नरेंद्र लांजेवार - 9422180451
वारकरी संप्रदायातील क्रांतिकारी पाऊल उचलून अखंड मानवजातीस ‘अ–जात’तेचा संदेश देणारे समाजसुधारक, संत गणपती महाराज यांनी नव्वद वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर गावात जातिव्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला होता. त्यांच्या प्रयत्नांनी ‘अजात’ हा पंथ निर्माण झाला, जो कुठलीही जात न मानता आजही अल्प प्रमाणात का असेना; पण तो सुरू आहे. 1920 च्या दरम्यान विदर्भात अस्पृश्यता निवारणाचे काम गणपती महाराजांनी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू केले. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्या प्रयत्नांतूनही ते तसे नंतर सुरूच होते. गणपती महाराजांनी ‘अजात’ नावाचा आचार पंथ स्थापन केला.
महाराष्ट्रातलं संतांचं कार्य भक्कम आणि प्रचंड आहे. ज्या काळात ही संतमंडळी जन्माला आली, त्या काळात समाजाची अवस्था ही भेदाची होती. तो भेद होता जातिभेदाचा, स्पृश-अस्पृश्यतेचा, श्रीमंत-गरिबीचा, उच्च-नीचतेचा, स्त्री-पुरुष अशा वेगवेगळ्या प्रकारचा. सोबतच रुढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धा यांनी व्यापून होता. कुणीतरी सांगितलं म्हणून हे कार्य करावंच लागतं; अन्यथा आपल्यावर कोप होईल, या भावनेत समाज जखडलेला होता.
या सर्वांना वाचा फोडणारा, समाजाची सत्य परिस्थिती दाखवणारा, त्याला जाती-पातीच्या गर्तेतून बाहेर काढायचं असेल तर त्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न किंवा आपणही माणूस आहोत; दास नाही, याची जाणीव करून देणारा प्रयत्न संतांनी केला. ज्या मूठभर लोकांनी संस्कृतीच्या नावाखाली लोकांना देवाचा कोप वगैरेची भीती दाखवून कर्मकांडांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, चातुर्वर्ण्य समाज, वर्णभेदातून जातिभेदाकडे वळण्यासाठी प्रयत्न केला, त्या लोकांनी स्वत:ची व आपल्या वंशजांची वर्चस्वाची व्यवस्था, मक्तेदारी मात्र स्वतःकडे ठेवली. बोटांवर मोजण्याइतक्या लोकांनी देव-धर्माच्या नावाखाली या जनसमुदायाला आपल्या मताप्रमाणे वागण्यास बाध्य केलं. सर्वार्थानं या त्यांच्या जोखडांना नाकारण्याचं कार्य जर कुणी केलं असेल तर ते संतांनी. संतांनंतर ‘सत्यशोधक समाज’च्या महात्मा फुले यांनी हे सर्व कार्य केले. लोकांना ब्राह्मणी कर्म-धर्मकांडातून बाहेर पाडण्यासाठी महात्मा फुलेंनी ‘सत्यशोधक समाज’ची स्थापना केली. ब्राह्मणी वैदिक धर्माचा, चाली-रीतींचा त्याग करून मानवी मूल्यांवर आधारित अशी जीवनप्रणाली स्वीकारण्याचा आग्रह महात्मा फुले यांनी धरला. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही विचारधारा ‘सत्यशोधक समाज’ने सुरू ठेवली.
1920च्या दरम्यान विदर्भात अस्पृश्यता निवारणाचे काम गणपती महाराजांनी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू केले. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्या प्रयत्नांतूनही ते तसे नंतर सुरूच होते. गणपती महाराजांनी ‘अजात’ नावाचा आचार पंथ स्थापन केला. मंगरूळ दस्तगीर (ता. चांदूर, जि. अमरावती) या ठिकाणी गणपती महाराजांनी चातुर्वर्ण्याच्या विरोधात अब्राह्मणी चळवळ उभी केली. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना जातनिर्मूलनाचे महत्त्व समजावून सांगितले की, जी जात नाही, ती जात; आपण स्वतःला ‘अजात’ समजू या… मानवता हाच आपला धर्म आणि माणूस हीच आपली जात… म्हणून अनेकांनी आपली पूर्वाश्रमीची जात गणपती महाराजांच्या आवाहनावरून सोडून दिली. बहुजन समाजातील गणपती महाराजांचे हे सत्यशोधकीय कार्य मात्र महाराष्ट्रात दुर्लक्षितच राहिले.
