अनिल चव्हाण -
विठ्ठल हे आपल्या राज्याचे आराध्यदैवत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातूनच नव्हे, तर आसपासच्या राज्यातून सुद्धा भाविक पंढरीला येतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर लाखो भाविक पायी चालत येतात. त्याला ‘पंढरीची वारी करणे’ म्हणतात. वारी करणारे ते वारकरी.
विठ्ठल भक्तीचा एक भाग म्हणून, अनेक जण दारू, मटण, मासे यापासून अलिप्त राहतात. आपल्या संकल्पाला बळकटी यावी म्हणून ते गळ्यात तुळशीची माळ घालतात. त्यांना ‘माळकरी’ म्हणतात.
विठ्ठल भक्तीमध्ये पूजा-अर्चा, यज्ञ, होम, मंत्र तंत्र, सोवळे ओवळे अशा बाह्यावडंबराला आणि कर्मकांडांना अजिबात स्थान नाही. “ज्याचे मुखी नाम तोचि धन्य!” अशी वारकर्यांची निष्ठा असते. त्यांच्या वर्तनात समता, बंधुता, न्याय, दया, क्षमा, शांती, भूतदया, मानवता, प्रेम, माया अशा उच्च आध्यात्मिक मूल्यांना स्थान असते. आपल्या या विचारांचा प्रचार व्हावा म्हणून वारकरी संतांनी अभंग लिहिले आहेत. भजन, प्रवचन, कीर्तनातून त्यांचा प्रचार सतत केला जातो. वारीमधून हा प्रचार गावोगाव केला जावा, असा प्रयत्न असतो.
वारकरी संतांप्रमाणेच अशा उच्च मूल्यांचा जागर देशभर अनेक संतांनी केला आहे. त्याची माहिती वाचकांना व्हावी म्हणून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यातील निवडक संतांची थोडक्यात ओळख करून देणार्या पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. नुकत्याच दहा पुस्तिका प्रसिद्ध झाल्या त्यांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ दोन महिन्यात दहा पुस्तकांचे २००० संच, म्हणजे वीस हजारपेक्षा अधिक पुस्तकांची विक्री झाली.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात अजून दहा संतांच्या पुस्तिका प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे, त्यामध्ये सहा पुस्तिका स्त्री संतांच्या आहेत.
वारकर्यांच्या उच्च विचारांमध्ये, आपल्या जातीवादी, धर्मांध, मनुवादी, भ्रष्ट विचारांची भेसळ करण्याचे काम सुरुवातीपासूनच अनेक जणांनी केले आहे. म्हणून अशी पुस्तके लिहून, समतेचे विचार पुन्हा पुन्हा वाचकांच्या पर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
संतांच्या विचारांचा जागर करायचा तर त्यासाठी तसाच अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ लेखक पाहिजे. तेव्हा ह. भ. प. अॅड. देवदत्त दिगंबर परुळेकर यांना विनंती करण्यात आली. त्यांनी ती आनंदाने मान्य केली. आणि पुस्तिका तयार झाल्या.
विवेकी विचारांची अखंड वारी
ह.भ.प.अॅड. देवदत्त दिगंबर परुळेकर हे संतवाङ्मयाच्या अखंड प्रवाहात चिंतन, विवेक आणि भक्ती यांचा सुंदर संगम घडवणारे संतविचारांचे अभ्यासक, प्रवचनकार आणि प्रबोधनकार म्हणून परिचित आहेत. त्यांच्या लेखणीतून उमटणारा प्रत्येक शब्द हा संतवाणीचा अनुनाद आहे: प्रत्येक पुस्तक ही विवेकाची एक प्रदीर्घ वारी आहे.
त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.
एक तरी ओवी अनुभवावी, तुका म्हणे, नामा म्हणे, एका जनार्दनी, विठोची लेकरे, भक्तीचा मळा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सर्वच पुस्तकांना मान्यवरांचे कौतुक लाभले असून वाचकांचा उत्स्फूर्त आणि प्रेमळ प्रतिसाद मिळाला आहे. संतविचारांची विवेकी बाजू उलगडणार्या या ग्रंथसंपदेला साहित्यविश्वात मानाचे स्थान लाभले आहे. संतविचारांचा प्रचार केवळ लेखणीतून नव्हे, तर कृतीतूनही व्हावा, हा त्यांचा ध्यास आहे. ते आपला वेळ सार्वजनिक कामातही व्यतीत करतात.
