विधवा सन्मान आणि समाजसुधारक

अनिल चव्हाण -

कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील एक गाव, हेरवाड. या छोट्याशा गावाने आपले नाव जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात आणि देशात दुमदुमत ठेवण्याचे ठरवलेले दिसते. देशात अनेक जाती आणि धर्म आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रथा, कुप्रथा आढळतात; पण एक कुप्रथा सर्वत्र समान आहे, ती म्हणजे विधवेचा अपमान. पतिनिधनानंतर विधवेने जगायचे कसे? काही वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रियांना त्यांच्या पतीच्या किंवा पुत्राच्या संपत्तीत वाटा मिळत नव्हता. त्यामुळे त्या कायमच्या पुरुषाच्या मेहरबानीवर अवलंबून असत. विधवांचे हाल तर कुत्रे खात नसे. वरिष्ठ वर्णातल्या विधवांना वैदिक धर्माने दोन पर्याय ठेवले होते. विधवेचे हाल होऊ नयेत म्हणून श्रीमंत क्षत्रिय वर्णात तिला जिवंत जाळून टाकले जाई. पतीच्या प्रेताबरोबर त्यांना बांधून, अफू चारून, बळजबरीने सती जायला लावत. तिच्या किंकाळ्या ऐकून एखाद्या पुरुषाच्या हृदयाला पाझर फुटू नये म्हणून जीव खाऊन ढोल वाजवले जात. विधवेला जाळून टाकल्याने माहेर व सासरच्यांना तिला सांभाळावे लागत नव्हते आणि पुरोहिताला तिच्या अंगावरचे सर्व सोन्याचे दागिने मिळत. सती गेल्यावर तिला, तिच्या पतीला आणि त्यांच्या पूर्वजांना हजारो, लाखो वर्षे स्वर्गात राहायला मिळणार, अशा भाकड कथा वैदिकांनी पुराणात रचल्या आहेत. देशभर विधवांना सती घालवल्याचे पुरावे त्यांची समाधी बांधून जतन केले आहे. अशा समाधीवर नमस्कारासाठी हात जोडलेल्या स्त्रीच्या हाताचे शिल्प असते. विशेष म्हणजे निरपराध महिलेला जिवंत जाळणाऱे वैदिक आजही स्वतःला सहिष्णू धर्माचे म्हणवून घेतात. यापूर्वी छत्रपती राजाराम महाराजांची एक पत्नी आणि माधवराव पेशव्यांची पत्नी सती गेल्याचे उल्लेख आहेत. सती प्रथेचे उदात्तीकरण करून एका मान्यवर मराठी साहित्यिकाने वाहवाही मिळवली आहे. सामान्यपणे ब्राह्मण समाजात विधवा स्त्रीचे ‘केशवपन’ करून तिला विद्रुप केले जाई. आयुष्यभर तिच्या नशिबी अंधारकोठडी आणि घरकाम असे. विधवेवर घरच्या पुरुषाची वाईट नजर पडली आणि ती गरोदर राहिली तर आड-विहीर जवळ करणे एवढा एक मार्ग तिच्यापुढे असे. महात्मा जोतिबा फुले यांनी वाट चुकलेल्या महिलांना आपल्या घरी येऊन गुपचूप बाळंत होण्याचे आवाहन केले. सुमारे 58 विधवांचे सावित्रीबाईनी बाळंतपण केले आहे. मोगल बादशहा आणि ब्रिटिश गव्हर्नर यांनी सती प्रथेला कायद्याने बंद करण्याचे प्रयत्न केले. राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांनी देशात सती प्रथाविरोधी कायदा ब्रिटिशांनी केला. आणि या क्रूर प्रथेला मूठमाती दिली.

महिलांच्या हक्कासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. ब्रिटिशांच्या आगमनामुळे भारताच्या सामाजिक क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती झाली. तिची पायाभरणी करण्याचं काम ज्या थोर पुरुषांनी केले, त्यामध्ये लोकहितवादींना वरचे स्थान आहे. त्यांनी आपल्या ‘शतपत्रा’तून समाजामधील अज्ञान, कर्मकांडे, अंधश्रद्धा, जातिभेद, वर्णभेद, ग्रंथप्रामाण्य, ब्राह्मणी श्रेष्ठत्व याबरोबरच स्त्री-पुरुष विषमतेवरही कोरडे ओढले आहेत.

