परिवर्तनाच्या राजकारणाला प्रतिष्ठा देणारे भाई एन. डी. पाटील

डॉ. भालचंद्र कांगो -

‘राजकारण’ हा शब्द गेल्या काही वर्षांत अत्यंत बदनाम झालेला आहे. राजकारणातील तत्त्वशून्य, संधिसाधू, सत्तालोभी लोकांनी याला मदत केली आहे; परंतु सर्वसामान्य लोकांची सत्तेवरची पकड ढिली करण्यासाठी जाणीवपूर्वक ‘राजकारणविरहित विकास’ही संकल्पना नवीन आर्थिक धोरणाच्या समर्थकांनी जोपासली आहे व तिला 1992 सालच्या सोविएत पतनाची साथ मिळाली आहे.

आज वातावरणात राजकारणाचं परिवर्तनासाठी असलेलं महत्त्व ध्यानात घेऊन, लोकशक्ती व लोकशाही मार्गाने राजकारणाला सत्ताध्येयाच्या पलिकडे नेऊन परिवर्तनाचे साधन म्हणून पाहणार्‍या प्रा. भाई एन. डी. पाटील यांचे निधन म्हणजे लोकचळवळीच्या राजकारणात मूल्ये जपणार्‍या चळवळीची झालेली अपरिहित हानी आहे.

1962 ते 2022 पर्यंत; म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या काळापासून ते आजपर्यंत सातत्याने जनतेशी बांधिलकी ठेवून, लोकशाही मार्गाने कार्यरत असणार्‍या भाई एन. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव म्हणजे ‘राजकारण हे परिवर्तनाचे साधन आहे, सत्ता मिळवण्याचे वा व्यक्तिश: लाभ मिळविण्याचे साधन नाही,’ हे ठासून सांगणे आहे.

सत्तेचे राजकारण, लोकअनुयायांसाठी भल्याभल्यांना चकवा देते, संधिसाधूपणाला वाव देते व सर्वसामान्य माणसाला राजकारणापासून दूर ठेवते. भाई एन. डी. पाटील हा धोका ओळखून होते. त्यामुळेच त्यांनी विधायक व परिवर्तनशील राजकारणाची कास सोडली नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी जगाचा, राष्ट्राचा, राज्याचा; त्याचबरोबर राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकासाचा ध्यास सोडला नाही. जात, पात, संकुचित धर्मनिष्ठा व विभागीय निष्ठा याला त्यांनी चान्स दिला नाही.

मी मराठवाड्यातील चळवळीतून वाढलेला कार्यकर्ता; परंतु मराठवाडा विकास आंदोलन असो, नामांतर वा पाण्याच्या वाटपाचा प्रश्न; भाई एन. डी. पाटील यांनी सातत्याने मार्गदर्शन व साथ दिली.

देवगिरी कापड गिरणी ही मराठवाड्याच्या विकासाच्या लढ्यातून मिळाली व नंतर ती बंद पडली; परंतु ही सहकाराच्या माध्यमातून चालवावी व कामगारांनी त्यात पुढाकार घ्यावा म्हणून भाई एन. डी. पाटील व कॉ. गोविंद पानसरे यांनी मुंबईपासून ते औरंगाबादपर्यंत मंत्री व कामगारांच्या बैठका घेतल्या व शासकीय मान्यता मिळविली; परंतु कामगारांनी एकजूट न ठेवल्यामुळे हा प्रयोग फसला! परंतु भाई निराश झाले नाहीत.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. उस्मानाबाद जिल्ह्यात एका तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केल्यावर भाईंबरोबर मला जाता आले, त्या गावाला व त्या शेतकर्‍याच्या घराला भेट देता आली. त्या भेटीत भाईंनी बहुजन समाजातून शिक्षण घेऊन शासकीय नोकरीत स्थिरावलेले व गावात सावकारी करणारे नवीन सावकार यांच्यासंदर्भात सांगितलेली माहिती त्यांच्या अभ्यासाची व दांडग्या जनसंपर्काची प्रचितीच होती.

त्याचप्रमाणे भाईंनी ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना बी. एड् व डी एड्.मध्ये प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पत्र पाठवून नोकरी दिली. यावर विद्यार्थी व पालकांचा विश्वास बसला नाही. कारण पैसे न देता, वशिला न लावता नोकरी मिळते, यावर त्यांचा विश्वासच नव्हता; परंतु भाईंनी अजूनही समाजात नैतिकता आहे, हे त्यांच्या ध्यानात आणून दिले. हे सर्व भाईंना भेटण्यासाठी आले असताना मी तिथे उपस्थित होतो व त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या प्रभावाचे वास्तव मला पाहता आले.

हे भाईंचे कार्य!

राजकारणात 60 वर्षे राहूनही त्यांचे कट्टर विरोधकही भाईंवर भ्रष्टाचाराचे, अनैतिक व्यवहाराचे आरोप करू शकले नाहीत, ही त्यांची नैतिकता होती.

डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर सातत्याने त्यांच्या मारेकर्‍यांना अटक व्हावी म्हणून झालेल्या आंदोलनांत ते सहभागी होते व त्याचप्रमाणे समाजात वैज्ञानिक विचार व व्यवहार वाढावा, अंधश्रद्धा नष्ट व्हावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला सतत सहकार्य करून त्यांनी आपली विज्ञाननिष्ठाही जपली.

राजकारण हा गंभीर व महत्त्वाचा विषय आहे व लोकसत्तेचा आधार आहे, हे आपल्या कार्याने त्यांनी दाखवून दिले आणि राजकारण व समाजकारण, राजकारण व विकास यांची फारकत करणार्‍यांना त्यांनी साथ दिली नाही, याची नोंद घ्यावी.

समाजवादी विचार मांडताना व त्याचा पाठपुरावा करताना प्रा. भाई एन. डी. पाटील यांनी सहकारचे महत्त्व ध्यानात घेऊन सहकार चळवळ मजबूत व निकोप राहावी, भ्रष्टाचारमुक्त असावी म्हणून आग्रह धरला होता. आज महाराष्ट्रात सहकार चळवळीला भ्रष्टाचाराच्या घराणेशाहीचे ग्रहण लागले आहे. अशा वेळेस या चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

भांडवलशाही आवरून लोकशाहीला साथ देणारी अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी सहकारचे महत्त्व भाईंनी ध्यानात घेऊन सातत्याने सहकार चळवळ वाढावी म्हणून प्रयत्न केला होता.

अजातशत्रू म्हणून भाईंचे वर्णन करताना त्यांनी शत्रू, मित्र, विवेक कायम ठेवत माणसाविषयी प्रेम; परंतु चुकीच्या गोष्टींना विरोध ही भूमिका कधीच सोडली नाही.

नवी मुंबई येथील रिलायन्स ‘सेझ’ला (एसीझेड) घ्यावी लागलेली माघार हा भाईंच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा क्षण आहे व होता. त्यामुळे आजच्या नवउदारीकरणाच्या काळात लोकसंघर्षाने यश मिळू शकते, हा संदेश मिळाला हे महत्त्वाचे.

राजकारण हे परिवर्तनाचे साधन आहे व सर्वसामान्य माणसाची ताकद हे सूत्र शेवटपर्यंत भाईंनी सोडले नाही, याची आपण जाण ठेवून भाईंचे समाजवादी राजकारण व विज्ञाननिष्ठावादी विचार आपण पुढे नेले पाहिजेत.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]