सुभाष थोरात -
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून धर्माच्या आधारे गोरगरीब जनतेचे शोषण करणार्या बुवा–बाबांचा भांडाफोड करणे आणि या निमित्ताने समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे; त्यासाठी देवा–धर्माला विरोध न करता पुरोगामी मूल्यांसाठी आवश्यक ती धर्मचिकित्सा करणे हे काम डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर केले. त्यामुळेच ते सनातन्यांच्या दृष्टीने धोकादायक ठरले होते.
‘समाजाची धारणा करतो तो धर्म,’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. यातून धर्माचे महत्त्व आणि त्याचा समाजजीवनावर किती खोल, व्यापक प्रभाव आहे, हे दिसून येते. म्हणूनच कुठल्याही सामाजिक चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेपासून होते, असे म्हटले जाते. ‘धर्म’ हा शब्द अनेक अर्थानेही वापरला जातो. उदाहरणार्थ – चार्वाक यांनी स्वभाववाद मांडताना उताराकडे वाहणे हा पाण्याचा स्वभाव (गुणधर्म) आहे, असे म्हटले आहे. गोष्टी स्वभावाने बांधलेल्या असतात, त्या स्वयंभू आहेत, त्यांना कर्ता-करवित्याची गरज नाही. यातून विश्वाला नियंत्रित करणारी काहीतरी शक्ती आहे, ही धारणा निकालात निघते.
थोडक्यात, धर्माच्या उदयापासून आजपर्यंत त्याचा जनमानसावर एखाद्या जादूसारखा प्रभाव राहिला आहे. ‘धर्म ही जनतेसाठी अफू आहे,’ असे जे मार्क्स यांनी म्हटले होते, ते या प्रभावाला अनुलक्षून.
अफूचे सेवन केल्यानंतर माणसाला जसा आजूबाजूच्या वास्तवाचा विसर पडतो, त्याप्रमाणे धर्माच्या गुंगीत असलेल्या माणसाला आपल्या वास्तव प्रश्नाचा विसर पडतो. धर्माच्या संदर्भात एखादा प्रश्न उद्भवला तर लोक चटकन् रस्त्यावर येतात. त्यातही धर्माचे ‘पद्धतशीर’ राजकारण करणार्यांनी त्यात तेल ओतले की ते आटोक्यात आणणे अवघड बनते, जनतेच्या जीवाशी बेतते. तरी जनता हिरिरीने आगीत उडी घेते. ही जनता जेव्हा धर्मांध राजकारणाच्या आहारी जाते, तेव्हा महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पाणी आदी प्रश्नांवर गप्प बसते किंवा हे तिचे प्रश्नच नाहीत, अशा पद्धतीने वागते. आज आपण ते अनुभवत आहोत आणि हाच आपल्या देशासमोरचा मोठा प्रश्न होऊन बसला आहे. चांगले काय वाईट काय, सत्य काय, असत्य काय, जनतेला सारासार विचार करणेच शक्य होत नाही. ‘हिंदू खतरे में’ ‘मुस्लिम खतरे में’ अशी बतावणी केली की धर्मवादी पक्षांची राजकीय उद्दिष्टे साध्य होतात, हा आजवरचा अनुभव आहे. ब्रिटिशांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी या ‘फोडा आणि झोडा’ नीतीचा ‘पद्धतशीर’ वापर केल्याचे दिसून येते. धर्मवादी पक्ष तीच नीती चालवीत आहेत. अर्थात, ही आजची परिस्थिती नाही. प्रत्येक देशात आणि समाजात याला दीर्घ इतिहासाची परंपरा आहे.
