मुलींच्या अंगात सैतान असल्याचं सांगत अत्याचार

मधुकर अनाप - 9850144709

अहमदनगर जिल्ह्यातील चर्चमधील धक्कादायक प्रकार

अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनई बेल्हेकरवाडी रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली दोन अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंगासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच सोनई येथील आरोपी उत्तम बळवंत वैरागर, संजय केरु वैरागर या दोघांसह अहमदनगर टीव्ही सेंटर येथील सुनील गुलाब गंगावणे या तीन आरोपींना पोलिसांनी अटकही केली.

डिसेंबर २३ ते १५ फेब्रुवारीपर्यंत सोनई बेल्हेकरवाडी रस्त्यावरील प्रार्थनास्थळात पैसे व चॉकलेटचं आमिष दाखवून तक्रारदाराच्या मुलीसह तिच्या भाचीचे आरोपी उत्तम वैरागर यानं वेळोवेळी लैंगिक शोषण केलं. पाचवीत शिकणार्‍या मुलींना अत्याचाराची वाच्यता जर केली तर त्यांची आई आणि आजी मरून जाईल अशी भीती घालण्यात आली होती. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाल्यानंतर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व तीनही आरोपींना अटक करून कलम ३७६, ३५४ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

माणसाने माणूसपण गुंडाळून ठेवायचे म्हटलं की, त्याच्यात फक्त जनावर शिल्लक राहतं. मग अशा माणूसपणाची झूल पांघरलेल्या विकृतांना अत्याचारासाठी धर्माच्या भिंतीसुद्धा पुरत नाही.

कुठलाही धर्म गरिबी आणि अज्ञानातून बाहेर पडण्याची शिकवण देतो; पण धर्माचा आधार घेत समाजातील विकृत गरिबी, असहाय्यतेचा फायदा घेऊन खेळण्या- बागडण्याच्या वयातील बालिकांना आपल्या वासनेची शिकार बनवत असेल, तर अशा अपप्रवृत्तींना कायद्याच्या मार्गाने धडा शिकवावाच लागेल. सोनईतील एका प्रार्थनास्थळामधील अल्पवयीन मुलींवरील ही अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर जनसामान्यांमधून आरोपींविषयी हाच रोष व्यक्त होत आहे. हा रोष रास्त असला, तरी अशा घटनांतून सावध होत, भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी समाज म्हणून आपण काय करतो, याचे मंथनदेखील तितकेच महत्त्वाचे.

सोनई गावाजवळील प्रार्थनास्थळाच्या प्रमुख व्यक्तीने गरीब कुटुंबाच्या असहाय्यतेचा फायदा घेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. तुमच्या कुटुंबातील मुलींमध्ये असलेल्या सैतानामुळे संकट आले आहे. त्यामुळे त्यांना धार्मिक स्थळी पाठवा, असं घरच्यांना सांगितले. सैतानाच्या भीतीने घरच्यांनी त्या मुलींना धार्मिक स्थळी पाठवले. यावर तब्बल एक महिन्यात अनेक वेळा पाचवीत शिकणार्‍या १० वर्षीय दोन मुलींवर भीती दाखवत अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अत्याचाराच्या घटनेचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. त्यामुळे अत्याचाराचे हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांनी याची पाळेमुळे खोदून काढण्याची गरज आहे. अशा पद्धतीने गरिबीचा फायदा उचलून अल्पवयीन मुलींचे शोषण होत असल्याने कठोर कारवाईची गरज आहे. गुन्हा दाखल होताच सोनई गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी आरोपींना कठोर शासन करण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दुसर्‍या दिवशी प्रार्थनास्थळाशी निगडित समाजानेदेखील मोर्चा काढत आरोपींना कठोरातील कठोर शासन करण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी केली. अनेकदा गुन्हा घडल्यानंतर धार्मिक रंग देऊन गुन्हेगाराला धर्माच्या नावाखाली लपविण्याचा प्रयत्न होतो; परंतु सोनईच्या घटनेत आरोपीच्या धर्मियांनी ‘आरोपीला कुठलाही धर्म नसतो, गुन्हा हाच त्याचा धर्म असतो’, या तत्त्वानुसार आरोपीवर केलेली कारवाईची मागणी महत्त्वाची ठरते. अत्याचाराच्या प्रकरणाचे व्हिडिओ चित्रीकरण करणार्‍यांनाही सहआरोपी करावे, ही केलेली मागणीदेखील रास्त आहे. तशी या घटनेशी निगडित काही प्रश्नांची उत्तरे संबंधित प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापनाला देणेही बंधनकारक ठरणार आहे. अत्याचाराचा प्रकार तब्बल एक महिना सुरू होता. शिवाय अत्याचाराची घटना प्रार्थनास्थळाच्या आवारात घडली. कुठलंही प्रार्थनास्थळ त्या धर्मियांसाठी पवित्र ठिकाण. अशा पवित्र ठिकाणी इतके क्रौर्य घडत असताना संबंधित प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन काय करत होते? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रार्थनास्थळी काम करणार्‍या व्यक्तीचे चारित्र्य व वर्तन पाहून त्याला ईश्वरसेवेच्या कार्याची जबाबदारी दिली जाते. सोनईतील धार्मिक स्थळी जबाबदारी देताना अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या आरोपीचे वर्तन व चारित्र्य तपासण्याची गरज संबंधित व्यवस्थापनाला वाटली नाही का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे. जनमानसाच्या रोषामुळे पोलीस तपासात यथावकाश यावर प्रकाश पडेलच. या प्रकरणात आणखी कोणी दोषी असेल, तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. जनतेच्या रेट्यामुळे खटला फास्टट्रॅक कोर्टातही चालेल आणि पोलीस न्यायव्यवस्थेने तिचे काम प्रामाणिकपणे केले, तर आरोपींना कठोर शासनदेखील होईल; पण पुढे काय? आयुष्य उमलण्याआधी अत्याचारामुळे ज्या दोन बालिकांचे उभे आयुष्य करपले. याची भरपाई आरोपीला कितीही गंभीर आणि कठोर शिक्षा झाली तरी होऊ शकत नाही.

