धार्मिक अस्मितेचे फसवे विज्ञान

राजीव देशपांडे -

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता. त्या व्हिडिओत तुळशीच्या रोपाची करामत दाखवली होती. एक गृहस्थ रस्त्याच्या कडेला तुळशीचे रोप ठेवत होता. त्याच्या हातात अंदाजे दोन फूट लांबीचे सळईला रॉड होते. ते रॉड हातात धरून एकमेकांना क्रॉस केलेले व्हिडिओत दिसत होते. तो गृहस्थ ते रॉड तुळशीच्या रोपाजवळ नेताच विरुद्ध दिशेत वळून एकमेकांपासून लांबतात, या प्रयोगाद्वारे तुळशीच्या रोपात मोठी ऊर्जा असते आणि ती ऊर्जा त्या रॉडना परस्परांपासून दूर लोटते, असा निष्कर्ष या प्रयोगातून दाखवला जात होता; पण सत्य काय? त्या गृहस्थाने हातात घेतलेल्या रॉडना ‘पाण्याड्याचे रॉड’ किंवा ‘डाऊझिंग रॉड’ असे म्हणतात. या रॉडची बुवाबाजी जगभर चालते. जमिनीतील पाणी शोधण्यासाठी, खनिज शोधण्यासाठी किंवा पुरून ठेवलेली स्फोटके शोधण्यासाठी अशा रॉडचा उपयोग केला जातो. पण हे फसवं विज्ञान आहे. रिचर्ड डॉकिन्स, जेम्स रँडी यांसारख्या विवेकवाद्यांनी पानाडे, स्फोटके शोधणारे वगैरे मंडळींचा पर्दाफाश केला आहे. डाऊझिंगचे रॉड्स हातात आपोआप वळतात हे शक्य नाही. कोणत्याही पदार्थाला वळण्यासाठी किंवा पळण्यासाठी भौतिक बल लावावेच लागते. जी व्यक्ती डाऊझिंग करते, तिला डाऊझिंगचे रॉड हातात वळण्यासाठीचे कसब माहीत असते. जेथे हे रॉड वळायचे असतील, तेथे संबंधित व्यक्तीच्या अंतर्मनातून आलेली सूचना आपोआप काम करते. त्या व्यक्तीचे हात हलताना दिसतही नाहीत; पण स्नायूंची हालचाल नकळत घडते. मानसशास्त्रात ‘विशफूल थिंकिंग’ म्हणजेच इच्छाप्रेरित निर्णय हा प्रकार आढळतो. मनातील सुप्त इच्छा नकळत आपल्या बारीक हालचाली घडवून आणतात. डाऊझिंगचे रॉडही नकळत इच्छाप्रेरणेमुळे वळतात. तुळशीच्या रोपात मांडलेल्या तथाकथित उर्जेशी रॉड वळण्याचा काहीही संबंध नाही; संबंध आहे धार्मिक अस्मितेचा.

मात्र तुळस ऑक्सिजन जास्त प्रमाणात बाहेर सोडते. तिच्यामुळे डास पळून जातात. अनेक रोगांवरती गुणकारी आहे, असे जे सांगितले जाते, त्याला विज्ञानातील प्रमाणांचा आधार नाही. केवळ तुळस ही हिंदू धर्मात पवित्र मानली आहे, म्हणून तिला अनेक प्रकारचे गुण चिकटवणे हा धार्मिक अस्मितेतून आलेला अहंकार आहे.

तुळस इतकी गुणकारी असती, तर भारतातील विद्यापीठांतून वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासकाने हे गुणधर्म तपासले असते आणि अभ्यासक्रमात त्याची नोंद केली असती. अशा प्रकारचे संशोधन ‘लॅन्सेट’सारख्या मॅग्झीनमध्ये पाठवून त्याची खात्री केली गेली असती. हा विज्ञानाचा मार्ग आहे; पण नकली विज्ञानाचा वापर करून तुळशीमधल्या उर्जेची सिद्धता करणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे.

असाच प्रकार देशी गायींचे महत्त्व वाढवण्यासाठी सुरू झालाय. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या पेपरमधील पुढील बातम्या पाहा- एका बीजेपी नेत्याने बंगालमध्ये गोमूत्र कोरोना आजारावर उपयोगी आहे, असा प्रसार केला. पश्चिम बंगालमधील एकजण गोमूत्र कोरोनावरील उपाय म्हणून विकत असताना हुगळी येथे पकडला गेला. एका केंद्रीय मंत्र्याने गोमूत्र कॅन्सरवर परिणामकारक ठरते, असे भाष्य केले आहे. उत्तर प्रदेशात सरकारी पातळीवर गोमूत्राचा उपयोग करण्याचा प्रयत्न चालू आहे. एवढेच नव्हे, तर गोमूत्राने ‘रेडिओ अ‍ॅक्टिव्ह’ घातक किरणांचा परिणाम टाळता येतो, असाही प्रचार केला जातो. हा सगळा प्रचार धार्मिक अस्मितेतून निर्माण झाला आहे. गाय ही पवित्र माता आहे, या श्रद्धेतून गायीने शरीरातून टाकून दिलेल्या शेण आणि मूत्रासारख्या वस्तूही किती उपयोगी आहेत, याचा प्रसार जोरदारपणे चालू आहे.

कोणत्याही खात्रीशीर संशोधनाची पद्धत काय आहे? एखादे नवे औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याची डबल ब्लाईंड नैदानिक चाचणी केली जाते. अशा चाचण्या जगातील विविध प्रयोगशाळेत केल्या जातात. या चाचण्यांचे निष्कर्ष जगातील ‘लॅन्सेट’ सारख्या मासिकामध्ये प्रसिद्ध केल्या जातात. अशा चाचण्यांचा एकत्रित आढावा कोक्रेन पुर्नमुल्यांकन पद्धतीने घेतला जातो. असं पुर्नमुल्यांकन गोमूत्राच्या बाबतीत व्हायला हवे मगच त्याला करोना लसीप्रमाणे मान्यता देता येईल; पण विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांऐवजी कुणी बाबा, तर कुणी मंत्री, तर कुणी राजकीय नेता गोमूत्राचे भजन गात असेल, तर तो वेडेपणा ठरेल. धार्मिक अस्मितेचे अशा प्रकारचे फसवे विज्ञान समाजाला घातक ठरू शकते. याचा राजकीय पातळीवर गंभीरपणे विचार व्हावा, असे आम्ही संबंधित यंत्रणेला आवाहन करतो.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]