ते म्हणतात, “ज्या देशात स्त्रियांचे अधिकार लोक मानत नाहीत, त्या देशात लोकांची स्थिती वाईट असते. सांप्रत काळी ब्राह्मण लोकात स्त्रियांचे हाल व विपत्ती बहुत होतात. कन्या झाली म्हणजे लोक नाक मुरडतात. त्यास वाटते की, माझे घरात अवदसा शिरली.” (पत्र क्रमांक 15)

लोकहितवादींनी बालविवाहाला विरोध केला. ‘लग्नं उशिरा, प्रौढपणी करावीत; एवढेच नव्हे, तर मुलांनी आपली लग्नं आपण करावीत,’ असा क्रांतिकारक विचार त्यांनी मांडला. “मुलींचे लहानपण विद्या शिकविण्यात घालावे व पुढे वीस वर्षांच्या आत तिला कळू लागले, म्हणजे तिची आई-बाबांचे संमतीने लग्न करावे, जेणेकरून बहुत फायदे होतील.”

स्त्रियांच्या पुनर्विवाहासंबंधी लिहिताना लोकहितवादी संतप्त झालेले दिसतात. स्त्रियांवर घोर अन्याय करणार्‍या शास्त्रकारांना कोणती शिक्षा केली तरी ती अपुरीच, असे त्यांना वाटते. ते म्हणतात, “सांप्रत आपले लोकांमध्ये हा केवढा अनर्थ आहे की, स्त्रियास पती वारल्यावर पुनरपि लग्न करू देत नाहीत आणि ईश्वराने स्त्री व पुरुष सारखे उत्पन्न केले व उभयतांचे अधिकार समसमान आहेत, असे असता पुरुषास पुनर्विवाहाची आशा; स्त्रियास मात्र मनाई, हा केवढा जुलूम आहे?”

विधवांच्या बद्दल ते म्हणतात, “सासू-सासरे म्हणतात, ‘ही करंटी, अवदसा नवर्‍यास मारून आम्हास तोंड कशाला दाखवते आहे?’ माहेरी भाऊ-बहिणी म्हणतात,‘आमचे घरी तुझे काय आहे? येथे कशाचा येतेस?’ बरे, रस्त्यात फिरली तर लोकं म्हणतात, ‘बोडकी पुढे आली पाऊल कसे टाकावे बरे!’ कोणाचा आश्रय करावा तर तेथे टीका होते की ‘रंडकी-मुंडकीस तूप दही कशाला हवे? गादी निजावयास कशास हवी?’ तेव्हा तिला संसारात वैराग्यासारखे राहून दिवस काढावे लागतात. याप्रमाणे खाटकाच्या घरी मेंढराचीही दुर्दशा होत नाही. तो त्यास एक वेळ सुरी लावतो त्यावेळेस मात्र काय दुःख होत असेल, तेवढेच.” (पत्र क्रमांक 90)

“प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी विधवा नाही, असे नाही. कित्येकांच्या कन्या लहानपणी विधवा झालेल्या आहेत. त्यास नवरा म्हणजे काय हे ठाऊक देखील नाही. त्यांचे पुन्हा लग्न नाही, हा केवढा जुलूम आहे! मुलगी विधवा झाली की तिला विद्रुप करून टाकावयाची. शास्त्री पंडित म्हणतात की, ‘त्या बाईने पूर्वजन्मी वाईट तपश्चर्या केली, म्हणून हे फळ प्राप्त झाले. ईश्वराने उन्हात उभी केली. हे पूर्वजन्माचे दुष्कृताचे फळ. म्हणून आता व्रते करा आणि आमचे पोट जाळा; म्हणजे सुकृत होऊन सात जन्म वैधव्य प्राप्त होणार नाही,’ असे म्हणून गरीब व भोळे जीवास फसवितात.” (पत्र क्रमांक 104)

“मनू जर ईश्वराचा अंश होता, तर त्याने अशी सत्ता पृथ्वीवर का प्रकट केली नाही की, प्रथम स्त्री मरावी नंतर नवरा मरावा; पण स्त्रियांवरील या आपत्तीचा बंदोबस्त मनुच्याने होत नाही तर त्याचे शास्त्र फिरविण्यास काय चिंता आहे?” (पत्र क्रमांक 15)

म्हणजे स्त्रियांच्या वरील अन्याय दूर करण्यासाठी लोकहितवादी धर्मग्रंथ सुद्धा दूर करा, म्हणत आहेत. “जे पूर्वी शास्त्र लिहिले, तेच सर्व काळ चालले पाहिजे, असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. पूर्वीचे वैद्यक होते. परंतु त्यात आता जी सुधारणा झाली असेल ती घेतली पाहिजे. ज्योतिष; तसेच धर्मशास्त्र यांच्यात फेरफार केले पाहिजेत व त्यातील नियम सुधारले पाहिजेत. लग्नाचा नियम हा धर्म नव्हे; ही रीत आहे. तरी अंध परंपरेस सर्व भितात, इतकेच. यास्तव जितकी त्वरा होईल तितकी अशा समयी करावी. कारण की एक घटका उशीर झाला तर हजारो स्त्रियांस समुद्रात फेकून दिल्याचे पातक डोकीवर बसते. याकामी एकट्या-दुकट्याने खर्ची पडू नये, या सुधारणेला संमती देणार्‍या लोकांचा एक गट करावा म्हणजे ही गोष्ट सुलभ होईल.” (पत्र क्रमांक 16)

