गोरे महाराजांची बाळूमामाच्या नावाने चालणारी बुवाबाजी ‘लातूर अंनिस’ने केली बंद

अनिल दरेकर - 9421374578

अंनिस’च्या रुक्साना मुल्ला व इम्रान सय्यद यांनी आपणास मूल होत नाही, यावर काहीतरी उपाय करा, असे सांगितल्यावर महाराजाने, ‘त्या दोघांचे अंगावरचे वापरायचे जुने कपडे व उपचारासाठी तीन ते साडेतीन हजार रुपये लागतील, ते तुम्ही घेऊन या. यावर मी तोडगा काढतो व पुढील दोन ते तीन महिन्यांत आपणाला मूल राहील,’ असे सांगितले.

बलभीम गणपती गोरे हा राहणार भोकरंबा (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील रहिवासी असून तो गावच्या तंटामुक्त समितीचा अध्यक्ष पण आहे असे कळले. तो बाळूमामाच्या नावाने येणार्‍या भक्तांना लिंबू व भंडारा (हळद) देऊन सर्वसामान्य माणसांचे (भक्तांचे) शोषण करीत असल्याचे ‘महा. अंनिस’ शाखा लातूरच्या कार्यकर्त्यांना कळाले. त्यानुसार लातूर ‘अंनिस’चे कार्यकर्ते रुक्साना मुल्ला, सुधीर भोसले, बाबा हलकुडे, रणजित आचार्य, हनुमंत मुंढे यांनी नकली गिर्‍हाईक म्हणून भोकरंबा येथील गोरे महाराजाच्या दरबारात जाऊन खातरजमा केली. गोरे महाराज यांनी त्यांच्या भोकरंबा येथील राहत्या घरातच बाळूमामाच्या नावाने दरबार थाटला असून त्या दरबारात येणार्‍या भक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी कौल लावणे व भक्तांना प्रसाद म्हणून लिंबू व भंडारा मंतरून देऊन तुम्ही हा भंडारा व लिंबू घ्या, तुमचे सर्व प्रश्न सुटतील, असे सांगायचा.

‘अंनिस’च्या रुक्साना मुल्ला यांनी ‘मला मूल होत नाही, लग्न होऊन खूप दिवस झाले. सगळीकडे दाखवले; परंतु कोणाचाच गुण येत नाही,’ असा प्रश्न महाराजांपुढे ठेवला. त्यावर महाराजांनी, ‘तुमच्या नवर्‍याला सोबत घेऊन या मला त्यांना तपासावे लागेल. पुढील वारीस येताना सोबत घेऊन या, मी खात्रीशीर इलाज करतो,’ असे सांगितले. तसेच ‘अंनिस’चे कार्यकर्ते बाबा हलकुडे यांनी त्यांना हृदयविकार असल्याचे सांगितले, त्यावेळी त्याने बाबा हलकुडे यांच्या छातीला हळद व लिंबू लावण्यासाठी दिला व तुमचा आजार बरा होईल, असे सांगितले. खरे म्हणजे गोरे महाराजाकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना अशा प्रकारच्या आजारावर उपचार करणे व लोकांची फसवणूक करणेच होय. आम्ही लातूर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी पुढील वारीला जाऊन या भोंदू गोरे महाराज याचा पर्दाफाश करण्याचे ठरवले व ठरल्याप्रमाणे ‘महा.अंनिस’चे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, महिला विभागाच्या राज्य सहकार्यवाह रुक्साना मुल्ला, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांनी रेणापूर स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्याशी चर्चा केली व आपण मदत करावी, अशी विनंती केली. दिवे यांनीही सामाजिकतेचे भान ठेवून सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. ठरल्याप्रमाणे रुक्साना मुल्ला व इम्रान सय्यद हे महाराजाकडे (पती/पत्नी) मूल होत नाही म्हणून गेले. त्यांच्या सोबत जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले व बुवाबाजीविरोधी संघर्ष विभागाचे जिल्हा कार्यवाह रणजित आचार्य हे होते, तर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर व लातूर शहर शाखेचे प्रधान सचिव हनुमंत मुंढे हे पोलिस निरीक्षक गोरख दिवे व त्यांचे काही कर्मचारी यांच्यासह भोकरब्याला गेले.

‘अंनिस’च्या रुक्साना मुल्ला व इम्रान सय्यद यांनी आपणास मूल होत नाही, यावर काहीतरी उपाय करा, असे सांगितल्यावर महाराजाने, ‘त्या दोघांचे अंगावरचे वापरायचे जुने कपडे व उपचारासाठी तीन ते साडेतीन हजार रुपये लागतील, ते तुम्ही घेऊन या. यावर मी तोडगा काढतो व पुढील दोन ते तीन महिन्यांत आपणाला मूल राहील,’ असे सांगितले. (याठिकाणी एक बाब वैशिष्ट्यपूर्ण सांगितली पाहिजे की, कोणाकडूनही पैसे घेत नाही. तुम्ही बाळूमामाच्या फोटोपुढे ठेवा, असे सांगून तो आलेल्या भक्तांकडून पैसे घेत असे, येथे खूप मोठे आर्थिक गणित दिसून आले.) आम्ही दरबारात गेलो, तेव्हा अनेक भक्त तेथे आढळून आले. आम्ही महाराजांना अनेक प्रश्न विचारले, तेव्हा महाराजांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; तसेच मला यातले काहीच कळत नाही व असे काहीही मंत्रशक्तीने किंवा कशाने काहीच होत नसते, असे तो सर्वांसमक्ष म्हणाला, ‘तुम्ही सांगेल तसं मी करेन यापुढे मी हा दरबार बंद करतो कोणाचीही फसवणूक करणार नाही,’ असे 100 रुपयांच्या बाँड पेपरवर त्याने पोलिस स्टेशनमध्ये येऊन आम्हाला लिहून दिले व अशा प्रकारे लातूरच्या ‘अंनिस’ शाखेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा भांडाफोड केला.

याकामी रेणापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे, कर्मचारी हवालदार गौतम कांबळे, पोलिस नाईक नरसिंग जाधव, कॉन्स्टेबल कृष्णा शेळके, महिला पोलिस असमा पठाण, सरस्वती कोतमे आदींचे सहकार्य मिळाले.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]