डॉ. सुधीर कुंभार - 9421214136
ग्रामीण भागात काम करत असताना विविध अनुभव येतात.कोणाला कधी कशाची मात्रा लागू पडेल हे सांगता येणे असंभव.श्रद्धा अंधश्रद्धांच्या झुल्यावर होय नाही म्हणता म्हणता अचानक जटा सोडवून घ्यायला महिला कशा तयार होतात याचे उत्तम उदाहरण या प्रस्तुत सत्यकथेत आहे.एका श्रीमंत स्त्रीला अस्वच्छतेमुळे व केसांची निगा न राखल्यामुळे जटा आल्या. त्यावेळी तिचे वय साधारण पन्नास वर्षे असावे. पती निर्व्यसनी आहे दोन मुले आणि एक मुलगी असा सुखाचा संसार होता पण महिलेच्या डोक्यावर 15 वर्षांपूर्वी जटांचा गठ्ठा तयार झालेला होता .हा टोप अभिमानाने ती स्त्री मिरवत होती. भात काढणीच्या वेळी घरातील आणि शेतातील कामाचा खूप व्याप असतो. त्या कालावधीत या महिलेने केस विंचरले नसावेत. या जटा नवीन असल्यामुळे तयार झाल्यावर समजले नसावे. केसावर पाणी न घेतल्यामुळे तसेच बांधून ठेवलेले केस ती सोडायची विसरली असावी. तसेच बांधून ठेवलेले केस पुढे एकमेकात गुंतले आणि त्याच्या जटा झाल्या. महिलेचे वय आता 65 होते. सध्या घरात नवरा-बायको दोघेच राहतात. मुले कामानिमित्त मुंबईला त्यांच्या त्यांच्या बायकापोरांबरोबर राहतात. घरात बघायला कोणी नाही.
दोघे नवरा बायको वाढलेल्या जटा दाखवायला बाजाराच्या दिवशी शाळेत आले होते. जटा दाखवून प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर आणि मनाचे समाधान झाल्यावरच ती दंपती तिथून गेली. नवर्याचे तर काहीच म्हणणे नाही. सध्या घरसंसार सुखी चालला आहे. जटेत कचरा, बुरशीची वाढ झाल्याने वास येत असतो अशी त्याची तक्रार. जटा कोरड्या दिसत होत्या. मोठा गठ्ठा दिसत होता. तर वाढत वाढत जटांची लांबी पंधरा वर्षांत साधारण तीन ते साडेतीन फूट वाढली होती तर रुंदी एक फुटापर्यंत दिसत होती. जटा सोडवताना हे आम्ही मोजूनच घेतो. केस हिस्ट्री घेताना अनेक गोष्टी समजल्या; पण त्यांनी आमच्याशी संपर्क कसा साधला याचे उत्तरही मिळाले. त्या महिलेचा एक भाऊ आम्ही काम करतो त्या ठिकाणी जवळच्या गावातच राहतो. तो सैन्य दलामधून सेवानिवृत्त झाला आहे. त्याला त्या बाबी खटकत होत्या. आम्ही इतर महिलांच्या सोडवलेल्या जटा त्याने पाहिल्या होत्या. तसेच वृत्तपत्रांतून वाचल्याही होत्या. बहिणीला सल्ला देऊन जटा सोडविण्याचा त्याचा प्रयत्न गेली दोन-तीन वर्षे चालूच होता; पण ही महिला ऐकत नव्हती. देवीचा कोप होईल होईल घरावर काहीतरी अनिष्ट प्रसंग येईल म्हणून ती तयार होत नव्हती. तिचा नवरा, मुले मुली तसेच सुना यांनी सांगून पाहिले होते; पण तिने ऐकले नाही. पूर्वी त्या गावात अशा दोन जटाधारी महिला होत्या. त्या तिच्या गुरूच होत्या.
