कोरोना निर्जंतुकीकरण : रसायनाचे उपयोग आणि धोके

अनिल सावंत - 9869791286

निर्जंतुकीकरणाची फवारणी ही वस्तूंच्या पृष्ठभागावर करायची असते, सजीवांवर नव्हे; तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, त्वचेवर फवारणी करून शरीराच्या आत प्रवेश केलेला विषाणू निष्क्रिय होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या केंद्रीय आरोग्य खात्याने आता मार्गदर्शक सूचनांद्वारे (अ‍ॅडव्हायझरी) सॅनिटेशन डोमवर व टनेलवर बंदी घोषित केलेली आहे. अशा फवारणीनंतर आपण निर्जंतुक झाल्याचे समजून सुरक्षित असल्याच्या भ्रामक भावनेपोटी लोक नियमित हात साबणाने धुणे व सार्वजनिक ठिकाणी शारीरिक दूरी दोन मीटर ठेवणे या आवश्यक बाबींचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतील, अशी शंका व्यक्त केली आहे.

कोविड-19 आलाय मुक्कामाला, आता बोला….

चीनच्या वुहान शहरात 31 डिसेंबर 2019 रोजी नॉवेल कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने 5 जानेवारी 2020 ला मानवी समाजात नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याचे जाहीर केले आणि 30 जानेवारी 2020 ला घोषणा केली, की या नव्या रोगाचा प्रसार इतर देशात होण्याची शक्यता असून ही एक सार्वजनिक आरोग्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय आणीबाणीची स्थिती आहे. तसेच 11 फेब्रुवारी रोजी नॉवेल म्हणजे नवीन (कोरोना गटात पूर्वी न आढळलेल्या) या विषाणूमुळे होणार्‍या नव्या आजाराला कोविड-19 (कोरोना व्हायरस डिसीज 19) हे नाव दिले गेले.

‘वर्ल्डोमीटर’ या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार एव्हाना एकूण 216 देशांत कोरोनाची लागण झालेली आहे. जागतिक पातळीवर बाधित माणसांची संख्या 47 लाखांहून अधिक आहे, तर तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एक लाखांहून अधिक बाधित असून तीन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आता पस्तीस हजारांपेक्षा जास्त बाधित आहेत, तर मरण पावलेल्यांची संख्या बाराशेहून जास्त झाली आहे.

अशा स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेच्या 13 मे रोजीच्या पत्रकार परिषदेत त्यांचे प्रवक्ते मायकल रायन यांनी सर्व जगाला सावधानतेचा एक संदेश दिला. त्यांनी सांगितले, की आता यापुढे कोरोना सोबत जगायला शिकावे लागेल. कारण कोविड-19 हा विषाणू मुक्कामालाच आलाय, तो इतर विषाणूंप्रमाणे कायमचाच या आपल्या जीवसृष्टीचा भाग होऊन राहू शकतो. म्हणूनच या पृथ्वीतलावर माणसात संक्रमित झालेल्या कोविड-19 चे स्वागत करून, नव्या पाहुण्यासोबत कसे वागायचे, हे ठरवायची वेळ आली आहे. कोविड-19 वरील लससाठी संशोधन सुरू आहे. पण लोकांसाठी अशी लस उपलब्ध व्हायला अजून एक वर्षाहून अधिक काळ लागेल. तोपर्यंत हा आजार टाळण्यासाठी कोरोना विषाणूचा संपर्क टाळणे, हा एकमेव सर्वोत्तम मार्ग आपल्या हाती आहे. हा विषाणूबाधित माणसाकडून दुसर्‍या माणसात व दूषित पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे कसा संक्रमित होतोे, याची सविस्तर माहिती विविध माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे इथे तो तपशील देण्याची आवश्यकता नाही.

WHO ची मार्गदर्शक सूत्रे

जागतिक आरोग्य संघटनेने 12 फेब्रुवारी 2020 रोजी या महामारीचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने आरोग्य यंत्रणा कशी उभारावी, हे सांगणारी मार्गदर्शक सूत्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यात सांगितलेले आठ आधारस्तंभ असे आहेत. 1. देशाच्या पातळीवर सुसूत्रता, आखणी व देखरेख करणे 2. लोकांना जोखमीची माहिती देणे व सहभागी करणे 3. प्रसारावर पाळत ठेवणे, शीघ्र प्रतिसाद कृती करणारे गट बनवणे आणि तपास करणे 4. प्रवेशाची (शिरकावाची) ठिकाणे नियंत्रित करणे 5. कोविड-19 नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळा अद्ययावत करणे 6. संसर्ग प्रतिबंध करणे आणि नियंत्रण करणे 7. संसर्ग झालेल्यांचे उपचारांसाठीचे नियोजन करणे 8. या गोष्टी कार्यान्वित करण्यासाठी संसाधने उपलब्ध करणे

