-
कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय, तलासरी (जि. पालघर) यांचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने 11 जून रोजी दृष्टिदान दिवसानिमित्त ‘नेत्रदान- एक राष्ट्रीय गरज’ या विषयावर नेत्रदान क्षेत्रात 40 वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीपाद आगाशे यांच्या जनजागृतीपर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
नेत्रदान का करावे? कोण, कधी, कसे, कोठे करू शकतो? त्यासाठी काय-काय करायला लागतं? डोळ्यांसाठी आपल्याला श्रीलंकेवर का अवलंबून राहावे लागते?
या आणि अशा अनेक प्रश्नांच्या समाधानकारक उत्तरांसाठी हा वेबिनार महत्त्वाचा ठरला.
नेत्रदानास कुठलेही धार्मिक बंधन नाही. नेत्रदानासाठी आधी नोंदणी करणे मुळीच बंधनकारक नाही. अपघातात गेलेल्या व्यक्तीचे नेत्रदान स्थानिक पोलीस अधिकार्यांच्या परवानगीने होऊ शकते; तसेच ज्यांचे नेत्रपटल चांगले आहे. परंतु इतर कारणांमुळे अंधत्व आलेल्या दृष्टिहीन व्यक्तींचेही नेत्रदान होऊ शकते, अशा विशेष बाबीही त्यांनी सांगितल्या.
दृष्टिहीनांच्या वाढत्या संख्येकडेही लक्ष वेधून त्यांनी यामागची विविध कारणेही सांगितली; तसेच नेत्रसुरक्षेचे विविध उपायही आवर्जून सांगितले. जसे की –
– डोळ्यांत कचरा जाऊ नये म्हणून दुचाकी चालवताना, गवंडीकाम; तसेच शेतीची काही कामे करताना चष्मा किंवा गॉगल वापरावा
– रंगपंचमीला बेसुमार रंग फासू नयेत, फुगे मारू नयेत.
– दिवाळी; तसेच विविध निमित्ताने बेदरकारपणे फटाके लावू नयेत.
– मुलांनी स्टीलच्या फूटपट्ट्यांनी मारामार्या करू नयेत.
– डोळे आल्यास वाटेल ते आय ड्रॉप्स न वापरता निदान डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावेत, आडगावात असाल तर स्वच्छ पाण्याने दिवसातून 5-6 वेळा डोळे धुणेही उपयुक्त ठरू शकते.
– संगणक किंवा मोबाईलचा अतिवापर आणि अंधारातही वापर करू नये, लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये.
श्रीलंकेत सक्ती नसूनही तेथील बौध्दधर्मीय 100 टक्के नेत्रदान करतात. त्यांचा आदर्श भारतातील सर्वधर्मियांनी घ्यावा. आपले अमूल्य नेत्र जाळले, पुरले जाण्यापेक्षा ते दान करावे. जीवनभर समाजासाठी काही केले नाही तरी निदान मरणोत्तर नेत्रदान करून दोन दृष्टिहीन देशबांधवांना अमूल्य दृष्टी द्यावी. नेत्रदानासारख्या साध्या बाबीतही भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वांनीच पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केलो. नेत्रदानावरील दोन स्वरचित कविताही सादर केल्या.
सविस्तर माहिती तसेच शंका समाधानासाठी त्यांचा संपर्क क्रमांक – 9969166607