नरेश आंबीलकर - 9423112181

जादूटोण्याच्या संशयावरून चौघांची विवस्त्र धिंड काढून बेदम मारहाण करण्याची घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे शनिवार दि. 25 जुलैला रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गावातील 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 22 जणांना अटक करण्यात आली आहे. या घृणास्पद घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधीकारी राजापूर येथे तळ ठोकून आहेत.
कचरू फत्तू राऊत (वय 60), ओमप्रकाश सदाशिव मेश्राम (वय 27), कुंदन भोजराम गौपाले (वय 40), मनोहर बळीराम गोटे (वय 70) अशी पीडितांची नावे आहेत. गत आठवडाभरापासून गावातील एका महिलेची प्रकृती ठीक नव्हती. औषधोपचार करूनही तिला बरे वाटत नव्हते. दरम्यान, तिच्या अंगात येऊ लागले. तिने गावातील या चौघांची नावे सांगून ते जादूटोणा करीत असल्याचे सांगितले. त्यावरून गत गुरुवारी गावकर्यांची बैठक घेण्यात आली. या चौघांना बैठकीला बोलाविण्यात आले. त्यावेळी ओमप्रकाश आणि कचरू बैठकीला उपस्थित होते. त्यांना समजही देण्यात आली. मात्र महिलेच्या अंगात येण्याचा प्रकार काही थांबला नाही. एवढ्यातच शनिवारी, नागपंचमीदिवशी पुन्हा हा प्रकार सुरू झाला. गावकरी एकत्र आले आणि ओमप्रकाश, कचरू, कुंदन आणि मनोहर या चौघांना त्यांच्या घरातून पकडून चौकात आणले. त्यांच्या अंगावरील कपडे काढून रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. हातपाय बांधून त्यांची गावातून विवस्त्र धिंड काढण्यात आली. हा प्रकार गावकरी उघड्या डोळ्याने बघत होते. तेवढ्यात गोबरवाही पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक गावात पोेचले. मात्र गावकर्यांनी पोलिसांच्या वाहनालाही घेराव घातला. दरम्यान, पोलिसांनी या चौघांची गावकर्यांच्या तावडीतून सुटका केली. बेदम मारहाणीत चौघेही जखमी झाले असून त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कचरू राऊत यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून योगेश चोपकर, देवा चोपकर, रवी राऊत, महेंद्र राऊत, अविनाश मेश्राम, मच्छिंद्र परबते, निरंजन परबते, सुखदेव परबते, राजकुमार घोनाडे, राजेंद्र गुर्जर, प्रतीक मकराम, प्रवीण परबते, विशाल मेश्राम, आकाश वघारे, रिची डोंगरे, शिशिर डोंगरे, आशा चोपकर, मनीषा चोपकर, सुनंदा झोडे, शामकला राऊत, जयकला राऊत, विनिता परबते, ओमकला झोडे सर्व रा. राजापूर आणि नौशाद पठाण रा. गोबरवाही यांच्याविरुध्द भादंवि 307, 353, 341, 323, 324, 143, 148, 149, 504 सहकलम 2(1) (ख), 7, महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी 22 जणांना पोलिसांनी रविवारी (दि. 26) अटक केली. लाकडी काठ्या, प्लास्टिक बॉटल, रॉकेल व पेट्रोलच्या रिकाम्या बॉटल, नॉयलॉन दोरी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख गजानन कंकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी राजापूर येथे तळ ठोकून आहेत.