यातील सर्व गोष्टी शासनाने करावयाच्या आहेत, हे खरे. पण जागरूक व जबाबदार नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आपण समजावून घेणे आवश्यक आहे. मार्गदर्शक सूत्रांनुसार शासन योग्य प्रकारे पावले उचलत आहे ना, यावर लक्ष ठेवले पाहिजे. शासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे व सहकार्य केले पाहिजे. तसेच काही त्रुटी असल्यास किंवा चुकीचे घडत असल्यास त्वरित निदर्शनास आणून दिले पाहिजे व सुधारणा करण्याचा आग्रह धरला पाहिजे. नागरिक म्हणून आपला सहभाग मुख्यतः सूत्र क्रमांक सहा – संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वांनी थेट संपर्क टाळून, शारीरिक दूरी ठेवून सामाजिक व्यवहार केले पाहिजेत, असे अपेक्षित आहे. तसेच व्यक्तिगत पातळीवर व सामाजिक पातळीवर निर्जंतुकीकरणाचा अवलंब केला पाहिजे. साबणाने हात धुणे कदाचित सवयीचे झाले असेल. मात्र रस्ते, इमारतीचा परिसर निर्जंतुक करता-करता, काही ठिकाणी सॅनिटेशन डोम, बूथ, टनेल बांधून माणसांवर रसायनाची फवारणी केली गेली, त्यासंदर्भातील धोके समजून घेण्याची गरज आहे.

रसायनाचे उपयोग व धोके

रसायने उपयुक्त आहेत, तशीच ती धोकादायक सुद्धा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. फवारणीसाठी मुख्यतः सोडियम हायपोक्लोराईट या घातक रासायनाचा वापर करण्यात आल्याचे दिसते. सोडियम हायपोक्लोराईटचा वापर किंवा हाताळणी करताना योग्य ती खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे, नाही तर एकीकडे कोरोनाला रोखला म्हणताना दुसरीकडे त्वचा, डोळे चुरचुरणे, पोटात मळमळणे, नाक- घसा- श्वसनमार्ग चुरचुरणे असे आजार उद्भवू शकतात. माणसांवर फवारणी करणे शारीरिक व मानसिकदृष्ट्या घातकच आहे.

आपण जेवणात वापरतो ते मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड हे सोडियम व क्लोरिनचे अणू मिळून बनते. तसेच सोडियम हायपोक्लोराईट हे सोडियम, ऑक्सिजन व क्लोरिन या तीन अणूंनी बनलेले असते. सोडियम हायपोक्लोराईट द्रावण रूपातही अस्थिर असते. त्याचे विघटन होऊन क्लोरिन मुक्त होतो. हाच त्याचा परिणामकारक घटक आहे. 10 लाख लिटर पाणी द्रावणात 500 लिटर सोडियम हायपोक्लोराईट असेल ज्याला 500 पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन म्हणतात असे (0.05 टक्के) द्रावण लोखंडासारख्या धातूवरही तीव्र परिणाम करू शकते. तसेच अशा द्रावणातून तयार होणार्‍या क्लोरीनचा पर्यावरणातील इतर ऑरगॅनिक रसायनांशी संपर्क आल्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन तयार होणार्‍या नवीन रसायनांमुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता असते. अशी रसायने अन्नसाखळीत शिरून माणसाच्या शरीरात आली तर धोका संभवतो.