ह.भ.प. परुळेकर यांच्या पुढील पुस्तिका अंनिसतर्फे प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
१) संत ज्ञानेश्वर माउली
संत ज्ञानेश्वर म्हणजे विवेकाचा प्रज्ञाप्रकाश. ते म्हणतात,
“जरी मंत्रेचि वैरी मरे, तरी वायां कां बांधावी कटारे?”
सातशे वर्षांपूर्वी असा निर्भीड प्रश्न विचारणारे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे केवळ अध्यात्माचे शिखर नव्हे, तर भारतीय विवेक परंपरेतील एक लख्ख प्रज्ञादीप आहेत. ज्या काळात कर्मकांडांचा प्रचंड पगडा समाजावर होता, त्या काळात ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून समताधिष्ठित विवेकवादाचा पाया घातला. ज्ञानेश्वर माउलींचा काळ म्हणजे यादवांचा काळ याला ‘सुवर्णयुग’ म्हणतात.
सोन्याचा काळ होता, पण कोणासाठी?
आज आपण म्हणतो, यादवांचे राज्य म्हणजे ‘सुवर्णकाळ’ होता, पण गड्यांनो, तो सोन्याचा काळ फक्त राजांसाठी आणि दरबारातल्या लोकांसाठी होता. सामान्य रयतेचं काय? तर परिस्थिती बिकट होती. एका बाजूला धर्ममार्तंड आणि पंडित लोक संस्कृत भाषेतल्या देवाचा धाक दाखवत होते आणि दुसर्या बाजूला सामान्य माणूस अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होता. “तुम्ही अमुक करू नका, तमुक करू नका, तुम्हाला अधिकार नाही”, अशी धर्माची भीती घालून सामान्यांना लुटलं जात होतं. गरिबांच्या पोटाची आणि मनाची कुणालाच पडली नव्हती.

संत ज्ञानेश्वर माउली
ही पुस्तिका माउलींच्या त्या विचारांवर प्रकाश टाकते, जे अंधश्रद्धेच्या अंधाराला छेद देणारे आहेत. ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता, अनुभवाच्या कसोटीवर सत्य पडताळण्याची दृष्टी माउली देतात. धर्माच्या नावाखाली चालणार्या भ्रामक प्रथा, निरर्थक कर्मकांड आणि शोषणमूलक रूढी यांचे तर्कशुद्ध विश्लेषण या ग्रंथात केले आहे. अज्ञान आणि भीतीमुळे निर्माण होणार्या अंधश्रद्धा माणसाच्या प्रगतीला कशा अडवतात, याचा बोध या पुस्तिकेतून होतो. चला, माउलींच्या ज्ञानामृताने विवेकाची मशाल प्रज्वलित करू या.
२) संत नामदेव महाराज
संत नामदेव महाराजांनी भक्तीचा प्रचार महाराष्ट्राच्या बाहेरही केला. त्यांच्या रचना गुरु ग्रंथसाहीबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी नामस्मरणावर भर दिला. ते वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार आहेत.
“नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.”
अशी प्रतिज्ञा करणारे संत नामदेव महाराज हे केवळ भक्त नव्हते, तर जागृत विवेकाचे प्रवर्तक होते.
नामदेवांची भक्ती सजग आणि समाजाभिमुख होती. त्यांनी केवळ माणसातच नव्हे, तर सर्व प्राणीमात्रांत ईश्वराचे अस्तित्व पाहिले. देव कोठे आहे आणि कोठे नाही, याचा सडेतोड विचार त्यांनी मांडला. जाती-पाती, उच्च-नीचतेच्या भिंती कोसळवून समाजसंघटनाचा मार्ग त्यांनी दाखविला. धर्माच्या बाह्य अवडंबरापेक्षा अंत:करण शुद्ध करण्यावर त्यांनी भर दिला. अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त होऊन निकोप, सजग आणि विवेकी समाज घडविण्याची प्रेरणा त्यांच्या अभंगांतून मिळते. त्यांच्या अभंगात देवाशी मैत्रीपूर्ण संवाद दिसतो.
ही पुस्तिका वारकरी परंपरेतील प्रगत आणि विचारप्रधान बाजू नव्याने उलगडते. चला, नामदेवांच्या ज्ञानदीपातून विवेकाचा उजेड अनुभवूू या.
३) संत एकनाथ महाराज
संत एकनाथ महाराज यांच्या काळात महाराष्ट्राने इस्लामी राजवट स्वीकारली होती. तरीही संस्कृतचे वर्चस्व वाढलेले होते.
या काळात त्यांनी लोकभाषेचा पुरस्कार केला. ‘संस्कृत भाषा देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासुनी आली?’ असा सवाल विचारत त्यांनी सामान्यांच्या मराठी भाषेत ज्ञान आणले.
प्रबोधनाचे नवे माध्यम कीर्तन आणि अभंगांसोबतच त्यांनी ‘भारुडे’ आणि ‘गवळणी’ यांसारख्या लोककलांच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवला.
आचरणातून शिक्षण : केवळ उपदेश न करता, नाथांनी स्वतःच्या आयुष्यात समता पाळली. एकनाथ महाराजांना महाराष्ट्राने ‘नाथबाबा’ हे नाव दिले. कारण ते एका पित्याप्रमाणे समाजाचे रक्षण करणारे, मार्गदर्शन करणारे आणि प्रसंगी चुकीच्या मार्गावर जाणार्यांना कानपिचक्या देणारे ‘आधारस्तंभ’ होते. पैठणच्या या महात्म्याने जे प्रबोधनाचे कार्य केले, तेच आजच्या काळातही ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ आणि ‘विवेकवादासाठी’ प्रेरणा देते.
“देव खोटा, नवस खोटा, एका जनार्दनीं रडती पोटा”, असे ठाम शब्दांत सांगणारे संत एकनाथ महाराज हे समाजाचे खरे लोकशिक्षक होते. त्यांच्या भारूड आणि गवळणींतून त्यांनी अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि धार्मिक शोषणावर तीक्ष्ण प्रहार केले.
पांडित्याचा अहंकार सोडून सामान्यांच्या भाषेत ज्ञानगंगा आणण्याचे कार्य त्यांनी केले. तहानलेल्या गाढवाला पाणी पाजून त्यांनी भूतदयेचा सर्वोच्च आदर्श घालून दिला. धर्माच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबविण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीतून समाजजागृती केली. संसारात राहूनही विवेकाने जगण्याची दिशा त्यांनी दाखवली.
अंधश्रद्धा केवळ बुद्धीलाच नव्हे, तर समाजालाही पोखरतात याचे सुस्पष्ट चित्र त्यांच्या साहित्यांतून दिसते. त्यांचा लोकप्रबोधनाचा वारसा आजच्या पिढीसाठी अनमोल आहे. नव्या विवेकी समाजनिर्मितीसाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरते.
४) संत सावता माळी
संत सावता माळी यांचा भर श्रमावर होता. ते म्हणतात, “कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी.”
हा केवळ अभंग नव्हे, तर श्रमाला देवत्व देणारा क्रांतिकारी विचार आहे. देवासाठी पंढरीला जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या कर्तव्यातच ईश्वर वसतो, हे संत सावता महाराजांनी शिकवले. काम करतानाच नामस्मरण करा एवढे पुरे आहे.
भोंदूगिरी आणि कर्मकांडाच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला त्यांनी साधेपणाने सांगितले. कर्म हाच खरा धर्म. अंधश्रद्धेमुळे होणारा वेळ आणि श्रमाचा अपव्यय टाळून उत्पादक कार्याला भक्तीचे रूप देणे, ही त्यांची विवेकनिष्ठ शिकवण आहे. शेती, कष्ट आणि विज्ञानाभिमुख दृष्टी यांचा संगम या पुस्तिकेतून स्पष्ट होतो. चला, कर्तव्याच्या मळ्यात विवेकाचे पीक घेऊ या.