जटेबद्दलची माहिती घेता घेता कोणते साहित्य आणायचे, कोणते साहित्य लागते हे सांगितले. त्यात ब्लेड, कात्री, डेटॉल, शाम्पूच्या दहा-पंधरा पुड्या, बँडेड याबरोबरच गरम पाणी, खुर्ची, स्टूल, प्लास्टिकचा कागद इत्यादी साहित्य लागते. ते आणून ठेवायला सांगितले. जटा सोडवायची वेळ आणि तारीख त्यांना सांगितली. ही साधारण आठवडाभर पुढची घेतली होती. जटा पाहिल्यावर त्या ओल्या असल्यामुळे त्यावर पाणी घेऊ नका, असे सांगितले रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊ मुहूर्त बिहिर्त बघायचे काही कारण नाही, हे अगोदर सांगून ठेवलं. जटा ओल्या असतील, तर सोडवणार नाही, हे सांगण्याचे कारण म्हणजे केस कोरडे असले, तर सहज सुटतात मोकळे होतात. हे अगोदर सांगून ठेवले. त्यानंतर रविवारी नऊच्या सुमाराला त्या गावात पोचलो. आमच्या शाळेत शिकणार्या त्या गावातली दोन चार मुले आणि मुली यांना तिथे येण्यासाठी सांगितले होते. त्याचबरोबर जटा निर्मूलनासाठी काम करणारे आमचे कार्यकर्ते सुहास पाटील, श्री.अल्केश ओहोळ हे नेहमीचे कार्यकर्ते होतेच. त्याचबरोबर नव्याने जटा निर्मूलन शिकणारे रणजीत काळे, योगेश गांगोडे, सलीम मुलाणी, गावडे हे शिकाऊ कार्यकर्तेही बरोबर घेतले होते.
पहिल्या भेटीत झालेली काही प्रश्नोत्तरे. जटा कधीपासून आहेत ते तरी आठवते का?” 2000 सालीही पावसाळ्यात भात काढणीच्या वेळी जट झाली. त्यो गुंता काही सुटलाच नाही बघा. हा गुंता सोडवायचा, विंचरायचा प्रयत्न कधी केला काय? नाही नाही कधीच नाही त्या म्हणाल्या. त्याला हळदी-कुंकू आलेली दिसते, मी म्हणालो. होय घरात परडी आहे, देवीच्या मंगळवार-शुक्रवार देवी अंगात इती ” मग बाया-माणसं प्रश्न विचारायला येतात का?” तर गेली दहा-बारा वर्षे हळद-कुंकू वाहून प्रश्न विचारायला गावातल्या बायका येत्याती.” गावातली दुसरी एक जटवाली होती, तिने दोन वर्ष मागे जट उतरवली. ती माझी गुरू होती. एक ठाणे आता बंद झाले.” तुम्ही काय ठरवले बंद करायचं ठाणं, की सुरूच ठेवायचं?” मी विचारले. तेवढ्यात महिलेन उत्तर दिलं, आता तुमच्याकडून जटा उतरून घेणार. माझ्या सर्व कुटुंबाचं चांगलं चाललंय, जटा उतरायला यल्लमा आईकडे व भराडी देवीकडे साकडे घातलं व्हतं, तिनंबी परवानगी दिली आता, काय होणार नाही मला.” आता जटा नसल्यावर तुमच्याकडे कोणी प्रश्न विचारायला, गार्हाणं घालायला येणार नाही, मग तुमचं तुम्हाला कसं वाटते.” जटा नाही तरी लोक विचारायला येणारच रिवाज पडलाय, लोक येणार; पण आता त्यात जास्त गुतणार नाही. ती महिला म्हणाली, जटा सोडवायला तयार आहात का? का कुणी सांगितले म्हणून दबाव आणलाय म्हणून सोडवता आहात?” मी आपला नेहमीचा प्रश्न विचारला. त्यावरच्या जटा असल्यापासून लई सोसलंया गुरुजी, आता जटा घेऊन जगायचं डेरिंग नाही. भविष्य मात्र चांगलं आहे. त्यामुळे सोडवून घेणार आहे. तुम्ही आता लय प्रश्न नका विचारू शंभर हिस्सा सोडविणार, यशस्वी होणारच आणि यात तुम्ही देवावाणी मदतीला आलासा.”
