मंदाकिनी गायकवाड -

माझ्या वडिलांचे नाव किसन सावंत. ते नास्तिक होते. त्यामुळे मी लहानपणापासूनच घरात व्रतवैकल्ये किंवा देवाची पूजा अर्चा पाहिलेली नाही. आई होती थोडी धार्मिक पण नंतर तिनेही सर्व सोडून दिलं. माझी अशी पार्श्वभूमी असूनही माझे मिस्टर पोलवरून पडून सात वर्षे झोपलेले होते, तेव्हा मी मंदिरात जाऊन विचारायची माझा नवरा कधी बरा होईल आणि माझी आणि माझ्या मुलांची आर्थिक स्थिती कधी सुधारले? पण मला तो उत्तर देऊ शकत नाही, आपल्यालाच सारं निस्तरायला पाहिजे, हे माझ्या ध्यानात आलं आणि मग मी दिवस रात्र काम करून मुलांचं शिक्षण केलं, नवर्याचं आजारपण निभावलं. माझी आई माझ्याकडेच होती. मी आणि मुलं किराणा दुकानाचा व्यवसाय करायचो. शेजारी हजारे काकांचं हॉटेल होतं तेव्हा शेजारच्या काकांनी सांगितलं बाहेरचं बघ, हजारे काका देवॠषीला घरी घेऊन आले. देवॠषी म्हटला, ‘तुमचा संडास अयोग्य दिशेला आहे. अडीच हजार खर्च येईल. त्या देवॠषीने साहित्य आणायला पाचशे रुपये घेतले आणि तो गेला. त्याने परत तोंड दाखवलं नाही. मी आणि माझी आई त्याच्या घरी गेलो. त्याने घरात असताना, आमची भेट घेतली नाही. त्यानंतर दोन वर्षांनी माझे मिस्टर वारले. पेणमधील मिनाताई मोरे माझी मैत्रीण. तिनं पेणमध्ये अंनिस शाखा स्थापन केली होती आणि त्या अंनिसच्या मिटिंग घेत असतं. त्यांची मुलं आणि आमची मुलं एकत्र शिक्षण घेत असल्यामुळे आमचे घनिष्ठ संबंध होते. २०१६ मध्ये गांधी मंदिरात मिटिंग होत असत. घराशेजारी गांधी मंदिर होते. मग मी, मीना ताई आणि मोरेभाऊ यांच्यामुळे अंनिसमध्ये आले आणि अंनिसच्या मिटिंग, उपक्रम, प्रेरणा मेळावा, आंदोलने, झेप आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक मोर्चा यामध्ये सहभागी झाले.
हळूहळू मला काम करताना आनंद मिळतोय असे मला जाणवू लागले. त्यात वाचनाची प्रचंड आवड लागली. म्हणून डॉ. बाबासाहेब आणि त्यांचा धम्म वाचला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर चरित्र वाचलं. बुद्ध आणि धम्म, बराक ओबामा, नेपोलियन, विद्रोही तुकाराम, शूद्र कोण होते? बुद्धकालीन पर्व अशी अनेक पुस्तकं वाचण्यात आली. डॉ नरेंद्र. दाभोलकर यांच्या छोट्या छोट्या पुस्तिका वाचल्या. कविता, लेखन याची प्रचंड आवड. त्यामुळे कृषीवल, दिवाळी अंक नवाकाळ अनेक अंकात तेव्हा माझे छोटे लेख, कविता प्रसिद्ध होऊ लागले.
माझं शिक्षण आठवी पास. कारण तेव्हा चौदाव्या वर्षी माझं लग्न झालेलं. त्यामुळे पुढील शिक्षण तिथंच थांबलं. परंतु मुलं लहान असताना माझ्या कविता पाहून पतंगराव कॉलेज, पेणचे प्राचार्य जाधव सर यांनी मला बाहेरून मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या प्रवेश परीक्षेला बसवलं आणि मी बासष्ट टक्क्यांनी पास झाले. मी बीऐचे फर्स्ट, सेकंड, थर्ड केले; परंतु माझे मिस्टर आजारी असल्याने थर्डचा रिझल्ट मला समजू शकला नाही. बरेच वर्षांनी चौकशी केली, परंतु रिझल्ट मिळू शकला नाही.