५) संत चोखोबा
संत चोखोबा आणि त्यांचे कुटुंब हे विषमतेवर विवेकाचा प्रहार करणारे संत होते. यादव कालातील क्रूर जातिव्यवस्थेचे ते बळी होते. संत नामदेवांच्या सहवासातून त्यांनी भतिमार्ग स्वीकारला. त्यांचे अभंगात आत्मसन्मान आणि वेदनादित होतात. देवापुढे सर्व समान आहेत, हा संदेश त्यांनी दिला. त्याचबरोबर सामाजिक अन्यायावर त्यांनी थेट भाष्य केले.
“काय भुललासी वरलिया रंगा?”
असा थेट प्रश्न विचारणारे संत चोखोबा म्हणजे, विषमतेच्या भिंतीवर विवेकाचे घाव घालणारे सल. पायात साखळदंड असला, तरी विचारांच्या आकाशात त्यांचे मन मुक्त भरारी घेत होते.
केवळ चोखोबाच नव्हे, तर संत सोयराबाई, बंका, निर्मळा आणि संत कर्ममेळा या संपूर्ण संतकुटुंबाने कर्मकांडापेक्षा अंत:शुद्धीला श्रेष्ठत्व दिले. ज्या काळात ‘विटाळ’ ही सामाजिक संकल्पना होती, त्या काळात त्यांनी ठाम सांगितले.
देहात नव्हे, तर विचारांत विटाळ असतो| अंधश्रद्धेचे मूळ मानवी भेदाभेदांत आहे, हे या कष्टकरी संत परिवाराने आपल्या जीवनातून दाखवून दिले. शारीरिक गुलामीपेक्षा मानसिक गुलामी घातक असते, हा जागर त्यांच्या अभंगांतून सतत घुमत राहतो. जातिभेद आणि अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी ही पुस्तिका प्रबोधनाचे नवे दालन उघडते.
६) संत नरहरी सोनार
संत नरहरी सोनार सुवर्णकार होते. सोनार व्यवसायातील रूपकांचा त्यांनी अभंगात वापर केला. मन:शुद्धीची तुलना सोन्याच्या शुद्धीशी केली.
“देवा तुझा मी सोनार,
तुझे नामाचा व्यवहार”
सोनार जसा सोन्याचा कस लावतो, तसा संत नरहरी महाराजांनी सत्याचा कस लावला. शिव-विष्णू अद्वैत सांगत त्यांनी संकुचित धर्मभावनेवर आणि अंधश्रद्धेवर प्रहार केला.
डोळ्याला पट्टी बांधून देव शोधण्याऐवजी विवेकाच्या डोळ्यांनी जग पाहावे, हा त्यांचा संदेश होता. भ्रामक कल्पनांच्या विवेकाच्या भट्टीत अज्ञान वितळवून शुद्ध विचारांचे सुवर्ण घडवणे, हीच त्यांची साधना होती. अहंकार वितळविणे ही खरी साधना, असे त्यांनी सांगितले. त्यांनी अंत:करण शुद्धीचा संदेश दिला.
ही पुस्तिका त्यांच्या विवेकप्रवासाची सुवर्णगाथा आहे.
७) संत शेख महंमद
संत शेख महंमद यांचा जन्म अहमदनगर परिसरात मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांनी सुफी आणि वारकरी विचारांचा समन्वय साधला. त्यांनी अभंग आणि ग्रंथरचना केलेली आहे. ‘योग संग्राम’ हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ! हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश त्यांनी दिला. महाराष्ट्रातील समन्वयवादी संत परंपरेतील ते महत्त्वाचे संत आहेत.
“शेख महंमद अविंध, त्याचे हृदयी गोविंद.”
हे शब्द भारतीय संस्कृतीतील सहिष्णुतेचे महाकाव्य आहेत. धर्माच्या नावावर निर्माण होणारी तेढ आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत शेख महंमद महाराजांनी विवेकाचे शस्त्र उगारले.
जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म, हा संदेश त्यांनी दिला.
कट्टरतेपेक्षा प्रेम आणि विवेक यांचा विजय कसा होतो, याचा ऐतिहासिक संदर्भ या पुस्तिकेतून उलगडतो. आजच्या काळात सामाजिक सलोखा राखण्यासाठी ही विचारसंपदा अत्यावश्यक आहे.
८) संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज म्हणजे विद्रोही विवेक.
“असाध्य ते साध्य करिता सायास,
कारण अभ्यास तुका म्हणे.”
असा अभ्यासाचा मंत्र देणारे संत तुकाराम महाराज म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध उभे ठाकलेले निर्भय संत. असाध्य गोष्ट साध्य करायची असेल तर तप, जप, यज्ञ, मंत्र, तंत्र, पूजा, महापूजा; असल्या गोष्टींचा पुरस्कार त्यांनी केलेला नाही. ते म्हणतात, अभ्यास करा आणि प्रयत्न करा म्हणजे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते.
त्यांनी स्पष्ट सांगितले
“तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी.”
दगडात देव शोधणार्या प्रवृत्तीला धारेवर धरत त्यांनी कृतीशील सद्गुणांत देवत्व पाहिले. “नवसे कन्यापुत्र होती. तरी का करणे लागे पती?” अशा रोखठोक अभंगांतून त्यांनी समाजातील भ्रामक समजुतींवर घणाघाती प्रहार केला.
बुवाबाजी, भोंदूगिरी आणि अंधानुकरण यांचे मुखवटे त्यांनी टराटरा फाडले. वृक्षांना सोयरे मानत पर्यावरणाशी नाते सांगणारी त्यांची जीवनदृष्टी अत्यंत प्रगत आणि विवेकनिष्ठ होती. तुकोबांचे विचार आजही तेवढेच ज्वलंत आणि समकालीन आहेत. भयमुक्त, तर्कनिष्ठ आणि अभ्यासू समाज घडविण्याचा संदेश या पुस्तिकेच्या प्रत्येक पानातून प्रकटतो.
९) संत सेना महाराज
संत सेना महाराज नाभिक होते. व्यवसाय करतानाही भक्ती करता येते, हा संदेश त्यांनी दिला. त्यांनी अहंकारावर टीका केली. त्यांच्या अभंगात नम्रता आणि समर्पण दिसते. साध्या जीवनातून अध्यात्म जगण्याचा आदर्श त्यांनी दिला.
“आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक.”
हातात कात्री आणि आरसा घेऊन सेना महाराजांनी समाजाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. बाह्य रूपापेक्षा वैचारिक स्वच्छतेवर त्यांनी अधिक भर दिला. अंधश्रद्धेच्या वाढलेल्या जटा कापण्याचे काम त्यांनी आपल्या रोखठोक वाणीतून केले. धर्माच्या नावाखाली चालणार्या अघोरी प्रथांना त्यांनी स्पष्ट शब्दांत विरोध केला.
व्यवसाय हाच परमार्थ आणि सत्य हेच व्रत ही त्यांची जीवनरेषा होती. स्वयंशिस्त, सचोटी आणि पारदर्शक आचरण यांचे महत्त्व या पुस्तिकेतून अधोरेखित होते.
१०) संत निळोबा
संत निळोबा महाराज हे तुकाराम महाराजांच्या परंपरेतील संत होते. त्यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात झाला. त्यांनी तुकोबांचे विचार अभंगातून सांगितले. त्यांचे जीवन साधे होते आणि नाम भक्ती हेच त्यांच्या जीवनाचे केंद्र होते. त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. तुकोबांचा वारसा पुढे नेला आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकी विचार मांडले.
निळोबा महाराजांनी वारकरी संप्रदायाची वैचारिक धुरा समर्थपणे पुढे नेली. ज्या काळात समाजात कर्मकांडांचे स्तोम माजले होते. त्या काळात निळोबांनी आपल्या अभंगांतून विवेकाचा जागर केला. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या सामान्य जनांना त्यांनी भतीचा सरळ, सोपा आणि तर्कशुद्ध मार्ग दाखवला.
धर्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी, ढोंगीपणा आणि शोषण यांवर त्यांनी आपल्या रोखठोक वाणीने नेमके आसूड ओढले. ते म्हणतात,
“ऐसींचि देखिलीं उदंडें |
जळो त्यांची काळीं तोंडें ॥१॥
मुखें सांगती परमार्थ |
स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥”
भक्ती म्हणजे आंधळेपण नव्हे, तर सजगता हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. बाह्य अवडंबरापेक्षा अंतःकरणाची शुद्धी हाच खरा देवधर्म आहे, असे ते ठामपणे सांगतात.
