-
प्रति
मा. जिल्हाधिकारी,
जिल्हा :
विषय : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडण्याबाबत…
महोदय,
या २० ऑगस्ट २०२३ ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. त्याविषयी खटला अजून चालू आहे. या खुनाचा तपास वीरेंद्र तावडे या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत, तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरलेली आहेत. बंगळुरू येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार कॉ. पानसरे यांच्या खुनासाठी वापरलेले एक पिस्तूल प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठी देखील वापरले आहे. या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी २०२० मध्ये झालेली आहे. कर्नाटक एस.आय.टी.ने झारखंड या राज्यातून ऋषिकेश देवडीकर या गौरी लंकेश खुनातील संशयित आरोपीला अटक केलेली आहे. तो तेथे पेट्रोल पंपावर काम करत होता, यावरून हे खून करणार्या गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात येईल. सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सदर खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आलेला आहे व त्यातून हे स्पष्ट झाले आहे की, ही फक्त खुनाची घटना नसून हे दहशतवादी कृत्य आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना Unlawful Activities Prevention Act 1967 हा कायदा लावण्यात आलेला आहे.
पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे अन्यथा, देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. त्यामुळे या खुनाच्या मागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करीत आहोत.
– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती