‘मन’ की बात…!

डॉ. हमीद दाभोलकर -

10ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष लेख

कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर समाजातील ताण-तणाव अनेक पटींनी वाढल्याचा आपण सगळेच अनुभव घेत आहोत. दरवर्षी 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना भेडसावणारे मानसिक आरोग्याचे विविध प्रश्न काय आहेत, ते कशामुळे निर्माण होतात, ते सोडवताना काय अडचणी येतात आणि आपण काय केले पाहिजे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया.

मानसिक आरोग्याविषयीच्या आपल्यामधील बहुतांश लोकांच्या अडचणींची सुरुवात ‘मन’ या गोष्टीविषयीच्या अज्ञानातून सुरू होते. ‘तुमचे ‘हात’ कुठे आहेत ते दाखवा, तुमचे ‘पाय’ कुठे आहेत ते दाखवा,’ हे आपल्याला बालवाडीमध्ये शिकवले जाते. पण सार्वत्रिक अनुभव असा आहे की, मन कुठे आहे, या प्रश्नाचे योग्य उत्तर अगदी ‘आयआयटी’ किंवा एम. एस्सी.च्या मुला-मुलींना देखील देता येत नाही. याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे, आपले मन म्हणजे काय? ते कुठे असते? ते कसे काम करते, याविषयी काहीही माहिती आपल्या शालेय अभ्यासक्रमात शिकवली जात नाही. त्यामुळे मग मन कुठे असते, या प्रश्नाचे उत्तर अगदी सुशिक्षित लोक देखील, ‘हृदयात असते’, ‘सगळ्या शरीरात कुठेही असते’, ‘मन हे प्रत्यक्षात कुठेच नसते,’ असे त्यांना वाट्टेल ते देतात. मानवाचा मेंदू ही एक रचना आहे आणि मन हे त्या माध्यमातून होणारे कार्य आहे. इतकी साधी वैज्ञानिक गोष्ट आपल्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली तर त्यामधून देखील खूप मोठे प्रबोधन होऊ शकेल. ज्या मनाचे आरोग्य जपायचे आहे, त्याचा आपल्या शरीरातील अवयव कोणता, एवढे तरी आपल्या सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे. आपल्या मेंदूमध्ये अब्जावधी चेतापेशी असतात. या चेतापेशींच्या माध्यमातून विविध प्रकारचे संदेशवाहन मेंदूत होत असते.आपण ज्यांना विचार आणि भावना म्हणतो, तेच हे संदेश! काही वेळा या संदेशजाळ्यात शॉर्ट सर्किट होते आणि आपले भावनिक संतुलन बिघडते. हे इतके साधे, सोपे गणित आहे. पण आपल्या समाजात शतकानुशतके मानवी मनासंबंधीच्या व्यवहारांवर गूढतेचे वलय राहिले आहे. मनाचे आरोग्य जपायचे असेल तर हा गूढतेचा पडदा आपण हटवायला पाहिजे.

मानसिक आरोग्याविषयी समजून घेताना आपल्याला नैसर्गिक भावना, भावनिक ताण-तणाव/टेन्शन आणि मानसिक आजार अशा तीन टप्प्यांत गोष्टी समजून घ्यायला हव्यात. दु:ख, आनंद, राग, द्वेष अशा भावना आपल्या सर्वांनाच आयुष्यातील विविध प्रसंगांत अनुभवायला येत असतात. या भावना ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कुठल्याही कारणाने वरीलपैकी भावना ही अत्यंत तीव्रतेने आपल्याला जाणवू लागली आणि त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अडचण निर्माण होऊ लागली तर त्या नैसर्गिक भावनेचे रूपांतर भावनिक ताण-ताणावांमध्ये होऊ लागते. उदाहरणार्थ – परीक्षेत नापास होण्याच्या घटनेमुळे ‘नाराज वाटणे’ ही नैसर्गिक भावना आहे. पण एखादी व्यक्ती परीक्षेत नापास झाल्याने सारखीच नाराज राहू लागली, पुढील परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करणे टाळू लागली, तर त्या नैसर्गिक भावनेचे ‘टेन्शन’मध्ये रूपांतर होऊ लागले आहे, असे समजावे. जर हे भावनिक ताण-तणाव दीर्घ काळ आपल्या मनावर परिणाम करू लागले, तर त्याचे ‘डिप्रेशन’ किंवा चिंतेच्या मानसिक आजारांमध्ये रूपांतर होते. यामध्ये आजारी व्यक्तीची झोप, जेवण अशा दैनंदिन गोष्टींवर परिणाम होतो. सातत्याने चिडचिड होत राहते. स्वतःविषयी; तसेच भविष्याविषयी नकारात्मक विचार मनात येऊ लागतात, आत्मविश्वास कमी होतो, काही वेळा तर जीवन जगणे नकोसे वाटायला लागते. सतत भीती वाटणे, अस्वस्थता राहणे, मन एकाग्र न होणे अशा स्वरुपाची देखील लक्षणे येतात. मानसिक आरोग्याच्या लक्षणांचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे बहुतांश मानसिक आजारांमध्ये त्या व्यक्तीला आपले मन ‘त्रस्त’ आहे, हे कळू शकते. तसेच आपल्या जवळच्या व्यक्तीचे, ‘मन अस्वस्थ आहे,’ हे देखील आपण निरीक्षणातून ओळखू शकतो. त्यासाठी स्वत:कडे किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थोडे तटस्थतेने पाहणे आवश्यक असते. पृथ्वीतलावर केवळ मनुष्याला हे कौशल्य मिळाले आहे. असे कौशल्य नैसर्गिकरित्या आपल्याकडे नसेल तर ते शिकून घेता येऊ शकते. मानसिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.