जाती न पूछो साधू की । पूछ लीजिये ग्यान ॥
मोल करो तलवार का । पडा रहन दो म्यान ॥
संत कबीरांच्या या दोह्यामध्ये माणसाचं मोल हे त्याच्या ज्ञानानं होतं; जातीनं नाही, ही स्वच्छ प्रतिमा सर्वांपुढे मांडली आणि त्या काळात हजारो अभंग लिहून, साहित्यनिर्मिती करून, क्रांतिकारी पाऊल उचलून समाजजागृतीचे, परिवर्तनाचे कार्य गणपती महाराजांनी केले.
संत, विचारवंत कोण्या एका जातीचे, धर्माचे नसतात; तर ते अखंड मानवजातीच्या उत्थानासाठी काम करतात, ज्यामध्ये अनेक थोर संतांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून आपलं मत पदोपदी प्रदर्शित केलं. ज्या-ज्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली नाही, त्याच्या स्वाभिमानावर, विवेकावर गदा आली, विरोध झाला, तेव्हा-तेव्हा तो नव्यानं उभा झाला. ज्या प्रकारे करता येईल, त्या प्रकारे स्वत:चा विरोध दर्शवला आणि लोकांना जागृत केलं (त्यांचं प्रबोधनाचं माध्यम त्या-त्या काळातील होतं.) दास्यवृत्तीचा स्वीकार न करता देवाची (मूर्ती) पूजा, मंदिरप्रवेश, आध्यात्मिक साहित्याचं वाचन, संस्कृतवाचन, देवाची भक्ती या सर्वांची मक्तेदारी फक्त भटांची नाही, असे विचार संतांनी कीर्तन, प्रवचन, अभंग, ओव्या, दोहे, गवळण, पोवाडा अशी साहित्यनिर्मिती करून लोकांपर्यंत नेले आणि समाजजागृतीचं मोठं कार्य आपापल्या काळात केलं. त्यामध्ये संत कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखा मेळा, जनाबाई, तुकाराम, बहिणाबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांचा समावेश होतो. स्त्रीसंतांचादेखील यात तितकाच महत्त्वपूर्ण सहभाग होता. आपल्या व्यथा या स्त्रीसंतांनी विठ्ठलाजवळ मांडल्या. संतांची परंपरा पुरोगामित्वाची; तसेच समाजजागृतीचीही होती. कधी त्यांचा आवाज कायमचा बंद केला गेला, तर कधी समाजातून बहिष्कृत करण्यात आलं; मात्र त्यांची संघर्षाची लढाई सुरूच राहिली.
या संतांच्या मालिकेतलं एक नाव आहे, संत गणपती ऊर्फ हरी महाराज विठोबा भबुतकर. (जन्म – भाद्रपद वद्य अष्टमी 1887) त्यांनी वर्हाडामध्ये समाजात रुजलेल्या सर्व कुप्रथांना, रूढी, प्रथा-परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धेला तिलांजली दिली आणि अखंड मानवजात एक करण्याचं कार्य केलं. त्यांची वाटचाल मंगरूळ दस्तगीर (ता. धामणगाव (रेल्वे), जि. अमरावती) या गावापासून सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचं वय केवळ सात वर्षांचं होतं. त्यांची आई त्यांना काचणूर (ता. आर्वी, जि. वर्धा) येथून मंगरूळ दस्तगीरला
(ता. चांदूर, जि. अमरावती) घेऊन आली. भक्तिमार्गाची अतिशय आवड असलेले छोटे गणपती घोराडच्या केजाजी महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानून त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सोबत कीर्तन-प्रवचन करायला लागले.
