बाबासाहेब सर्वांचेच

अजय कांडर - 9404395155

1990 नंतरच्या काळात ठाम वैचारिक भूमिका घेऊन कविता लिहिणार्‍या मराठी कवींतील महत्त्वाचा कवी. ‘आवनओल’, ‘हत्ती इलो’ आणि ‘युगानुयुगे तूच’ हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध. ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता हत्ती हे रूपक घेऊन आजच्या ढासळत्या समाजव्यवस्थेवर भाष्य करते, तर ‘युगानुयुगे तूच’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याला मध्यवर्ती ठेवत लिहिलेली दीर्घ कविता आहे.

` मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे कसा वळलो, हे सांगताना मला माझ्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कवितेची निर्मितीप्रक्रिया इथे सांगावी लागेल. कोणत्याही कवितेची निर्मितीची प्रक्रिया हा खूप मोठा विषय आहे. केवळ माझ्यासाठीच नाही, तर एकूणच कविता लिहिणार्‍यांत सगळ्यांसाठीच. याची कोणती कारणे असतील, असा विचार केल्यास प्रामुख्याने एक कारण आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे कोणतीही कविता सुचली आणि लगेच लिहिली, असं जरी साधारण होत असलं तरी ती लिहिण्यामागची मानसिकता ही तुमच्या आधीच्या जगण्याशी निगडित असते. या लिहिण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक घटक येत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या ‘युगानुयुगे तूच’ कवितेचा आपल्याला सकारात्मक विचार करावा लागेल आणि हा विचार करत असताना त्याच्या मुळाशी जावं लागेल. हे मुळाशी जाणं म्हणजे नेमकी कोणती गोष्ट आहे? माझे कविमित्र कालकथित अरुण काळे म्हणतात, “कोणी अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहीत नाही.” कवी काळे यांचं हे म्हणणं शंभर टक्के खरं आहे. अक्षर सुधारण्यासाठी कोणी कविता लिहित नाही, तर माणसं सुधारण्यासाठी, त्यांच्यातील संवाद वाढत जावा, माणसामाणसांतील भेद नष्ट व्हावा म्हणून कविता लिहायची असते.

बाबासाहेबांवर लिहिलेल्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कवितेच्या निर्मितीप्रक्रियेचा विचार करताना माझा पूर्वेेतिहास मला तपासावा लागेल. या समाजात जात आहे, धर्म आहे आणि त्यातून निर्माण झालेले वेगवेगळे भेद आहेत. एवढंच नाही, तर जातिअंताची चळवळ राबवणार्‍या समूहामध्ये जातीचे छोटे-छोटे गट आहेत. त्यात कमी-अधिक मानणारे आहेत. अशावेळी आपल्याला बुद्धाकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि बुद्धापर्यंत आपल्याला जायचं असेल, आजच्या समाजाला अनुकरणातून बुद्ध सांगायचा असेल तर एखाद्या महामानवाला लोक दैवत मानतात, त्याचा आधार घ्यावा लागेल. खरं तर माझ्यासारखा कवी महामानवांचे दैवतीकरण होऊ नये, असाच विचार करतो. पण तुम्ही तसे मानत असाल तर माझ्या लेखी त्या महामानवांचे विचार तुमच्या अनुकरणात दिसले पाहिजेत. ते जगण्यात आले पाहिजेत. मी जो कवितेचा शब्द तुमच्यासमोर बोलतो, तो माझ्या कृतीतून दिसला पाहिजे. समजा मी बाबासाहेबांच्या विचारांची कविता लिहितो, तो विचार तुमच्यासमोर सांगतो आणि उद्या जर मी ती कृती प्रत्यक्षात जगण्यात अवलंबिली नाही तर मी माणूस म्हणून खोटा आहे. त्यामुळे केवळ ‘युगानुयुगे तूच’ हीच कविता नव्हे, तर कोणतीही कविता लिहिण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे बाबासाहेबांवर कविता लिहिताना मला बुद्धाकडे जावंसंं वाटलं आणि बुद्धविचार पोेचविण्यासाठी परत बाबासाहेबांकडे यावं लागतं. मला हे जाती-धर्माचे बांध फोडता यायला हवेत, असं वाटतं. अर्थात, हे कसं शक्य होईल? हा प्रश्न निव्वळ माणूस म्हणून जगणार्‍या प्रत्येकासमोर असतो, तसा तो माझ्यासमोर आहे आणि त्यातला एक पर्याय म्हणून ‘युगानुयुगे तूच’ या कवितेची निर्मिती होय! मी जेव्हा बाबासाहेबांची कविता लिहिताना विचार करत होतो, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, एखाद्या विशिष्ट जाती-धर्मातील लोकांपर्यंत उद्या बाबासाहेबांचा विचार पोेचवायचा असेल तर त्याच जाती-धर्माच्या महामानवाला आपल्याला आधी शोधावे लागेल, त्याला जोडून घेता आले पाहिजे; म्हणजे असं म्हणता येईल की, प्रत्येक धर्मात कोणता तरी महामानव जन्माला आलेला असतो. बुद्ध मला आवडतो, बाबासाहेब आवडतात आणि या दोघांनाही जोडणारा आणखी एक महामानव म्हणजे कबीर. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की, कबीर मला माझ्या जवळचा वाटतो. कबीराने बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेला होता. हे जे एकात्मतेचे संघटन असते किंवा बांधणी असते, ती मुळातच असते. ती बांधणी फोडणारा वर्ग मात्र दर काळात कार्यरत असतो. त्यामुळे याची पुनर्बांधणी कवीला आपल्या कवितेतून चांगल्या प्रकारे करावी लागते आणि कवी हा एक प्रकारे आपल्या कवितानिर्मितीतून त्या काळाचे राजकारणच खेळत असतो. मला नेहमी असं वाटतं की, राजकारण हे तुमच्या जगण्याला चिकटूनच आलेलं असतं. दिवसभरात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी खोटं बोलत असाल तर तेही एक राजकारण असतं.