आपल्याकडे वेदप्रामाण्य मानणारे ‘सनातन वैदिक’ आणि वेदप्रामाण्य नाकारणारे ‘प्रगतिशील अवैदिक’ तत्त्वज्ञानाच्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. युरोपातच विज्ञानवादी लोकांना धर्मसत्तांनी छळले, मारले, जाळले असे नाही, आपल्याकडेही ते घडले आहे आणि आज पुन्हा एकदा आपण त्या संघर्षाला सामोरे जात आहोत. राजेशाहीच्या काळात धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकमेकांना पूरक भूमिका घेताना दिसतात. दोघांनाही जनतेचे शोषण करण्यासाठी ते गरजेचे होते. राज्यसत्तांना धर्माकडून नैतिक मान्यतेची गरज आहे. ‘राजा हा देवाचा अंश आहे,’ ही संकल्पना त्यातूनच पुढे येते. आपल्याकडे त्याला देवाने अवतार घेतल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, धर्मपीठांचे रक्षण करणे, धर्मपीठांना संपत्तीचे दान करणे, जे धर्म पाळणार नाहीत, जे धर्मावर टीका करतात, त्यांचा बंदोबस्त करणे हे राज्यसत्तेचे काम राहिले आहे. कुठल्याही राज्यसत्तेला धर्मपीठांची मान्यता असल्याशिवाय कायदेशीरता प्राप्त होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘राजा’ म्हणवून घेण्यासाठी गागा भटाकडून राज्याभिषेक करवून घ्यावा लागला. तेव्हाच ‘राजा’ म्हणून मान्यता मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या ग्रंथात ज्या- ज्या क्षत्रियांनी ब्राह्मणी वर्चस्वाला; म्हणजे धर्मसतेला विरोध केला, त्यांचे ‘उपनयन’ करण्याचे धर्मसत्तेने नाकारले. त्यामुळे ते शूद्र झाले. ‘उपनयन’ केल्यानंतर ते क्षत्रिय होतात, जसे मुंज केल्यानंतर ब्राह्मण होतो. तसे जर केले नाही तर शूद्रच राहतात. संत ज्ञानेश्वरांना धर्मपीठांनी शुद्ध करून घेण्यास नाकारले, त्यामुळे ते शूद्र राहिले. ज्ञानेश्वरांनी, ‘आमची मुक्ती, मोक्ष कशात आहे,’ असा प्रश्न विचारला, तेव्हा ‘शूद्रांची मुक्ती तिन्ही वर्णांच्या सेवेत आहे,’ असे उत्तर त्यांना देण्यात आले. यावरून धर्म व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर कसे अधिराज्य गाजवत होता, हे दिसून येते.
राजेशाही व्यवस्थेत मतस्वातंत्र्य, धर्मावर टीका करण्याचे स्वातंत्र्य असणे शक्य नव्हते. त्यामुळे या काळात धर्मचिकित्सा करणार्या, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणार्या धर्मातील अन्यायकारक कालबाह्य मूल्यांना विरोध करून मानवतावादी मूल्यांचा आग्रह धरणार्या विचारवंतांना; तसेच प्रस्थापित धर्माला आव्हान देऊन नवीन धर्म स्थापन करणार्यांचा छळ केल्याचे दिसून येते. भारताचा नव्हे, तर जगभराचा इतिहास त्याची साक्ष देतो.
