महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी – विद्रोहाचे पाणी पेटले!

- सुबोध मोरे -

“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरता जावयाचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे!”

वरील महत्त्वाचे उदगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली महाडला दुसरी बहिष्कृत परिषद भरली असताना काढले.

यंदा दि. २० मार्च २०२६ पासून महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या व मनुस्मृती दहनाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ होत आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत व मानव मुक्तीच्या संग्रामात, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे मोठे महत्व आहे. या चवदार तळे सत्याग्रहाच्या संघर्षातूनच स्वतंत्र “दलित चळवळीचा” पाया घातला गेला.

या सत्याग्रहाच्या पूर्वी, अस्पृश्यतेच्या रुढी, परंपरांच्या विरोधात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रयत्न, लढे झाले, त्यात दलितेतर समाज सुधारक, समाज क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रामस्वामी पेरियार, छत्रपती शाहू महाराज आदी.चा सक्रिय सहभाग होता.

परंतु महाड चवदार तळे सत्याग्रहाचे, लढ्याचे वैशिष्ट्य हे होते की, हा परिवर्तनाचा, सामाजिक विषमते विरोधातील लढा हा अस्पृश्यांवरील, दलितांवरील सामाजिक विषमतेच्या, अन्यायाविरोधात, दलितेतर, अस्पृश्यतेतरांच्या पुढाकाराने सुरू झाला नव्हता, तर तो जातिव्यवस्थेचे, धर्मव्यवस्थेचे जे बळी, पीडित होते, मनुस्मृतीच्या विचारांमुळे ज्यांना हीनतेचे अमानवी जीवन कंठावे लागत होते, त्या प्रत्यक्ष पीडितांनी, शोषितांनीच या सामाजिक विषमतेच्या विरोधातील आंदोलन संघटीत करण्यात पुढाकार घेतला होता व त्या लढ्याचे नेतृत्वही केले होते आणि हे भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत प्रथमच घडत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या “रायगडाच्या” पायथ्याशी असलेल्या कोकणातील महाड येथे हा ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रम झाला. यामागे काही ऐतिहासिक सामाजिक पार्श्वभूमी होती. ब्रिटिशांच्या आगमनानंतर कोकणातील अस्पृश्यांना ब्रिटिश सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली व त्यांच्या दैनंदिन जगण्यात जे परिवर्तन झाले व गुलामगिरीची मानसिकता झुगारून स्वतंत्रपणे स्वाभिमान अंगीकारला, त्यांना शिक्षणाचा लाभ मिळाला. त्याच काळात महात्मा जोतिबा फुलेंसारखे “समाज क्रांतिकारक” ज्या समाज परिवर्तनाच्या चळवळी उभारीत होते, त्यांच्या विचारांच्या, कार्याच्या प्रभावातील, ब्रिटिश सैन्यातील सुभेदार गोपाळ बाबा वलंगकरसारखे समाज सुधारक महाड, दासगाव, दापोली या कोकण परिसरात “अनार्य दोष परिहार मंडळ” सारख्या संस्थामार्फत सामाजिक विषमतेच्या विरोधात अस्पृश्यांमध्ये जनजागृती, प्रबोधन करीत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ, दासगावचे माडीवाले जोशी उर्फ विठ्ठल हाटे, वीरचे गंगाराम भागोजी सवादकर, पनवेलचे सुभेदार गंगाराम भातणकर आदी कार्यकर्ते कोकणात सामाजिक चळवळीत अग्रभागी होते.

कोकणातील आद्य समाजसुधारक व आद्य पत्रकार गोपाळ बाबा वलंगकर हे अनार्य दोष परिहार मंडळ, संस्थेचे चिटणीस होते. त्यांनी जे सामाजिक जागृती, प्रबोधनाचे कार्य केले होते, त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने गोपाळ बाबा वलंगकरांना महाड लोकल बोर्ड सदस्य म्हणून १८९५ साली नियुक्त केले होते. त्याच काळात त्यांनीच प्रथम सर्व सार्वजनिक तलाव, विहिरी, पाणवठे अस्पृश्यांना खुले करावे व अस्पृश्य मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठीही ठराव मांडला होता, हा इतिहास आहे.

