ईशान संगमनेरकर -
आमच्या ग्रुपवर तुम्हाला ‘नो एन्ट्री’
प्रवेश निषिध्द तुम्हाला…
तुकोबा वाणी
नामा शिंपी
गाडगेबाबा धोबी
चोखा मेळा महार
कबीर धर्मचिकित्सक
तुम्हाला नाही मांडता येणार
तुमचं मत, तुमची
चिकित्सा-विवेचन इत्यादी…!
केशवसुत
कुसुमाग्रज
मर्ढेकर
सुर्वेनारायण
आणि नामदेव ढसाळ
तुमची तुतारी -गर्जना -विद्रोह
आणि शोषणाच्या गप्पा
नाही चालणार
आमच्या कट्ट्यावर…!
दाभोलकर
पानसरे
तुमचे तर्क नकोत आम्हाला!
आणि नकोय आम्हाला
फुले-शाहू-आंबेडकर आगरकरांची
समता, बंधुता, मानवता,
समाज सुधारणा
आम्ही ठरवलंय
ठरवलंय आम्ही
अभिव्यक्तीचा विजयी
ध्वज उंचावण्याऐवजी
षंड वैचारिक प्रगल्भतेचे,
गुलामीचे निशाण उंचावून
शरणागतीची पांढरी
पताका हाती घेऊन
परिस्थितीशी तह करायचे…!
ठरवलंय आम्ही
ठरवलंय आम्ही…!
ईशान संगमनेरकर मुंबई