अशा जटा असणार्या स्त्रिया वर्षातून एकदा एकत्र येतात. हा दहा-बारा जणींचा गट असतो. कालांतराने गट सौंदत्ती, पंढरपूर, तुळजापूर, चिंचणी अशा ठिकाणी जाऊन येतो, तिथे जाऊन साग्रसंगीत पूजाअर्चा करतो. आतापर्यंत ही महिलादेखील अनेकदा गेल्याचे समजले. तेथे पंचामृत, साडीचोळी असा आहेर घेऊन जाण्याची प्रथा आहे. हिच्या अंगात देव देवी मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी हमखास येतेच. हिचे घर मोठे असल्याने अनेक जण प्रश्न विचारायला येतात. कधी शंकर तर कधी यल्लमा अंगात यायची. गावात यातून दानधर्म चालायचा. महिला पहिल्यांदा हळदीकुंकू वाहायच्या. पूजा केली जायची, देवीच्या ठाण्याची पूजा केली जायची. या गावात ज्योतिबा आणि भराडी देवी ही दोन ग्रामदैवतेही आहेत, यांच्या जत्रा-यात्रा वेळीही अंगात यायचं. गावात वाजत गाजत मिरवणूक निघायची. जटा असलेल्या एका महिलेला गुरू करून ठेवलेले आता गुरुचे ठाण (स्थान) वेगळे आणि हिचे ठाण वेगळे चालवलं जायचं. हिच्या घरात देवीचं ठाणं होतं. या महिलेच्या घरात एका जागेत देवीचा जग, मुखवटा, आसूड, कवड्यांची माळ, बांबूची परडी जटातील एक पडलेली मोठी बटही ठेवलेली होती. देव्हारा चांगला सजवलेला होता. अनेक देवही होते. कुलदैवत, टाक, फोटो, मूर्त्या, पूजेचे साहित्य असा सर्व जामानिमा होता. छोटे देऊळच आकाराला आलेले दिसत होते. आवश्यक तशी वातावरण निर्मिती यामुळे होत होती.
आता सौंदत्तीला जटाधारी महिलांना पकडून जटा काढायला लावतात.यावर उपाय म्हणून असे जटाधारी महिलांचे गट गुपचूप दुसरीकडे उतरून पोलिसांना आणि कार्यकर्त्यांना चुकवतात आणि तिथल्या कुंडावर जातात. आई यल्लमाला जटा ठेवायला परवानगी मागायची. जटा उतरवायला देखील परवानगी मागतात. आतापर्यंत तुला डोक्यावर वागवलं आता उतरायला परवानगी दे, असे म्हणून सोडवायला येतात. इतरांनी जटा सोडवलेल्या काढलेले असल्यास त्यांचा अनुभव विचारून जटा सोडवायच्या कृतीस होकार दिला जातो. यात अनेक स्त्रिया सामान्य गरीब कुटुंबातील असतात, त्यामुळे त्यांना प्रवास करणे व पैसे खर्च करणे शक्य नसते. त्या इतरांना गार्हाणं व मागणी घालायला लावतात.
