अंनिवा -
औरंगाबाद जिल्ह्यात भटक्या समाजात लावले जात असलेले तब्बल चार बालविवाह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांच्या सतर्कतेने थांबवले गेले. या चारही मुली नगर जिल्ह्यातील आहेत. मसणजोगी या भटक्या समाजातील अनिष्ट जातपंचायत गवांदे यांच्या प्रयत्नातून बरखास्त झाली. मात्र याच समाजातील पंचायतीचे पंच प्रतिष्ठेसाठी बालविवाह लावण्यात पुढाकार घेत असल्याचे आढळले.
औरंगाबादमधील बिडकीन येथील दोन व लासूर स्टेशन येथील दोन असे एकूण चार बालविवाह नुकतेच महिला बालकल्याण विभाग व पोलीस अधिकार्यांच्या मदतीने थांबवले गेले आहेत. या घटनेतील मुली अवघ्या 9, 10, 11 व 13 वर्षांच्या आहेत. बिडकीन येथे विवाह होत असलेल्या मुली शेवगाव तालुक्यातील, तर लासूर स्टेशन येथे होत असलेल्या विवाहातील मुली नेवासा फाटा भागातील आहेत. या बालविवाहाची माहिती अॅड. गवांदे यांना मिळाली होती. बिडकीन व लासूर स्टेशन परिसरातील वाड्या-वस्त्यांवर हे विवाह लावले जात होते. गवांदे यांनी महिला बालकल्याण व पोलीस विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला व संबंधित वाड्या-वस्त्यांवर जाऊन बालविवाह थांबवले. या चारही मुलींना आता त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असले, तरी या मुलींना बालसुरक्षा समितीपुढे हजर करण्याच्या नोटिसा संबंधित पालकांना बजावल्या गेल्या आहेत. अॅड. गवांदे यांनी मसणजोगी या भटक्या समाजातील जातपंचायत बरखास्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता; परंतु या पंचायतीचे पंच आता खोट्या प्रतिष्ठेसाठी बालविवाह लावण्यात पुढाकार घेत असल्याचे आढळत असल्याची माहिती त्यांनी दिली.