अंनिसमध्ये काम करताना कार्यकर्त्यांचे बिझी शेड्युल, आर्थिक विवंचना, उपक्रम घेताना प्रवास खर्च आणि इतर खर्चासाठी ओढाताण, कामात आनंद न वाटणे यामुळे कार्यकर्ता जोडताना थोड्या अवधीसाठी कार्यकर्ता जोडला जातो असं वाटतं. त्यामुळे त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतोय का असं वाटतं. देणगी जाहिराती वर्गणीदार जोडताना मला स्वतःला हे काम जमत नाही. नेमकेच कार्यकर्ते आर्थिक मदत करतात. कधी कधी तर एकटीला सर्व तयारी करावी लागते. बरोबर कोण नसताना एकटीला उपक्रम घ्यावा लागतो. पण या सर्वांवर मार्ग काढत मी आनंदाने अंनिसचे काम करत आहे.
त्यानंतर माझ्या मुलासुनेचं एक्झिट झालं आणि माझा संसार उद्धवस्त झाला. गेल्या पाच वर्षांपासून मी पेण सोडून माझ्या गावी आले आणि मी फलटण शाखा जीवित केली आणि आजपर्यंत तेथेच काम करते आहे.
अंनिसमध्ये काम करताना समाज पहिल्यांदा विचारतो यात तुमचा फायदा काय? किंवा या लष्कराच्या भाकर्या कशाल्या भाजता? आपण कार्यकर्ते म्हणून ज्याचं नुकसान करत नाही त्यांच्याकडून समाजात मान असतोच; परंतु ज्यांच्या विरोधात आपण म्हणजेच अंनिस काम करतेय त्यांच्यामुळे माझं न भरून येणारं नुकसान झालं, माझ्या आयुष्यावरही परिणाम झाला.
अंनिसचं काम करताना धावपळ ओढाताण, चणचण कार्यकर्तांचा अभाव यामुळे कुटुंब अंनिस सोडायला सांगतात. अंनिसमध्ये काम करताना प्रथम सासरचे लोक प्रचंड नाराज झाले. त्यांनी मी एक घराच्या बाहेर पडणारी लायक नसलेली स्त्री असे मानले.
ज्या देवॠषीने माझ्याकडून देवासाठी पैसे नेले होते तो मनुष्य आम्ही ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ हा उपक्रम घेत असताना भेटला. आमच्या उपक्रमसाठी पोलिस चौकीजवळ जागा मिळाली तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे मॅडम त्या चौकीत बसल्या असताना ती व्यक्ती तिथे पोलिस स्टेशनमध्ये शांती समितीचा अध्यक्ष म्हणून आली होती. मी पोलिस निरीक्षक आणि त्या व्यक्तीला दूध प्यायला दिलं तेव्हा तो म्हणाला यात काय घातलं? मी उगाचंच म्हटलं, अंगारा! त्यांनी मला ओळखलं. मी पोलिस मॅडमला सांगितले यांनी घराची अडचण सोडवण्यासाठी माझ्याकडून पाचशे रुपये घेतले होते. यावर त्या हसल्या आणि तिथून पटकन निघून गेल्या. कायदा या बाबांच्या बाबतीत कसा मजबूर असतो याची प्रचिती फलटण आणि पेण या दोन्ही ठिकाणी मला आली. अंनिसमध्ये काम करताना फलटण ग्रामीण भागातील मुंजवडी गावातील भूत उतरविण्याच्या बहाण्याने एका महिलेस मारहाण करणार्या बाबांच्या विरोधात फलटण अंनिसने अटकेची मागणी केली होती. पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. परंतू मला दोन तीन वेळा घाबरविण्याच्या प्रयत्नात माझा हात फ्रॅक्चर झाला. असा आहे महा. अंनिसमध्ये काम करण्याचा अनुभव. पण तरीही विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रयत्न सातत्याने सुरू राहतील ही स्वतःला आणि महा. अंनिसला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून दिलेली ग्वाही आहे.
– मंदाकिनी गायकवाड (फलटण)
संपर्क : ९०२९७ ४५९९२