गोविंद पानसरे -

२० फेब्रुवारी रोजी स्मतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. कॉ. पानसरे यांच्या एका पुस्तकातील हा लेख वाचकांना विचार करायला लावणारा आहे.
आजवर ज्ञात असलेल्या मानवाच्या सर्व ठिकाणच्या सर्व समाजात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ‘धर्म’ अस्तित्वात होता आणि आहे. जनमानसावरील धर्माचा पगडाही कितीतरी सखोल आहे आणि प्रदीर्घ काळ टिकून आहे. मानवी समाजात सर्वांत जास्त काळ टिकून राहिलेली संघटना म्हणून धर्माचाच सर्वांत वरचा नंबर आहे. असे का आहे? समाजात कोणतीही व्यवस्था अकारण टिकून राहात नाही. धर्मात असे काहीतरी आहे की, जे समाजाची कोणती तरी गरज भागवते आहे. जगात सर्वांत जास्त चिकित्साही धर्माचीच झाली आहे. असा एकही विचारवंत सापडणार नाही की, त्याने धर्माची चिकित्सा केली नाही. ज्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रभाव जगात सर्वांत जास्त झाला आणि अनेक चढउतार येऊनही आणि प्रस्थापितांच्या सर्व प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देऊनही ज्याचा प्रभाव टिकून आहे, त्या कार्ल मार्क्सनेही धर्माचा विचार केला आहे. विरोधकांनी हेतुपूर्वक पसरविलेल्या विकृतीमुळे आणि काही अनुयायांच्या व समर्थकांच्या मुळातून अभ्यास न करण्याच्या प्रवृत्तीमुळे मार्क्सच्या अनेक विचारांचे विकृत स्वरूप पसरले आहे. तथापि, त्याच्या धर्मविषयक विचारांबाबत जेवढे अपसमज आहेत तेवढे कोणत्याच विषयासंबंधी नाहीत. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, हे मार्क्सचा धर्मविषयक विचार हे जगातील सर्वांत जास्त प्रसिद्ध वाक्य असावे. मूळ वाक्याचे हे भाषांतरही बरोबर नाही आणि मागील पुढील संदर्भापासून तोडून एक सुटे वाक्य हाच जणू पूर्ण विचार म्हणून मांडल्याने भरपूर घोटाळा झाला आहे आणि होत आहे. “Contribution to the critique of Hegel’s philosophy of Law” मध्ये हे वाक्य असलेला पॅरा आहे. मूळ इंग्रजी भाषेतला पॅरा असा –
“Religious distress is at the same time the expression of real distress and also the protest against real distress. Religion is the sign of oppressed creature, the heart of the heartless world just as it is the spirit of spiritless condition. It is the opium of the people.”
“To abolish religion as the illusory happiness of the people is to demand the real happiness. The demand to give up illusion about the existing state of affair is the demand to give up a state of affair which needs illusion.”
दुबळ्यांचा उसासा : “धर्माच्या रूपाने व्यक्त होणारे दुःख हे एकाच वेळी खर्या दुःखाचे प्रकट रूप असते आणि त्याच वेळी तो खर्या दुःखाचा निषेधही असतो. धर्म हा दबलेल्या दीनदुबळ्यांचा उसासा असतो. (धर्म) हृदयशून्य जगाचे हृदय असते. निरुत्साही परिस्थितीतला उत्साह असतो. तो लोकांची अफू असतो.”
“सुखाचा केवळ आभास असणारा धर्म नाहीसा करण्याची मागणी करणे म्हणजेच लोकांच्या खर्या सुखाची मागणी करणे होय. आभास सोडून देण्याची मागणी करणे म्हणजेच ज्या परिस्थितीमुळे अशा आभासाची गरज भासते, ती परिस्थितीच नाहीशी करण्याची मागणी असते.”
ज्या हतबलतेमुळे धर्माची गरज भासते, ती हतबलता नाहीशी करणे हाच धर्माची गरज नाहीशी करण्याचा मार्ग आहे. वास्तव जीवनातील दुःख आणि संकटे विसरण्यासाठी लोक गुंगी येणार्या अनेक पदार्थांचे सेवन करतात, आधार घेतात. धर्मश्रद्धेचा आधार हा असाच आधार आहे. अशीच गुंगी आणणारी जाणीव आहे म्हणून मार्क्स म्हणतो, धर्म लोकांची अफू असते.
