प्रा. प. रा. आर्डे - 9822679546
21 जून रोजी सूर्यग्रहण झाले. महाराष्ट्रात ते खंडग्रास स्वरुपात सर्वत्र दिसले. या ग्रहणकाळात परातीतील पाण्यात मुसळ आपोआप उभे राहते, हा चमत्कार सर्वत्र दाखविला गेला. काही धार्मिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या चमत्काराचा संबंध आपल्या धर्मातील परंपरेशी जोडला. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र लोखंडी मुसळाच्या कडीला खाली ओढते व सूर्य, चंद्र आणि पृथ्वी सूर्यग्रहणकाळात एका सरळ रेषेत आल्याने गुरुत्वाकर्षणाने मुसळ वरच्या दिशेने ओढले जाते, त्यामुळे ते पाण्यात उभे राहते, असा युक्तिवाद केला गेला. प्राचीन काळापासून भारतात हे माहीत होते, त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचे विज्ञान आपल्या पूर्वजांना माहीत होते, असाही युक्तिवाद केला गेला. ग्रहणाबाबतचे हे विज्ञान म्हणजे छद्मविज्ञान असून पाण्यात मुसळ उभे राहण्याचा संबंध ग्रहणाशी नाही; तर भौतिक विज्ञानातील एका साध्या संकल्पनेशी आहे, ती संकल्पना म्हणजे गुरुत्वमध्य.
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार दोन पदार्थांमधील गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा त्यांच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात; परंतु अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. या नियमानुसार सूर्य पृथ्वीला गुरुत्वाकर्षणाने ओढत राहतो आणि ती सूर्याभोवती फिरत राहते. सूर्याचे वस्तुमान प्रचंड आहे. त्यामानाने पृथ्वीचे वस्तुमान खूपच कमी आहे. त्यामुळे सूर्याचा प्रभाव पृथ्वीवर राहतो. शाळकरी मुलगा व एखादा पैलवान दोरीने एकमेकांना ओढत असतील, तर मुलगा पैलवानाकडे ओढला जातो. याच कारणाने चंद्र हा पृथ्वीपेक्षा लहान आहे म्हणून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव चंद्रावर राहून चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. म्हणून चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीला किंवा पृथ्वीवरील मुसळासारख्या पदार्थाला ओढणे शक्य नाही.
आता मुसळाचा विचार करा. मुसळाचे वस्तुमान अगदीच नगण्य आहे. मुसळावर तिघांचे गुरुत्वाकर्षण (चंद्र, सूर्य आणि पृथ्वी). सूर्य आणि चंद्र मुसळापासून खूप दूर असल्याने अंतराचा विचार करता त्यांचा प्रभाव मुसळावर शून्य होतो. पण मुसळ हे पृथ्वीवर असल्याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याच्यावर प्रभाव गाजवते. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत आल्याने सूर्य आणि चंद्र मुसळाला वर ओढतो हे अशक्य आहे.
सूर्य, चंद्र सरळ रेषेत असो वा नसो, त्यांचा मुसळावरील प्रभाव नगण्यच राहतो, हे आपण वर स्पष्ट केले. मुसळामधील लोखंडी कडीच्या चुंबकत्वाबद्दलसुद्धा असेच आहे. चुंबकीय बलापेक्षा पृथ्वीचे गुरुत्वबल 137 पट प्रभावी असतं. या पृथ्वीच्या गुरुत्वबलामुळेच तिच्यावरील मुसळासारखा पदार्थ स्थिर राहील की अस्थिर होईल, हे ठरते. त्यासाठी गुरुत्वमध्य ही संकल्पना समजून घ्यायला हवी.