आपल्याकडे बुद्धापासून ते फुले-आंबेडकरांपर्यंत धर्मचिकित्सेची समृद्ध परंपरा आहे. बुद्ध, महावीर क्षत्रिय होते आणि राज्यसत्तेचे प्रतिनिधी होते. त्यांना त्रास देणे अवघड झाले; शिवाय ते केवळ तात्त्विक वाद घालत बसले नाहीत. त्यांनी गोरगरीब जनतेत जाऊन जनतेचा पाठिंबा मिळवला. त्यांचे धर्म, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेला अनुकूल होते. परंतु पुढे राज्यसत्ता जसजशा प्रबळ झाल्या आणि सनातनी वैदिक विचारांकडे वळल्या, चातुर्वर्ण्याचा आणि मनुस्मृतीचा पुरस्कार करू लागल्या, त्या काळात बौद्ध आणि जैन धर्माच्या अनुयायांची कत्तल झालेली दिसून येते. पुढे, चक्रधर, बसवण्णांच्या अनुयायांनाही याच गोष्टीला सामोरे जावे लागले. संत कबीर, संत तुकाराम यांच्या मृत्यूची तर्कशुद्ध स्पष्टकरणे देता येत नाहीत. त्यांचा दोष हाच होता की, त्यांनी धर्मातील कालबाह्य मूल्यांना विरोध करून नवीन मानवतावादी मूल्यं पुढे आणली. हे केवळ आध्यात्मिक क्षेत्रातील मतभेद नाहीत, तर त्याला बदलत्या अर्थकारणाची जोड आहे. उदाहरणार्थ – वैष्णव आणि वीरशैव त्यांच्यातील भांडण केवळ आध्यात्मिक नाही, तर ते वर्गीयही आहे. वैष्णव जमीनदार आहेत, तर वीरशैव शेतकरी. अशाच पद्धतीने प्रत्येक मतभेदाचा शोध घेतल्यास आपल्याला दिसून येईल ते मतभेद बदलत्या अर्थरचनेशी निगडित आहेत.
भांडवलशाहीच्या उदयानंतर भांडवलशाहीला धर्माची गरज उरली नाही. याची ठळकपणे दिसून येणारी दोन कारणे; एक -कारखानदारीमुळे सामुदायिक कामाची गरज निर्माण झाली आणि बाजारपेठ नवा धर्म झाला. धर्मयुद्धाची जागा आता बाजारपेठांसाठी होणार्या युद्धाने घेतली. दुसरे कारण जनतेचे शोषण करण्यासाठी भांडवलशाहीला धर्माची गरज उरली नाही. कारण उत्पादनप्रक्रियेतच श्रमाची चोरी करून भांडवलशाही नफा मिळवू लागली. त्यामुळे धर्म आणि राज्यसत्ता यांची फारकत झाली. धर्मनिरपेक्ष राज्यसत्ता अस्तित्वात आली. राज्यसत्तेचा कुठलाही धर्म असणार नाही, राज्यसत्ता धार्मिक भेदभाव करणार नाही, हे मान्य केले गेले. कारण माल तर सर्वत्र खपला पाहिजे. जात-धर्म, भेदभाव करून कसे चालेल; तसेच राजेशाहीत नसणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य केले गेले. थोडक्यात, टीका करण्याचे स्वातंत्र्य, धर्मचिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य बहाल झाले. त्यामुळे भारतात ब्रिटिश आल्यानंतर धर्मचिकित्सेची एक मोठी लाट आलेली आपल्याला दिसून येते. आधुनिक काळात राजाराम मोहन राय यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिव्यवस्थेला विरोध करताना हातचे काहीही न राखता परखड शब्दांत चिकित्सा केली आहे. आज अशा प्रकारची टीका शक्य नाही. ब्रिटिश सत्ता असल्यामुळे ते शक्य झाले, तरी महात्मा फुले यांच्यावर मारेकरी घालण्याचे प्रयत्न झाले. हे पेशवाईत शक्य झाले असते काय? असे असते तर महात्मा फुले, आंबेडकर जन्मालाच आले नसते.
धर्मसंकल्पनेचा उदय ज्या काळात झाला, त्या काळात त्या वेळच्या सत्ताधारी वर्गाच्या हितसंबंधांना अनुकूल अशी मूल्ये धर्माने स्वीकारली; पण समाज स्थिर नसतो, सतत बदलत असतो, विकासाच्या, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो. परंतु धार्मिक मूल्यांना नंतर दैवी अधिष्ठान प्राप्त होते. त्यामुळे त्यांना विरोध करणे धर्मद्रोह बनतो आणि कालबाह्य मूल्यं टिकून राहतात. ती समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरतात. धर्मचिकित्सेची गरज धर्मालाही असते. कारण काळाबरोबर राहायचे असेल आणि नव्या परिस्थितीत धर्माचे आधुनिकीकरण व्हायचे असेल तर ते गरजेचे ठरते. धर्मचिकित्सेमुळे आणि बदलत्या काळाबरोबर राहण्याच्या गरजेमुळे एकाच धर्मात आपल्याला वेगवेगळ्या विचारांचे गट अस्तित्वात आल्याचे दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारताना आजच्या काळात बौद्ध धम्म कसा सुसंगत राहील, याची मांडणी केली आहे. ती पारंपरिक बौद्धांना मान्य नाही.
