कर्मकांडातून मुक्तीचा मार्ग दाखविणार्‍या संत निर्मळा!

शामसुंदर महाराज सोन्नर -

संत चोखा मेळा यांची धाकटी बहीण निर्मळा यांचे संतमालिकेतील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संत बंका यांच्या त्या पत्नी होतं. सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा हे त्यांचे मूळ गाव. याच गावातील निवृत्ती आणि मीरा यांच्या पोटी निर्मळा यांचा जन्म झाला. मेहुणाराजा येथे निर्मळा नावाची नदी आहे. या नदीवरूनच निर्मळा यांना नाव ठेवण्यात आले असावे.

वर्ण अभिमान विसरण्यासाठी पंढरपूरच्या वाळवंटात जो खेळ मांडलेला आहे, त्या खेळातील जे महत्त्वाचे खेळाडू होते, त्यात महिला संत निर्मळा एक होत्या. ज्या काळात वर्णन व्यवस्थेने निर्माण केलेल्या तटबंदीमध्ये गावकुसाबाहेरील समाजाची मोठी घुसमट होत होती, ती कोंडी फोडण्यासाठी ज्या धडका वेगवेगळ्या महामानवांनी दिल्या, त्यात चोखोबांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा होता. वर्णव्यवस्थेला धडका देत असतानाच कर्मकांडामुळे गलितगात्र झालेल्या समाजाला सोप्या नामसाधनेचा पर्याय देण्याचा जो प्रयत्न वारकरी संतांनी केला, त्यात महिला संत निर्मळा यांचा वाटा मोठा दिसतो.

समाजातील जो वर्ग जास्त शोषित आहे, तोच कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेल्याचे दिसते. इथे मात्र निर्मळा या आपली वेगळी वाट निवडण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

तेराव्या शतकात समाजातील मोठ्या वर्गाची परकियांच्या आक्रमणामुळे आणि स्थानिक उच्च वर्णीयांच्या वर्चस्ववादी व्यवस्थेमुळे घुसमट होत होती. तेव्हा संत नामदेवांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्व समाजघटकांतील स्री-पुरुष संतांना एकत्र केले. कर्मकांडात अडकलेल्या समाजाला भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय दिला. या पर्यायाच्या आघाडीच्या प्रचारक म्हणून निर्मळा यांच्याकडे पाहिले जाते.

पंढरपूरच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी जी चळवळ उभी राहिली, त्यात चोखा मेळा यांचे योगदान मोठे होते. खालच्या जातीत जन्माला आल्यामुळे या कुटुंबाला खूप हीन वागणूक मिळाली, छळ झाला. एकीकडे खालच्या जातीत जन्माला आल्यामुळे सामाजिक कुचंबणा आणि दुसरीकडे स्त्री म्हणून होणारी घुसमट दूर करण्यासाठी महिला संतांना संघर्ष करावा लागला. या संघर्षाच्या वाटेवरून चालताना निर्मळा यांनी आपले ज्येष्ठ बंधू चोखोबा यांनाच आपला गुरू किंवा मार्गदर्शक म्हणून स्वीकारल्याचे दिसते. अभंगरचनेचे आणि अध्यात्माचे धडे आपल्याला चोखोबा यांच्याकडूनच मिळाल्याचा उल्लेख निर्मळा यांच्या अनेक अभंगांमध्ये दिसतो. त्यांच्या अभंगात इतर कर्मकांडे नाकरून नामसाधनेवर भर देण्याचा संदेश मोठ्या प्रमाणात दिल्याचे दिसते. त्या स्पष्ट शब्दांत नामसाधनेचा पर्याय अधोरेखित करताना म्हणतात-

संसाराचे कोण कोड। नाही मज त्याची चाड ॥

एका नामेंचि विश्वास । दृढ घालोनिया कांस ॥

जेथे न चले काळसत्ता । विठोबाचे नाम गाता ॥

शास्त्रेपुराणे वदती । नाम तारक म्हणती ॥

या अभंगातून इतर कर्मकांडात अडकण्यापेक्षा देवाच्या नावावर विश्वास ठेवा. त्या विठ्ठलाचे नाव घेतले की काळाचीही सत्ता तेथे चालत नाही, असे ठामपणे सांगत असताना त्यासाठी निर्मळा शास्त्रे आणि पुराणांची साक्ष काढतात. कारण आपल्यासारख्या गावकुसाबाहेर राहणार्‍याचे कोण ऐकणार? यासाठी शास्त्र आणि पुराणांवर हवाला घालतात. कारण ज्या व्यवस्था कर्मकांडांमध्ये समाजाला जखडून ठेवण्यासाठी प्रयत्नशील होत्या, त्या शास्त्र आणि पुराणांचे दाखले देत होत्या. म्हणून वारकरी संतांनी जाणीवपूर्वक शास्त्राचेच दाखले देऊन समाजाला कर्मकांडातून मुक्ती देण्याची व्यूहरचना केली. तोच धागा संत निर्मळा यांनी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

प्रबोधनाच्या या चळवळीत निर्मळा या आपले मोठे भाऊ चोखा मेळा यांनाच गुरुस्थानी मानताना दिसतात; किंबहुना नामसाधनेचा सोपा मार्ग आपल्याला चोखा मेळा यांच्यापासूनच मिळाला असल्याचे सांगताना त्या म्हणतात-

चोखा म्हणे निर्मळेशी । नाम गाय अहर्निशी ॥

तेणे संसार सुखाचा । इह परलोकी साचा ॥

साधन हेचि थोर असे । शांती क्षमा दया वसे ॥

इतर कर्मठ आणि कठीण साधनाकडे वळण्याऐवजी लोकांना नामसाधनेकडे आकर्षित करण्यासाठी हे साधन किती श्रेष्ठ आणि केवळ आपले संचित भक्कम असेल तरच कसे साध्य होते, हे सांगताना निर्मळा म्हणतात-

अनंत जन्माचे सुकृत पदरी । तोचि उच्चारी ओठी हरिनाम ॥

अनंत जन्माचे पुण्य जया गाठी । तोची उच्चारी ओठी हरिनाम ॥

म्हणजे ज्याच्याकडे पुण्यसंचय आहे, तोच हरिनाम घेऊ शकतो, असा विश्वास देत असतानाच अनंत जन्माचे पाप घालवायचे असेल तर त्यासाठी सुद्धा भगवंताचे नाम हाच उपाय असल्याचा विश्वास देताना त्या सांगतात-

निर्मळा म्हणे अनंता जन्माचे । उच्चारिता वाचे पाप जाय ॥

पुण्य मिळविण्यासाठी आणि पाप घालविण्यासाठी ज्या नाना खटपटा कराव्या लागतात, असे पूर्वी सांगितले जात होते. तेथे नामसाधनेचा सुलभ मार्ग वारकरी संतांनी दिला. त्या सोप्या भक्तिपंथाच्या एकनिष्ठ प्रचारक म्हणून संत निर्मळा यांच्याकडे पाहिले जाते. हा वाट अधिक प्रशस्त झाली तर आजही कर्मकांडांमुळे होणारे समाजाचे शोषण थांबू शकते.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]