मुळात अशा घटना घडतात का आणि अशा घटना टाळणे कसे शक्य आहे? या दोन प्रश्नांच्या मुळाशी सोनई अत्याचार घटनेच्या निमित्ताने आपल्याला जावे लागेल. समाज म्हणून यावर उत्तर शोधावे लागेल. आपल्या आवतीभोवती अन्याय, अत्याचाराच्या घटनांचा परीघ इतका वेगाने वाढतो आहे की, पहिल्या घटनेतून सावरायच्या आत दुसरी घटना आपल्यावर येऊन आदळते. समाजमन इतकं दूषित झालं आहे की, विकृतांना आता पवित्र प्रार्थनास्थळही पुरेना आणि इवलेसे जीवदेखील त्यांच्या वासनेचे शिकार होण्यापासून वाचेना!

याचा मुकाबला करण्यासाठी पालक गरीब असो वा श्रीमंत, आपली मुलं करतात काय? कुणाच्या संपर्कात आहेत, याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. अंधश्रद्धेविरुद्ध लढताना नरेंद्र दाभोलकरांचा बळी गेला; परंतु अंधश्रद्धा काही आपल्यातून जायला तयार नाही. अशा अंधश्रद्धेच्या आहारी जात आपण आपली मुलं प्रार्थनेच्या नावाखाली नराधमांच्या हवाली करणार असाल, तर कितीही नरेंद्र दाभोलकर मारले गेले, तरी खरी श्रद्धा निर्माण होईल कशी?

आज समाज म्हणून भौतिक सुख आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण कितीही प्रगती केली असली, तरी माणसाचा भवताल मात्र माणसांनीच असुरक्षित करून ठेवला आहे. हे वास्तव दर्शवणार्‍या घटना पावलोपावली घडत असताना आपल्या गरिबीचा, असहाय्यतेचा फायदा उठवत आपल्या मुलांचे आयुष्य कुणी उजाड करणार नाही ना, याविषयी पालकांनी जागरूक राहिली पाहिजे. हाच सर्व समाज आणि पालकांना सोनई अत्याचार प्रकरणाचा धडा आहे.

तंत्रज्ञानाने जगाचं अंतर जवळ आलं असलं, तरी माणसाची मनं मात्र लांब गेली आहेत. धर्म, रंग, जाती, वर्ण यांच्या अस्मितेच्या अतिरेकामुळे धर्मा-धर्मांतील वातावरण कमालीचे कलुषित झाले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या धर्माच्या प्रार्थनास्थळाशी निगडित किंवा जबाबदार धार्मिक व्यक्तीशी निगडित जेव्हा सोनईसारखी घटना समोर येते, तेव्हा शिकला सवरलेला समाजदेखील त्याला जातीचा रंग द्यायला बघतो. उच्चशिक्षितांमध्ये अलीकडच्या काळात रूढ होत असलेल्या अंधश्रद्धा ही अतिशय गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा सोनई घटनेतील आरोपींना फाशी देण्यासाठी जसा सर्वधर्मीय समाज एकवटला आहे, तसा अशा घटना घडू नये म्हणून सर्व समाजाने जागरूक राहात माणूसपण जपलं पाहिजे.

अशा आणि यांसारख्या अनेक घटना समाजात वर्षानुवर्षे घडत आहेत अशा अंधश्रद्धा व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अथक प्रयत्नातून जादूटोणाविरोधी कायदा २०१३ पारित झाला आहे. त्याची पोलिसांमार्फत योग्य प्रकारे आणि कठोरपणे अंमलबजावणी झाली तर कायद्याच्या भीतीने का होईना, असे प्रकार समाजात घडणार नाही.

मधुकर अनाप

कार्याध्यक्ष – अंनिस अहमदनगर जिल्हा

मो.९८५०१४४७०९


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]