बाल गणपतीच्या मनात आपल्या गुरूंविषयी अत्यंत आदर होता. ते भ्रमंती करायला लागले. वारकरी विचारांचे असलेल्या गणपती यांनी कीर्तन, प्रवचन, पंढरीची पायी वारी आणि या सर्वांमधून लोकांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. गणपती कीर्तन, प्रवचन करून महाराज झाले आणि वाटचाल सुरू झाली, एका नव्या क्रांतिकारी संताची.
केजाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गणपतींचं कार्य सुरू राहिलं. त्यांनी देशभ्रमंती करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना पदोपदी समाजातले अनेक ज्वलंत प्रश्न दिसले. त्यावर काय तोडगा काढायचा, यावर त्यांचं चिंतन सुरू झालं. त्या प्रश्नांमध्ये माणूस माणसाचा भेद करताना त्यांना दिसला, स्त्रीचा बंदिवास, अघोरी अंधश्रद्धा दिसली, कर्मठ कर्मकांडं आणि रूढी-प्रथा-परंपरांमध्ये पिचलेला मानवसमाज दिसला. राज्यकर्ते जरी इंग्रज होते, तरी व्यवस्थेत, समाजात हे भेद आपल्याच लोकांकडून होताना त्यांना दिसले आणि माणूस एक आहे, तो जातीच्या जोखडात बैलासारखा मान खाली घालून ‘माझ्या हेच नशिबात आहे,’ म्हणून गप गुमान व्यवस्था स्वीकारत होता. हे दास्यत्व, ही हीन-दीन वागणूक, पिळवणूक संत गणपती महाराजांनी आपल्या भ्रमंतीमधून अनुभवली आणि आपल्या कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृतीचं कार्य सुरू झालं. लोकांच्या, बायाबापड्यांच्या मनावर असलेला हा पगडा पुसून काढण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला.
आपल्या 60 हजारांपेक्षा जास्त शिष्यांना या कार्यासाठी प्रवृत्त केलं आणि सुरुवात केली स्वत:पासून. भ्रमंती करताना एकदा अचलपूरला गेले असता त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपला आणि पटवी जातीच्या एका विधवा स्त्रीसोबत (जिचा सात वर्षांचा मुलगा होता) आंतरजातीय विधवाविवाह केला. त्यामुळे संघर्षाची ठिणगी पेटली आणि गणपती महाराजांना विरोध सुरू झाला.
अन्नकाला
महाराजांनी आपल्या अनेक शिष्यांना सोबत घेऊन ‘अन्नकाल्या’ची सुरुवात केली. कारण कुठलंही धार्मिक कार्य असलं तर अनेक जाती, धर्म, पंथांचे लोक एकत्र येतात आणि आपली भक्ती संपली की, आपापल्या घरी, नातेवाईक, जात, समाजाकडे वळतात. महाराजांनी या भक्तांना सांगितलं की, आपापल्या घरात शिजलेलं अन्न आणा आणि त्याचा काला करून तो प्रत्येकानं प्रसाद म्हणून भक्षण करावा. महाराजांच्या भक्तपरिवारामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक होते. 1916 चा तो काळ होता. जवळपास सर्वत्र अस्पृशता पाळली जात होती. हा नीच, तो उच्च असा भेद होता. त्यामुळे अस्पृश्यांच्या घरची भाकर आम्ही कशी खावी, याचा विचार अनेक भक्तांना पडला. त्याचं निरसन महाराजांनी केलं आणि अन्नाच्या रूपानं जात कालवली. या ‘रोटी व्यवहारा’नं क्रांतीची पाऊलवाट सुरू झाली. मग त्या पाऊलवाटेचा रस्ता बनवण्यासाठी महाराजांनी अनेक निर्णय घेतले. त्यातलाच एक निर्णय होता बेटी व्यवहाराचा.