“आभासात्मक किंवा भ्रामक सुखाची गरज ज्या परिस्थितीमुळे निर्माण होते, ती दीनदुबळ्यांची, दबलेल्यांची हतबलताच नाहीशी करा. अशी हतबलता निर्माण करणारी परिस्थिती आणि समाजरचनाच बदला, असे मार्क्स आग्रहाने आणि वारंवार सांगतो म्हणून त्याच्या विचाराचे विकृतीकरण केले जाते. समाजातील शोषक वर्गाने धर्माचा वापर शोषणासाठी सतत केला आहे, हे मार्क्स पुन्हा पुन्हा सांगतो. त्यांच्यासाठी ‘धर्म’ अफू नसतो तर ते शोषणाचे साधन असते. म्हणून प्रस्थापित त्याच्या विचारांचे विकृतीकरण करतात. धर्मजाणिवेने मिळणार्या भ्रामक – आभासात्मक पारलौकिक सुखामागे धावण्याऐवजी इथेच याच जगात आपल्या जिवंतपणातच खरे सुख निर्माण करा, असे मार्क्स सांगतो. गुंगीतून बाहेर पडा, असे मार्क्स सांगतो.”
‘भ्रामक जाणिवा नाहीशा करून योग्य जाणिवा निर्माण करा’ असे मार्क्स शिकवतो. धर्म मानणार्या, धर्माच्या आहारी गेलेल्या, दबलेल्या दीनदुबळ्यांबाबत मार्क्स कणव व्यक्त करतो आणि त्याचवेळी परिस्थिती बदलण्याच्या खर्या मूळ संघर्षात सहभागी व्हा असे आवाहनही मार्क्स करतो. ज्या परिस्थितीमुळे मादक पदार्थाचे सेवन करावेसे वाटते ती परिस्थितीच बदला, असे मार्क्सचे आवाहन आहे.
लेनिनचे विचार : जगातल्या सर्वच क्रांतिकारकांना धर्माचा विचार करावा लागला आहे. समाजातल्या दोन विभागांना समोर ठेवून हा विचार करावा लागला. धर्माचा वापर करून सर्वच प्रकारचे शोषण करणारा एक विभाग आणि ज्या दबलेल्या दीनदुबळ्यांनी भ्रामक सुखाच्या खोट्या आशेने धर्माचा आश्रय घेतला आहे असा दुसरा विभाग. धर्माचा गैरवापर करणार्यांचा एक विभाग आणि त्याला भुलून बळी गेलेल्यांचा दुसरा विभाग, फसवणार्यांचा एक विभाग आणि फसलेल्यांचा दुसरा विभाग. फसलेल्यांना फसविणार्यांच्या प्रभावाखालून बाजूस काढून क्रांती कार्यात सहभागी करून घ्यावे, या संघर्षनीतीचा, व्यूहरचनेचा विचार करून आणि स्थळ-काळाचा विचार करून धर्मविषयक मांडणी केली पाहिजे.
कोणत्याही काळी आणि कोणत्याही ठिकाणी मूलभूत शास्त्रीय भूमिका मांडीत राहणे ज्यांना केवळ जगाचा अर्थच सांगायचा असेल त्यांना सोयीचे असते. ज्यांना ‘जग बदलायचे’ आहे, त्यांना तसा विचार करणे उपयुक्त नसते. हा संधिसाधूपणा नव्हे. ‘धर्म सांगायला’ महत्त्व निश्चितच आहे. ‘अर्थ’ समजल्याखेरीज ‘बदल’ करता येत नाही, हे स्पष्टच आहे. तथापि, बदल करण्यासाठी अर्थ सांगणे वेगळे आणि अर्थासाठी अर्थ सांगणे किंवा ज्ञानासाठी ज्ञान सांगणे वेगळे. जगातले पहिले कामगार-शेतकर्यांचे राज्य स्थापण्याची जगाच्या इतिहासातील अभूतपूर्व कामगिरी ज्याच्या नेतृत्वाखाली झाली, त्या कॉ. लेनिनचे धर्मविषयक विचार समजावून घेणे फारच उद्बोधक आणि मार्गदर्शक आहे.
बिनचूक अर्थ : १९०५ सालच्या डिसेंबरमध्ये कॉ. लेनिन यांनी ‘समाज व धर्म’ असा एक लेख लिहिला. त्यांनी लिहिले “धर्म ही खाजगी बाब समजली पाहिजे…” या सूत्राचा बिनचूक अर्थ ठरवला पाहिजे. धर्म ही खाजगी बाब समजली पाहिजे अशी आपली मागणी आहे, हे खरे; पण त्याचा अर्थ असा की, शासनसंस्थेतर्फे ती खाजगी बाब मानली जावी. आपल्या पक्षामध्ये ती खाजगी बाब ठरवणे कधीही बरोबर ठरणार नाही. याच लेखात लेनिन पुढे लिहितात- “आमच्या पक्षाच्या कार्यक्रमात कामगारांची धर्मश्रद्धेपासून सोडवणूक करणे हा एक उद्देश आहे. अर्थातच धर्माविरुद्ध हा तात्त्विक लढा चालविणे ही काही खाजगी बाब नाही. उलट ते आमच्या सर्वच पक्षाचे व सर्व कामगार वर्गाचे एक उद्दिष्ट आहे.
