डॉ. हमीद दाभोलकर -
चमत्कारांचा दावा करून संतपदापर्यंत पोेचणार्या व्यक्ती या भारताला नवीन नाहीत. भूतबाधा उतरवणारे, मंत्राने आजार बरे करणारे सर्वधर्मीय भोंदू बाबा-बुवा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. ‘माझा चमत्कार हेच माझे व्हिजिटिंग कार्ड आहे,’ असे म्हणून हातातून सोन्याची साखळी काढण्याची हातचलाखी करणारे सत्यसाईबाबा हे तर या देशातील राष्ट्रपती, पंतप्रधान, असंख्य राजकारणी, कलाकार आणि खेळाडू यांचे गुरू होते. मदर तेरेसांचे कथित चमत्कार आणि त्या अनुषंगाने त्यांना देण्यात येणारे संतपद यांमुळे ‘संत आणि चमत्कार’ हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरक करायचा असेल तर एवढाच आहे, की मदर तेरसा यांनी चमत्काराचा हा दावा स्वतः केलेला नाही. साधारणपणे सप्टेंबर 2016 मध्ये हे संतपद देण्याचा सोहळा होईल.
चमत्काराचा दावा करणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची, पंथाची अथवा लिंगाची असो; तिला शास्त्रीय तपासणीसाठी आव्हान देणे, हे काम ‘महाराष्ट्र अंनिस’ गेली पंचवीस वर्षे करत आली आहे. 2003 मध्ये जेव्हा मदर तेरेसांच्या नावाने चमत्काराचा पहिला दावा करण्यात आला होता, तेव्हादेखील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र अंनिस’ने त्याला विरोध केला होता. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्या वेळच्या पोप यांना लिहिलेले पत्र त्यांच्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर संतपदासाठी चमत्कार हा निकष असावा का, याची चर्चा करणे अप्रस्तुत ठरू नये, असे वाटते. केवळ इतकेच नाही, तर ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,’ असे भारतीय राज्य घटनेने सांगितलेले असल्यामुळे संतपदासाठी चमत्काराची अट ठेवणे हे योग्य की अयोग्य, ही चर्चा उपस्थित करणे, हे आपल्या सगळ्यांचे भारतीय राज्य घटनादत्त कर्तव्य आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. त्या कर्तव्याला अनुसरून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून मदर तेरेसांविषयी केले गेलेले चमत्कारांचे दावे आपण जरा तपासून बघायचे ठरवले, तर कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, असे वाटते.
मदर तेरेसा यांचा मृत्यू 1997 मध्ये झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना संतपद देण्यासाठी 2003 मध्ये चमत्कार झाल्याचा पहिला दावा करण्यात आला होता. पश्चिम बंगाल येथील ‘मोनिका बसेरा’ नावाच्या तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचा ठरवले, तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतरदेखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन या दाव्यातील वास्तव आपण समजून घेतले, तर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी-पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशीमध्ये पुढे हेदेखील समोर आले होते की, प्रत्यक्षात मोनिका बसेरा यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता. त्यांच्या पोटातील गाठदेखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. आतादेखील त्याच पद्धतीने, 2008 मध्ये केवळ मदर तेरेसा यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठी बर्या झाल्याच्या चमत्काराचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे? तिला नक्की कोणता आजार होता? प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते? यामधील कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न देता केवळ ‘चमत्कार झाला,’ असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवरदेखील उतरत नाही. सगळ्यात गंभीर आहे, ते कर्करोगासारखे आजार हे चमत्काराने बरे होतात, असा समज लोकांमध्ये पसरणे. असे समज जेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या नावाने पसरवले जातात, तेव्हा ते समज रुग्ण व्यक्तींना शास्त्रीय उपचारांपासून दूर नेणारे आणि त्याचमुळे हानिकारकदेखील ठरू शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला संत म्हणून जाहीर करण्यासाठी चमत्कारांची अट ही केवळ विज्ञानविरोधीच नाही, तर लोकांच्या शोषणालादेखील कारणीभूत ठरू शकणारी आहे. हे सर्व दावे मदर तेरेसा यांच्या मृत्यूनंतर केलेले असल्यामुळे स्वतः मदर तेरेसा यांचे या चमत्कारांच्या दाव्यांविषयी काय मत होते, ते समजण्याचा मार्ग नाही. पण ते नकारार्थी असावे, असा तर्क लावला, तर फार टोकाचे होणार नाही, असे वाटते. कारण स्पष्ट आहे – चमत्काराने आणि प्रार्थना करून आजार बरे होत असते, तर मदर तेरेसा यांना कुठलीही संस्था काढण्याची गरज भासली नसती, केवळ चमत्काराने आणि प्रार्थनेने त्यांनी आजार बरे केले असते. असे काही घडल्याचा इतिहास नाही. त्यामुळे मदर तेरेसा यांच्या मृत्यूनंतर हे चमत्कारांचे दावे सुरू केले गेले असतील, असे मानायला जागा आहे. ज्यांना समाजातून स्वयंस्फूर्तीने संतपद दिले जाते, त्यांच्या नजरेतून जर आपण हे सर्व बघायचे ठरवले, तर हे आपल्या सहजच लक्षात येईल की, त्यांचे काम तर केव्हाच या लौकिक गोष्टींच्या पलिकडे गेलेले असते. मग अशा लोकांच्या नावाला चमत्कार जोडून त्यांना समाजाच्या संभाव्य शोषणाचे माध्यम बनवणे, हा त्यांचा अपमानच नाही का?