वारकरी परंपरेची ही विवेकी बाजू समजून घेण्यासाठी ह. भ. प. देवदत्त दिगंबर परूळेकर यांची ही पुस्तिका प्रत्येक सजग वाचकासाठी मार्गदर्शक आहे.
वारकरी संत परंपरेमध्ये अनेक थोर पुरुष संत झाले. तसेच अनेक स्त्रियाही संत झालेल्या आहेत. त्यांनीही एकापेक्षा एक सुंदर अभंग रचना केल्या आहेत. वेळप्रसंगी त्यांनी पुरुष संतांनाही मार्गदर्शन केले आहे. पाषाणहृदयी सनातन्यांनी, संत ज्ञानेश्वरांचा आत्यंतिक छळ केला. तेव्हा उद्विग्न अवस्थेत ज्ञानेश्वर झोपडीचे दार बंद करून बसले. त्यांना संत मुक्ताबाई यांनी केलेले मार्गदर्शन अजरामर झाले आहे.

११) संत मुक्ताबाई
संत मुक्ताबाई म्हणजे विवेकाची जननी.
वारकरी संतपरंपरेतील तेजस्वी संतकवयित्री संत मुक्ताई या केवळ संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी नव्हत्या, तर समता, विवेक, करुणा आणि मानवतेचा निर्भय आवाज होत्या. समाजबहिष्कार, दु:ख आणि अन्याय यांच्या कठोर अनुभवांतून घडलेल्या मुक्ताईने आपल्या ‘ताटी’च्या अभंगांमधून खर्या संतत्वाची ओळख करून दिली. दया, क्षमा, समदृष्टी, अहंकाराचा त्याग आणि अंधश्रद्धाविरोधी विवेक यांचा संदेश देणारे त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. युवकांना जीवनमूल्यांची दिशा देणारी, संतविचारांचा आधुनिक संदर्भ उलगडणारी ही पुस्तिका संत मुक्ताईच्या क्रांतिकारी आणि करुणामय व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देते.
१२) संत कान्होपात्रा, संत निर्मळा, संत सोयरा
वारकरी संतपरंपरेचा इतिहास पुरुष संतांच्या बरोबरच, स्त्रियांच्या संघर्ष, संवेदना, समता आणि विवेकाच्या तेजानेही उजळलेला आहे. संत कान्होपात्रा, संत निर्मळा, संत सोयरा ही पुस्तिका अशाच तीन विलक्षण संतकवयित्रींच्या जीवनाचा आणि विचारांचा प्रेरणादायी वेध घेते.
गणिकेच्या घरात जन्म घेऊनही आत्मस्वातंत्र्याचा मार्ग निवडणारी संत कान्होपात्रा, भक्ती आणि कौटुंबिक जबाबदारी यांचा सुंदर समतोल शिकवणारी संत निर्मळा, तसेच स्त्रीविषयक अन्याय, अस्पृश्यता आणि तथाकथित ‘विटाळ’ यांना विवेकपूर्ण प्रश्न विचारणारी संत सोयराबाई या तिन्ही संतस्त्रियांचे जीवन आजच्या काळातही अत्यंत समकालीन वाटते.
आजच्या युवक-युवतींना, वारकरी परंपरेच्या अभ्यासकांना आणि संत साहित्याकडे नव्या दृष्टीने पाहू इच्छिणार्या प्रत्येक वाचकाला विचारप्रवृत्त करणारी ही पुस्तिका म्हणजे संतवा़ङ्मयातील स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी परिचय आहे. भक्ती, विवेक आणि सामाजिक न्याय यांचा संगम अनुभवायचा असेल, तर ही पुस्तिका नक्की वाचावी.
