या भूतकाळात आपल्या गौरवाच्या गाथा गाणार्‍या प्रतिगामी प्रतिकांना नव्या परिस्थितीत उजाळा देण्याचे आणि प्रतिगामी सांस्कृतिक मूल्य समाजात रुजवण्याचे काम करताना दिसत आहेत, आज त्यांचा जोर इतका वाढला आहे की, एकेकाळी तुम्ही देवदेवतांबद्दल बिनधास्त काही बोलू शकत होता; आज ती सोय राहिली नाही. लगेच धार्मिक भावना दुखावल्याची बोंब मारली जाते. एका अर्थाने धर्मचिकित्सेला आता या शक्तींकडून विरोध होऊ लागला आहे. आपल्याला थोर चित्रकार एम. एफ. हुसेन यांचे उदाहरण यासाठी देता येईल, त्यांना आपला देश सोडावा लागला आणि दुसर्‍या देशाचे नागरिकत्व स्वीकारावे लागले. तेव्हा सांस्कृतिक पातळीवरच्या राजकारणासाठी अशा चर्चांना खूप महत्त्व आहे. डॉ. यशवंत मनोहर फुले-आंबेडकर यांच्या विचार परंपरेतील एक मान्यवर विचारवंत, साहित्यिक आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला एक महाराष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त होते आणि या संदर्भात उलट-सुलट चर्चा सुरू होते आणि सुरू झाली आहे.

या निमित्ताने पुन्हा एकदा व्यापक सांस्कृतिक लढ्याची गरज अधोरेखित होते. शब्द, प्रतीके आपल्याला काय सांगत असतात? त्यांच्यात दडलेला आणि दडवलेला इतिहास आपल्याला कुठल्या संस्कृतीसंघर्षाचे दर्शन घडवतो, याचा शोध घेणे नव्या समाजनिर्मितीसाठी गरजेचे आहे. आमचे मित्र डॉ. मेहबूब सय्यद यांच्या प्रत्येक भाषणात “शब्द केवळ शब्द असत नाहीत, शब्द हे त्यांच्या सांस्कृतिक अर्थासह प्रकट होत असतात.” तीच गोष्ट प्रतीकांची. शब्दांमागे आणि प्रतीकांमागे समाजाच्या प्रचंड उलथापालथींचा, घडामोडींचा इतिहास साठवलेला असतो. ही प्रतीके त्या-त्या काळाच्या सांस्कृतिक मूल्यांचे वाहक असतात, त्यांचा प्रचार करतात. त्यांच्याशी त्यांच्या काळातील; तसेच नव्या काळातील नवीन हितसंबंध जोडले जातात. प्रतीकांचे वैशिष्ट्य हेच की, ती ज्या काळात सामाजिक, भौतिक आधारांवर निर्माण झालेली असतात, तो काळ आणि त्यांचा सामाजिक आधार नष्ट झाला, तरी टिकून राहतात. त्यामुळे सांस्कृतिक लढा ही एक दीर्घकाळ चालणारी चिवट अशी लढाई असते; शिवाय समाजातील मान्यता प्रत विचार संस्कृती कला सत्ताधारी वर्गाचे विचार असतात आणि ते बहुजन समाजावर सांस्कृतिक मूल्यांच्या नावाखाली लादले जातात. उदाहरणार्थ चोरी करणे पाप आहे, असे वरवर आदर्श असणारे मूल्य समोर येते, तेव्हा त्यामागे सामाजिक वास्तव दडलेले असते; म्हणजे समाजात माणसाला चोरी का करावी लागते, कोणाची चोरी होते, हे धन त्यांच्याकडे कसे आलेले असते, हे मात्र दडवले जाते. ते एक सामाजिक मूल्य बनते. सर्व समाजात त्याला मान्यता असते. वर म्हटल्याप्रमाणे समाजातील मान्यता प्रत विचार संस्कृती ही जरी सत्ताधारी वर्गाची असली, तरी त्या-त्या काळात सत्ताधारी जात वर्गाविरुद्ध लढणारा तो कष्टकरी वर्ग असतो. तो प्रतिकाराची संस्कृती, कला विचार निर्माण करत असतो आणि त्याची प्रतिके बनतात. उदाहरणार्थ स्पार्टाकस, शंबुक, एकलव्य, बळीराजा, बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा इतिहास आपल्यासमोर प्रकट होतो. संपूर्ण जगाचा आजवरचा संस्कृतिसंघर्षाचा इतिहास आपल्याला या वर्गसंघर्षाच्या चौकटीत पाहता येतो.