प्रश्न विचारता विचारता या महिलेला जटांचा काही त्रास झाला का, होतो का? विचारल्यावर जटांमुळे डोकेदुखी, अर्धशिशी, मान दुखणे, डोळ्यांचा त्रास, सर्दी अशा बाबी कायम होत असतात, तसेच कंबरदुखीचा त्रास होतो; पण या महिला असा त्रास अंगावर काढतात. जटाधारी महिलांना पाठीवर झोपताच येत नाही. जटा भिजल्या, तर त्यामध्ये वाढलेल्या बुरशीमुळे सतत वासाचा त्रास होतोच. त्यातच ऊवा व लिखांचा त्रास सुरू झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता वाढते. यामुळे अशक्तपणा येतो, हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे चक्कर आणि थकवा येण्यासारख्या बाबी सुरू होतात. या जटा सोडवायला गेलेल्या महिलेला आधी काही मोठ्या व्याधी झाल्या होत्या का हे विचारले असता त्यांनी पाच विविध ऑपरेशन झाल्याची माहिती दिली. ही तर आम्हाला धक्कादायक बाब होती. किडनी स्टोन दोनदा काढला होता. गर्भाशयाची पिशवी काढणे, अपेंडिक्सचे ऑपरेशन आणि डोळ्यातील मोतीबिंदूचे ऑपरेशन अशा उपचारांची मालिका या महिलेने सहन केली होती. जटा सोडवायच्या वेळी महिलेला विचारले अंगात येणार्या देवाला किंवा देवीला एवढा त्रास कसा होतो. त्यावर ती हसून म्हणाली, देवीला नाही मलाच त्रास झाला आहे. हा प्रश्न तिने पूर्णपणे टाळला. देवीला किंवा देवाच्या अंगात संचार करता येतो; पण त्यांना रोग बरे कसे करता येत नाहीत. या प्रश्नाला ती बिचारी उत्तर देऊ इच्छित नव्हती.
जटा सोडविण्यापूर्वी पुन्हा एकदा विचारायचे असते की आता जटा सोडवायच्या आहेत का? होय, म्हणून त्या जटाधारी महिलेने सांगितले पाहिजे, त्यांच्या कुटुंबातील इतरांनी नाही. त्यानंतर त्यांनी जटा सोडविण्यासाठी आणलेले साहित्य पाहिलं आणि त्यांना आवश्यक सूचना दिल्या. या कामासाठी दोन-तीन तास लागणार आहेत हेही सांगितलं. यांचा चेहरा पहिल्यांदा थोडासा तणावयुक्त वाटला पुन्हा एकदा त्यांना दिलासा यावा, म्हणून यापूर्वी आम्ही सोडवलेल्या जटांचे फोटो त्यांना दाखवले. त्यांची खात्री व्हावी, यासाठी असे करावे लागते. वातावरण ताणरहित होईल अशी सकारात्मक चर्चा कार्यकर्ते आणि महिलेच्या कुटुंबात सुरू ठेवली.
जटा सोडवायला सुरूवात केल्यानंतर ते बघण्यासाठी अनेक लोकांची विशेषतःमहिलांची गर्दी जमली होती. त्यांनाही काही प्रश्न पडलेले होते त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिली. जटा निर्मूलनाविषयी माहिती सांगितली आणि फोटो दाखवले. या एक वर्षाच्या मुलीपासून लग्न झालेल्या अथवा लग्न न झालेल्या मुलींच्या जटा होत्या, तशाच अत्यंत म्हातार्या पण जास्त काळ म्हणजे चाळीस वर्षे जटा ठेवलेल्या महिलांच्या जटा कशा सोडवल्या या बाबी फोटोतून त्यांना पाहायला मिळाल्या. त्यात एक महिला, ज्या महिलेला