नंतर १९२३ साली मुंबईच्या असेंब्लीत रावबहादूर सी. के. बोले यांनी वलंगकर बाबांच्या प्रमाणे, सर्व सार्वजनिक ठिकाणे, विहिरी, तलाव, पाणवठे आणि धर्मशाळा अस्पृश्यांसह सर्वांना खुली करावीत असा “बोले ठराव” मंजूर करून घेतला होता. तसाच ठराव १९२४ साली महाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनीही मंजूर केला होता, परंतु त्या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र त्यांना महाड व इतरत्र करता आली नव्हती.

सार्वजनिक स्थळं, विहिरी, तलाव पाणवठे खुले करणार्‍या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला, तो दासगावच्या रामचंद्र मोरे या शिक्षित अस्पृश्य तरुणाने. या रामचंद्रला स्वतःचे शिक्षण घेतानाही अस्पृश्यतेचे चटके बसले होते, त्यासाठी त्याला महाडमधील सनातनी विचारांच्या लोकांसोबत शाळेत प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागले होते. कलेक्टरला, वर्तमानपत्रात पत्र दिल्यानंतरच कलेक्टरच्या सांगण्यावरुन रामचंद्रला हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला होता. या रामचंद्र मोरेला वैचारिक प्रेरणा आद्य समाजसुधारक गोपाळ बाबा वलंगकरांकडूनच व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू बाळारामदादा आंबेडकरांमुळे जी आंबेडकर कुटुंबियांशी जवळीक निर्माण झाली त्यामधूनच मिळाली होती.

याच तरुण रामचंद्र मोरे यांनी पुढाकार घेऊन महाड नगरपालिकेच्या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी दासगाव, वीर, महाड परिसरातील अस्पृश्य समाजातील तरुणांची पहिली सभा १९२४ साली महाड मधील तत्कालीन महारवाड्यात (आजच्या क्रांती भूमी शेजारी) घेतली. या सभेत रामचंद्र मोरे यांनी “बोले ठरावाची” माहिती सर्वांना दिली व या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी महाडलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली “बहिष्कृत परिषद” घेण्याचे ठरवले. या सभेत कोणीही अस्पृश्येतेतर लोक उपस्थित नव्हते. याच सभेने रामचंद्र मोरेंवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परिषदेला आणण्याची जबाबदारी दिली. या सभेनंतर मोरे मुंबईत राहणारे कोकणातील दलित समाजातील ज्येष्ठ नेते संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यावेळी बाबासाहेबांसोबत सामाजिक कार्यकर्ते भाई अनंत चित्रेही होते. त्या दोघांनीही मोरेंकडून परिषदे संदर्भात माहिती घेतली व त्याबाबत निर्णय नंतर कळवितो असे सांगितले.

त्यानंतर रामचंद्र मोरे ज्या-ज्या वेळी मुंबईत येत असत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे परिषदेला येण्यासाठी पाठपुरावा करीत असत. परिषदेची महाडमध्ये काय तयारी सुरू आहे, यासाठी डॉ. बाबासाहेबांनी एकदा, “बहिष्कृत हितकारणी सभेचे” सदस्य व त्यांचे सहकारी कमलाकांत चित्रे यांना महाडला पाठविले. त्यांच्या सोबत मोरेंनी महाड परिसरातील प्रमुख अस्पृश्य समाजातील कार्यकर्त्यांची सभा घेतली, ज्यात  सुभेदार विश्राम सवादकर, चर्मकार समाजाचे भानुदास कांबळे आदी लोक उपस्थित होते. या सभेनंतर कमलाकांत चित्रे, मोरे, सवादकर यांच्यासह महाडचे नगराध्यक्ष सुरबा नाना टिपणीस यांना भेटले व ठरावाची कायदेशीर बाजू समजावून घेतली आणि आगामी काळात लवकरच महाडमध्ये, बोले ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली “बहिष्कृत परिषद” घेणार असल्याचे सांगितले. त्यावेळी या परिषदेला सहकार्य करण्याचे आश्वासन सुरबा नाना टिपणीसांनी दिले.