‘त्या’ महिलेवर कारवाईची व गावच्या पोलीस पाटील
यांच्या निलंबनाची मागणी
अंनिसच्या कार्यकर्त्यांची राजापूर गावाला भेट
पत्नीवर करणी केली म्हणून पतीने व गावकर्यांनी केली गावातील चारजणांना बेदम मारहाण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न राजापूर या गावात करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्यांनी राजापूरला भेट देऊन सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यात कसूर करणार्या पोलीस पाटलांना निलंबित करण्याची; तसेच ज्या महिलेमुळे हे प्रकरण घडले, त्या महिलेवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील राजापूर येथील चारजणांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण करून पेट्रोल घालून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कुंदन गोपाले यांनी सांगितले की, जिवतीच्या दिवशी दि. 20 जुलैला सुषमा चोपकर ही त्याच्या घरी आली व अंगात आल्याचे भासवून बेशुद्ध पडली. त्यानंतर ती ओमप्रकाश मेश्राम व कचरू राऊत यांच्या घरी जाऊन तेथेही ते बेशुद्ध पडली. सुषमाचा पती योगेश व इतरांनी, ‘तुम्ही तिघांनी सुषमावर करणी केली, आता तुम्हीच तिला दुरुस्त करा. ती दुसर्यांच्या घरी न जाता तुमच्या घरी का आली,’ असा आरोप केला. याप्रकरणी कुंदन गोपाले यांनी गावातील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष वाघमारे यांची भेट घेऊन ‘तुम्ही निर्णय द्या’ अशी विनंती केली. 21 जुलैला यासाठी हनुमान मंदिराजवळ सभा बोलविण्यात आली होती. यावेळी सरपंच मरकाम व ग्रामपंचायत सदस्य; तसेच 300 गावकरी उपस्थित होते. मात्र यावेळी कोणीही कुणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. याप्रसंगी ओमप्रकाश मेश्राम याला मारहाण करण्यात आली. यानंतर ती सभा बरखास्त झाली. 25 जुलैला नागपंचमीच्या दिवशी सुषमाचा पती योगेश चोपकर व इतर लोक ओमप्रकाश मेश्राम यांच्या घरी आले. त्याला बाहेर काढून मारहाण करू लागले. पतीला मारहाण होत असताना त्याची पत्नी ही पोलीस पाटील डोंगरे यांच्या घरी गेली. मात्र पोलीस पाटलाने तिच्यासोबत येण्यास किंवा पोलिसांना कळविण्यात साफ नकार दिला. त्यानंतर ती तंटामुक्त गाव समिती अध्यक्षांकडे गेली असता, ‘आम्ही न्याय करू शकत नाही,’ असे म्हणून त्यांनी तिला परत पाठविले. ओमप्रकाश मेश्राम, कचरू राऊत यांना मारहाण करीत चौकात आणण्यात आले. त्यानंतर मनोहर गोटे यांना घरातून बोलावून त्यालाही मारहाण करण्यात आली. कुंदन गोपाले हा गोबरवाही या गावी गेला होता त्याला गावातून संध्याकाळी फोन आला की, ‘तुम्ही गावात येऊ नका. गावातील वातावरण खराब झालेले आहे.’ कुंदन त्यानंतर पोलीस स्टेशनला गेला व घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी ‘तुला मारहाण झाली नाही तर तू कशी तक्रार देऊ शकतो,’ म्हणून त्याला जाण्यास सांगितले. रात्री बारा वाजता गावातील काही लोक कुंदनला घेण्यासाठी होते. कुंदन गोपाले गावात येताच त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर सर्वांचे कपडे काढून पेट्रोल टाकून ते कपडे जाळण्यात आले. चारही जणांच्या अंगावर पेट्रोल घालण्यात आले होते. मात्र पावसाची जोरदार सर आल्याने त्यांना आग लावता आली नाही. याच वेळी कुंदन गोपाले याच्या पत्नीने पोलीस स्टेशन गोबरवाही येथे फोन करून पोलिसांना लवकर येण्याची विनंती केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. पोलीस पाटील; तसेच या करणीसाठी कारणीभूत महिलेवर कारवाईची मागणी करून जादूटोण्याचा संशय व्यक्त करणार्या सुषमा चोपकर हिच्यावर पोलिसांनी अद्यापही गुन्हा नोंदविला नाही. तिच्या संशयामुळे चार जणांना मारहाण करण्यात येऊन त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. पोलीस पाटील यांनी याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना निलंबित करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, भंडारा यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. राजापूर येथील प्रकरणाच्या माहितीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, प्रा. नरेश आंबीलकर प्रा. युवराज खोब्रागडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला व अन्यायग्रस्तांना भेट देऊन यासंदर्भात विचारपूस केली.