पुढे ते म्हणतात, “नवरा मरणे ही प्रारब्धाची गोष्ट आहे व तत्संबंधी जुलूम फक्त हिंदू लोकांच्या अज्ञानी व गरीब बायकांनी सोसला आहे. जेव्हा या स्त्रिया विद्वान होतील, तेव्हा या पंडितास चरणसंपुष्टांनी पूजा अर्पण करतील, यात संशय नाही. परंतु याच कारणास्तव ब्राह्मण लोक स्त्रियास शहाण्या करण्यास असे प्रतिकूल आहेत. जुलूम आणि शास्त्र जेथे चालू आहे, तेथे जरूरच आहे की, बायका जनावरांप्रमाणे नीच अवस्थेत राखले पाहिजेत. स्त्रिया सुशिक्षित होतील, तेव्हा आपला अधिकार स्थापतील. परंतु सांप्रत बायका अगदी जनावरे पडल्या, म्हणून संधी सापडली आहे.” (पत्र क्रमांक 105)

“अज्ञान व भोळसरपणामुळे सर्वत्र जुलूम चालतो, असा नियम आहे. त्याचप्रमाणे हे झाले आहे. जर आपल्या देशात दहा स्त्रिया विद्वान असत्या आणि त्या जर विधवा झाल्या असत्या, तर त्यांनी आपला पुनर्विवाह करण्याचे ठरविले असते आणि दुष्ट ब्राह्मणांचे तंत्रात त्या कधी राहिल्या नसत्या, यात संशय नाही.” (पत्र क्रमांक दहा)

विद्येवर नितांत श्रद्धा असल्यामुळे त्यांचे दुःख निवारण्यासाठी त्यांनी विद्या हा उपाय आग्रहाने आपल्या लोकांना सांगितला आहे.

ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा विवाह आणि स्त्रीशिक्षणाचे खंदे पुरस्कर्तेहोते. त्यांनी निदर्शने करून, मोर्चेबांधून त्यावेळच्या सरकारवर दबाव आणला आणि विधवा विवाह व्हावेत म्हणून कायदाही पास करून घेतला. मुलीसाठी शाळा काढून त्यांनी भारतातील स्त्रीशिक्षणाला हातभार लावला.

सत्यशोधक महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी लिखाण केले, व्याख्याने दिली आणि समतेसाठी जागृती केली. ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ असा ग्रंथ लिहिला. त्यात त्या म्हणतात, ‘स्त्रिया जर सती जातात तर पुरुष सता का जात नाही?’

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञाननिष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून, ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्रीसुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत, हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत, अशा विचारांचे ते होते. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी ‘सुधारक’मधून केला. जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, ग्रंथप्रामाण्य, धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. ‘मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे,’ अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते.

‘स्त्रियांना शिक्षण दिले तर घरकाम कोण करणार?’ असा खोचक प्रश्न जेव्हा त्याला करण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, “स्त्री-पुरुषांस एकत्र शिक्षण दिल्यामुळे कित्येक पुरुषास घरी बसून मुले खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे, दळणकांडण करण्याचे काम करावे लागले तर त्याला आम्ही काय करावे? यासाठी ही कामे त्यांनीच करावीत, हा काही ईश्वरी नियम नाही; तसेच मुले जी होतात, ती स्त्रियांना होतात म्हणून त्यांनी ती कामे केली पाहिजेत, असे कोणास सिद्ध करता येणार नाही. स्त्रियांच्या शिक्षणाला केवळ प्राथमिक शिक्षणापर्यंत ही मर्यादा घालून चालणार नाही; तर उच्च शिक्षणापर्यंत जावे लागणार आहे,” अशी आपली भूमिका आगरकरांनी स्पष्ट केली आहे.