यानंतर पुढील दोन वर्षे रामचंद्र मोरे परिषदेच्या बाबतीत बाबासाहेबांना व मुंबईत राहणार्‍या चाकरमानी दलित तरुणांना भेटत असत. याच काळात १९२६ साली मुंबईत मोरेंनी संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या मदतीने “महार समाज सेवा संघ” या तरूणांच्या संघटनेची स्थापना केली. ज्याचे सरचिटणीस रामचंद्र मोरे, अध्यक्ष भिकाजी गायकवाड व खजिनदार केशवराव आड्रेकर होते. या संघटनेचे मुंबई व कोकण परिसरातील आगामी परिषदेचा प्रचार – प्रसार व निधी जमा करण्यासाठी अहोरात्र झटत होते. यांच्याच पुढाकाराने महाड परिषदेच्या निधीसाठी मुंबईतील दामोदर हॉल नाट्यगृहात “संत तुकाराम” या नाटकाचा खास शो आयोजित केला होता.

रामचंद्र मोरे यांनी बोले ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःच्या दासगाव गावातील क्रॉफर्ड तळे व विहिरीवर जाहीर कार्यक्रम करण्याची सूचना तहसीलदार व पोलिस प्रशासनाला देऊन सुमारे दोनशे – अडीचशे लोकांच्या उपस्थितीत दि. ४ डिसेंबर १९२६ रोजी, वरील तळ्याचे, विहिरींचे पाणी प्यायले व बोले ठरावाची अंमलबजावणी महाडच्या आधी दासगावात केली. या कार्यक्रमात महाड पंचक्रोशीतील महत्वाचे अस्पृश्य समाजातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गावातील सोनार समाजाचे रा. बा. पोतदार होते.

या दासगावच्या कार्यक्रमानंतर महाड व कोकण परिसरातील अस्पृश्य समाजात नवचैतन्य व उत्साह निर्माण झाला आणि लोक महाड बहिष्कृत परिषदेच्या कामाला जोमाने लागले. याच काळात भाई अनंत चित्रे यांनी बापू सहस्रबुद्धे यांना पत्राने जानेवारी १९२७ ला कळविले की, “रामचंद्र मोरे व विश्राम सवादकर” हे परिषदेची तयारी जोरात करत आहेत, तरी डॉ. आंबेडकरांकडून परिषदेची तारीख मिळवावी. त्यानंतर फेब्रुवारी १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १९-२० मार्च १९२७ ही तारीख कळवली.

याच १९- २० मार्चला महाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली महाडच्या विरेश्वर थिएटरच्या मंडपात कोकणचे पहिले दादासाहेब उर्फ कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या स्वागताध्यक्ष पदाखाली ऐतिहासिक “बहिष्कृत परिषद” झाली. ज्याचे प्रमुख संघटक आर. बी. मोरे होते. त्यांनीच पाहुण्यांचा परिचय करून दिला. यात दलितेतरांपैकी मुंबईहून आलेले भाई अनंत चित्रे, बापुसाहेब सहस्रबुद्धे हेच फक्त मार्गदर्शक म्हणून मंचावर होते.

तसेच नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस व महाड मधील एक – दोन, स्पृश्य – दलितेतर समाजातील लोकच या परिषदेत सहभागी होते. दि.२० मार्च रोजी दुपारी परिषदेत भाई चित्रे यांनी प्रतिनिधींना आवाहन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक बाजारपेठेतून मिरवणुकीने चवदार तळ्यावर गेले आणि सगळ्यांनी जाहिरपणे ओंजळीने पाणी पिऊन “बोले ठरावाची” व  मानवी मुलभूत हक्कांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

