सांगली अंनिसकडून बेळगाव येथील महिलेचे जटा निर्मूलन

ज्योतीबा अगसीमनी -

जटा वाढविणे, देवीच्या नावाने मुलींना देवदासी म्हणून सोडणे अशा प्रथा या अज्ञान व अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या असतात. कोणताही देव वा देवता जटा वाढवायला सांगत नाही. उच्चशिक्षित, उच्चभ्रू समाजातील स्त्रियांच्या केसात जटा नसतात. मात्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या व अज्ञानी महिलांच्या केसात या जटा दिसून येतात. कारण यांसारख्या अनेक अनिष्ट प्रथा, रूढी व परंपरा गरिबांच्या आयुष्यात या केवळ अज्ञानातून आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या दिसून येतात. स्वच्छतेच्या अभावामुळे, केसांची निगा न राखल्यामुळे केसांचा गुंता वाढतो. त्याकडे दुर्लक्ष झालं की, धूळ, माती साचून हा गुंता वाढून शेवटी सर्व केसांची एकच वजनदार जट तयार होते. मानेला ओझं पेलवयाला त्रास होतो. मान वळवायला त्रास, नीट झोपता येत नाही, कूस बदलताना त्रास होतो. परंतु हा त्रास सहन करायचा असतो, असा समज रूढी-परंपरेने करून दिलेला आहे. परंपरा नाकारली तर काहीतरी नुकसान होणार, ही भीतीही मनात घर करून असते.

यासाठीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली शाखेने जटा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले आहे. अंनिसच्या या शाखेतील कार्यकर्त्यांकडून २२ डिसेंबर २०२३ रोजी बेळगावातील भक्ती भारत पेडणेकर या महिलेचे जटा निर्मूलन करण्यात आले. ही महिला जवळजवळ पाच वर्षे मोठ्ठ्या आंबाड्याएवढा बुचडा होईल अशी मोठ्ठी आणि वजनदार जट डोक्यावर वागवत होती. तत्पूर्वी बेळगाव अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले, त्यांचे भाऊ अर्जुन चौगुले, उपाध्यक्ष जोतिबा अगसीमनी, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर नानावटी आणि पुष्पा चौगुले यांनी या महिलेचे समुपदेशन करून तिला जट काढण्यास राजी केले होते. अशा वजनदार जटेमुळे मानेचे रोग उद्भवतात, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात हे तिला समजावून दिले आणि डोक्यावरील केसांची स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे समजावून दिले. केसांची निगा नीट राखली तर डोक्यात कधीही जट निर्माण होणार नाही, हेही तिच्या मनावर बिंबवले.

या महिलेच्या जटा काढण्यापूर्वी तिचा नवरा, सासू, भाऊ आणि मुले अशा सगळ्या कुटुंबीयांची संमती आहे आणि खुद्द जटाधारी भक्ती पेडणेकर स्वेच्छेने जटा काढण्यास तयार आहे, असे ‘संमती पत्र’ त्यांनी सह्यानिशी लिहून दिले. त्यानंतर जटा काढण्याचा कार्यक्रम झाला. ही जड जट काढताना अत्यंत कौशल्यपूर्वक कातरकाम करावे लागते. ते आशा धनाले यांनी अत्यंत सहजगत्या तिला दुखतंय-खुपतंय का अशी विचारपूस करून अगदी हलक्या हाताने सावकाशपणे भली मोठी जट तिच्या डोक्यावरून कापून काढली. या कामी तिला त्रिशला शहा यांनी खूपच मोलाची मदत केली. या कार्यक्रमानंतर जमलेल्यांचे प्रबोधन करताना अंनिसचे कार्यकर्ते जगदीश काबरे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. जटा काढल्यामुळे देवीचा कोप होईल किंवा कोणत्यातरी प्रकारचा त्रास होईल याची भीती महिलांनी मनातून काढून टाकली तर आपण या अंधश्रद्धेपासून निश्चितच दूर राहू, असे अंनिसच्या कार्यकर्त्या आशा धनाले यांनी सांगितले. बेळगाव शाखेच्या अंनिसचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी जमलेल्या स्त्रियांनी ‘यापुढे आम्ही अशा प्रकारच्या अंधश्रद्धा जोपासणार नाही’, असे सांगितले. जटा निर्मूलनाच्या या कार्यक्रमाचे हे फलित आशादायक आहे.

ज्योतीबा अगसीमनी (बेळगांव अंनिस)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]