त्र्यंबकेश्वर : नाव देवाचे; पण गाव कुणाचे?

व्ही. टी. जाधव -

त्र्यंबकेश्वर देवस्थानातील शिवपिंडीवर बर्फ जमा झाल्याचा ‘चमत्कार’ घडल्याचा दावा रीतसर भांडाफोड होऊन हा चमत्कार बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या या घटनेची तपशीलवार माहिती अं. नि. वार्तापत्राच्या वाचकांना करून देत आहोत.

लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल ना? परंतु हा लेख वाचून झाल्यावर हे मात्र खरं आहे, याची तुम्हाला नक्कीच खात्री वाटेल. त्यासाठी नुकत्याच प्रसार माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आधार घेऊन अधिक तपशील पुढीलप्रमाणे –

त्र्यंबकेश्वर शिवलिंगावर बर्फविषयक चित्रफीत बनावट

सात महिन्यांनंतर तीन जणांविरुद्ध गुन्हा

(दै. लोकसत्ता, नाशिक)

नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानात गर्भगृहातील शिवलिंगावर ३० जून २०२२ रोजी अमरनाथप्रमाणे बर्फाचे लिंग तयार झाल्याची चित्रफीत समाजमाध्यमांत पसरली होती. हा संपूर्ण प्रकार बनावट असून सात महिन्यांनी तीन संशयितांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात मागील वर्षी, ३० जूनच्या पहाटे गर्भगृहातील शिवपिंडीवर अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याची चित्रफीत (व्हिडीओ) समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती. देवस्थान प्रशासनाने हवामान खात्याचा निर्वाळा घेऊन सत्य परिस्थिती पडताळून पाहिली. या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या पाहणीत मंदिरातील सर्व सीसीटीव्हींच्या चित्रणांची तपासणी करण्यात आली असता प्रकार बनावट असल्याचे निदर्शनास आले.

समितीकडून अहवाल मिळाल्यानंतर देवस्थानच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात मंदिरात दिवाबत्ती करणारे सुशांत तुंगार यांनी स्वत: पिशवीत बर्फ नेऊन ते पिंडीवर ठेवल्याचे, त्यावर बेलपत्र ठेवून त्याची चित्रफीत काढल्याचे उघड झाले आहे. देवस्थानाविषयी खोटा प्रचार केल्याने सुशांत तुंगार (पुजारी) व त्यास मदत करणारे आकाश तुंगार, उल्हास तुंगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलैमध्ये हा प्रकार निदर्शनास आल्यावर देवस्थान प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यास सात महिने उशीर का केला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

यावर त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुशांत तुंगार, आकाश तुंगार व उल्हास तुंगार यांच्यावर भा.दं.वि. कलम ५०५(३), ४१७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करून जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलमानुसार संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पुरोहित संघाचा आक्षेप :

त्र्यंबकेश्वर देवस्थानने मंदिरातील बर्फ प्रकरणात तीन पुजार्‍यांवर गुन्हा दाखल केला असून त्याच्याशी त्र्यंबकेश्वरातील क्षेत्रस्थ पौरोहित्य करणार्‍या ब्राह्मणांचा कोणताही संबंध नाही. त्र्यंबकेश्वरी पुजारी आणि पुरोहित दोन वेगवेगळे घटक आहेत, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे आणि देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी नमूद केले आहे.

चमत्कार घडल्याचा दावा करण्यामागील सुप्त हेतू :

चमत्कार घडत नसतात. चमत्कार घडल्याचा दावा करण्यामागे देवस्थानचे महत्त्व वाढवून भक्तांचे मानसिक, आर्थिक शोषण व फसवणूक करणे हाच सुप्त हेतू असतो. त्यामागे षड्यंत्र असण्याची शक्यता असतेच; परंतु प्रकरण अंगाशी येणार असे वाटले की, देवस्थान प्रशासन ‘विश्वामित्री पवित्रा’ घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असते. यापूर्वीही अनेक देवस्थानांमध्ये अशी प्रकरणे घडल्याची उदाहरणे सापडतात. १७ वर्षांपूर्वी, जुलै २००६ मध्ये असाच प्रकार बर्फानी बाबा, अमरनाथ गुहेतील शिवलिंगाच्या बाबतीत घडून आणला होता. लाखो भाविकांची फसवणूक झाली. त्या प्रकरणाचे पुढे काय झाले, माहीत नाही. आज इथे, उद्या दुसरीकडे श्रद्धेच्या गोंडस नावाखाली चमत्कारांची प्रकरणे व त्यातून भोळसट भाविकांच्या फसवणुकीची मालिका सुरूच असते. लोकांची स्मरणशक्ती अतिशय कमकुवत असते, हे गृहीत धरूनच पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने भाविकांचे मानसिक, आर्थिक शोषण करणे सुरूच असते.