पहिल्या महायुद्धाच्या काळात,1915 साली ब्रिटिश केमिस्ट हेंरी डाकिन यांनी प्रथमच सोडियम हायपोक्लोराईट या रसायनाची अँटिसेप्टिक द्रव म्हणून वापरण्यासाठी शिफारस केली. त्यावेळी 0.5 टक्के सोडियम हायपोक्लोराईट असलेले पाण्यातील द्रावण सैनिकांच्या जखमा निर्जंतुक करण्यासाठी वापरण्यात आले. 1920 मध्ये डॉक्टर क्रेन यांनी दातांच्या रूट कनाल ट्रिटमेंटमध्ये सोडियम हायपोक्लोराईट रासायनाचा उपयोग केला. त्यानंतर आता या कामासाठी याचा सर्रास वापर केला जातो. 0.5 टक्के ते 5.25 टक्के सोडियम हायपोक्लोराईट पाण्याच्या द्रावणात वापरले जाते. 18 व्या शतकापासून साफसफाईसाठी घरगुती वापरात असलेल्या ब्लीचिंग द्रावणात सोडियम हायपोक्लोराईटचे प्रमाण 2 ते 10 टक्के इतके असते. जे पाणी घालून सौम्य करून वापरावे लागते. हात धुण्यासाठीच्या द्रावणात सोडियम हायपोक्लोराईटचे प्रमाण 0.05 टक्के इतके असते. सोडियम हायपोक्लोराईटची इतकी कमी मात्रा असूनही त्यापासून डोळ्यांना इजा होऊ शकते. उदाहरणार्थ रूट कॅनॉलच्या ट्रिटमेंटमध्ये डेंटिस्टच्या कामात चूक झाल्यास पेशंटचा गाल सुजणे, तीव्र वेदना होणे अशा घटनाही घडत असतात.

निर्जंतुकीकरण कसे करायचे?

नॉवेल कोरोना जीवाणू नसून विषाणू आहे. विशिष्ट रसायनाच्या संपर्कात आल्यावर या विषाणूचे बाहेरचे फॅटचे आवरण विघटन होऊन तुटते, आतील ‘आरएनए’ निखळून पडतो आणि हा विषाणू निष्क्रिय बनतो. आज अनेक रसायने निर्जंतुकीकरणासाठी वापरली जातात. डिटर्जंटच्या 2 टक्के द्रावणात कोरोना विषाणू निष्क्रिय व्हायला 15 मिनिटे लागतात. 1 टक्के ब्लीच म्हणजे सोडियम हायपोक्लोराईट द्रावणात 5 मिनिटे लागतात. तीव्र हायड्रोजन पॅरॉक्साईडमध्ये 5 मिनिटे लागतात. पोटॅशियम पॅरॉक्सीमोनोसल्फेटच्या 1 टक्के द्रावणात 10 मिनिटे लागतात. 60 टक्केपेक्षा अधिक प्रमाणातील अल्कोहलमध्ये 5 मिनिटे लागतात. क्लोरहेक्झिडीनमध्ये 5 मिनिटे लागतात. 70 टक्के प्रमाणातील आयसोप्रोपील अल्कोहलमध्ये 1 ते 3 मिनिटे लागतात. त्याचप्रमाणे क्वाटर्नरी अमोनियम संयुगेही निर्जंतुकीकरणासाठी वापरली जातात. आयसोप्रोपील अल्कोहल हे मोबाईल किंवा कॉम्प्युटरसाठी वापरू शकतो.

व्यक्तिगत वापरासाठी आता तर पायाने ऑपरेट करण्याचे सॅनिटायजर डिस्पेंसर आलेले आहेत. कारखान्यात याचा वापर सुरू झाला आहे. तसेच केंद्रीय समितीने सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुक करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली बनवली आहे. त्यात निर्जंतुकीकरणाच्या अंमलबजावणीच्या सोयीसाठी जागांची तीन गटात विभागणी केली आहे. इमारती अंतर्गत भाग, बाहेरील मोकळ्या जागा आणि सार्वजनिक संडास, साफसफाई व निर्जंतुकीकरण हे मुख्यत: सतत मानवी संपर्कात येणार्‍या किंवा दूषित होण्याची आशंका असलेल्या पृष्ठभागावर केंद्रित व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ लिफ्टचे दरवाजे, लिफ्टची बटणे, जिन्याचे रेलिंग, कामकाजाचे टेबल, टेलिफोन, मोबाईल इत्यादी.

लॉकडाऊनच्या अटी काही बाबतीत शिथील करून अर्थव्यवस्थेच्या गाड्याला चालना देण्यासाठी ठराविक सेवाक्षेत्रे व उत्पादन कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने आता सशर्त परवानगी दिलेली आहे. अशा आस्थापनांमध्ये बाहेरून येणार्‍या वस्तू, कच्च्या मालाचे ड्रम, बॅगा, यंत्रे इत्यादी निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटेशन टनेलमध्ये ठेवायचे, मात्र ठेवणार्‍या व्यक्तीने आत थांबायचे नाही, बाहेर राहून वस्तूंवर फवारणी करायची. फवारणी झाल्यावर कोरोनाच्या निष्क्रियीकरणासाठी 15 मिनिटे वेळ द्यायचा, त्यानंतर त्या वस्तू वापरासाठी घ्यायच्या. अशा तर्‍हेची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक व्यक्तिगत सुरक्षा साधने वापरून सुरक्षित हाताळणी करण्याची नियमावली बनवून अमलात आणता येईल. म्हणजे आता बनवलेले ‘सॅनिटेशन टनेल’ अशा कामासाठी नक्कीच वापरात आणता येतील.