पूर्वी जटा होत्या आणि आम्ही त्या सोडवल्या होत्या, तीही तेथे आली होती. तिने त्रास होत नाही संकट येत नाही, हे आवर्जून सांगितले. या गावात अशी ही वेगळीच गोष्ट होत होती की, जटा सोडवून घेतलेली महिला आपण होऊन पुढे येऊन आमच्या बरोबर कार्यकर्ती होऊन विद्यार्थ्यांना व आम्हाला जटा सोडवायला मदत करत होती. नाव ठेवण्यापेक्षा त्या लोकांना ज्या जटांची भीती वाटत होती त्यालाच हात घातल्यावर जटा सोडवायला इतरही सरसावले होते. जस-जसे जटा सुटत होत्या तस-तशा त्या महिलेच्या चेहर्यावर बदल होत होते आणि केसांचा गठ्ठा मोकळा होत असताना संपूर्ण चेहर्यावरचा ताण कमी झालेला दिसत होता. त्यामुळे तेथे आलेल्या अनेक मैत्रिणी महिलेला दिलासा देतच होत्या; पण आम्हाला त्या चर्चेतून वेगवेगळ्या गोष्टी कळत गेल्या. या महिलेने कसे प्रश्न सोडवले, अंगात आल्यावर काय काय केले ते ऐकणे मोठे मनोरंजक होते. सर्व केस सुट्टे केले गेल्यावर हाताने केसातून कंगवा फिरवायला लावला कुठे कुठे अडकत होते, तिथे तिथे ती बट मृत केस काढून सोडवण्यात आली आणि शेवटचा टप्पा म्हणजे केस धुण्याचा कार्यक्रम. यात सोडविलेल्या केसातील तेल, धूळ, कचरा संपूर्ण धुण्यासाठी डोक्यावरून थोडे गरम पाणी टाकून आणि शांपू लावून केस चोळून चोळून धुण्याचे काम कार्यकर्त्या मुलींनी मस्तपैकी केले. ही केस धुण्याची स्वच्छतेची प्रक्रिया दोन वेळा केली आणि त्या महिलेला आंघोळ करायला पाठवले.
आंघोळ करून आल्यावर त्या महिलेच्या सुटलेल्या जटांमधून कंगवा फिरवायला लावला आणि कुठे अडथळा आहे का ते पाहण्यात आले. जटा पुन्हा होऊ नयेत म्हणून पुढे कोणती काळजी घ्यायची याच्यावर सर्वांबरोबर चर्चा केली. यांना शेजार्यांनी जेवली का? असं विचारायचं नाही तर केस विंचरले का? असे विचारायचे, सलग आठवडाभर दररोज केसावरून पाणी घेऊन शांपूने केस धुवायचे, ओले केस कोरडे करायचे आणि विंचरायचे, नंतर तेल लावायचे, दिवसातून चार वेळा तरी कंगवा फिरला पाहिजे…. कंगवा सहज फिरला पाहिजे असे सांगितले. अडकत असल्यास अडथळा गुंता लगेच काढावयाचा. त्या महिलेच्या मैत्रिणी आणि घरात कोणी तरी याची जबाबदारी स्वीकारली. सर्दी वगैरे झाल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्यायला सांगितले. या सगळ्या जटा निर्मूलन प्रक्रियेचे अगोदरचे आणि नंतरचे फोटो काढून ठेवण्यात आले. अगोदर एक मुलाखत आणि सोडल्यावर एक मुलाखत घेण्यात आली होती आणि हे सगळे कागदोपत्री पूर्तता केली होती. जटा सोडून झाल्यावर आग्रहाने त्यांनी सर्वांना जेवू घातले. काम कमी झाल्यामुळे नवर्याने तोपर्यंत सगळा वाडा फिरून दाखवला. त्यांची नात आमच्याबरोबर सगळीकडे फिरत होती. जेवणानंतर कुटुंबाने टॉवेल टोपी घेऊन नारळ देऊन आमचे आभार मानले.
