डॉ. प्रसन्न दाभोलकर -
डॉ.प्रसन्न दाभोलकर हे मनोविकार तज्ञ आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञानाची पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. वाढत्या वयाच्या मुलांशी अभ्यास, नाती, ताण–तणाव, करिअरची दिशा याबद्दल बोलणे हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. खास मुलांच्यासाठी त्यांचे हे सदर दरमहा सुरू करत आहोत.
डॉ. दाभोलकर यांच्या या लेखमालेत मुलांनी केलेल्या प्रश्नांच्या भडिमाराने आनंदून जाणारे सर आहेत. ‘प्रश्न म्हणजे काय’ ‘या प्रश्नाचं उत्तर कोणाला येतंय?’ ‘तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते कशासाठी?’ ‘तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारता का?’असे प्रश्न ते मुलांना विचारतात आणि त्यांच्याशी गप्पा मारतात. आपण प्रश्न विचारत नाही याचे कारण आपल्याला प्रश्नच पडत नाहीत असे तर नाहिये ना? असे विचारून पुढे ते म्हणतात की मनाला सतत प्रश्न पडण्याची सवय लावायला हवी.
शास्त्रीय माहिती देताना ते फक्त वैज्ञानिक माहिती देत नाहीत तर त्या माहितीच्या आजूबाजूच्या सामाजिक व्यवहाराची देखील चर्चा करतात. म्हणजे ‘रक्त’ या विषयाबद्दल बोलताना ते ‘रक्तदान’, ‘प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी करायची नसते’, ‘मी दरवर्षी रक्तदान केल्याने मला ही माहिती मिळाली व पुस्तकाशिवाय जगात वावरून देखील आपल्याला बरेच ज्ञान मिळते’ हे सुद्धा सांगतात.
भूत, उपास, दारू, कॅन्सर, अभ्यास अशा वेगवेगळ्या विषयांशी संबंधित प्रश्नांबद्दल ते बोलतात. कोणत्याही प्रश्नांची तयार उत्तरे या लेखमालेत नसतील तर त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची रीत हळूहळू त्या उत्तरापर्यंत कशी पोहोचते हे या लेखांतून उलगडेल. प्रश्नाचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया कशी पार पाडावी याची माहिती ही खुसखुशीत लेखमाला वाचता वाचता आपल्याला होईल.
आमची शाळा जिल्ह्यातील नावाजलेली शाळा होती. त्यात ‘अ’ तुकडीतील मुले म्हणजे निवडक, हुशार मुले. नुसता अभ्यासच नाही तर खेळ, वतृत्व, चित्रकला, गायन, नृत्य अशा अनेक कलांमध्ये आमच्या वर्गातील अनेक मुले-मुली चांगली तरबेज होती. त्यामुळे ‘नववी अ’मधील आम्हा मुलांना, आपण फार शहाणे, आपल्याला सगळे समजते, आम्हाला कोण काय शिकवणार अशी ‘ग’ची बाधा झाली होती.
पीजी सर आठवीपासून आम्हाला सायन्स शिकवायला होते. विज्ञान शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. ते वर्गात वेगवेगळे प्रयोग करून दाखवीत. घरी काही प्रयोग करून त्यांची निरीक्षणे नोंदवून आणायला सांगत. त्यांच्यापेक्षा चांगला सायन्स टीचर जगात मिळणार नाही यावर आमच्या वर्गाचे एकमत होते.
एके दिवशी पीजी सरांनी वर्गात बॉम्ब फोडला. ते म्हणाले, “मी पुढच्या टर्ममध्ये येथे नसणार. दहावीला मी परत तुमच्या वर्गावर येईन. मधल्या काळात देशमुख सर तुम्हाला शिकवतील. त्यांनीच मला विज्ञानाची गोडी लावली. गेल्या वर्षी ते निवृत्त झाले, पण खास बाब म्हणून ते शाळेत शिकवणार आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळेल.”
आम्ही सर्व जण ओरडलो, “हे काय सर? तुमच्यापेक्षा चांगलं कोण शिकवणार? आणि आणखी नवीन कोण शिकवणार? सारं पुस्तकात तर असतं.”
पीजी सर म्हणाले, “अरे, पुस्तकात ज्ञान आणि माहिती असतेच. पण या पलीकडे असलेल्या काही गोष्टी तुम्ही त्यांच्याकडून शिकाल अशी मला आशा आहे.”