बुवा-बापू-महाराजांच्या जोडीला देवाधर्माच्या नावावर श्रद्धेचा हा काळाबाजार सुरू असतो. कधी मूर्ती दूध पिते, कधी मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू (पाणी) येतात, तर कधी शिवपिंडीवर बर्फ साचतो, कधी देवाची पावले आपोआप उमटतात असे एक ना अनेक चमत्कार पसरविले जातात. चमत्कारावर विश्वास ठेवणार्‍या लोकांचे कोणतेही प्रश्न तथाकथित चमत्कारांनी सुटत नाहीतच; उलट भाविकांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक शोषण होते, हे श्रद्धाळूंच्या ध्यानी येत नाही, हेच खरे!

आपली श्रद्धा स्वत:बरोबरच इतरांच्या फसवणुकीला कारणीभूत तर ठरत नाही ना? एवढा विवेकी विचार केला तरी बुवा-बापू-महाराज, तसेच अप्रत्यक्षरीत्या देवस्थानांकडून (पुजारी-पुरोहितांमार्फत) होणार्‍या आर्थिक, मानसिक फसवणुकीला आळा बसू शकेल, नाही का? लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन यापूर्वी देवस्थानाच्या परिसरात भाविकांची ‘पळवापळवी’ करण्याच्या प्रकाराने तेथील पुजारी, पुरोहित यांची भांडणे, मारामार्‍या किती विकोपाला गेल्या आहेत, याची उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे देवस्थानची बदनामी फक्त महाराष्ट्रात, भारतातच नव्हे, तर भारताबाहेरील दूरवर असलेल्या भाविकांमध्ये होत असते. याला मुख्य कारण आहे, तेथील अर्थकारण!

वरील ‘चमत्कार’ प्रकरणाच्या निमित्ताने महत्त्वाच्या, सुप्रसिद्ध अशा ‘त्र्यंबकेश्वर’ या तीर्थस्थळाबद्दल जाणून घेणे भाविकांसह जिज्ञासूंसाठी नक्कीच संयुक्तिक व रंजक असेल.

त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थळाबद्दल :

नाशिकपासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर असलेले हे टुमदार व निसर्गरम्य गाव ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेले होते व आहे. जुना त्र्यंबक नाका ते त्र्यंबकेश्वर हा ‘त्र्यंबक रोड’ म्हणून ओळखला जातो. हा रस्ता वळणावळणाचा, दुतर्फा दाट झाडी असलेला होता. मात्र आता तसे चित्र नाही. ब्रिटीश आमदानीत दीडशे वर्षांपूर्वीच त्र्यंबकेश्वरला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. २०११ च्या जनगणनेनुसार त्र्यंबकेश्वर गावाची लोकसंख्या १२ हजार ०५६ होती. हद्दवाढीनंतर ती १३ हजार २८३ झाली आहे. (ही आकडेवारी प्रस्तुत लेखकाने सिंहस्थ पर्वकाळात (२०१५) नगरपरिषदांच्या कार्यालयातून घेतली होती.) चौदा हजारांच्या घरात असलेली गावाची लोकसंख्या! परंतु वर्षभरात या गावात सुमारे २० ते २५ लाख भाविक, यात्रेकरू, साधू येतात. सिंहस्थ पर्वकाळात हीच संख्या ५० लाखांच्या घरात पोचते. त्यामुळे ‘गाव लहान; पण गर्दी महान’ अशीच कायम स्थिती असल्याचे दिसून येते. कारण त्र्यंबकेश्वराचं धार्मिक महात्म्य!

त्र्यंबकेश्वर हे प्राचीन देवस्थान असले, तरी तेथील मंदिराचे बांधकाम पेशव्यांच्या काळात १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाले आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराप्रमाणे हेमाडपंती प्रकारचे काळ्या पाषाणात असलेले त्र्यंबकेश्वराचे मंदिर वास्तुकलेचा व शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. त्र्यंबकेश्वराच्या स्थानमहात्म्याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी नमुन्यादाखल काही आख्यायिका पुढीलप्रमाणे –

आख्यायिका १) एकदा भगवान शंकर व सृष्टीकर्ता ब्रह्मदेव यांच्यात वाद निर्माण होऊन दोघेही क्रोधित झाल्याने त्यांनी परस्परांना शाप प्रतिशाप दिले. ब्रह्मदेवाच्या शापामुळे (Action) शंकर पर्वत झाले, तेच ब्रह्मगिरीचं रूप! या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आद्य ज्योतिर्लिंगांपैकी ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वराचं मंदिर! भगवान शंकरानेही मग ब्रह्मदेवाला प्रतिशाप (Reaction) दिला की, ‘तुझी भूतलावर कोणीही पूजा करणार नाही.’ म्हणून ब्रह्मदेवाचे एक दुर्मिळ मंदिर गावापासून दूर आहे.

