एक अध्याय निकालामुळे संपला

मिलिंद देशमुख -

दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी शिवाजीनगर विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. पी. पी. जाधव यांनी १० मे २०२४ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याचा निकाल देण्यात येईल, असं सांगितलं. दिनांक ८ मे पासून प्रसारमाध्यमातील अनेक प्रतिनिधींचे मला फोन येत होते. काय वाटतं? कोणाला शिक्षा होणार? किती होणार? महाराष्ट्र अंनिसची प्रतिक्रिया काय असेल? असे प्रश्न विचारत होते. निकाल आल्यावरच आम्ही प्रतिक्रिया देऊ, आमचा संविधानावर व न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे, असे मी त्यांना सांगत.

१० मे या दिवशी हमीद व मुक्ता यांच्याबरोबरच राहुल थोरात, फारूख गवंडी, राजू देशपांडे, मेधा पानसरे इत्यादी अनेक जण पुण्यात आले होते. १३ मे ला पुण्यात निवडणूक होणार होती. त्यासाठी अनेक मोठमोठ्या सभापण पुण्याच्या आसपास होत होत्या, तरी डॉ. दाभोलकरांच्या केसबाबत बातम्या घेण्यासाठी अनेक पत्रकार शिवाजीनगर कोर्ट परिसरात जमलेले होते. कोर्टात बरीच गर्दी होणार हा अंदाज आधीच असल्याने पावणे अकरालाच मी कोर्टात पोहचलो. नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ असे अनेक कार्यकर्ते आधीच आलेले होते. खुनाला जवळपास अकरा वर्षे होत आलेली होती. आरोपी सापडावे, त्यामागील सूत्रधार सापडावे यासाठी आम्ही पुण्यात अनेक आंदोलने केली होती. १० जून २०१६ या दिवशी सर्वप्रथम डॉटर तावडे यांना पनवेल येथील सनातनच्या आश्रमातून अटक झाली. पुण्यातील वेगवेगळ्या कोर्टात वेगवेगळ्या न्यायाधीशासमोर या केसची सुनावणी होत होती. मी नेहमीच जात होतो. दोन वर्षे काहीच प्रगती झाली नाही. ऑगस्ट २०१८ ला सचिन अंदुरे व शरद कळसकरला अटक केल्यानंतर सीबीआयने त्यांनीच डॉ. दाभोलकरांना मारले असा दावा केला. २५ मे २०१९ रोजी विक्रम भावे व अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना देखील आरोपी केले गेले. संजीव पुनाळेकर हे ह्या खून प्रकरणात जवळपास ४० दिवस तुरुंगात होते. विक्रम भावे दोन वर्षे तर डॉ. तावडे हे आठ वर्षे तुरुंगात होते. तुमच्याबद्दल संशय असूनही तुमचा सहभाग सिद्ध करणारे पुरावे सादर करण्यात फिर्यादी कमी पडल्यामुळे तुम्हाला सोडण्यात आल्याबाबत न्यायमूर्तींनी सांगितले व दाभोलकरांच्या खुनाचे समर्थन केल्याबद्दल सनातनच्या वकिलांना समज दिली. तसेच पुनाळेकरने केसचे आय. ओ. एस. आर. सिंह यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले.