या घटनेनंतर गावातील जातियवादी, सनातनी, धर्मांधांनी खोट्या अफवा पसरवल्या की, हे अस्पृश्य लोक आता विरेश्वराच्या मंदिरात घुसून, देवळं बाटवणार आहेत. यामुळे सामान्य लोकांची, भाविकांची माथी भडकली व त्यांनी परिषदेला आलेल्या सत्याग्रहींना बेदम, जीवघेणी मारहाण केली त्यात अबालवृद्ध, स्त्रियाही मोठ्या संख्येने जखमी झाल्या. काही ठिकाणी सत्याग्रहींनीही हल्लेखोरांना जशास तसं उत्तर दिले व प्रतिकार केला. संपूर्ण महाडमध्ये धुमश्चक्रीचे व तणावपूर्ण वातावरण होतं. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हल्लेखोरांना पिटाळले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व सत्याग्रही कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरवली. अशा तह्रेने पहिली परिषद पार पडली.

अस्पृश्यांनी तळ्याचे पाणी प्यायल्याने “चवदार तळे बाटले, अपवित्र झाले,” असा गहजब महाडमधील ब्राम्हणांनी, सनातनी संस्कृतीच्या ठेकेदारांनी केला. त्यांनी ते तळे तथाकथित “पवित्र” शुद्ध करण्यासाठी १०८ घागरी शेण, गोमूत्र (पंचगव्य) मंत्राग्नीचा जयघोष करीत तळ्यात ओतले व ब्राह्मणी धर्माचे पालन केले.आणि हे चवदार तळे सार्वजनिक नसून खाजगी मालकीचे आहे असा दावा कोर्टात टाकून, अस्पृश्यांना पाणी भरण्यास पुन्हा मनाई केली.

या परिषदेमुळे अस्पृश्यांना आपल्या ताकदीची जाणीव झाली, त्यांना नवं आत्मभान व आत्मविश्वास निर्माण झाला. अस्पृश्यांनी सामुहिकरित्या, संघटीत होऊन पाणी प्राशन केल्यामुळे सबंध महाराष्ट्रात व देशभरात असा संदेश गेला की, अस्पृश्य जनता आता जागृत  झाली आहे व ती आता लाचारीचे, मानहानीचे अवमानकारक जीणं जगणार नाही. त्यांच्यातील स्वाभिमानाला जागृत करण्याचे काम या चवदार तळे “बहिष्कृत परिषदेतून” झाले. अस्पृश्यांना आता स्वतःच्या समाजातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखं, कर्तृत्ववान, दैदिप्यमान नेतृत्व मिळालं आहे. या लढ्यातून दलितांची “स्वतंत्र अस्मिता” पुढे आली आहे. याच चवदार तळे सत्याग्रह आंदोलनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र नेतृत्व उदयास आले!

या ऐतिहासिक परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संपादकत्वाखाली “बहिष्कृत भारत” नावाचं नवं पाक्षिक दि.३ एप्रिल १९२७ साली सुरू केले. ज्यात त्यांनी महाड चवदार तळे बहिष्कृत परिषदेचा सविस्तर वृत्तांत दिला व जाहीर केले की, आम्ही पुन्हा डिसेंबरला महाडला येऊन, दुसरी “सत्याग्रह बहिष्कृत परिषद” घेऊ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चवदार तळे आंदोलनाची दखल तत्कालीन इंग्रजी वर्तमानपत्रांनी महत्त्वाची पुरोगामी, सामाजिक घटना म्हणून घेतली. परंतु तत्कालीन टिळकांचा “केसरी” कुलाबा समाचार, भोपटकरांचा “भाला”, “चाबुकस्वार” सारख्या वर्तमानपत्रांनी मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळीतील सत्याग्रहींवरच दंगलीचे खापर फोडले व आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेतृत्वावर तोंडसुख घेतले.