“पण सर, पुस्तकांत आणि गुगलवर सगळं ज्ञान असतं.” आमच्या वर्गातील पुस्तक-कीटक करण बोललाच.
सर्वांकडे हसत बघत पीजी सर म्हणाले, “अरे, तिथं असते ती सारी माहिती. ती आपण पचवली की आपल्याला ज्ञान होतं. आणि ज्ञानाच्याही पलीकडे काही असतं. बघू तुम्ही माझ्या सरांकडून काय शिकता?”
*****
दुसरी टर्म सुरू झाली. देशमुख सरांच्या पहिल्या तासाला आम्ही सर्व जण उत्सुकतेने बसलो होतो. मळकट रंगाची पॅन्ट, त्यावर पिवळट शर्ट, पांढरे, तुरळक व विस्कटलेले केस, खडूच्या पुडीने पांढरे शुभ्र रंगलेले हात आणि कपडे अशी त्यांची ठेंगणी मूर्ती आमच्यासमोर उभी राहिली. शंकित नजरेने आम्ही त्यांच्याकडे बघू लागलो.
आमच्याकडे पाठ करून ते फळ्याकडे वळले. सगळा फळा त्यांनी स्वच्छ पुसला. नंतर आमच्याकडे वळून ते म्हणाले, “पीजी सरांनी विज्ञानाचा तुमचा पाया पक्का केला असणारच. आता आपण सारे मिळून इमारत चढवू या.”
थोडे थांबून ते पुन्हा बोलू लागले, “तुमच्या वर्गाबद्दल चांगलं ऐकलं आहे. मला तुमच्याबरोबर एक गंमत करायची आहे. तुमच्या वर्गावर दर बुधवारी संध्याकाळी माझा एक तास आहे. ही कंटाळवाणी वेळ असते. त्या वेळी आपण काही वेगळं करू. तो ‘मुक्त प्रश्नां’चा तास असेल.” आमच्याकडे स्थिर नजरेने बघत ते गप्प उभे राहिले.
आमचे गोंधळलेले चेहरे बघून ते प्रेमाने म्हणाले, “अरे, घाबरू नका. या तासाला मी तुम्हाला पुस्तकातला एकही प्रश्न विचारणार नाही. या तासाला आपण एकमेकांना प्रश्न विचारायचे. कोणतेही प्रश्न, कोणत्याही विषयावरचे प्रश्न, न घाबरता मुक्तपणे. त्यांची उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न करू. तुमच्याजवळ काही माहिती असेल, काही मला माहीत असेल. काही माहिती आपण मिळवू. त्यावर चर्चा करून आपलं मत बनवू. हं बोला, ओपनिंग बॅट्समन कोण?”
हे काय नवीनच? पहिल्या बॉलवरच आमची दांडी उडाली होती. तेवढ्यात नेहमी आडवं लावणारा असीम म्हणालाच, “प्रश्न म्हणजे काय?” त्याच्याकडे बघत सारा वर्ग हसू लागला.
तिकडे दुर्लक्ष करीत देशमुख सर उद्गारले, “एकदम छान! उत्तम प्रश्न. प्रश्न म्हणजे काय?” सार्या वर्गाकडे बघत त्यांनी विचारले, “कोणाला येतं या प्रश्नाचं उत्तर?”
वर्गातली चुणचुणीत मुलगी मितवा म्हणाली, “सर, धड्याखाली विचारले असतात ते प्रश्न?”
“वा! आणखी काय उत्तरं असू शकतील?”
“प्रश्न म्हणजे काय, या प्रश्नाला अनेक उत्तरं आहेत तर.” किंचित वात्रट व विनोदी दिनेशने मधे तोंड घातलेच.
मंद स्मित करीत देशमुख सर म्हणाले, “अगदी बरोबर. अनेक प्रश्नांना अनेक बरोबर उत्तरं असू शकतात. सांगा बरं, प्रश्न म्हणजे काय, या प्रश्नाची आणखी वेगवेगळी उत्तरं.”
मग काय, आमचा वर्ग चेकाळलाच. चारही बाजूंनी अनेक उत्तरे येऊ लागली. “वर्गात तुम्ही आम्हाला विचारता ते प्रश्न, परीक्षेत जे विचारले जातात ते प्रश्न, घरी गेल्यावर आई दिवसभर काय काय केलं ते विचारते ते प्रश्न, खूप दिवसांनी एखादा मित्र भेटल्यावर जे विचारावं वाटतं ते प्रश्न, वर्तमानपत्राच्या बाल पुरवणीत सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतात’ अशी अनेक उत्तरे येऊ लागली.
