वधूवर सूचक केंद्र : खास आंतरजातीय/धर्मीय विवाह इच्छुकांच्यासाठी!

डॉ. हमीद दाभोलकर -

भारतीय नागरिकांच्या आयुष्यातील खूप सारे निर्णय हे जात आणि धर्म या दोन गोष्टींभोवती फिरत असतात, ही नाकारता येऊ शकेल अशी गोष्ट नाही. नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आपल्याला ह्या गोष्टीचा अनुभव आला. जात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपले जीवन आणि सार्वजनिक व्यवहार असावेत या विषयी अनेक वेळा चर्चा होते, पण प्रत्यक्षात त्या दिशेने कार्य करताना मात्र अनेक अडचणी येतात.

हे केंद्र कशासाठी ?

आंतरजातीय/धर्मीय विवाह हा जात आणि धर्माच्या पलीकडे जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील त्यांच्या ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथात आंतरजातीय विवाहांमुळे जात निर्मूलनाच्या दिशेने कसे पाउल पडू शकते हे नमूद केले आहे. आपल्या समाजात स्वजातीय अथवा स्वधर्मीय लग्न हे जात आणि धर्माची संकल्पना बंदिस्त ठेवण्यासाठी वापरली गेलेली पद्धत आहे. आंतरजातीय/धर्मीय विवाहांमुळे ह्या मध्ये मोकळेपणा येऊ शकतो. त्याला पाठबळ देण्यासाठी हे केंद्र महाराष्ट्र अंनिस सुरू करत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस मार्फत नुकतेच आंतरजातीय /धर्मीय विवाह करू इच्छिणार्‍या व्यक्तींसाठी वधूवर सूचक मंडळ चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जात ही कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत असत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या इतकेच ते जातिअंताच्या लढाईविषयी देखील आग्रही असत. जवळजवळ गेली दोन दशके मअंनिस ही आंतरजातीय/धर्मीय विवाहांना पाठबळ देणारी यंत्रणा राबवते. आजपर्यंत अशा शेकडो विवाहांना अंनिस कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले आहे. अनेक ठिकाणी अशा लग्नांना दोन्ही बाजूच्या घराच्या लोकांचा टोकाचा विरोध असतो. त्यामधून ह्या मुलांना जीवाचा धोका देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सेफ हाउस गाईड लाईन प्रमाणे महाराष्ट्रातील पहिले सेफ हाउस अंनिसने चालू केले आहे. आंतरजातीय/धर्मीय वधू-वर सूचक मंडळ हे याच प्रयत्नातले पुढचे पाऊल आहे.

प्रत्यक्ष कार्यवाही कशी चालेल?

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ज्या विवाहेच्छुक व्यक्तींना आंतरजातीय /धर्मीय विवाह करण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांच्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्याशी संपर्क करून नोंदणी करायची आहे. महा.अंनिस मध्यवर्ती कार्यालयात हे सगळे नोंदणी झालेले फॉर्म एकत्र करून तेथून हे वधू-वर सूचक केंद्र चालेल. यासाठी वेबसाईट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढे या विषयाचे स्वतंत्र अिि देखील तयार केले जाणार आहे.

प्रत्यक्षात काय होणे अपेक्षित आहे?

समाजात जसे स्वयंप्रेरणेने आंतरजातीय /धर्मीय विवाह करणार्‍या लोकांचे प्रमाण वाढेल तसे जातीच्या आणि धर्माच्या भिंती ढासळू लागतील अशी अपेक्षा आहे. एकमेकांना समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये स्व जातीचा/धर्माचा वृथा अभिमान. आपलीच जात/धर्म सर्वश्रेष्ठ आहे ही समजूत अशा अनेक गोष्टींना हळूहळू तडे जाऊ लागतील. ‘अंनिस’ मार्फत पाठबळ देण्यात आलेल्या अनेक आंतरजातीय/ धर्मीय जोडप्यांमध्ये हे घडताना दिसून आले आहे. जाती/धर्माच्या पलीकडे जाऊन हे लोक माणूस म्हणून एकमेकांशी संवाद करू शकतात, त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीवर देखील होताना दिसतो, असा अनुभव आहे.

हा उपक्रम केवळ आंतरजातीय/धर्मीय विवाहांच्या पुरता मर्यादित न राहता अशा प्रकारे होणार्‍या सर्व विवाहांच्या मध्ये आपला जोडीदार विवेकी पद्धतीने निवडणे आणि परिचयोत्तर विवाह यांना प्राधान्य दिले जाणार आहे. ही प्रक्रिया दोन्ही व्यक्तींच्या निर्णयस्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करून केले जाणार आहे. हे विवाह हे कुंडली, कर्मकांड यांच्या पलीकडे जावून महात्मा फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीने अथवा विशेष विवाह नोंदणी कायद्यामार्फत होतील याची काळजी घेतली जाणार आहे.

आपल्या समाजात जात आणि धर्म जाणिवा ह्या अत्यंत खोलवर रुजलेल्या जाणिवा आहेत आणि केवळ आंतरजातीय/धर्मीय विवाह केल्याने त्या लगेच नष्ट होतील अशी भाबडी अपेक्षा यामध्ये नाही, पण जाती आणि धर्माच्या भिंती अधिकाधिक उंच होत असलेल्या या कालखंडात जात आणि धर्माच्या पलीकडे जाणारा समाज निर्माण करण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

-डॉ. हमीद दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]