या वर्तमानपत्रांनी पीडित, जखमींची, अस्पृश्यांची बाजू घेण्याऐवजी, जातीयवादी, सनातन्यांचीच बाजू घेतली. या वरील सर्व वर्तमानपत्रातील टीकाकारांचा परखड समाचार डॉ. बाबासाहेबांनी सडेतोड शब्दात, नेमका युक्तिवाद मांडून बहिष्कृत भारतात अग्रलेख व विविध स्तंभातून घेतला. “बहिष्कृत भारत” मुळे महाराष्ट्राच्या खेडोपाडी डिसेंबरला महाडला होणार्‍या दुसर्‍या “बहिष्कृत परिषदेचा” संदेश अस्पृश्य समाजापर्यंत गेला. लोक लहान, मोठ्या सभा, बैठका घेऊन परिषदेला जाण्याची तयारी करू लागले. पहिल्या परिषदेनंतर सत्याग्रहींना जी मारहाण झाली होती, त्यापासून सावध होऊन, आक्रमकपणे, संघर्षाच्या तयारीने जाण्यासाठी, प्रमुख संघटक, आर. बी. मोरे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली काँग्रेस सेवा दलाच्या धर्तीवर,  “आंबेडकर सेवा दल” या तरुणांच्या लढाऊ संस्थेची स्थापना केली. (नंतर याच संस्थेचे नामांतर, “समता सैनिक दल” असे केले.) दुसर्‍या परिषदेला लोक लढण्याच्या जिद्दीने,मरण्याच्या तयारीने आले होते. काही जण तर आपल्या पत्नीचं कुंकू पुसून आले होते, “महार समाज सेवा संघाचे” प्रमुख कार्यकर्ते आड्रेकर तर स्वतःचे कफन घेऊनच आले होते.

याच २५ ते २७ डिसेंबर १९२७ ला भरलेल्या दुसर्‍या “बहिष्कृत परिषदेत” स्त्री – शुद्रातिशुद्रांवर, अमानुष जीणं लादणार्‍या, माणुसकीचे हक्क हिरावून घेणार्‍या व सनातनी विचारांचे गुणगान करणार्‍या, विषमतेचा पुरस्कार करणार्‍या, हिंदू धर्माच्या तथाकथित “पवित्र” ग्रंथाचे बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात प्रथमच जाहीर दहन महाडच्या, आजच्या “क्रांती भूमी”वर  केले. आणि धर्ममार्तंडाना, हिंदू धर्मालाच आव्हान दिले. थोडक्यात ९९ वर्षांपूर्वी याच महाड मध्ये विद्रोहाचे पाणी पेटले व सनातनी विचारांना आग लावली. आज २५ डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन, “भारतीय महिला मुक्ती दिन” म्हणूनही साजरा केला जातो.

थोडक्यात हा झाला, महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहनाचा रोमहर्षक इतिहास!

परंतु आज या जाज्वल्य इतिहासाची,वर्तमानात काय स्थिती आहे, याचाही विचार महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन स्मृती शताब्दी वर्ष साजरं करताना करणे गरजेचे आहे.

सुमारे शंभर वर्षांपूर्वी मनुस्मृती डॉ. बाबासाहेबांनी जाहीरपणे जाळली. परंतु त्याच मनुच्या अवलादी अजूनही अधिक आक्रमक होऊन दलितांवर, स्त्रीयांवर हल्ले करीत आहेत. राजस्थानच्या राजधानीत, जयपूर उच्च न्यायालयाच्या आवारात, आजही विषमतेचा पुरस्कार करणार्‍या मनुचा पुतळा पोलिस संरक्षणात, दिमाखात उभा आहे आणि त्याच राजस्थानातील एका शाळेतील इंद्र मेघवाल नावाचा दलित विद्यार्थी तथाकथित सवर्ण शिक्षकाच्या मडक्यातील पाणी प्यायला म्हणून त्या जातियवादी शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मरेपर्यंत अमानुष बेदम मारहाण केली ज्यात इंद्र मेघवाल हा कोवळा मुलगा मृत्युमुखी पडला. महाराष्ट्रातील खानदेशातील एका खेड्यात दलित समाजातील लहान मुलांनी सार्वजनिक विहिरीवर आंघोळ केली म्हणून गावातील जातियवादी, मनुच्या अवलादींनी त्या कोवळ्या मुलांना बेदम मारहाण केली होती. संविधानावर चालणार्‍या आपल्या या देशात, दलितांनी पायात चप्पल घातली म्हणून, दलित नवरदेव फेटा बांधून घोड्यावर बसला म्हणून, दलिताने मिशी ठेवली म्हणून त्याला जीवानिशी मारले जाते. काही राज्यात दलितांनी गावात पक्की घरं बांधली म्हणून, घरात नवं कपाट, सामान आणलं म्हणूनही मनुवाद्यांच्या रोषाला बळी पडावे लागते. दलितांना लहान, मोठ्या शहरात भाड्याने, तथाकथित उच्चवर्णीय घर देत नाहीत. महाराष्ट्रात व देशातील काही राज्यात दलितांना मेल्यानंतरही गाडायला, दहनासाठी जागा द्यायलाही उच्चवर्णीय तयार  नाहीत, थोडक्यात मेल्यानंतरही अस्पृश्यता, भेदभाव उघडपणे पाळला जातो.