पोप फ्रान्सिस हे सुधारणावादी विचारांचे पुरस्कर्तेआहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संतत्वाच्या संकल्पनेला चमत्कार सिद्ध करण्याच्या अटीतून मोकळे करण्यात येईल, असा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. युरोपात पाहिले, तरी चमत्काराला आव्हान देणारी प्रबोधनाची प्रचंड मोठी परंपरा तेथे आहे. गॅलिलिओला दिलेल्या शिक्षेबद्दल तीनशे वर्षांनी का होईना माफी मागून सत्यशोधनाविषयी आस्था दाखवण्याचे धारिष्ट्य तेथे दाखवण्यात आले आहे. त्याच परंपरेला स्मरून आपणदेखील चमत्काराला नकार देऊन केवळ मानवतावादी कामाचा नि संतपदासाठी ठेवण्याचा आग्रह का धरू नये?
आपल्याकडील संतपरंपरेमध्ये चमत्काराला नकार देणारी आणि मानवतेच्या सेवेला खरे संतत्व मानणारी मोठी परंपरा आहे. ‘जे का रंजले गांजले…’ म्हणणारे संत तुकाराम; तसेच तुकडोजी महाराज, गाडगे महाराज अशी ही मोठी परंपरा आहे. निर्भय होऊन आपल्या आजूबाजूच्या अवैज्ञानिक गोष्टींची चिकित्सा करण्याऐवजी अशा गोष्टींना धर्माच्या चौकटीत अडकवण्याचा जो प्रयत्न काही प्रवृत्ती आपल्या इथे करताना दिसतात, तो तर अत्यंत निंदनीय आहे, म्हणूनच भारतातील इतर राज्यांतील; तसेच परदेशांतील विज्ञानवादी संघटनांच्या बरोबरीने जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना बरोबर घेऊन ‘संतपदासाठी चमत्काराची अट रद्द करण्यात यावी,’ अशा आशयाची पत्रे पोप फ्रान्सिस यांना His Holiness, Pope Francis, Apostolic Palace, 00120, Vatican City या पत्त्यावर पाठवावीत; तसेच ई-मेलही पाठवावेत, अशी मोहीम ‘महाराष्ट्र अंनिस’ चालवणार आहे. आमचा विरोध हा देव अथवा धर्म याला नसून त्याच्या नावावर जे शोषण होऊ शकते, त्याला आहे. शेवटी राहिला तो प्रश्न मदर तेरेसा यांच्या मानवतावादी कामाच्या मूल्यमापनाचा आणि धर्मांतराविषयी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचा; त्याची निश्चितच चर्चा व्हायला हवी. त्याला दोन बाजू आहेत आणि कायमच सत्य हे टोकाची भूमिका घेणार्यांच्या भूमिकांच्या कुठेतरी मधोमध असण्याची शक्यता आहे. प्रश्न असा आहे की, धर्म आणि राजकारण यांची अभद्र युती ही सामान्य माणसाचे जगण्या-मरण्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यामध्ये येणारी अत्यंत मोठी धोंड ठरत असताना ही चर्चा आपण तारतम्याने आणि संयत भाषेचा वापर करून करणार की त्यामधूनदेखील धार्मिक ध्रुवीकरणाचेच राजकारण करणार?
’विवेकाच्या वाटेवरून’ या पुस्तकातून साभार
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पोप जॉन पोल (दुसरे) यांना ई–मेल आणि पत्रही लिहून ‘महाराष्ट्र अंनिस’ची याबाबत असलेली भूमिका कळवली आणि भेटण्याचे आवाहनही केले होते, त्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. देव आणि धर्म याबाबत भारतीय संविधानाने घेतलेली भूमिका हीच समितीची भूमिका आहे. याबरोबरच भारतीय घटनेने नागरिकांचे कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोधक बुद्धी यांचाही आग्रह आम्ही धरत असतो…वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहता चमत्कार होऊच शकत नाहीत…यामुळे देव आणि धर्म यांच्या नावे होणार्या चमत्काराच्या दाव्याला आम्ही सतत विरोध करत आलो आहोत…यामुळे माणसे डोळस आणि शहाणी होतील…आणि समाजातील दुःख, दारिद्य्र, शोषण यांच्याविरुद्ध काम करतील असा आम्हाला विश्वास वाटतो…!
मदर तेरेसा यांच्या अलौकिक मानवतावादी कार्यामुळे त्यांना ‘संत’ ही पदवी सहज प्राप्त होऊ शकते…मानवी कल्याणासाठी याचप्रकारे झटणार्या अनेक महामानवांना महाराष्ट्राने आदराने ‘संत’ ही पदवी दिली आहे…परंतु आपल्या निकषाप्रमाणे संत ही पदवी देण्यासाठी अशा व्यक्तींनी आयुष्यात दोन खरे चमत्कार करावे लागतात, त्यासाठी शोध घेण्यास अधिकृत पथकही भारतात आले आहे..!
आम्हाला असे वाटते की, अत्यंत उच्च दर्जाचे सेवाकार्य करणार्या मदर तेरेसा यांना ‘संत’ ही पदवी देण्यासाठी चमत्काराची गरज नसावी…मात्र अशा चमत्कारांचा शोध होत असल्यास ही प्रक्रिया चुकीची व घटनाविसंगत असल्याने आमची समिती त्याला विरोध करेल, हे आम्ही नम्रपणे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो…आपल्या निदर्शनास आम्ही हेदेखील आणू इच्छितो की, गॅलिलिओला केलेल्या शिक्षेबद्दल त्याच्या मृत्यूनंतर 350 वर्षांनी ख्रिश्चन धर्मपीठांनी माफी मागितली आहे…हे लक्षात घेता मदर तेरेसांचे संतत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले कथित चमत्कार शोधणे, हा त्यांचा सन्मान नसून अवमान आहे…असे आमचे मत आहे…लवकरच आपण भारतात येणार आहात, त्या वेळी याबाबत आम्ही आपणास भेटू इच्छितो…!
– नरेंद्र दाभोलकर