ह.भ.प. देवदत्त परुळेकर - 9422055221

संतांचा धर्म पारलौकिक सुखाची इच्छा धरणारा नाही. तो पूर्णपणे इहलौकिक आहे. आपला संबंध इहलौकिक सुख-दुःखाशी येतो. स्वर्गात पुष्पक विमानात कोणते इंधन वापरले जाते आणि त्याचा भाव किती आहे, याच्याशी आपले काही देणे-घेणे नसते. इथे आपण राहतो तिथे पेट्रोलचा भाव काय आहे, हा आपल्याला दररोज भेडसावणारा प्रश्न असतो. संत हे जाणतात म्हणून त्यांनी परलोकातील सुख-दुःखाला अजिबात महत्त्व दिले नाही. त्यांनी इहलोकातील सुख-दुःखाचा विचार आपल्या धर्मातून मांडला.
प्रत्येक माणसाला जीवनात प्रत्येक वेळी कशाची अपेक्षा असते? सुखाची! तुम्हाला ज्ञान हवे काय? काहीजण म्हणतील, नको. तुम्हाला देव हवा काय? काहीजण म्हणतील, नको; पण ‘सुख नका,’ असे कोणी म्हणत नाही. सुख प्रत्येकाला हवे; पण सुख कशात आहे, याचे ज्ञान नाही. सुख मिळविण्याचा मार्ग काय, याचे ज्ञान नाही.आईला वाटते, मूल झाले की सुख मिळेल. बापाला वाटते, मुलगा झाला की सुखी होईन. मुलगा झाला. सुख मिळाले का? पुढे, तो शिकायला हवा. शिकला. पुढे, त्याला नोकरी मिळायला हवी, त्याला चांगली बायको मिळायला हवी. ही मागण्यांची साखळी कधीही पूर्ण होत नाही. आज ज्यात सुख वाटते, ती गोष्ट प्राप्त झाली की त्यात सुख वाटत नाही. पुढची मागणी पुढे येते.अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर ‘मागण्या अगणित आहेत; पण मागण्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध साधने मर्यादित आहेत. त्यामुळे सर्व मागण्यांची पूर्तता कधीच होऊ शकत नाही.’
माणसाला विचारलं की अशी कोणतीही एक वस्तू सांग, जी मिळाल्यावर तू पूर्ण सुखी होशील. सांगता येत नाही. या जीवनात सुखाची मागणी पूर्ण होत नाही, म्हणून स्वर्गाची कल्पना पुढे आली. इथे भोगायला मिळत नाहीत ती सुखे स्वर्गात मिळतात; याउलट नरक. अत्यंत यातनामय जीवन तिथे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात –
एरव्ही तरी नरकांचे दु:ख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख ।
नरकाचं दु:ख पाहून स्वर्गाला सुख हे नाव आले आहे; पण खरे सुख स्वर्गात तरी आहे काय?
तुम्हाला खरे सुख पाहिजे ना! मग नित्य, निर्दोष, आनंदमय स्वरूप माझे आहे, त्याला प्राप्त व्हा, असे भगवान सांगतो. वांचुनि (स्वर्ग, नरकाशिवाय)
वांचूनि नित्यानंद गा निर्दोष । तें स्वरूप माझे ॥
पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
मज येता पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा ।
स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥
अर्जुना (सुभटा), माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरुपापासून भलतीकडे नेणार्या स्वर्ग व नरक, या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत. त्या चोरांच्या आहेत.
स्वर्गाची प्राप्ती म्हणजे परमसुखाची प्राप्ती असा आपला गैरसमज असतो. समजा आपल्याला ताजमहाल पाहायचा आहे, तर कन्याकुमारीला जाऊन चालेल काय? ताजमहाल उत्तरेला आग्रा इथे. तर आपण चाललो दक्षिणेला कन्याकुमारीकडे. पहिली गोष्ट म्हणजे सुख कुठे, याचा पत्ताच चुकला. काहीना वाटते की, देवाची प्राप्तीही स्वर्गात होईल. देव एकदा सापडला की परमानंद मिळालाच; पण आपला पत्ता चुकलेला आहे. देव स्वर्गात असता तर…
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा ।
मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा ॥
असे म्हणावेच लागले नसते.
मग देवाला जाणण्याची वाट कोणती? स्वर्ग, नरक या चोरांच्या आडवाटा आहेत, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपल्याला शॉर्टकटचे फार आकर्षण असते. ‘झटपट इंग्लिश’पासून ‘लॉटरी लागली की एकदम श्रीमंती’, ‘अभ्यास न करता कॉपी करून पास’, ‘व्रतवैकल्य करून एकदम भाग्योदय’ हे सगळे शॉर्टकट. या चोरांच्या वाटा असे माऊली म्हणतात.
आडवाटांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्या रानात कुठे हरवतील, हे सांगता येत नाही. बहुतेक वेळा सुखापेक्षा संकटांचीच प्राप्ती. स्वर्गसुखासाठी केले जाणारे सर्वकाही ईश्वराच्या जवळ नव्हे, तर दूर घेऊन जाते. अशा चोरांच्या आडवाटांपासून दूर राहा, असे माऊली निक्षून सांगतात.