मानसिक आजारांविषयी असलेल्या गैरसमजातून अनेक भले-भले लोक हे आपल्याला मानसिक त्रास आहे, हे मान्य करीत नाहीत. पूर्वी जसे कुष्ठरोग किंवा क्षयरोगाकडे एखादा कलंक असल्याच्या नजरेने बघितले जायचे, तसेच काहीसे मानसिक आजारांचे आहे. अनेक लोकांना आपले मन आजारी पडले आहे, स्वीकारायला खूप कमीपणा वाटतो. त्यामुळे अनेकदा, वेळीच उपचार न घेतल्याने आजार बळावतो. आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की, जसे शरीर आजारी पडते, तसेच मन देखील आजारी पडू शकते. त्यामध्ये कोणताही कमीपणा नाही. आपल्याला यामधील कोणतीशी लक्षणे स्वत:मध्ये अथवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये दिसून आल्यास कोणतीही भीड न बाळगता आपण तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये दीपिका पदुकोण, विराट कोहली अशा ‘यूथ आयकॉन्स’नी त्यांना आलेल्या डिप्रेशनविषयी जाहीर ‘शेअरिंग’ केले आहे. दीपिका पदुकोणने तर याही पुढे जाऊन मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी तिच्या संस्थेच्या माध्यमातून काम देखील सुरू केले आहे. यामधून हळूहळू का होईना मानसिक आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.

‘स्किझोफ्रेनिया’सारखे काही ‘तीव्र मानसिक आजार’ असतात, ज्यामध्ये अनेक वेळा आपण आजारी पडलो आहे, हे त्या व्यक्तीच्या लक्षात येणे अवघड असते. या आजारांमध्ये त्या व्यक्तीला ‘भास’ आणि ‘भ्रम’ होतात. वास्तवाचे भान जाते.कोणी तरी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहे, असे ‘विचारभ्रम’ मनात तयार होतात. आजूबाजूला कोणीही बोलत नसेल तरीही बोलल्याचे आवाज एकू येतात. अजून देखील आपल्या समाजात असा त्रास होत असलेल्या व्यक्तीला भगत अथवा मांत्रिकाकडे काही ‘बाहेरची बाधा’ झाली आहे, म्हणून घेऊन जातात. ‘स्किझोफ्रेनिया’सारख्या आजाराचे वेळेत निदान झाले आणि योग्य उपचार मिळाले तर त्यापैकी अनेक लोक हे आजाराशी मैत्री करून अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतात. अशा प्रकारे तीव्र मानसिक आजार असलेल्या ‘रुग्णमित्र’ आणि त्यांच्या पालकांसाठी पुण्यात ‘मानसरंग’ नावाचे व्यासपीठ परिवर्तन संस्था चालवते. नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्या पुढाकारातून हे आम्ही सुरू केले आहे आणि कलेच्या माध्यमातून पुनर्वसनाकडे जाणारी प्रक्रिया यामधून केली जाते. ‘रुग्णमित्र’ आणि पालक यांच्या सहभागातून ही प्रक्रिया चालवली जाते. अनेक रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यामधून स्वत:च्या पायावर उभे राहून सन्मानाचे जगणे जगत आहेत. समाजातील बहुतांश लोकांना मात्र आपल्या दैनंदिन आयुष्यातील ताण-तणाव हाताळण्यासाठी मनोविकारतज्ज्ञ किंवा समुपदेशक यांच्याकडे जाण्याच्या आधी देखील अनेक गोष्टी करता येतात. ‘भावनिक स्वमदत’ म्हणजेच स्वत:च स्वत:च्या भावनांची काळजी घ्यायला शिकणे, ही त्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व्यक्ती-व्यक्तीनुसार प्रत्येकाची भावनिक स्वमदत करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. एखादी बुद्धिवादी व्यक्ती, घडलेला प्रसंग, त्यामागच्या आपल्या मनात प्रतीक्षिप्त क्रिया म्हणून निर्माण होणार्‍या भावना, त्यामागचा विचार असे सगळे सोपस्कार करून विवेकनिष्ठ विचारपद्धतीने स्वमदत करत असेल. दुसरी कोणी व्यक्ती नातेसंबंधांमधून आधार मिळवून भावनिक तोल राखत असू शकते. देवाची संकल्पना आणि धर्मातील कर्मकांडे हे देखील अनेक वेळा अस्वस्थ मनाला स्वत:ला आधार देण्यासाठी उपयोगी पडत असतात. विविध खेळ खेळणे, संगीत, गिर्यारोहण अशा अनेक छंदांचा देखील याकामी उपयोग होऊ शकतो. भावनिक स्वमदत करण्याच्या काही त्रासदायक पद्धती देखील असतात; जसे की, ताण वाढला की व्यसन करणे किंवा सोशल मीडियावर विनाकारण खूप वेळ घालवणे. आपल्या स्वत:च्या भावनिक स्वमदत करण्याच्या पद्धतींविषयी अधिक सजग होणे आणि त्रासदायक पद्धतींऐवजी अधिक आरोग्यपूर्ण स्वमदत पद्धती वापरायला शिकणे, हे मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडे जाण्याच्या आधी करता येण्यासारखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक प्रथमोपचार होय; जसे – भाजले किंवा कापले तर डॉक्टरकडे जाण्याच्या आधी आपण घराच्या घरी शारीरिक प्रथमोपचार करतो, त्याचप्रमाणे एखाद्या भावनिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला आपण नातेसंबंधांच्या माध्यमातून शास्त्रीय मदत करू शकतो, त्याला ‘भावनिक प्रथमोपचार’ म्हणतात. जागतिक आरोग्य संघटना ही मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील इमर्जन्सीला एक महत्त्वाचे उत्तर म्हणून भावनिक प्रथमोपचारांविषयी खूप मोठ्या प्रमाणात सध्या जनजागृती करत आहे. भावनिक प्रथमोपचार कसे द्यायचे, हे कोणीही व्यक्ती काही तासांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकू शकते. ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे ‘मानस मैत्री’ या उपक्रमात असे प्रशिक्षण दिले जाते. समोरच्याचे मन:पूर्वक ऐकून घेणे, अस्वस्थ व्यक्तीला आधार देणे, योग्य ठिकाणी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात उद्युक्त करणे, अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून देखील मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील गंभीर प्रसंग टाळले जाऊ शकतात. भारतात दरवर्षी साधारण दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यामधील जवळजवळ एक लाख हे 15 ते 35 वयोगटातील तरुण- तरुणी असतात. हे लक्षात घेतले, तर योग्य वेळी मानसिक आरोग्याच्या बाबतीतील मदत मिळणे किती आवश्यक आहे, हे आपल्याला कळू शकेल