गप्पांच्या ओघात आम्हाला एक वेगळीच माहिती मिळाली होती. जटा सोडवून घ्यायची विनंती भावाने, शेजारी-पाजारी, सुनांनी, मुलांनी केली होती. अनेकदा यावर चर्चा झाली होती; पण त्या जटाधारी महिलेची देवीच्या कोपाच्या भीतीने मानसिक तयारी मात्र नव्हती. ही तयारी करण्यासाठी भावाने एक गोष्ट तिला सांगितली की कुठल्यातरी माणसाकडे भावाने जटाचा विषय काढला होता त्यावेळी माणसाने सहज सांगून टाकले, की अशा स्त्रियांवर अंत्यसंस्कार वेगळ्या पद्धतीने करावे लागतात, त्यांना मृत्यूनंतर जाळत नाहीत तर पुरतात. भावाबरोबर कुटुंबाची आणि बहिणीची चर्चा झाली. त्यानंतर मात्र या महिलेची विचाराची प्रक्रिया बदलली. हा संस्कार ऐकल्यावर महिलेने थोडा पुढचा विचार केला, तिच्या मैत्रिणी आणि इतरांच्याबरोबर चर्चा केली. माझं बरं झालं पण माझ्या धर्मानुसार अग्निसंस्कार माझ्यामागे असणार्यांनी करणे गरजेचे आहे. नाहीतर मला मोक्षप्राप्ती होणार नाही. त्यातून आता मुलांचं आणि नातवंडांचं चांगलं चाललेलं आहे. गावात कोणी मृत्यूनंतर आपल्याला नावे ठेवू नयेत. घरात येऊन आत्मा कोणाला त्रास देऊ नये म्हणून आता आपणच बदलले पाहिजे. जटा सोडवून घ्यायचं म्हणून मनोमन ठरवलं. गावात कोणी विचारणारे नसले, तरी इतर ठिकाणी विचारून घेतले. आतापर्यंत यल्लमा देवीला विचारून जटातून सुटका करून घ्यायची इच्छा बोलून दाखविली. पंधरा वर्षांचा भार डोक्यावरून काढायला देवीची परवानगी घेतली. याबाबत भावाशी नवर्याशी चर्चा केली आणि नंतरच त्यांनी जटा सोडवायला आमच्याशी संपर्क केला होता. मृत्यूनंतर आत्मा भरकटला जाईल. त्याच्यामुळे कुटुंबाला मुलाबाळांना त्रास नको. मृत्यूनंतर उरलेले संस्कार केले जात नाहीत ऐकल्यामुळे जटा सोडवण्याची प्रबळ इच्छा त्या महिलांमध्ये निर्माण झाली. आपल्यावरही मृत्यूनंतर असेच संस्कार व्हायला हवेत, ही मानसिकता येथे होती.
हे सर्व असले तरी तिची मानसिक तयारी आम्ही केली होती. त्यामुळे जटा निर्मूलनाची, जटामुक्तीची तयारी आम्ही करू शकलो. जटाधारी प्रत्येक व्यक्तीची केस ही भिन्न भिन्न असते. आतापर्यंत माझ्याकडून 120 महिलांच्या जटा सोडवून झाल्या आहेत. जटा कापण्यापेक्षा जटा सोडविताना जटाधारी व्यक्ती आणि आपणाला थोडा जास्त वेळ त्रास होतो; पण केस असण्याची भावना जपता येते, ही जमेची बाजू आहे. प्रत्येक केसमध्ये जटा असण्याची, ती ठेवण्याची कारणे वेगवेगळी असतात. अशा व्यक्तींचे समुपदेशन करून जटा सोडवण्याची पद्धती, त्यांना समजावून सांगायची पद्धती भिन्नभिन्न ठेवायला लागते. त्या व्यक्तीने नंतर कोणतीही तक्रार करू नये, याची काळजी घेतली जाते. मानसिक, शारीरिक तक्रार कमी झाल्यामुळे जटा सोडल्यानंतर मनावरचा ताण हलका होतो, अशा व्यक्ती भविष्यकाळात अत्यंत आनंदी वातावरणात आपले आयुष्य जगतात. आज घडीला या क्षेत्रात काम करणार्या आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांमुळे अनेक कुटुंबे सुखी समाधानी अंधश्रद्धामुक्त झाली आहेत.
– डॉ. सुधीर कुंभार, कराड
लेखक संपर्क ः 94212 14136