बेटी व्यवहार
‘बेटी व्यवहार’ जर आपसांत झाले तर आपापसांतला जातीयवाद नष्ट होऊन या भारतातून जात नष्ट होऊन अखंड मानवजात एक होईल, असं स्वप्न उराशी बाळगून या कार्याची सुरुवात 1920 मध्ये झाली. आपल्या शिष्यांना, जनतेला आवाहन करून आपसांत वेगवेगळे आंतरजातीय विवाह सुरू केले. इतक्यावरच महाराज थांबले नाहीत तर उद्या या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला, पुरुषानं दुसर्या स्त्रीशी संबंध ठेवले व तिच्या अस्तित्वावर गदा आली तर त्यावर तोडगा काढून ब्रिटिश सरकारच्या काळातील तेव्हाच्या एक रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दोघांचीही संमती नोंदवून साक्षीदारांच्या सह्या व्हायच्या. ही पद्धती होती महाराजांची.
स्त्री ः बंदिनी ते स्वामिनी
स्त्रीला बंधमुक्त करण्याचंही काम महाराजांनी त्या काळात केलं. त्यांनी सांगितलं, “स्त्रीला वाटत असेल तर तिनं मंगळसूत्र घालावं, सौभाग्याच्या लेण्यापेक्षा सौंदर्याचं प्रतीक म्हणून वापरायचं असेल तर ती स्वतंत्र आहे.” त्याचीही सुरुवात आधी आपल्या घरातून केली व गुरुआज्ञेनं कित्येक स्त्रियांनी ही बंधनं झुगारली. ते म्हणतात-
स्त्रियांना शिक्षण देत । नाही कपटी जन ॥
याचे सांगती कारण । चित्त देऊन ऐकणे ॥
ज्ञानवान स्त्रिया होतील । पतीसंगे भांडतील ॥
सम अधिकार मागतील । त्यांना ते पडतील देणे ॥
या भाषेत त्यांनी स्त्रीबद्दल तत्कालीन लोकं काय विचार करतात, हे आपल्या अभंगांमधून सांगितले. त्या काळात लोकांना जातीवरून ओळखले जात होते (उदा. महादू मातंग, दिनू कुंभार, महादेव माळी, गोदा मायरीन इ.) अशाच खालच्या मानल्या जाणार्या जातीतील स्त्रियांना शिक्षणासाठी प्रेरित केलं. त्यातील ‘झिंगा गोंडीन व गोदा मायरीन’ या स्त्रियांनी त्या काळात अभंगरचना केली. त्यांचे अभंग आजही पाहावयास मिळतात. स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल महाराज म्हणतात –
कोण्याही जातीची कोणी । कांता आणावी करूनी ॥
तिचे लग्न तिच्या मनाने । झाले जगी पाहिजे ॥
मंदिरप्रवेशाची घटना
समाजातील ज्या लोकांना महाराजांनी आपल्या विचारांनी जोडले होते, त्यांना त्यांच्या जातीतून बेदखल करण्यात आलं. या लोकांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास मनाई होती. तेव्हा महाराज ज्या-ज्या ठिकाणी आपले सहकारी व शिष्यांना घेऊन राहिले, त्या-त्या ठिकाणी त्यांनी विहिरी खोदून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. महाराजांनी मंगरूळ दस्तगीर येथे 9 ते 11 नोव्हेंबर 1929 दरम्यान एक ‘वर्हाड – मध्य प्रांत बहिष्कृत परिषद’ घेतली आणि हजारो बहुजनांना एकत्र करून स्वत:च्या मालकीच्या विठ्ठल मंदिरात बहुजन, अस्पृश्यांचा प्रवेश घडविला. याप्रसंगी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं; मात्र तेव्हा बाबासाहेब कलकत्त्याला होते आणि अन्य कामांत व्यस्त असल्यानं त्यांनी कलकत्त्याहून तेव्हाचे अस्पृश्यांचे नेते विराटचंद्र मंडल यांना पाठवलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय संमेलन झालं. चळवळीत काम करणारी महाराष्ट्रातील सत्यशोधक मंडळी या तीन दिवसांच्या संमेलनाला उपस्थित होती. विषय होता- ‘बोलक्या सुधारकांनो, इकडे लक्ष द्या.’