न्यायाधीशांनी सचिन अंदुरे व शरद कळसकर या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा दिली. त्यानंतर काही प्रमाणात का होईना, एक समाधानाची भावना मनात आली. कारण प्रत्येक तारखेला देहू रोडवरून कोर्टात जाणे ही एक साधनाच होती. १५ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झालेली केस सुनावणीस आल्यावर अनेक वेळा सकाळी अकरा ते साडेपाचपर्यंतही थांबावे लागले. जाधव सरांच्या आधी मा. सत्यनारायण नावंदर सर यांच्यापुढेही सुनावणी सुरू होती. एकदा तर सनातनच्या वकिलांनी एका आय विटनेसला “मिलिंद देशमुख तुम्हाला भेटले होते का?” असे विचारले व त्यांनी ‘हो’ म्हणताच यावर अंनिसचे कार्यकर्ते साक्षीदारांवर दबाव आणतात असा आरोपही केला. नावंदर सरांनी मला तुम्ही भेटले होते का असे विचारले, तेव्हा मीही ‘हो’ असे सांगितले. नंदिनी जाधव व मी त्यांना भेटलो होतो कारण साक्ष देण्यासाठी ते घाबरत होते. तेव्हा तुम्ही न घाबरता साक्ष द्या, पोलीस तुम्हाला संरक्षण देतील असे सांगण्यासाठी भेटलो. अर्थात, नावंदर सरांनी यात काही गैर नसल्याचे सांगितले. या प्रसंगानंतरही मी प्रत्येक तारखेला नेहमीच जात असे. सनातनचे वकील, आरोपी व त्यांचे नातेवाईक, तसेच सीबीआयचे सर्व जण मला व नंदिनीला हे कामकाज बघण्यासाठी येत असतात ते जाणून होते. अंनिसचे विश्वस्त अरविंद पाखले हेही अनेकदा येत असत. कोर्टात सनातनच्या वकिलांनी अनेक चीड येणारे आरोप केले. पण अत्यंत शांतपणे मी या सर्व प्रकाराकडे पाहत असे. डॉ. दाभोलकरांच्या संबंधित अनेक वस्तू जसे डायरी, चष्मा, चप्पल, कपडे, बुलेटस्चे फोटो दाखवले गेले त्या वेळी मनाला अत्यंत वेदना होत होत्या. आपल्या खटल्यात अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी, त्यांचा मुलगा सिद्धांत व इतर सहकारी याशिवाय अ‍ॅड. ओंकार नेवगी हे आपल्यातर्फे बाजू मांडत होते. ३५ साक्षीदारांपैकी २० साक्षीदार तपासले गेले. विशेष म्हणजे सर्व साक्षीदारांनी चांगली साक्ष दिली आणि त्यांना त्रास देणारे अनेक प्रश्न सनातनच्या वकिलांनी विचारले. त्यांचा भरपूर वेळ घेतला. विनाकारण साक्षी लांबवल्या. डॉ. दाभोलकरांच्या ह्या खटल्यात चार साक्षीदार हे विरुद्ध विचारसरणीचा प्रभाव असलेले होते. तरी पण त्यांनी प्रामाणिकपणे साक्ष दिली. त्यामुळे ह्या खटल्याचा निकाल काही प्रमाणात आपल्याकडून लागला. मी यापुढे तुमच्याबरोबर अंनिसचे काम करेन असेही मला सांगितले. हा डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा विजय आहे असे मला वाटते. सनातनचे वकील कोर्टात साक्षीदारांना खूपच धारेवर धरण्याचा प्रयत्न करत असत. अ‍ॅड. सूर्यवंशी सरांबरोबर त्यांची बरीच खडाजंगीसुद्धा होत असे. पण कोर्टाबाहेर एकदम सूर्यवंशी सरांशी चांगल्या गप्पा मारत असत. माझ्याबरोबरही बाहेर ते चांगलेच बोलत असत. केसचा निकाल लागल्यावर कोर्टाबाहेर आल्यावर अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी मला व नंदिनीला ‘हे पर्सनल नाही, प्रोफेशनल आहे’ असे सांगितले. मी पण त्यांना ‘हा निकाल अंतिम नाहीये, असे म्हटले.

एकदा सनातनच्या वकिलांनी दाभोलकर कसे वागत असत हे दाखवण्यासाठी एका अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एका अंकावरील मुखपृष्ठ दाखवून हिंदू धर्माची हे चेष्टा करतात असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो अंक २०१८ चा होता, हे सूर्यवंशी सरांनी दाखवले व त्यामध्ये डॉ. दाभोलकरांचा कसा हात असू शकतो? असे विचारले. मग त्यांना त्यांची चूक कळली.

कोर्टातील कामकाजाबाबत पुण्यातील पेपरमध्ये नियमित बातम्या येत होत्या. पूर्वी अनेक पत्रकार सुनावणीच्या वेळी उपस्थित असावयाचे. बसण्यास जागा मिळत नसे, मग उभे राहून कंटाळा येत असे. एकदा नावंदर सरांनी पत्रकारांना तुम्ही सर्व जण येण्यापेक्षा दोघे-तिघेजण येत जा असे सांगितल्यावर ही संख्या कमी झाली. अनेकदा सर्वसामान्यांना कोर्टामध्ये काय चालले हे नीट आकलन होत नसे. अनेकांना तर डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडले गेले, कोर्टात केस आहे हेच लोकांना माहीत नव्हते. मी भेटल्यावर ते मारेकरी कधी सापडणार? असे मला विचारत तेव्हा त्यांना हे सगळं सांगावं लागत होते. कोर्टातील प्रत्येक साक्षीच्या वेळी अनेक गोष्टी घडल्या. सर्वच काही लिहिणे शय नाही. मात्र जे साक्षीदार होते त्यांनी जी साक्ष दिली, आपल्या वकिलांनी जो युक्तिवाद केला त्या सर्वांमुळे हा निकाल लागला. घरात अनेक अडचणी असताना देखील मी कधीही कोर्टाची तारीख चुकवत नसे. शेवटच्या काही तारखांच्या वेळी वडील जवळपास तीन महिने दवाखान्यात ट्रीटमेंट घेत होते. मला रोज हॉस्पिटलमध्ये थांबावे लागत असे, पण कोर्टाची तारीख असली की मी बहिणीला त्या दिवशी वडिलांपाशी बसवत असे, पण तारीख चुकवत नसे. डॉटर दाभोलकरांचा खून झाला त्या दिवशी डॉ. दाभोलकर व मीच पत्रकार परिषदेला असणार होतो. २० ऑगस्ट २०१३ च्या दिवशी डॉ. दाभोलकरांनी प्रेसनोट सही करून टेबलवर ठेवली होती. त्या दिवसापासून ज्या प्रकारे वेगवेगळ्या बातम्या पेपरमध्ये येत होत्या त्याचा एक अध्याय ह्या निकालामुळे संपल्यासारखे वाटते. सर्वच प्रसारमाध्यमांनी या प्रकरणात चांगली साथ दिली त्या सर्वांचे मनापासून आभार…

– मिलिंद देशमुख


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]