पदार्थाचे वजन हे पृथ्वीच्या गुरुत्वबलाचा परिणाम होय. पदार्थाच्या ज्या बिंदूत गुरुत्वबलाचा परिणाम म्हणजेच वजन एकवटलेले असते, त्या बिंदूला त्या पदार्थाचा ‘गुरुत्वमध्य’ असे म्हणतात. हा गुरुत्वमध्य पदार्थाच्या बाहेरसुद्धा जाऊ शकतो. जिकडे पदार्थाचे वस्तुमान जास्त, तिकडे गुरुत्वामध्य झुकतो. गुरुत्वमध्य पदार्थाच्या तळापासून म्हणजे पायापासून जितका जवळ तितका तो पदार्थ स्थिर राहतो. गुरुत्वमध्य उंच गेला की, तो पदार्थ अस्थिर होतो. पदार्थ स्थिर राहील की अस्थिर होईल, यासाठीची कसोटी म्हणजे गुरुत्वमध्यात सरळ खाली लंबरूप रेषा ही पदार्थाच्या पायामधून किंवा तळातून जायला हवी, हे होय. ही लंबरेषा तळाच्या बाहेरून गेली की पदार्थ कलंडतो. या तत्त्वाची अनेक उदाहरणे निसर्गात आणि व्यवहारात आपल्याला दिसतात. मुलांच्या खेळातील ‘डोलती बाहुली’ हे समतोलाचे छान उदाहरण आहे. या बाहुलीचा तळ जड म्हणजे वजनदार केलेला असतो. त्यामुळे बाहुलीचा गुरुत्वमध्य तळाला जवळ राहतो. त्यामुळे ती बाहुली उभी स्थिर राहते. ती वाकडी केली की परत मूळ जागी येते. याचे कारण गुरुत्वमध्यापासून काढलेली लंबरेषा नेहमी तिच्या तळामधून जाते, हे होय. मालाने उंचपर्यंत भरलेली बैलगाडी किंवा उसाने भरलेला ट्रॅक्टरचा गुरुत्वमध्य उंच जातो. अशा वाहनांचे चाक जर खड्ड्यात घुसले, तर गाडी कलंडते. त्यामुळे गुरुत्वमध्यातून टाकलेला लंब गाडीच्या बाहेर जातो आणि गाडी कोलमडते. इटली या देशात पिसा येथे एक उंच मनोरा आहे. तो सरळ उभा नसून तिरका आहे. तो पडत कसा नाही, याचे आश्चर्य वाटते. वैज्ञानिकांनी या मनोर्याचा तळ अधिक जड केल्यामुळे गुरुत्वमध्य बराच खाली राहतो. त्यामुळे मनोरा स्थिर आहे.
आता परातीत मुसळ कसे स्थिर राहते, याचे स्पष्टीकरण बघूया. मुसळ हे सरळसोट सिलिंडरच्या आकाराचे. परातीचा तळ क्षितिज समांतर असेल आणि त्यात हे मुसळ काटकोनात उभे केले, तर ते स्थिर राहते. कारण मुसळाच्या गुरुत्वमध्यातून टाकलेला लंब त्याच्या पायातून जातो. मुसळाला लोखंडी कडे लावल्याने तळ जड होतो आणि मुसळ स्थिर राहण्यास मदत होते. आता हे मुसळ थोडेसे तिरके केले तर… मुसळाचा तळ अगदीच लहान असल्याने गुरुत्वरेषा तळाच्या बाहेर जाते. त्यामुळे मुसळ कलंडते. मुसळ परातीत उभं राहण्याचे हे विज्ञान आहे. ग्रहण असो किंवा नसो, त्याचा मुसळ परातीत उभे राहण्याशी काहीही संबंध नाही. सूर्य, चंद्राचे गुरुत्वाकर्षण आणि चुंबकशक्ती याचा मुसळ उभे राहण्याशी काहीही संबंध नाही. म्हणूनच ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्याने मुसळ उभे राहते व ग्रहण सुटले की, ते पडते हे असत्य आहे. ग्रहण नसताना देखील परातीत मुसळ उभे राहते, हे ‘सांगली अंनिस’ने सिद्ध करून दाखविले आहे.
ग्रहणाला बर्याच धार्मिक आणि दैवी गोष्टी चिकटविल्या गेल्या आहेत. ग्रहणाचा हा गूढ परिणाम म्हणून गर्भावर परिणाम होतो, अशी अंधश्रद्धा आहे. अन्न आणि पाणी दूषित होते, अशाही गैरसमजुती प्रचलित आहेत. या गैरसमजुतींवर पुरावा म्हणून ग्रहणाच्या वेळी मुसळ परातीत उभे करण्याचा चमत्कार चिकटविला जातो. लोकांना ग्रहणाचे परिणाम होतात, हे खरं वाटायला लागतं. म्हणून अशा चमत्काराचे खरे कारण समजून घेऊन अंधश्रद्धेपासून दूर राहणं हेच अधिक योग्य.