परिषदेच्या शेवटी मंदिरप्रवेश, कारकून पगारवाढ, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे मिश्रविवाह, बहिष्कृत वर्गाच्या मुलांसाठी वसतिगृह सक्तीचं, पोलीस खात्यात बहिष्कृतांना जागा, लोकसंख्येच्या मानानं स्थानिक कामात प्रतिनिधी निवडणं, लेबर कमिशन व राउंड टेबल कमिशनमध्ये प्रतिनिधी निवडणं, अशा प्रकारच्या मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. शेवटी स्पृश्य-अस्पृश्यांचं एकत्र सहभोजन झालं. यामध्ये ब्राह्मण, मराठे, राजपूत, कुणबी, माळी, तेली व मांग जातीचे लोक सहभागी होते. या घटनेचे सकारात्मक पडसाद देशभर दिसून आले.
अजात
रुढी, प्रथा, परंपरा मोडताना वाईट प्रथांना तिलांजली देत जन्मानंतर जावळ काढण्यापासून ते मृत्यूनंतर होणार्या मुंडनापर्यंतच्या सर्व विधींना महाराजांनी विरोध केला. समाजातून जात नष्ट व्हावी, यासाठी त्यांनी माणसाला जन्मजात चिकटलेली जात संपवण्यासाठी, सर्व मानवजात एक होण्यासाठी जात नाकारली आणि “आम्ही ‘अजात’ आहो; जात मानत नाही,” असा संकल्प केला. समाजातून जात नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाह व्हायला हवेत, म्हणून आपल्या शिष्यांच्या मिश्रविवाहाला सुरुवात केली. हे विवाह करताना स्त्रीची सुरक्षितता जपण्यासाठी या विवाहाला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं. त्या काळात एक रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं – जर पती पत्नीला सांभाळण्यास सक्षम नसला, पुरुषानं व्यभिचार केला तर स्त्री स्वतंत्र आहे. ती तिला वाटेल तो निर्णय घेऊ शकते. शेवटी साक्षीदारांच्या सह्या केल्या आणि स्पष्ट उल्लेख केला की, “मी पांढरी झेंडीधारी हा विवाह स्वीकार करतो.” आणि ‘अजात’ असं नमूद केलं. मिश्रविवाहातून होणारं अपत्य हे जातिहीन म्हणजे ‘अजात’ असेल, असं महाराजांनी जाहीरपणे सांगितलं. ‘आम्ही जात मानत नाही; आम्ही अजात आहोत’, शाळेचा दाखला, कोतवाल नोंद, सात-बारा यावर ‘अजात’ लिहायला सुरुवात झाली. त्यावेळी कित्येक लोक ‘अजात’ झाले. महाराज आपल्या अभंगात म्हणतात-
देव एकच आहे । दुसरा नाही ॥
कोट्यवधी पुरावे । यासी केव्हाही ॥
आणि अजात असे । देव तो जाणा ॥
असे सदा म्हणती । पंथही नाना ॥
बाप अजात ज्याचा । त्या लेकरा जात ॥
गण्या म्हणे । कोठून आली जगात? ॥
डिसेंबर 1925 मध्ये अखिल भारतीय ब्राह्मणेतर अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनाला कोल्हापूरचे राजे छत्रपती राजाराम महाराज उपस्थित होते. त्यांच्यासोबत डॉ. पंजाबराव देशमुख आणि त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत काम करणारे तेव्हाचे समाजसुधारक उपस्थित होते. या अधिवेशनाचं अध्यक्षपद गणपती महाराजांना मिळालं होतं. त्यांच्या या अद्वितीय कार्याला पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी विदर्भातील ‘खरा जोतिबा’, असे गौरवोद्गार संत गणपती महाराज यांच्याबाबत काढले. जातिभेदातीत कृतीतून केलेलं कार्य व गावागावांत कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागरणाचं कार्य यामुळे नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी महाराजांना सुवर्णजडित अंगरखा, मुकुट आणि पंचा देऊन त्यांना सन्मानित केले होते.