आख्यायिका ) गोहत्येच्या पापातून मुक्तीसाठी गौतम ऋषींनी शंकराची तपश्चर्या करून गंगेचे वरदान मागितले. शंकराने ब्रह्मगिरी पर्वतावर आपली जटा आपटून गंगेला मुक्त केले व ती भूतलावर अवतरली. गौतम ऋषींच्या तपश्चर्येने गंगा अवतरली म्हणून तिला ‘गौतमी गंगा’ असे म्हटले जाते. तिने गोहत्येचं पातक दूर केलं, म्हणून तिला ‘गोदावरी’ म्हणतात. कुशावर्तात मूळ गोदावरीचं वास्तव्य आहे, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने तिला पवित्र तीर्थ (पाणी नव्हे!) मानलं जातं म्हणून ते ‘कुशावर्त तीर्थ!’

पुढे, गोदावरीला अनेक नद्या-उपनद्या येऊन मिळतात, तिलाच ‘दक्षिण गंगा’ असेही म्हणतात.

आख्यायिका ) फार-फार वर्षांपूर्वी (अतिप्राचीन काळी) देव-दानवांनी समुद्रमंथनातून काढलेल्या १४ रत्नांपैकी चौदावे रत्न ‘अमृतकुंभ’ मिळविण्यासाठी १२ दिवस (म्हणजे आपली १२ वर्षे) भयंकर युद्ध केले. या झटापटीत काही थेंब त्र्यंबकेश्वरी कुशावर्तात व नाशिकला रामकुंडात पडले. म्हणून दर बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा’ भरतो. सिंहस्थ पर्वकाळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे लाखोंच्या (आता कोटी) संख्येत भाविक, साधू, यात्रेकरूंची गर्दी असते. एवढी गर्दी का असते, याचे उत्तर पुराणातील पुढील श्लोकात मिळू शकेल –

गोदाया यदफलं प्रोक्त संगमे द्विगुणं भवेत्|

चतुर्गुणंतु सिंहस्थे हयातिचारे तुषङ्गुणं॥

त्र्यंबके चाष्टुगुणं प्रोक्त स्नानदिन जपांदिकम्|

उत्पत्तै कोटी गुणितं सर्व रुचाक्षय भवेत्॥

अर्थात –

गोदावरी स्नानाने जे फळ मिळते ते संगम असेल तेथे (अहल्या-गोदा संगम) दुप्पट मिळते. तेच फळ सिंहस्थ असता चौपट मिळते आणि सिंहस्थात गुरूचे परिभ्रमण असल्यास सहापट मिळते आणि सिंहस्थात गुरू असल्यास गोदावरीच्या उगमस्थानी कुशावर्त तीर्थ येथे कोटींच्या पटीत स्नानदानाने फळ मिळते, (व्वा रे, वैदिक गणित व वैदिक महात्म्य!) सिंहस्थात एकदा डुबकी मारली की १२ वर्षांतील पापांचा बँक बॅलन्स (छळश्र) निरंक!) मग गर्दी होणारच ना!

गेल्या चार-पाच शतकांपासून नारायण नागबळी, रूद्राभिषेक, त्रिपिंडी, श्राद्धादी विधी अशा कर्मविधींचा पसारा वाढत चालल्याने शिवकालापासून कोकण, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातून अनेक ब्राह्मण ‘त्रिसंध्या क्षेत्र’ म्हणून येथे स्थायिक झाले. मुख्य व्यवसाय भिक्षुकी व पौरोहित्य असल्याने साहजिकच ‘वेदमूर्ती’, ‘वेदविद्यासंपन्न’ अशी बिरूदावली लावलेल्या ब्राह्मणांकडून पूजा-अर्चा, होमहवन करवून घेण्यासाठी श्रीमंत व्यापारी, राजकीय नेते, देश-विदेशातील अभिनेते येऊ लागले. त्यामुळे नाशिक पाठोपाठ त्र्यंबकेश्वरी भाविकांची गर्दी वाढू लागली. गावाचे अर्थकारण सुधारले. ब्राह्मणांमधील देशस्थ-कोकणस्थ, ऋग्वेदी-यजुर्वेदी असा पौरोहित्य करण्याच्या संदर्भातील वाद पूर्वापार चालत असल्याच्या नोंदी आढळतात. तो आता स्थानिकपासून प्रादेशिकपर्यंत पोचल्याचे चित्र दिसते. पेशव्यांच्या काळापासून त्र्यंबकेश्वर देवस्थानास आलेले स्थैर्य व भरभराट येऊन मूळचे महादेव कोळी (आदिवासी) आता कुठे आहात, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. (स्थलांतर?)