उद्याच्या इतिहासात डॉ. नरेंद्र दाभोलकरांकडेही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढ्यातील एक प्रतीक म्हणूनच पाहिले जाईल. भारतीय समाजाचा पाया जात-वर्ग आधारित असल्यामुळे आपण इतिहासातील कोणतीही प्रतीके घेतली, तरी आपल्याला यामागील सांस्कृतिक संघर्षाचे राजकारण पाहता येईल. आर्य-अनार्य संघर्ष आणि आर्यांविरुद्ध लढलेल्या अनार्यांच्या नेत्यांना आज जसे ‘आतंकवादी,’ ‘राष्ट्रद्रोही,’ ‘तुकडे तुकडे गँग’ म्हटले जाते, तसे मानले गेले आहे; म्हणजे वाईटाचे प्रतीक मानले गेले आहे. ज्यांनी त्यांचे वर्चस्व स्वीकारले नाही, त्यांना कपटाने पाताळात (ठार मारण्यात) घालण्याचे काम केले आणि जे गद्दार झाले, त्यांना देव पदाला पोचवले आहे. पुराणकाळातील गोष्टी सोडून देऊ; पण अलिकडे बाराव्या शतकापासून आपल्याला संस्कृतिसंघर्षाचे ठळक दर्शन घडते आणि त्याच्या मुळाशी एकच तत्त्व दिसून येते, ते म्हणजे जातिव्यवस्थेचा पुरस्कार करणार्‍या सनातन वैदिक संस्कृतीला आणि वेदप्रामाण्याला नकार.

बाकी इतिहास आपल्याला ठाऊक आहेच, जिला विद्येची देवता म्हटले जाते आणि ज्यावर वाद उभे राहिले आहेत, त्या देवतेने कोणाला विद्या दिली. बहुजनांवर विद्याबंदी, ज्ञानबंदी होती, त्यांनाही देवतेने विद्या दिली काय? ‘विद्ये विना गती गेली, मती गेली, मतीविना शूद्र खचले,’ असे महात्मा फुले यांनी म्हणून ठेवले, ते कशासाठी? बहुजनांना ज्ञान कधी मिळाले, ब्रिटिश आल्यानंतर आणि त्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी जीवाची पर्वा न करता काम केल्यामुळे. विद्येची खरी देवी आधुनिक भारतीय समाजात सावित्रीबाई फुले आहेत; आणि ही काल्पनिक विद्येची देवता नाही, तर खरीखुरी हाडामासांची देवता आहे; पण बहुजनांना याचे भान आले आहे काय? आजही परंपरेने त्यांच्यावर उच्च जातवर्गाने लादलेल्या खोट्या संस्कृतीच्या प्रतीकांचे ओझे वाहण्याचे काम ते करत आहेत. ही एक अंधश्रद्धा आहेच; पण स्वत:ला उच्च जातवर्ग समजणार्‍या सत्ताधारी वर्गाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला मान्यता देण्यासारखे आहे.

महात्मा फुले यांनी यासाठी एक मोठा सांस्कृतिक वर्चस्वाच्या इतिहासाचा पट मांडून ठेवला आहे आणि ब्राह्मणी धर्माला नकार देताना सार्वजनिक धर्माची मांडणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेवर आधारलेला सनातन वैदिक तत्त्वज्ञानाला संपूर्ण नकार देणारा बौद्ध धम्म स्वीकारून आणि आपल्या अनुयायांना डोळस करण्यासाठी 22 प्रतिज्ञा देऊन ब्राह्मणी धर्माचे उरलेसुरले सर्वस्व मोडीत काढले आहे; पण सांस्कृतिक लढा संपला का? तर नाही आजही बहुजन समाज धर्माच्या प्रभावामुळे या सांस्कृतिक वर्चस्वाखाली मोठ्या प्रमाणात आहे. या लढ्यासाठी एका व्यापक सांस्कृतिक भानाची गरज आहे. यासाठी दलित आदिवासी, कष्टकरी, बहुजन जनतेच्या शोषणाविरुद्ध स्वातंत्र्य, समतेवर, लोकशाहीवर आधारलेले व्यापक मूल्यांचे राजकारण करण्याची गरज आहे. ब्राह्मणी वर्चस्वाच्या मूल्यांच्या विरोधातला लढा एका जातीविरुद्ध चालणारा नाही. भान बाळगले नाही, तर दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, संत रामदास आणि छत्रपती शिवाजी राजे यांची भेट झाली नव्हती किंवा गडकरी यांनी त्यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकात संभाजी महाराजांची बदनामी केली, म्हणून त्यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातला पुतळा हटवणे किंवा जेम्स लेनला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पुरवून त्यांचा अपमान केला गेला, यासाठी भांडारकर वाचनालयातील व्यक्तींना जबाबदार धरून त्या ग्रंथालयाची मोडतोड करणे, अशा घटना पुढे येतात, या घटना खोट्या नाहीत; खर्‍या आहेत, यातून इतिहासाचे नवे भान जरी पुढे येत असले, तरी या लढाईचे स्वरूप एक जात विरुद्ध दुसरी जात अशा स्वरुपात पुढे येते आणि त्यामुळे त्याच्यावरील प्रतिक्रियाही जातीनुसारच पुढे येतात. यातून व्यापक अशा सांस्कृतिक लढ्याला खीळ बसते. शोषक जातवर्ग यांनी निर्माण केलेली प्रतीके मोडून काढत असताना आपण आपली प्रेम, सत्य, समता जोपासणारी प्रत्येक माणसांचा समान आदर करणारी प्रतीके पुढे आणली पाहिजेत.

लेखक संपर्क – 98693 92157


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]