खूश होऊन देशमुख सर म्हणाले, “अरे वा! प्रश्नांबद्दल तुम्हाला खूप माहिती आहे. तुम्हाला हे जे प्रश्न विचारले जातात ते कशासाठी?”
“आमची परीक्षा घेण्यासाठी.”
“आमच्याकडून माहिती काढण्यासाठी.”
“आम्हाला वैताग आणण्यासाठी.”
“उगीचच.”
“आम्हाला काय समजलं आहे ते लक्षात घेऊन आम्हाला पुढचं शिकवण्यासाठी.”
एक एक उत्तर पुढे येऊ लागले.
आमच्या या भडिमाराने आणखी आनंदून सर म्हणाले, “छान. तुम्हाला काय माहीत आहे, तुम्हाला काय समजलं आहे, हे आम्हाला समजण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. आता मला सांगा, तुम्ही वर्गात कोणते व कशासाठी प्रश्न विचारता?”
“मी बाई प्रश्नच विचारत नाही. काय येत नाही ते विचारायला लाज वाटते.” आमच्या वर्गातील अबोल मैना मृदुला धीर धरून पुटपुटली.
तिच्याकडे कौतुकाने बघत देशमुख सर म्हणाले, “तुझा मुद्दा बरोबर आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसली तर आपण दुसर्याला त्याबद्दल प्रश्न विचारतो. असे प्रश्न न घाबरता, बिनधास्त चारचौघांत विचारावेत. आपण बावळट प्रश्न विचारला तर सारे आपल्याला एकदा हसतील; पण आपण अज्ञानी राहिलो तर जन्मभर आपल्याला लोक हसत राहतील.”
पुढे त्यांनी विचारले, “तुम्ही कधी स्वतःलाच प्रश्न विचारता का?” गंभीर पण मिश्कील चैतन्य म्हणाला, “मी दररोज सकाळी स्वतःला विचारतो? आज तू काय अभ्यास करणार आहेस? आणि त्याचं आज अभ्यास नाही करायचा, नुसते खेळायचं, असं उत्तर देऊन मोकळा होतो.”
किंचित हसत सर म्हणाले, “न्यूटन यांना स्वतःलाच एक प्रश्न पडला होता. ‘फळ झाडावरून खालीच का पडतं?’ त्यावर खूप विचार करून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधून काढले. स्वतःला पडणारे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात, बरं.”
घड्याळात बघत ते म्हणाले, “वेळ संपत आली आहे. आता तुम्ही मला गणितातला एक प्रश्न विचारा.”
“सर, दोन आणि दोन किती?” खोडकर मिहीर विचारून मोकळा झाला. वर्गात एकच हशा उसळला. आता देशमुख सर याला कसे झापणार असा प्रश्न आम्हाला पडला.
सर शांतच. त्यांनी उत्तर दिले, “वा…आपल्याला लहानपणी नेहमी विचारला जाणारा प्रश्न. त्याचं उत्तर आहे ‘चार.’ आता तुम्ही मला सांगा, ज्या गणिताच्या प्रश्नाचं उत्तर चार आहे अशी किती गणितं तुम्ही तयार करू शकाल? वह्या उघडून पटकन लिहा.”
उत्साहाने वर्गाने हे चॅलेंज स्वीकारले. सगळे जण पटापट अनेक गणिते वहीत लिहू लागले. मग आमच्या लक्षात आले, ‘अरे बापरे, या साध्या, सोप्या, सरळ प्रश्नाला असंख्य उत्तरं आहेत’. नजर वर करून आम्ही सरांकडे कुतुहलाने बघू लागलो. हे वेगळंच पाणी आहे, हे आमच्या लक्षात आले.
शेवटी सर म्हणाले, “छान प्रश्नोत्तरे झाली. अनेक प्रश्न असतात, अनेक कारणांनी ते विचारले जातात आणि त्यांची उत्तरेही अनेक असतात. आता दर बुधवारी तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारायचे. बघू तुम्हाला काय प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं आपण कशी शोधतो.”
वर्गातून बाहेर पडणार्या सरांच्या मूर्तीकडे मी टक लावून बघत राहिलो. सरांना नेमके काय करायचे आहे ते माझ्या लक्षात येत नव्हते.
लेखक संपर्क : prasannadabholkarpri@gmail.com