संजीव चांदोरकर -
सढळहस्ते फक्त कर्ज देऊन कोणालाही उद्योजक बनवता येत नाही; त्यासाठी पूरक आर्थिक धोरणांची फ्रेम हवी. आपल्या देशातील हाताला काम मागणार्यांच्या तुलनेत देशात होणारी रोजगारनिर्मिती तुटपुंजी आहे. त्याच्या आकडेवारीत आत्ता नको जायला. पण सामान्य नागरिकांचा असा ब्रेनवॉश केला गेला आहे की रोजगार मागणे म्हणजे बांडगुळी मानसिकता. ती मानसिकता आळशीपणा, नवीन काही शिकण्याची, जोखीम घेण्याची तयारी नसण्यातून येत असते. ज्याची कष्ट घेण्याची, शिकण्याची, जोखीम घेण्याची तयारी आहे तो केव्हाही स्वतः उद्योजक बनू शकतो. रोजगार मागणारा नाही तर इतरांना रोजगार पुरवणारा होऊ शकतो.
सर्वांना संघटित क्षेत्रातील, सार्वजनिक वा खाजगी मालकीच्या उपक्रमात चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळू शकणार नाहीत, हे मान्य. देशातील कोणत्याही प्रौढ स्त्री- पुरुषांनी स्थानिक पातळीवरील वस्तुमालाचे उत्पादन, सेवा क्षेत्रात स्वयंरोजगार करण्यात काही गैर नाही. स्त्रियांनी स्वयंसहाय्यता गट स्थापन करून सामुदायिकपणे एखादा धंदा, व्यवसाय करण्यात देखील काही गैर नाही. पण शासन पुरस्कृत मायक्रो फायनान्स क्षेत्र असा भ्रम पसरवत आहे की आम्ही तुमच्यासाठी कर्जाची सोय केली आहे. ते कर्ज घेऊन तुम्ही देखील छोटे मोठे उद्योजक बनू शकता. ही आत्यंतिक फसवी मांडणी आहे. का ते बघू या.
उद्योजकता (इन्त्रप्रुनरशिप) प्रत्येकाच्या अंगात असेलच असे नाही. हे रसायनच वेगळे असते. फक्त कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे उठसूट कोणीही उद्योजक बनू शकत नाही हे आकळण्यासाठी ‘वित्त साक्षरता’ महत्त्वाची आहे. स्वयंरोजगाराच्या अति उदात्तीकरणामुळे लाखो कुटुंबाचा कर्जबाजारीपणा वाढला आहे, म्हणून या विषयाची चिरफाड करण्याची गरज आहे.
उद्योजक होणे म्हणजे काही व्यायामशाळेत जाऊन, भरपूर व्यायाम करून शरीर कमावणे नाही. उद्योजकतेचे कोणतेही बाळकडू मिळालेले नसताना देखील किमान काही प्रौढ स्त्री-पुरुष आपल्या कुटुंबापुरते नियमित उत्पन्न देणारा एखादा छोटा धंदा-व्यवसाय नकीच करू शकतात. मात्र त्यासाठी स्वयंरोजगारांसाठी पूरक आर्थिक धोरणांची फ्रेम लागते. दुर्दैवाने आपल्या देशात सुरू केलेले स्वयंरोजगार टिकतील, त्या स्वयंरोजगारींना किमान आणि शाश्वत मासिक मिळकत होईल यासाठी आवश्यक ती आर्थिक धोरणे अस्तित्वातच नाहीत.
एक काळ असा होता की फारसे भांडवल, तंत्रज्ञान, कौशल्ये न लागणार्या, स्थानिक पातळीवर उत्पादन आणि खप होऊ शकणार्या किमान १००० वस्तुमाल, सेवा फक्त लघुउद्योग क्षेत्रासाठी आरक्षित होती. त्या वस्तुमाल, सेवा कॉर्पोरेट क्षेत्राला उत्पादन करण्यास मज्जाव होता. लघुउद्योगांना मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्राकडून होऊ शकणार्या स्पर्धेपासून दिले गेलेले हे संरक्षण, नवउदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानानुसार नंतर काढून घेण्यात आले. एका बाजूला, नोकर्या मिळत नसतील तर सूक्ष्म कर्जे घेऊन तुम्ही आपापले धंदे, व्यवसाय सुरू करा असे सांगायचे आणि दुसर्या बाजूला या सूक्ष्म, लघू उद्योगांना मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर स्पर्धा करायला लावायचे. लाखो सूक्ष्म, लघू धंदे, व्यवसाय या विषम स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे हरत आहेत. त्यातून लाखो सूक्ष्म, लघु उद्योजकांना वित्तीय, मानसिक ताणातून जावे लागत आहे.