अनेक कौटुंबिक संकटांची मालिका मागे असूनही लोकहिताचा ध्यास घेऊन महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी धडपडणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे पंडिता रमाबाई सरस्वती या होत. त्या अतिशय कुशाग्र बुद्धीच्या होत्या. त्यांचा जन्म 1858 चा. सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना वडिलांच्याकडूनच मिळाले. वडील अनंतशास्त्री डोंगरे यांनी, त्या काळात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना शिक्षण दिले, म्हणून सनातन्यांनी त्यांना धर्मबहिष्कृत केले. 1874 मध्ये भारतात महाभयानक दुष्काळ पडला. उपासमारीने पन्नास लाखांच्या वर भारतीयांनी दम तोडला. रमाबाईर्ंचे आई- वडील आणि मोठी बहीणही त्यांना सोडून गेली. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन बंधूसह कलकत्त्याला झाले. कलकत्त्याच्या विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर ‘पंडित’ आणि ‘सरस्वती’ या पदव्या मिळविल्या. त्यांनी त्या काळात आंतरजातीय रजिस्टर्ड विवाह केला. पण एका गोंडस मुलीला मागे ठेवून दोन वर्षांनी पती पटकीच्या साथीत मृत्यू पावले, पाठोपाठ भाऊही निवर्तला.

अशा अनंत संकटांशी सामना करत असताना त्यांनी पुणे येथे एक मे रोजी ‘आर्य महिला समाज’ची स्थापना केली. त्याच्या महाराष्ट्रात अजून पाच शाखा काढल्या आणि महिलांना स्वावलंबनाचे धडे मिळू लागले. या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. या काळात त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडला आणि त्यांनी तो धर्म स्वीकारला; परिणामी देशातल्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. अनेकांनी त्यांच्यावर कडवट टीका केली. 1904 मध्ये गुजरातमध्ये भयानक दुष्काळ पडला. हजारो महिलांना त्यांनी ‘मुक्ती सदन’ उभा करून धीर दिला, आश्रय दिला. त्यावर टीका करताना लो. टिळक म्हणतात, “हा पंचवीसशे महिलांचा तुरुंग आहे.” त्यांनी हंटर आयोगासमोर साक्ष देऊन आपली शिक्षणविषयक मते मांडली. 1889 मध्ये झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात त्या पहिल्या आणि एकमेव स्त्री प्रतिनिधी होत्या. त्यांनी परित्यक्ता, अपंग, निराधार महिला, विधवा, वृद्ध महिला, शोषण झालेल्या महिला, आजारी महिला आणि लहान मुलींच्या शिक्षणासाठी अशा विविध विभागात काम करण्यासाठी ‘प्रीती सदन’, ‘मुक्ती सदन’, ‘सायं घरकुल’, ‘सदानंद सदन’, ‘कृपा सदन’ इत्यादी ‘शारदा सदन’चे विभाग स्थापन केले. त्यांनी ‘बायबल’ मराठीत आणले आणि विविध ग्रंथ लिहून आपले विचार मांडले. कित्येक दुःखाचे डोंगर असूनही पंडिता रमाबाई यांनी आपले स्त्रियांच्या उन्नतीचे कार्य सुरू ठेवले.

“हिंदू संतमाळेत नमूद करता येण्यासारखी पहिली ख्रिश्चन व्यक्ती म्हणजे रमाबाई होत,” असे गौरवोद्गार सरोजिनी नायडू यांनी त्यांच्याबद्दल काढले आहेत.

सती प्रथेचे शास्त्रशुद्ध उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. “एक जातीचा गट घ्या. निसर्गतःच गटात जेवढे पुरुष तेवढ्या महिला असतात. गटाला वेगळे ठेवायचे तर गटातील स्त्री-पुरुषांनी आपसांतच विवाह केले पाहिजे. स्त्री-पुरुषांची संख्या निसर्गतः समान असल्याने हे शक्य आहे. पण अवेळी मृत्यूही होत असतात. समजा एक स्त्री मृत्यू पावली, तर गटातला एक पुरुष जास्त होणार. त्याला बाहेर विवाह करावा लागेल. हे टाळण्यासाठी पुरुष त्या वयोगटापेक्षा कमी वयाच्या मुलीशी विवाह करतो. या कारणामुळे ‘बाला-जरठ’ विवाहाची प्रथा सुरू झाली. समजा एका पुरुषाचा मृत्यू झाला, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या पेक्षा एकाने जास्त होणार. गटातील एक स्त्री या परिस्थितीत गटाबाहेर विवाह करण्याची शक्यता आहे. असे होऊ नये म्हणून एका स्त्रीला ठार मारण्याचा म्हणजे सती घालवण्याचा किंवा केशवपन करून घरी थांबवण्याचा उपाय केला जातो. अशा रीतीने कमी वयाच्या मुलीशी विवाह करणे, सती घालवणे किंवा केशवपन या प्रथा समाजाने सुरू केल्या. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे ज्यादा पुरुषाला ठार मारले जात नव्हते. ब्राह्मण व क्षत्रियांव्यतिरिक्त इतर जातीमध्ये वरील प्रथा नव्हत्या. विधवा पुनर्विवाह प्रचलित होता. पण वरिष्ठ वर्गाचे अनुकरण करून आपणही वरिष्ठ ठरू, अशा समजातून पुनर्विवाहाला कनिष्ठ दर्जाचे मानले जाऊ लागले, विधवेला अशुभ मानले जाऊ लागले. तिच्यावर अनेक बंधने लादली गेली. हिंदू धर्माने तिच्या जीवनाचा नरक बनवला, म्हणजे जातिभेद टिकवण्यासाठी विधवेवर अनेक बंधने घातलेली आहेत.”

