-
संविधान सोबत घेऊन वधू–वरांचे आगमन अन् पुस्तकांचा रुखवत
सांगलीतील सत्यशोधक विवाहात महापुरुषांचे स्मरण
वधू- वरांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. भांडीकुंडी, किंमती भेटवस्तूंचा थाट नव्हता तर रुखवतात प्रगतीशील विचारांच्या पुस्तकांची भेट दिली होती. विज्ञानवादी विचारांचा जागर अन् प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा आदर व सत्कार असे एखाद्या लग्नाचे वातावरण. शेकडो लोकांनी अनुभवले व कौतुकही केले. बिसूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष सदाशिव पाटील यांची कन्या संपदा व करोली एम. (ता. मिरज) येथील इंजि. अतुल काकासाहेब पाटील यांचे चिरंजीव अभिनव यांचा नुकताच सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. संविधान सोबत घेऊन वधू-वरांचे आगमन झाले. घटनेतील प्रास्ताविकेचे वाचन व स्वातंत्र्य आणि समानतेच्या वागणुकीची शपथ घेत संपदा व अभिनव यांनी माधवनगर-कर्नाळ रस्त्यावरील सुशांत गार्डनमध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीत एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकार केला. सहजीवनाची सुरुवात केली. हा विवाह नव्हे तर प्रबोधनाची यात्रा होती.
महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य अण्णा कडलास्कर यांचे चिरंजीव विवेक यांचा विवाह सुवर्णा राजहंस यांच्यासोबत दि. २१ मे रोजी पुणे येथे नोंदणी पद्धतीने संपन्न झाला.
कोणत्याही कर्मकांडाशिवाय अत्यंत सुंदर व देखणा असा हा विवाह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
दोन्ही परिवारांचे हार्दिक अभिनंदन..!
पेण अंनिसच्या कार्यकर्त्या मीना सनय मोरे (पेण) यांचा मुलगा आदित्य व अर्चना अनिल पाटील (पेण) यांची मुलगी कल्याणी यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने पुणे येथे १४ मे रोजी पार पडला. यामध्ये तांदळाचा वापर न करता सुगंधी गुलाबांच्या पाकळ्यांचा वापर अक्षदा म्हणून केला. कुठलेही कर्मकांड, विधी मुहूर्त न बघता भटजीशिवाय साध्या पद्धतीने हा विवाह येथे पार पडला. दोन्ही परिवारांचे हार्दिक अभिनंदन..!