सर्वसाधारणपणे यज्ञ, याग आणि तत्सम कर्मकांड विधी आपण पुण्य संपादन करण्यासाठी करतो. या पुण्यसंपादनातून आपले या लोकीचे नाही, तर परलोकीचे (स्वर्ग) जीवन सुखमय होईल, अशी आपली कल्पना असते.पुण्यसंचयाने स्वर्ग मिळतो आणि पापाचा संचय झाला की नरक. मग स्वर्ग मिळवण्यासाठी जे-जे विधी करायचे ते पुण्य आणि याउलट कर्म ते पाप अशी आपली पाप-पुण्याची व्याख्या असते. ज्ञानेश्वर माऊलींनी ही व्याख्याच बदलली. त्यांनी पाप-पुण्याला दिलेला अर्थ किती सखोल, किती वेगळा आहे पाहा-
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मके पापे नरका जाइजे
स्वर्गाला जाण्यासाठी तुम्ही जे विधी, यज्ञ, याग करता ते पुण्य नव्हेच; ते पाप आहे पाप ! फक्त पुण्यात्मक पाप एवढंच. उडदामाजी काळे गोरे – काळे काय, गोरे काय; उडीद ते उडीदच. पाकीटमारी करणारा काय आणि घरफोडी करणारा काय – दोन्ही चोरच. अरे मग, आपण पुण्य समजत होतो, ते पुण्य नसून पापच आहे, तर खरं पुण्य कोणतं? ज्ञानेश्वर माऊलींनी याचे उत्तर पुढे दिले आहे –
मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥
माझे स्वरूप ज्याने जाणता येतं, ते खरे शुद्ध पुण्य. हे शुद्ध पुण्य कोणतं? ज्ञानेश्वरीतच किमान दोन यज्ञांचा उल्लेख आहे. 1. स्वधर्मरुपी नित्ययज्ञ 2. नामस्मरणरुपी जपयज्ञ.
इतर यज्ञादी विधींना पुण्य का म्हणायचे नाही? माऊलींची भाषा कठोर बनते. आपण सर्व त्याच्यातच सामावलेले आहोत; मग त्याला दुसरीकडे शोधणे – अगदी स्वर्गात – याला पुण्य कसे म्हणता? तुमची जीभ कशी झडत नाही!
आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दूरी होय पांडुसुता ।
तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥
माऊलींनी ज्या स्वर्गाकडे जाणार्या चोरांच्या आडवाटेचा उल्लेख केला आहे, तो उल्लेख यज्ञ-यागादी काम्यकर्माबाबत आहे, हे कशावरून? तुम्ही उगीच याज्ञिकांना धोपटता, असा आरोप कोणी करेल म्हणून याचे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. माऊली स्वर्गसुखाचे विस्तृत वर्णन प्रथम करतात, त्याची सुरुवात अशी –
परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरी ते दीक्षित ।
यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥
याप्रमाणे ते यज्ञ करणारे (वस्तुत:) माझी आराधना करतात; पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात.
मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे ।
तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥
माऊली पुन्हा सांगतात – मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही, असे पापरूप पुण्य आहे. त्यामुळे मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गात येतात. पुढे याज्ञिकांना ज्याचे आकर्षण वाटते, त्या स्वर्गाचे विस्तृत वर्णन आहे. स्वर्गात काय काय आहे? न मरणे हे सिंहासन आहे, ऐरावत वाहन आहे, अमरावतीसारखी राजधानी आहे. महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, कामधेनुचे कळप आहेत, देवसमुदाय सेवक आहेत, चिंतामणीच्या जमिनी आणि करमणुकीकरिता कल्पवृक्षांचे बगीचे, गंधर्वांचे गाणे, रंभेसारख्या अप्सरांचे नृत्य आहे, विलास करण्याकरिता उर्वशीसारख्या अप्सरा आहेत, इथे शय्यागृहात प्रत्यक्ष मदन (कामदेव) चाकरी करतो, इत्यादी… इत्यादी…
पण हे सर्व तुच्छ! का?
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे ।
आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥
जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें ।
तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगो ॥
मग या पापात्मक पुण्याचा साठा संपला की, इंद्रपणाचे तेज नाहीसे होते. मृत्युलोकात परतावे लागते. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा संपला की, तिच्या दाराला हात लावण्याची सोय नसते, तशी या यज्ञकर्त्यांची लाजिरवाणी स्थिती आहे.संतांनी एवढ्या कडक भाषेत सुनावूनही परंपरेच्या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य माणसाला पारलौकिकाचे आकर्षण वाटणारच नाही, असे नाही. यासाठी संतांनी काय योजना केली पाहा –
स्वर्गाचे मुख्य आकर्षण काय? तेथे देव राहतात. देवांचा देव विष्णू वैकुंठलोकात राहतो. वैकुंठात देवाला भेटायला जायचे तर काय करावे लागते?
वैकुंठा जावया तपाचे सायास । लागे जीवा नाश करणें बहु
तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथ्वीचा ॥
तुका म्हणे केली सोपी पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥
वैकुंठामध्ये जाणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. वैकुंठामध्ये जाण्यासाठी अतिशय तपस्वी जीवन व्यतीत केल्यानंतरच शारीरिक स्तरावर उदासीन होऊन जीवाचा नाश करूनच वैकुंठप्राप्ती शक्य आहे. परंतु पुंडलिकरायाने आपल्या सर्वांवर अतोनात उपकार केले आहेत. पृथ्वीवर पंढरीक्षेत्र आणून पृथ्वीवरील आपणा सर्वांना साक्षात् वैकुंठाचीच अनुभूति दिली आहे. कारण पंढरी म्हणजे साक्षात् वैकुंठच आहे. तुकोबाराय म्हणतात की, पुंडलिकरायाने वैकुंठाची वाट आमच्यासाठी सोपी केली. केवळ पंढरीमध्ये जाणे म्हणजेच वैकुंठी जाणे. यापेक्षा मोठे उपकार ते काय?
लेखक संपर्क ः 94220 55221