ब्रिटिश राजवटीत सर्व जाती-धर्मांच्या स्त्री-पुरुषांना ज्ञान खुले झाले. स्वातंत्र्यानंतर साक्षरता बर्‍यापैकी वाढली. पण अजूनही जुन्या अनिष्ट प्रथा तशाच सुरू आहेत. त्यातील एक विधवांवरील बंधने. कोणीतरी पुढे होऊन हे दाखवून द्यावे लागते. ते दाखवले आहे, हेरवाडच्या नागरिकांनी. त्यांनी ग्रामसभेत विधवांच्या सन्मानाचा ठराव केला. देशात विधवांना दुय्यम स्थान दिले जाते, सन्मानापासून दूर ठेवले जाते, धार्मिक शुभकार्यात सहभागी होण्यास अलिखित निर्बंध घातले जातात. या प्रथा बंद व्हाव्यात व महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, असा ठराव हेरवाड ग्रामपंचायतीने बुधवार, दि. 4 मे रोजी ग्रामसभेत एकमताने मंजूर केला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, पायातील जोडवी काढणे, हातातील बांगड्या फोडणे, या कुप्रथांना हेरवाडमधून आता हद्दपार करण्यात आले आहे. हेरवाडचे सरपंच सूरगोंडा पाटील यांनी याचे श्रेय महात्मा फुले सामाजिक संस्था, बार्शी (जि. सोलापूर) येथील प्रमोद शिंगाडे यांना दिले आहे. त्यांनी चळवळ उभारली असून गावकर्‍यांना प्रेरणा दिली. हेरवाडच्या नागरिकांना शतशः धन्यवाद!

लेखक संपर्क : 97641 47483

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात महिलाविषयक कायदे केले. त्यामध्ये

1) आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास मान्यता देणारा कायदा

2) नोंदणी पद्धतीस मान्यता देणारा कायदा

3) स्त्रियांच्या छळवणुकीची प्रतिबंध करणारा कायदा

4) विविध जाती-धर्मियांसाठी कोल्हापूरचा काडीमोड कायदा

5) अनौरस संततीविषयक कायदा

6) जोगतिणीविषयी कायदा

7) विधवा पुनर्विवाह कायदा

यांचा समावेश होतो. कुर्मी क्षत्रियांमध्ये विधवा विवाह प्रचलित असलेला पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणतात, “आपली जात भ्रूणहत्या, व्यभिचार अशांपासून मुक्त राहील, याबद्दल मला विश्वास आहे.”

त्यांनी समाजामध्ये प्रचलित पडदा पद्धतीस विरोध केला. ते म्हणतात, “भारतवासीय लोक उन्नतीची तीन मुख्य साधने समजतात; ती ही – पहिले साधन पडदा. दुसरे विधवा विवाह निषेध व तिसरे कोणाशीही मिळून-मिसळून भोजन न करणे. काय आश्चर्य आहे! राजमाता जिजाबाई साहेब, कोल्हापूरच्या राज्य संस्थापक महाराणी ताराबाई साहेब, महाराणी अहिल्याबाई, महाराणी कमलाबाई आदीकरून क्षत्रिय स्त्रियांनी राज्याचा गाडाही हाकलेला आहे व रणांगणावर जाऊन शत्रूबरोबर लढायाही मारलेल्या आहेत. हे सर्व काम पडद्यात राहून केवळ अशक्य होते. सध्याही पडद्याची चाल सर्व देशात नाही. महाराष्ट्र, गुजरात, मद्रास वगैरे प्रांतात पडदा बिलकुल नाही. दुसर्‍या प्रांतांमध्येही काही थोड्या जातींमध्ये पडदा आहे. पडद्यामुळे स्त्रियांमधील शुरतादी गुणांचा सर्वथा नाश होतो.”

(कुर्मी परिषद अध्यक्ष कानपूर 1919 सालच्या भाषणातून).


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]