१३) संत जनाबाई
संत जनाबाई या संत नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून राहात होत्या. नामदेवाच्या घरात आधीच दारिद्य्र. घरात १४ माणसे. त्यात जनाबाई दासी म्हणून राहू लागल्या. त्यांना प्रचंड कष्ट करावे लागत. झाडलोट. धुणीभांडी, जमीन सारवणे, शेण्या लावणे, दळण कांडप, असे दिवसभर कष्ट करून त्या दमून जात. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांना विठ्ठल भक्तीचा उपयोग झाला. आध्यात्मिकदृष्ट्या कोणीही कनिष्ठ नाही, भक्ती म्हणजे मैत्री आणि कर्म म्हणजेच पूजा, असा संदेश त्यांनी दिला आहे.
विवेक, समता आणि मानवतेची वाट दाखवणारी ही पुस्तिका प्रत्येक वाचकांसाठी चिंतनाची नवी दारे उघडते.
१४) संत बहिणाबाई
संत बहिणाबाई म्हणजे भती, विवेक आणि समतेचा अद्वितीय संगम. प्रतिकूल परिस्थितीत जगताना त्यांनी केवळ विठ्ठलभक्तीचा मार्ग स्वीकारला नाही, तर अंधश्रद्धा, जातिभेद, कर्मकांड आणि खोट्या संतांच्या दांभिकतेवरही निर्भीडपणे प्रहार केला. या पुस्तिकेत त्यांच्या जीवनप्रवासाबरोबरच संगतीचे महत्त्व, खरे संतत्व, निःस्वार्थ भक्ती, समता, मानवता आणि विवेकनिष्ठ अध्यात्म यांचे सोप्या भाषेत दर्शन घडते. स्त्रीलाही अध्यात्म मार्ग खुला आहे, हे आपल्या जीवनातून सिद्ध केले. प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल साधला.
आजच्या युवकांना विचारशील, संवेदनशील आणि जबाबदार जीवनाची प्रेरणा देणारे बहिणाबाईंचे विचार आजही तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत.

१५) संत सोपानदेव – संत निवृत्तीनाथ
संत निवृत्तिनाथ आणि संत सोपानदेव हे वारकरी संतपरंपरेतील दोन तेजस्वी संत आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा प्रेरणादायी परिचय करून देणारी ही पुस्तिका आहे. बालवयात दु:ख, बहिष्कार आणि संकटांचा सामना करूनही त्यांनी समता, करुणा, विवेक, मानवता आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या अभंगांमधून व्यक्त होणारे अंधश्रद्धाविरोधी, समतावादी आणि मानवतावादी विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक आहेत. संतत्व म्हणजे, माणसामाणसांतील भेद दूर करून प्रेम, बंधुता आणि विवेकाची ज्योत प्रज्वलित करणे, हा संदेश ही पुस्तिका प्रभावीपणे देते. युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि संतविचार जाणून घेऊ इच्छिणार्या प्रत्येक वाचकासाठी हे एक प्रेरणादायी वाचन आहे.
१६) संत गोरा कुंभार
संत गोरा कुंभार वारकरी संप्रदायामध्ये गोरोबा काका म्हणून प्रसिद्ध आहेत. मातीची भांडी तयार करणे हा त्यांचा व्यवसाय होता. त्यांनी आपल्या अभंगांतून माणसाचे जीवन घडविण्याचा संदेश दिला. भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर जागृत विवेक. देव म्हणजे भीती नव्हे, तर प्रेम, सेवा आणि प्रामाणिक कर्म ही गोरोबाकाकांची शिकवण, आजही समजून घेण्यासारखी आहे.
संत जनाबाई यांचा एक सुंदर अभंग आहे. त्या म्हणतात, “विठु माझा लेकुरवाळा! संगे गोपाळांचा मेळा!!” आणि त्या लेकरांमध्ये नाव येते “गोरा कुंभार मांडीवरी.” म्हणजेच गोरोबाकाका विठोबाच्या, प्रेमाच्या, संस्काराच्या आणि सत्याच्या सर्वांत जवळ आहेत.
या पुस्तिकेत त्यांच्या जीवनातील प्रसंग, अभंगांचा आशय आणि आधुनिक काळाशी जोडलेले विचार सांगितलेले आहेत.
१७) संतांची मांदियाळी – १
संत चांगदेव, संत विसोबा खेचर, संत सच्चिदानंद बाबा, संत परिसा भागवत.