गुजरात व अन्य राज्यांत दलित विद्यार्थ्यांनाच शौचालय साफ करण्यास सांगितले जाते. दलित समाजातील अंगणवाडी महिलांनी केलेली खिचडीचे शाळेत वाटप केले जात नाही.

आयआयटी, टीस, केंद्रीय विद्यापीठे, वैद्यकीय, इंजिनिअरिंग महाविद्यालयात, दलित विद्यार्थ्यांना विषमतेच्या वागणूकीला पदोपदी सामोरे जावे लागते, जातीय टोमणे सहन करावे लागतात. त्यामुळे अशा संस्थामध्ये दर्शन सोलंकी, डॉ. पायल तडवी सारख्या हुशार विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते. अशा संस्थांमधून व्यवस्थापना कडून होणार्‍या सामाजिक विषमतेच्या वागणुकीमुळे रोहित वेमुलासारख्या हुशार दलित विद्यार्थ्यांना संस्थांत्मक आत्महत्या कराव्या लागतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्या वेळीसच हिंदू राज्याचा धोका ओळखला होता. महाडच्या दंगलीचा संदर्भ देऊन, ते १९२७ सालीच बहिष्कृत भारतात म्हणतात,
“परवाच्या महाड येथील दंग्यातच तुमची स्वराज्यविषयक नालायकी शाबित झाली आहे. तुम्ही अल्पसंख्याक लोकांचे नागरिकत्वाचे हक्क कबूल करावयाला तयार नाही.गरीब दुबळ्या लोकांशी न्यायपुर्वक वागण्याची तुमची इच्छा नाही,मग हिंदू राज्य झाले असते तरी बहिष्कृत वर्गाची पुरी कंबख्ती भरली असती….. कलेक्टर युरोपियन… पोलिस इन्स्पेक्टर मुसलमान असे अधिकारी नसते आणि महाडच्या मुसलमानांनी आपापल्या घरातून बहिष्कृत वर्गातील स्त्रीपुरूष मंडळींना व मुलांना आसरा दिला नसता तर स्पृश्यवर्गीय म्हणविणार्‍या हिंदूंनी अत्याचाराची कमाल केली असती.”
(बहिष्कृत भारत १९२७)

आरक्षित जागांवर नोकर्‍या करणार्‍या दलित, आदिवासींना “सरकारी जावई” म्हणून हिणवले जाते. काहींना छुप्या जातीवादाला तोंड द्यावे लागते.

खैरलांजीपासून ते उत्तर प्रदेशातील हाथरस, सारख्या दलित महिलांवरील बलात्कार, अत्याचाराच्या घटना अलीकडे राजरोस घडत आहेत. पीडितांना न्याय मिळणे तर दूरच त्यांच्या वरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार्‍या, आक्रोश करणार्‍या कुटुंबियांनाही उच्चवर्णीय गुन्हेगार जीवंत जाळीत आहेत, त्यांचे मुडदे पाडत आहेत.आणि धर्मांध सत्ताधार्‍यांच्या तालावर नाचणारी पोलिस व न्याय यंत्रणा, प्रशासन केवळ मूक दर्शक बनले आहेत. 

ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून सामाजिक समतेचा, धर्मनिरपेक्षतेचा, विज्ञाननिष्ठ विचारांचा पाया घालण्याचा प्रयत्न, भारतीय संविधानाद्वारे केला. आज तीच संविधान मूल्य धर्मांध सत्ताधारी,रोज पायदळी तुडवीत आहेत. अध्यात्मिक विचार शिकविण्याच्या नावाखाली, छुप्या पद्धतीने “मनुस्मृती”चा महाविद्यालये, विद्यापीठ अभ्यासक्रमात घुसविण्याचा व मनुस्मृती चा गौरव करण्याचे कारस्थान शैक्षणिक संस्थांमध्ये सत्ताधार्‍यांच्या आशिर्वादाने सुरू आहे. “कौशल्य विकास”च्या नावाखाली पारंपरिक जातीव्यवसायाचे गौरविकरण करुन, जातीव्यवस्था अधिक बळकट करण्याचा संघ परिवाराचा छुपा अजेंडा सरकार शिक्षणाच्या नावाखाली राबवित आहे. सार्वजनिक उद्योगांचे, सरकारी शैक्षणिक संस्थांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण, कंत्राटीकरण करुन, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसींच्या शैक्षणिक, नोकरीच्या क्षेत्रातील संविधानाने दिलेल्या आरक्षणावर गदा आणली जात आहे. दुसरीकडे तळागाळातील दलित जात समुहातील खोट्या जातीय अस्मिता फुलवून, जाती वर्गिकरणाचे बिनबुडाचे मुद्दे उकरून काढून जातीय सलोखा संपवून, जातीय वैमनस्य वाढविण्याचा सरकारचा व संघ परिवाराचा प्रयत्न आहे. आदिवासी समुहामध्येही असेच प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. अलिकडेच मणिपूरमध्ये दोन जमातींमध्ये कसे वैमनस्य वाढविले, हे ठळक उदाहरण आहे.

ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने आधुनिक मानवी मुल्यांचा पुरस्कार केला व ती मूल्ये संविधानाच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यावरच आता धर्मांध हल्लाबोल करून हिंदू राष्ट्राच्या वल्गना करत आहेत.

डॉ. बाबासाहेबांनी काळा राम मंदिर आंदोलनानंतर हिंदू धर्मातील जातीव्यवस्था व विषमतेच्या विरोधात १९३५ साली नाशिक जवळील येवला येथे घोषणा केली की, “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही” आणि नंतर सुमारे २१ वर्षांनी, विषमतेचा पुरस्कार करणार्‍या हिंदू धर्माचा त्याग करून, समतेचा, विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार करणार्‍या बौद्ध धम्माचा स्वीकार केला. तसेच धम्म दिक्षेप्रसंगी २२ प्रतिज्ञाही लोकांना घेण्यास सांगितल्या, ज्यात हिंदू देव, देवतांना मानणार नाही, त्यांची पूजा अर्चा करणार नाही आदी गोष्टी वदवून घेतल्या व हिंदू धर्माशी, रुढी परंपरांशी फारकत घेतली.

आज संघ परिवार व सत्ताधारी महाड चवदार तळे शताब्दी उत्सव, इव्हेंट साजरा करीत आहेत. तसेच समतेची नव्हे तर “समरसतेची” भाषा बोलत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, धर्मांध, हिंदू राष्ट्राची वल्गना करणार्‍या गोळवलकर, हेडगेवार, सावरकरांच्या पंक्तीत बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत.  संघ परिवाराचे हे ब्राम्हणी कटकारस्थान पुरोगाम्यांनी व स्वतःला आंबेडकरी म्हणवणार्‍यांनी हाणून पाडायला हवे. आणि महाड तळे सत्याग्रह शताब्दी उत्सव साजरे करणार्‍या सरकारला जाब विचारायला हवा ,की हे सरकार आगामी २५ डिसेंबरला देशभर “मनुस्मृती दहन दिन” साजरा करणार का..? तसेच या शताब्दी वर्षात, राजस्थानाच्या कोर्टातील मनुचा पुतळा हटवणार का?

– सुबोध मोरे

लेखक संपर्क : ७७०९८ ७६०२९

(लेखक डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]