हिंदू धर्मावर आधुनिक काळाचा आणि प्रबोधनाचा परिणाम होऊन अनेक अन्यायकारक, कालबाह्य प्रथा, रुढी नाहीशा झाल्या आहेत. सर्वांत मोठा बदल म्हणजे स्त्रियांना आणि बहुजनांना शिक्षणाची बंद असलेली दारे उघडली. शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळाले तरी आपल्या श्रेष्ठत्वाला धक्का पोचल्याची भावना झालेली जातिव्यवस्था, ‘मनुस्मृति’चे समर्थन करणारे उच्चवर्णीय आजही अस्तित्वात आहेत. आज ते सत्तेवर आहेत म्हणून आजच्या परिस्थितीत धर्मचिकित्सा करणे ही अवघड गोष्ट बनली आहे आणि आज आपल्यासमोर तेच एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून झाला. त्याची कारणे काहीही सांगितली जात असली, तरी महात्मा गांधींनी आयुष्याच्या अखेरीस ‘अस्पृश्यता असणारा हिंदू धर्म मला मान्य नाही, आंतरजातीय लग्न असेल तरच मी लग्नाला हजर राहीन,’ असे म्हटले होते. त्यांनी धर्मद्वेष नाकारला, राज्यसत्तेच्या संदर्भात धर्मनिरपेक्ष मूल्यांचा स्वीकार केला. हे सनातनी गटांना मान्य नव्हते. त्यातूनच गांधींची हत्या घडवली. हे सनातनी गट गांधीखूनानंतर राजकीयदृष्ट्या अस्पृश्य ठरवले गेले. ते पुन्हा उदयाला आले. जनता पक्षाच्या राजवटीत, त्यानंतरच्या काळात वेगवेगळी नावे धारण करणार्या अनेक धर्मवादी संघटना उदयाला आलेल्या दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून धर्माच्या आधारे गोरगरीब जनतेचे शोषण करणार्या बुवा-बाबांचा भांडाफोड करणे आणि या निमित्ताने समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे; त्यासाठी देवा-धर्माला विरोध न करता पुरोगामी मूल्यांसाठी आवश्यक ती धर्मचिकित्सा करणे हे काम डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर केले. त्यामुळेच ते सनातन्यांच्या दृष्टीने धोकादायक ठरले होते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुजनवादी स्वरूप पुढे आणले होते. त्याचबरोबर प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांनीही बसवण्णांच्या जातिव्यवस्थेविरोधी संप्रदायात ब्राह्मण्यवादी विचारसरणीच्या हस्तक्षेपाला विरोध केला. त्यासाठी बसवण्णांचे मूळ विचार ते हिरिरीने पुढे आणत होते, धर्मचिकित्सा करत होते. हे सर्व धर्मचिकित्सेमुळे शहीद झाले आहेत.
आणि आता तर गेल्या आठ वर्षांच्या मोदी सरकारच्या सत्ताकाळात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ‘धर्म’ हा शब्द उच्चारणे मुश्कील होऊन बसले आहे. कोणाच्या भावना कधी दुखावतील, याचा नेम राहिला नाही. या काळात घडलेली अनेक उदाहरणे त्याची साक्ष देत आहेत.
असे असले तरी बुद्धांपासून थेट गौरी लंकेश यांच्यापर्यंत चालत आलेला धर्मचिकित्सेचा समृद्ध वारसा आपण जपला पाहिजे. देशाचे आणि समाजाचे त्यातच हित आहे. तीच खरी राष्ट्रसेवा आहे.
लेखक संपर्क ः 98693 92157