संत चांगदेव, संत विसोबा खेचर, संत सच्चिदानंदबाबा आणि संत परिसा भागवत हे वारकरी संत परंपरेतील चार महत्त्वपूर्ण संत आहेत. ‘चांगदेव पासष्टी’मुळे संत चांगदेव प्रसिद्ध आहेत. संत विसोबा खेचर यांनी देव सर्वत्र आहे, याचा अनुभव नामदेवांना दिला. संत सच्चिदानंद बाबा संत ज्ञानेश्वर माउलींच्या सहवासात होते, तर संत परिसा भागवत, संत नामदेव महाराजांच्या सहवासात होते दोघांनीही समता आणि भक्तीचा संदेश दिला आहे. यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा परिचय करून देणारी ही पुस्तिका वाचकांना भक्ती, विवेक, समता आणि आत्मज्ञानाचा प्रेरणादायी संदेश देते. संत चांगदेवांचा अहंकारातून विनम्रतेकडे झालेला प्रवास, विसोबा खेचरांनी दिलेला विवेकाचा धडा, सच्चिदानंद बाबांचे ज्ञानसंवर्धनातील योगदान आणि परिसा भागवतांचा जन्माधिष्ठित श्रेष्ठत्वावरील प्रहार यांचे सुलभ व समकालीन विवेचन या पुस्तिकेत आढळते.
१८) संतांची मांदियाळी – २
संत कान्हो पाठक, संत भानुदास, संत माणकोजी बोधले, संत कान्होबा.
संत कान्हो पाठक, संत भानुदास, संत माणकोजी बोधले, संत कान्होबा हे कमी परिचित संत आहेत. त्यांनीही भक्ती, समता, विवेक, मानवता आणि अंधश्रद्धा विरोधी दृष्टिकोन यांचा संगम आपल्या अभंगांतून केलेला आहे. कर्मकांडांपेक्षा अंत:करण शुद्धी, भेदभावापेक्षा बंधुता आणि अंधानुकरणापेक्षा विचार यांचा संदेश देणारी संत आहेत. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा परिचय संतांची मांदियाळी – दोन या पुस्तिकेत करून देण्यात आला आहे.
१९) संत गाडगेबाबा
“देव देवळात नसतो. देवळात भटजीचे पोट असते म्हणून देवळात दान-दक्षिणा देण्याऐवजी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करा; अशी शिकवण संत गाडगेबाबा यांनी दिली.
“दगडधोंडे पुजू नका, पोरे शाळेत घाला.”
हातात खराटा आणि डोक्यावर फुटके गाडगे घेऊन गाडगेबाबांनी अंधश्रद्धेच्या साम्राज्यावर प्रहार केला. शिक्षण, स्वच्छता आणि समाजसेवा यांनाच त्यांनी खरे देवत्व मानले.
अंधश्रद्धेपोटी होणारा पशुबळी आणि पैशाचा अपव्यय थांबवण्यासाठी त्यांनी कीर्तनातून लोकजागृती केली. त्यांचा संदेश केवळ उपदेश नव्हता; तो कृतीतून साकारलेला विवेक होता.
२०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे.” ‘ग्रामगीता’च्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीगावोगावी विवेकाचा दीप प्रज्वलित केला. अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि आळस हे समाजाचे खरे शत्रू आहेत, असे ते ठाम सांगत.देव मंदिरात नव्हे, तर मानवसेवेत आहे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी रुजवला. समर्थ, सुसंस्कृत आणि अंधश्रद्धामुक्त राष्ट्रनिर्मितीचा मार्ग या पुस्तिकेतून स्पष्ट होतो. वारकरी संतांचे विचार आणि कार्य समाजापर्यंत पोहोचावे म्हणून या पुस्तिका आपण लिहून प्रसिद्ध करतो आहोत.
यात आपण सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त पुस्तिका लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न करू या.
प्रत्येक पुस्तिकेची किंमत रूपये २०/-
२० पुस्तिकांची किंमत रूपये ६००/-
सवलतीच्या दरात रू. ४००/- मध्ये २० पुस्तिका
पुस्तकांसाठी संपर्क : सुहास ९८७०५१२२५०
प्रकाशक : अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र
लेखक : ह.भ.प.देवदत्त परुळेकर
