डॉ. प्रदीप पाटील -

आध्यात्मिक खयाली पुलाव खाणार्यांची संख्या कमी नाहीय. यांचे ‘साक्षात्कारी’ मनोरथ उधळले की, वैज्ञानिक दृष्टिकोनास चिरडून टाकण्याचे ‘शुभ’कार्य घडते. मुलांचे आयुष्य घडविणारे शिक्षक आणि शिक्षण आता महाराजांचे ‘दृष्टांत’ उजळू लागले आहेत. स्वप्नात येऊन महाराज कोरोनावर औषध सांगतात आणि सरकार दखल घेते, यात एक मोठ्ठा मानसिक ‘लोच्या’ आहे.
आपले महाराज-बुवा-गुरू आपल्या समस्या सोडवतात, अशी एक आवडती ‘समजूत’ आपण घट्ट केलेली असते. ते ‘विघ्नहर्ता’ आणि आयुष्य घडविणारे असतात, अशी निराधार समजूत प्रबळ असते. या समजुतीस आपल्या ‘इच्छा’ सतत खतपाणी घालत असतात.
आपली आजची सर्वोच्च इच्छा आहे की, कोरोनावर औषध निघावे. सर्वोच्च इच्छा किंवा मनात बाळगलेल्या ठळक इच्छा या आपण झोपल्यावर आपल्या स्वप्नात अवतरतात. इच्छा स्वप्नात अवतरणे, हा मेंदूकार्याचा एक भाग आहे. त्यामुळे स्वप्नं बहुसंख्य लोकांना पडतात. ते नॉर्मल आहे. नॉर्मल हे नाही की, त्या स्वप्नाचा काहीही अर्थ लावणे. कारण अर्थ लावणारे आपण स्वप्नवालेच. आपल्या मनी जे वसे, तोच अर्थ दिसे! मग तो शिक्षक असो नाही तर डॉक्टर.
तो जो अर्थ लावतो, तो त्याच्या इच्छेचे रूप असते. त्यास हवेतल्या इमल्याचे विचार किंवा विशफुल थिंकिंग म्हणतात. हा विचारदोष आहे. कारण आपण जो अर्थ काढतो, तो बिनबुडाचा आणि बिनपुराव्याचा असतो. ज्यास अवास्तव आशावाद किंवा ‘अनरियालिस्टिक ऑप्टिमिझम’ म्हणतात. हा दोष मनात भिनला की, साक्षात्कार सुद्धा होतात. सारासार विचार करण्याची क्षमता अशा वेळी संपलेली असते. यास ‘कॉग्निटिव्ह बायस’ म्हणतात. त्यातून आपण काय दावे करतोय, याचे भान राहत नाही. वैज्ञानिक वृत्तीचे व्यवधान नसते; मग आंधळे दावे, भविष्यवाणी सारे काही सुरू होते. भारतातीलच फक्त बुवा-गुरू-महाराजांमध्ये हा ‘विशफुल थिंकिंग’चा…हवामहली विचारदोष नाहीय्ये, जगातील सर्व धर्मातल्या बुवा-महाराजांत तो आहे.
हवामहली विचार जेव्हा दैनंदिन व्यवहारात कोणीतरी व्यक्त करतो, तेव्हा आपण म्हणतो, वेड लागलंय का तुला? म्हणजे हवामहली विचारविकृती आपण निदर्शनास आणतो. हाच नियम दृष्टांत, भविष्य सांगणार्या सर्वांसाठीही आहे.
पुराव्यानिशी अर्थ काढणे, यासाठी आपणाकडे विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध झालेले ज्ञान असावे लागते आणि नेमकं इथंच आध्यात्मिक/धार्मिक ज्ञान गोत्यात येतं. कारण धर्मग्रंथांचे बहुसंख्य ‘ज्ञान’ आणि विज्ञान यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे! आणि जे ग्रंथप्रमाण्यवादी असतात, ते हवामहली विचारदोषात सहजपणे अडकतात. कारण स्वर्ग, नरक, पाप-पुण्य, तंत्र आणि मंत्र, अशांनी ते ग्रस्त असतात. मग कोरोनाबाधितांसाठी मुळी-झाडपाल्यांपासून गोमूत्रापर्यंत सारे उपाय ओसंडून वाहतात. वैज्ञानिक म्हणवणारे जे हवामहली विकृतीने बाधलेले असतील, तर ते यज्ञातून पॉझिटिव्ह एनर्जी काढतात, मंत्रातून व्हायब्रेशन्स निर्माण करतात, तुळशीचे आणि ओझोनचे लग्न लावतात… यादी खूपच मोठी आहे.
याचा अर्थ, हवामहली विचारविकृतीशी लढायचं आहे. त्यांना मानसोपचाराचा मार्ग दाखवावा लागेल. हवामहली विचारविकृती ओळखण्यासाठी चाचण्या आहेत, ज्यास ‘अँबुगस स्टडीज’ म्हणतात.
विचारवैद्यांशी सत्संग हा त्यांच्या विकृतीमुक्तीचा मार्ग आहे!
…आणि कोणत्याही देशाने हा हवामहली उपचार कोरोनामुक्तीसाठी स्वीकारला तर तो संपूर्ण देश संपूर्ण मानवमुक्त होईल, यात शंका नाही.