व्यक्ती आणि कुटुंब म्हणून आपण जशा या बाबतीत काही गोष्टी करू शकतो, तसेच राज्य शासनाने देखील या गोष्टींकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात शासकीय मानसिक आरोग्यसेवांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक जिल्ह्यांत शासकीय रुग्णालयांमध्ये मनोविकारतज्ज्ञ हे पद रिक्त आहे. आपल्याकडे मानसिक आरोग्याची ही परिस्थिती असताना न्यूझीलंडसारखे काही देश त्यांच्या नागरिकांच्या मानसिक आरोग्याविषयी कमालीचे जागरूक आणि कृतिशील झाले आहेत. जेसिंथा आर्डन या तरुण पंतप्रधानांनी मानसिक आरोग्याविषयी स्वतंत्र मंत्रालय आणि बजेट सुरू करण्यासारखे यशस्वी प्रयोग केले आहेत. दिल्लीमध्ये ‘आप’ सरकारने शालेय वयापासून प्रत्येक सरकारी शाळेत ‘मन आनंदी कसे ठेवावे,’ याविषयी ‘हॅपिनेस करिक्युलम’ सुरू केले आहे. महाराष्ट्रातील नवीन सरकार याविषयी संवेदनशीलता दाखवून काही महत्त्वाची पावले उचलेल, अशी अशा आहे. ‘विकास’ हा परावलीचा शब्द झालेल्या आजच्या भारतात मानसिक आरोग्यावरील एक डॉलरची गुंतवणूक चार डॉलरपर्यंतचा परतावा नजीकच्या भविष्यात देऊ शकते,’ हा वर्ल्ड बँकेचा अभ्यास आपण समाज म्हणून लक्षात घेणे आवश्यक आहे

योग्य वेळी योग्य प्रकारची मदत मिळाली तर बहुतांश मानसिक आजार चांगल्या प्रकारे बरे होतात आणि ती व्यक्ती उत्तम आयुष्य जगू शकते, हे दाखवणारे अनेक दिशादर्शक प्रकल्प भारतात देखील उपलब्ध आहेत. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात रस असलेले नागरिक, मानसिक अस्वास्थ्याशी झुंजणारे ‘रुग्णमित्र’, त्यांचे नातेवाईक, शासन आणि समाज या सगळ्यांनी ठरवले तर ‘सर्वांसाठी मानसिक आरोग्य’ हे अजिबात अशक्य नाही. त्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने, संधी मिळेल तिथे ‘मन’ की बात मात्र न चुकता, न थकता करणे आवश्यक आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]