उपेक्षित असणार्या या सत्यशोधकीय गणपती महाराजांचे कार्य स्वातंत्र्य चळवळीनंतर विशेष वाढले नाही. लोक आपली जात, पोटजातच श्रेष्ठ मानून लागलेत. 1990-95 नंतर ‘कास्ट व्हॅलिडिटी’ला महत्त्व प्राप्त झाले. नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये जातीला महत्त्व प्राप्त झाल्याने जो-तो ‘अजात’ झालेला पुन्हा मूळ जातीकडे वळू लागला. ‘व्हॅलिडिटी’साठी आपली मूळ जात शोधून काढू लागला. मनुष्य कितीही प्रगत झाला तरी सरकारी कागदपत्रांवरून जोपर्यंत जात जात नाही, तोपर्यंत गणपती महाराजांसारख्या अनेक समाजसुधारकांच्या कार्यांना महत्त्व प्राप्त होणार नाही, हेही वास्तव नाकारून चालत नाही.
आज जातिनिर्मूलनाची चळवळ कोणी राबवित नाही. ज्याला-त्याला जातीचे विशेष फायदे हवेत, यासाठी जात आणि पोटजात यांना चिकटून राहणार्यांची मानसिकता तीव्र बनत आहे. गणपती महाराजांनी केलेले कार्य खरोखरच मोठे होते. 19 जून 1944 ला महाराजांचे निधन झाले. महाराजांनी देव नाकारला, जात नाकारली, पारंपरिक धर्मही नाकारला. महाराजांच्या निधनानंतर एक पिढी ‘अजात’ राहिली; परंतु पुढे सरकारी योजनांपासून आपण वंचित राहू, म्हणून ज्यांनी-ज्यांनी ‘अजात’ अशी नोंद केली होती, त्यातील बहुतांश व्यक्तींनी पुन्हा आपली मूळ जात स्वीकारली.
गणपती महाराजांचे नातू श्याम महाराज भबूतकर म्हणतात, “गणपती महाराज आम्हाला कधीच माफ करणार नाहीत. आम्ही अजात झालो; परंतु आता जातीच्या दाखल्यासाठी आम्ही ‘अॅफिडेव्हिट’ करून आमची मूळ जात माळी होती, ती पुन्हा स्वीकारली. आमच्या पूर्वजांनी जे क्रांतिकारी काम केलं त्याला आम्हीच तिलांजली दिली.”
दत्तात्रय नरेश निमकर अपंथी विद्यार्थी म्हणतो, “शिक्षणासाठी कास्ट सर्टिफिकेट हवं होतं. वडील व आजोबा अजात. मला कोणत्याच सवलती मिळत नाहीत; मग आम्हीच आमची जुनी जात तेली शोधून काढली.”
मंगेश पवनकुमार भबूतकर, गणपती महाराजांचा नातू म्हणतो, “आम्ही अजात असल्यामुळे ‘व्हॅलिडिटी’ निघत नाही. अजातीचं प्रमाणपत्र त्रुटीमध्ये निघालं. मग प्रतिज्ञापत्रावर आम्ही लिहून दिलं – ‘मी मंगेश पवनकुमार भबूतकर, वय 26 वर्षे, धंदा – मजुरी, राहणार पेठ रघुनाथपूर, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती. मी वरील कोर्टास प्रतिज्ञापूर्वक लिहून देतो की, मी वरील ठिकाणचा रहिवासी असून माझ्या आणि माझ्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर माझी ही जात ‘अजात’ अशी नमूद केली आहे. परंतु ‘अजात’ ही जात कुठेही अस्तित्वात नसून आमची खरी व सत्य जात माळी आहे, ही माळी जात आमच्या दाखल्यावर लावण्यात यावी.”)
–नरेंद्र लांजेवार
संपर्क : 94221 80451