निर्जंतुकीकरणाची फवारणी ही वस्तूंच्या पृष्ठभागावर करायची असते, सजीवांवर नव्हे; तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, त्वचेवर फवारणी करून शरीराच्या आत प्रवेश केलेला विषाणू निष्क्रिय होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या केंद्रीय आरोग्य खात्याने आता मार्गदर्शक सूचनांद्वारे (अ‍ॅडव्हायझरी) सॅनिटेशन डोमवर व टनेलवर बंदी घोषित केलेली आहे. अशा फवारणीनंतर आपण निर्जंतुक झाल्याचे समजून सुरक्षित असल्याच्या भ्रामक भावनेपोटी लोक नियमित हात साबणाने धुणे व सार्वजनिक ठिकाणी शारीरिक दूरी दोन मीटर ठेवणे या आवश्यक बाबींचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतील, अशी शंका व्यक्त केली आहे.

आपण कसे वागायचे?

निर्जंतुकीकरणासंदर्भात अविवेकी व विवेकी असे दोन्ही प्रकारे वागणारे लोक दिसत आहेत. दोन प्रातिनिधिक घटना पाहूया.

एकीकडे, 14 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील मोतीपुरा गावात घडलेली घटना विदारक आहे. तिथे कँुवर पाल नावाचा एक युवक निर्जंतुकीकरणसाठी फवारणी करत असताना फवारणीचे रसायन चुकून इंद्रपाल नावाच्या एका तरुणाच्या पायावर पडले. त्याचा राग येऊन इंद्रपाल व त्याच्या साथीदारानी फवारणीचा पाईपच कुँवर पालच्या तोंडात खुपसला आणि फवारणीचे रसायन प्यायला त्याला भाग पाडले. कुँवर पालला ताबडतोब उपचारासाठी नेले; पण मोरादाबाद येथील हॉस्पिटल मध्ये 17 एप्रिल रोजी कुँवर पाल मरण पावला.

तर दुसरीकडे, मुंबईत धारावी हे कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ झाले आहे. म्हणूनच केंद्रातून एक समिती पाहणी करण्यासाठी आली. या समितीने कोरोनाचा संसर्ग होण्यास मुख्यतः कारणीभूत होऊ शकणार्‍या वस्तीतील सार्वजनिक संडाससारख्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाच्या आवश्यकतेवर भर दिला. यावर मुंबईतल्याच दुसर्‍या एका वस्तीतील उत्साही लोकांनी पुढाकार घेऊन संडाससाठी फवारणी करणारी यंत्रणा डिझाईन करून बसवली व कार्यान्वित सुद्धा केली. एक टाकीतून फवारणी रसायन पाईपद्वारे संडासमध्ये सोडण्यात येते. बाहेरून एक व्यक्ती फवारणी चालू करणे किंवा बंद करणे हे काम करते. अशा तर्‍हेने एक सकारात्मक विचार दिसतो.

आपण विवेकी माणूस आता आपल्याला नवे वळण लावले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालूनच जावे. इतर व्यक्तींचा थेट स्पर्श टाळावा, किमान सहा फूट अंतर ठेवावे. दोन वर्षांखालील बाळांना मास्क लावू नयेत. मास्क लावला तरीही शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. घोळका करू नये. गर्दीपासून दूर राहावे. बाहेरून घरी आल्यावर, तसेच नाक शिंकरल्यावर, खोकल्यावर हात साबणाने किमान वीस सेकंद धुवावेत. साबण व पाणी उपलब्ध नसेल तर किमान 60 टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायजरचा वापर करावा. अस्वच्छ हातांनी डोळे, नाक, तोंड यांना स्पर्श करू नये. असे बदल केले, तर कोरोनापासून आपला बचाव खात्रीने करू शकतो. असे ना का कोरोना मुक्कामाला.

लेखक रसायन उद्योग सुरक्षा व पर्यावरण तज्ज्ञ आहेत