स्वयंरोजगार करणार्या गरिबांना उद्योजक / इंत्रप्युनर संबोधून, सिस्टीम त्यांना एक मेसेज देऊ पहात आहे…
कोट्यवधी गरीब रोजगार मिळत नाहीत म्हणून किंवा रोजंदारीवर तुटपुंजे वेतन मिळते म्हणून सूक्ष्म, छोटे धंदे व्यवसाय सुरू करतात. नाइलाज म्हणून, हौस म्हणून नकीच नाही. हा खरेतर त्यांच्या कसेबसे जिवंत राहण्याचा संघर्ष असतो. याला इंग्रजीमध्ये लाईव्हलीहूड अॅक्टिव्हिटीज म्हणतात. नदीच्या पुरात पोहायला न येणार्या एखाद्याने नाकातोंडात पाणी जाऊ नये, आपण बुडू नये म्हणून एखाद्या लाकडी फळकुटाचा जसा आधार घ्यावा तसे या कोट्यवधी लोकांचे सूक्ष्म धंदे व्यवसाय असतात. असे नाइलाजाने सूक्ष्म धंदा, व्यवसाय करणार्यांचे मुख्य प्रवाहातील वित्त क्षेत्राने नामकरण केले सूक्ष्म उद्योजक किंवा मायक्रो इन्त्रप्रुनर. म्हणजे लाखो कोटी रुपयांचे साम्राज्य उभारणारा अंबानी देखील इन्त्रप्रुनर आणि नाक्यावर एक टोपली घेऊन केळी विकणारी म्हातारी देखील इन्त्रप्रुनर! प्रश्न संज्ञांचा नाही. त्यातून मुख्य प्रवाहाची असंवेदनाशीलता दिसतेच, पण त्यातून एक राजकीय मेसेज देखील दिला जात असतो.
इतर कोणत्याही उद्योजकासारखे तुम्हीदेखील तुमचा, कितीही सूक्ष्म का असेना, स्वतःचा उद्योग उभा करण्याचा निर्णय स्वतःहून घेतला आहे हे प्रस्थापित व्यवस्थेला गरिबांना सांगायचे असते. स्वतःचा धंदा, व्यवसाय स्वतःहून उभे करणार्या कोणत्याही उद्योजकाच्या उद्योजकतेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यात अनुस्यूत असणारी जोखीम स्वतः उचलणे. कोणत्याही इतर एजन्सीला, विशेषतः शासनाला, मदतीसाठी साकडे न घालणे. येईल तो तोटा पत्करणे.
कोट्यवधी सूक्ष्म स्वयंरोजगारांना मायक्रो इन्त्रप्युनर असे संबोधून सिस्टीमला त्यांना तोच मेसेज द्यायचा असतो. धंदा, व्यवसाय करायचा निर्णय तुमचा असेल तर त्यात अनुस्यूत असलेली जोखीम पण तुम्हालाच घ्यावी लागेल. धंदा बुडाला तरी झालेले नुकसान सहन करावे लागेल. आपल्या अपयशाला आपणच जबाबदार आहोत हे स्वीकारावे लागेल. त्यामुळे सूक्ष्म धंदा, व्यवसाय करणार्या गरिबांची आपले नशीबच फुटके किंवा आपल्यातच काहीतरी कमी आहे अशी तुमच्या मनाची तयारी केली जाते आहे. छोटे उद्योग-व्यवसाय किफायतशीर करण्याच्या कोणत्याही जबाबदारीतून शासनाची आपसूक मुक्तता देखील होते.
समाजातील सामाजिक, आर्थिक वंचित घटकातून येऊन यशस्वी उद्योजक देखील असतात. तळागाळातून येऊन स्वतःच्या हिमतीवर धंदा यशस्वी करणार्यांचे सत्कार समारंभ तर करायलाच हवेत. पण त्यांचे शेकडा प्रमाण अत्यल्प असते. चला, चर्चेसाठी १ टका धरू या. पण सिस्टीम अशा अपवादात्मक एक टका व्यक्तींच्या यशोगाथा सतत निरनिराळ्या व्यासपीठांवर आणि मीडियातून इतर ९९ टक्क्यांच्या मनावर बिंबवत राहते. सूक्ष्म-कर्ज घेऊन आपला छोटा-मोठा धंदा, व्यवसाय उभारून, आपल्या कुटुंबाला मध्यमवर्गीय राहणीमान देणार्या स्त्री उद्योजकांच्या यशोगाथा देखील याच प्रकारात मोडतात. अशा प्रत्येक यशस्वी उद्योजकामागे ९९ उद्योजक अयशस्वी झाले आहेत, त्यातील काही तर जीवनातून कायमचे उठले आहेत, ही आकडेवारी मात्र सोयीस्करपणे सांगितली जात नाही.
पण यशोगाथांचे नको तेवढे उदात्तीकरण करताना सिस्टिमला इतर ९९ टक्यांना हेच सांगायचे असते की, बघा तो/ती देखील फक्त काही वर्षांपूर्वी पर्यंत तुमच्यासारखाच होता/ होती. त्याला / तिला जमले तर तुम्हाला का जमत नाही, याचा विचार करा. साहजिकच त्या ९९ टयांना वाटू लागते की, आपल्यातच काही न्यून आहे.
ही न्यूनगंडाची भावना प्रयत्नपूर्वक घालवण्याची गरज आहे. सिस्टीमकडे शासनाकडे आपल्या हकाच्या, चांगल्या रोजगाराच्या वाजवी मागण्या करण्याच्या राजकीय इच्छाशक्तीचे त्यामुळे खच्चीकरण होते. अपवादात्मक यशोगाथांच्या जाहिरातीचा हेतू देखील तोच असतो. आम्ही सर्वस्व पणाला लावून देखील आमचा स्वयंरोजगार आतबट्ट्याचा ठरत आहे, आम्ही पूर्वी होतो त्याच्या तुलनेत अजून गाळात रुतत आहोत, आम्हाला चांगले रोजगार द्या, या मागणीला या अंतर्दृष्टीतून पाठबळ मिळू शकते.