“साम्यवादी पक्षांनी आस्तिक (देव मानणारे) व्यक्तींना पक्षाचे सभासद करून घ्यावे का, या प्रश्नाचे लेनिन यांनी उत्तर दिले आहे. त्यांचे म्हणणे ‘नास्तिकपणाची अट घातली तर लाखो कामगार शेतकर्यांना आणि गोरगरिबांना पक्षाचे सभासद होताच येणार नाही…’ “समाजवादाचे तत्त्वज्ञान निरिश्वरवादी आहे, मग पक्षात आस्तिकाला घेणे हा केवळ संधिसाधूपणा नाही का ?” यावर लेनिन यांनी उत्तर दिले की, “….. आमचा पक्ष हा आस्तिक-नास्तिक यांच्या तात्त्विक चर्चची ‘डिबेटिंग सोसायटी’ नाही. पिळवणूक होणार्या जनतेला नव्या मानव जीवनाकडे नेणार्या लढण्याचा मार्ग दाखविणारा तो राजकीय सार्वजनिक पक्ष आहे.”
दि. के. बेडेकर यांनी एका प्रस्तावनेत सार सांगितले आहे. “जनतेने सुजाणपणे घडवलेले समाजपरिवर्तन हे एका सर्वंकष विचारपरिवर्तनाचे व विवेकशील कृतिशीलतेचे फळ असते, ही क्रांतीसंबंधीची लेनिनची भूमिका स्पष्ट आहे. क्रांती हा काही मूठभर साहसी व्यक्तींनी यशस्वी करावयाचा गुप्त कट नव्हे.”
स्थळ–काळ सापेक्षता : आज आणि भारतात किंवा महाराष्ट्रात परिवर्तनवाद्यांचे धर्मविषयक धोरण किंवा भूमिका काय असावी? एका बाजूने ही भूमिका स्पष्ट, रोखठोक आणि न बिचकता धर्माचे विश्लेषण करणारी असावी. धर्माने बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेची मांडणी करणारी असावी आणि त्याचवेळी प्रस्थापितांनी आजवर सतत आणि सुसंगतपणे धर्माचा वापर दीनदुबळ्यांना दीनदुबळे ठेवण्यासाठीच कसा केला आहे हे मांडणारी असावी. धर्माचा वापर करून सत्तासंपत्ती मिळविणारे पुरातन काळापासून अगदी आजपर्यंत कार्यरत आहेत, हे दाखवून द्यावे. प्रस्थापित हितसंबंधियांनी स्वतःच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी आणि शोषितांना शोषित ठेवण्यासाठी धर्माचा वापर कसा कसा केला आहे हे स्पष्टपणे मांडले पाहिजे आणि त्याचवेळी त्यांच्या प्रचारांना आणि कारवायांना बळी पडलेल्यासंबंधी कणव असली पाहिजे.
फसविले गेलेल्यांना समजून घेणारी व समजावणारी भूमिका असावी. भ्रामक सुखामागे न लागता स्वर्गातील सुखाकडे न पाहता किंवा नरकयातनांकडे लक्ष न देता या पृथ्वीवरील यातना नाहीशा करून इथेच याच पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याच्या कार्यात संघटित होण्याचे आणि त्यासाठी संघर्षरत व्हायला आवाहन करणारी भूमिका असावी.
गौतम बुद्धापासून, संत-सुधारकांपासून तर म. फुले, हा कर्मवीर शिंदे, आगरकर, म. गांधी, साने गुरुजी, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू यांनी मांडलेल्या आणि प्रचारलेल्या विचारावर आणि व्यवहारावर मात करून धार्मिक उन्माद निर्मून देशात राजसत्ता बळकावली गेली. अशा काळात आपण वावरतो आहोत. त्यांचा पराभव करण्यासाठी, फसून त्यांच्या मागे गेलेल्यांना परत आणण्याचे कार्य करावयाचे आहे आणि त्याचवेळी असे घडावे असे मानणार्या आणि त्यासाठी प्रयत्न करणार्या सर्व विभागांची रास्त विचारावर एकजूट घडवून समान भूमिका तयार करून समान संघर्षात उतरवण्याचे कार्य आपणास करावयाचे आहे.
अंतिम साध्याचा आणि स्थळकाळाचा हा संदर्भ सुटू नये.