त्र्यंबकेश्वरी शैव साधूंचे १० आखाडे असून त्यात नागा साधूंचांही समावेश असतो. नील पर्वतटेकडीवर, तसेच त्र्यंबक परिसरात साधूंचे मठ असून शेकडो एकर जागा व त्यावर मालमत्ता आहे. येथे काही साधूंचे वर्षभर कायम वास्तव्य असते. यात पुरोहित वर्गही मागे नाही. त्यामुळे त्र्यंबक परिसरातील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. बेहिशोबी मालमत्ता, पैसा; त्यामुळे खाजगी, सावकारी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, हे नाकारता येत नाही. (कोरोना काळात व्यवसायांवर परिणाम झाल्याने त्याचा येथील अर्थकारणावर विपरित परिणाम झाला होता, हेही तितकेच खरे!) कोरोनाच्या कारणाने दोन वर्षेश्रावण महिन्यातील दर सोमवारी हजारोंच्या संख्येने ‘ब्रह्मगिरीच्या फेरी’साठी होणारी भाविकांची गर्दी, तसेच पौष (कृ. ११) एकादशीला निवृत्तिनाथांच्या यात्रेला शेकडो/हजारो भाविकांच्या पायी येणार्‍या दिंड्या बंद होत्या. त्यामुळे नारायण नागबळी, रूद्राभिषेक, त्रिपिंडी, श्राद्धादी विधींचे ‘मुहूर्त’ही थांबले होते. पुरोहितांची नवीन पिढी टेक्नोसॅव्ही झाल्याने ‘त्र्यंबक डॉट कॉम’ सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवसाय पुन्हा भरभराटीला येऊन दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. नाशिकपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत ‘त्र्यंबक रोड’वर शेकडो हॉटेल्स, अलिशान लॉन्स, लॉजेस होऊन अनेक अवैध धंदे (गोरखधंदे) वाढून परिणामी रस्त्यातील दंगामस्ती, गुन्हेगारी वाढीस लागली. दुतर्फा झाडी असलेला वळणावळणाचा रस्ता सरळ होऊन काँक्रिटीकरण झाले आहे. त्र्यंबकेश्वर गावाचं निसर्गरम्य, टुमदार रुपडं बदलून सिमेंट काँक्रीटचं जंगल झालं आहे. प्रचंड गर्दी वाढल्याने अस्वच्छता वाढून पर्यावरणाची ऐसी-तैसी झाली आहे. पिढ्यान्पिढ्या पौरोहित्य, देवधर्माचे काम करणार्‍या घराण्यांतसुद्धा मानसिक विकारग्रस्तांची संख्या उल्लेखनीय आहे, हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे.

‘नारायण नागबळी’ हा त्र्यंबकेश्वरी विधी बहुधा भारतात एकमेव असावा. हा विधी खर्चिक असल्याने तो सामान्य माणसांच्या आवाक्यातील नाही. त्यामुळे श्रीमंत व्यापारी, उद्योजक, दोन नंबरचा पैसा असणारे नोकरदार यांची संख्या मोठी असते. नारायण बळी व नागबळी हे दोन विधी एकत्र करून ‘नारायण नागबळी’ हा विधी केला जातो. मुहूर्त पाहून त्र्यंबकेश्वरातच येऊन हा विधी दोन ते तीन दिवस केला जातो. त्यासाठी ब्राह्मणांची टीम असावी लागते. भक्तांची व्यवस्था ब्राह्मण वाड्यांमध्ये/तसेच हॉटेल्समध्ये केली जाते. संख्येनुसार व परिस्थितीनुसार पॅकेजेस दिले जातात. सोन्याच्या नागासह पूजेचे सर्व सामान यात समाविष्ट असते. ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने ब्राह्मण-पुरोहितांची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे जुजबी ज्ञान असणार्‍या ब्राह्मणांनाही बर्‍यापैकी रोजगार व उत्पन्न सुरू झाले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आज महाराष्ट्रात व भारतात एक विचित्र वास्तव आहे, जे अडाणी, अल्पशिक्षित आहेत ते आणि जे उच्च विद्याविभूषित आहेत ते, हे सर्वचजण वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्यात वापरण्यात सारखेच अशिक्षित आहेत. नवसपूर्तीसाठी देवाला बोकडाचा बळी देणारा अडाणी खेडूत आणि स्वत:च्या इच्छापूर्तीसाठी त्र्यंबकेश्वराला सोन्याचा नाग देऊन नारायण नागबळीची पूजा करणारे विद्यापीठाचे कुलपती यात फरक कसा करणार, असा प्रश्न शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर करतात. तो योग्यच आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला असतानाही २१ व्या शतकात म्हणूनच म्हणावेसे वाटते की, “त्र्यंबकेश्वर : नाव देवाचे; पण गाव कुणाचे?…”

-व्ही. टी. जाधव, नाशिक

लेखक संपर्क : ९८५०४४०९४७


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]