क्षणाक्षणाला जगण्यातील बदलणारे राजकारण तुम्हाला कळत नसेल, तर कवितेतून होणार्‍या समाजबदलासाठी तुम्ही शब्द देऊ शकत नाही. याच्या मुळाशी मला बाबासाहेबांची कविता घेऊन जावी, असं वाटलं. मी तीस वर्षांपासून कविता लिहितो, सार्वजनिक जीवनात काम करतो. परंतु हे ‘युगानुयुगे तूच’ कवितेचा संग्रह येईपर्यंत कुणाला माझ्या जातीचा शोध घ्यावा वाटला नाही. मी हिंदू आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. आपल्या ठराविक कृतीतून ते कळतंही. परंतु मी सगळ्या बहुजन वर्गामध्ये कार्यरत असल्याने जातीचा प्रश्न कधीच आला नाही. माझ्या घरी सर्व जाती-धर्माचे लोक येतात. तसं माझ्या घरात कुठल्याही जाती-धर्माची प्रतीके नाहीत. त्यामुळे मी कोणत्या जातीचा आहे, हे काही लक्षात येत नाही. (अर्थात, आपण कोणत्या जातीचे आहोत, हेही दडवण्याची गरज नाही. कारण जन्माला आलेला प्रत्येक माणूस गर्भातूनच जात जन्माला घेऊन येतो). परंतु हे पुस्तक आल्यानंतर मला अतिशय वाईट अनुभव आले. तो इथे सांगावासा वाटतो – मला एका व्यक्तीचा फोन आला की, “तुमची ‘युगानुयुगे तूच’ ही बाबासाहेब आंबेडकरांवरील दीर्घ कविता वाचली. हा संग्रह वाचेपर्यंत मला वाटत होते की, तुम्ही आमच्या जातीतील असाल.” तर दुसरीकडून अजून एक असाच फोन आला, “तुझा संग्रह वाचला. छान वाटले. तू आमच्या जातीतला आहेस, हे आजवर माहीत नव्हतं.” मला वाटतं, या दोन्ही व्यक्तींची ही दोन्ही विधाने अतिशय जातिवाचक आहेत. बाबासाहेबांनी जात, धर्म पाळायला सांगितला का? त्यांनी वेळोवेळी हाच विचार सांगितला की, माणूस सगळा एक आहे. त्याला बरोबर घेऊन जा. जो फक्त माणूस म्हणून जगतो, ओळखला जातो, तोच खरा माणूस असतो. खरंतर मानवतावाद हा खूपच व्यापक अर्थाने घेतला पाहिजे. अगदी प्राणिमात्रांवर, प्रत्येक जिवंत जीव आहे, त्या सगळ्यांवर प्रेम करणे म्हणजे मानवतावाद. पण आपण जर एकमेकांची जातच शोधत राहिलो, तर बाबासाहेबांच्या विचारांपर्यंत कधीच पोचणार नाही. आपल्या देशात 2014 नंतर जे सुरू आहे, त्यातून बहुजन म्हणून आपण सर्वांनी आपली जात-धर्म बाहेरच नव्हे, तर घरातही विसरली पाहिजे, असे मला वाटते. या सर्वांची सुरुवात आधी आपल्या घरापासूनच व्हायला हवी.

या सगळ्या आजच्या गोंधळलेल्या मनःस्थितीत उत्तर म्हणून बाबासाहेबांकडे, बुद्धाकडे जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी काही बाबासाहेबांच्या विचारांचा फार मोठा अभ्यासक नाही. मी छोटा पत्रकार आणि छोटा कवी आहे. सतत माणूस म्हणून मला कसे जगता येईल, असा प्रयत्न मी करत असतो. माणूस म्हणून जगताना आज दिवसभरात ज्या काही चुका झाल्या, त्या उद्या सुधारू, या विचाराने पुढे जायला हवे. असा माणूस म्हणून माणसावरच प्रेम करणारा मी शेवटी बाबासाहेबांकडे जाणार ना? कविता लिहिताना प्रारंभीची अवस्था ही अशी होती. परंतु बाबासाहेबांकडे मी सहज गेलो नाही. त्यासाठी मला माझं कुटुंब, घर, गाव याकडे जावे लागेल. मी ज्या जातवर्गातून आलो, ज्या संस्कारात वाढलो, त्यातून मी कसा घडत गेलो हे तपासावे लागेल आणि या सगळ्यातून मला बाबासाहेबांचे विचार किती महत्त्वाचे वाटले, हेही मला पाहावं लागेल. बाबासाहेबांनी मला माणसांवर प्रेम करायला शिकवले.

मी बावशीसारख्या जेमतेम चारशे लोकवस्तीच्या गावात बालपणापासून वाढलो. गावात तळातला समाज गावापासून दूर होता. माझं कुटुंब मात्र या समाजाला जोडलेलं होतं. या सगळ्याला कारण होती ती म्हणजे माझी आजी, जी अशिक्षित होती. अजून एक आजी होती, जी आजी पंढरपूरला जायची; पण माझी चुलत आजी. तिला सांगायची पंढरपूरला जाण्यापेक्षा आहे तिथेच कष्ट कर, शेतात राबून मुलांना वाढव. तुला आपोआपच विठ्ठल भेटेल. इथे सांगायचा मुद्दा असा की, माझ्या आजीने घरी आलेल्या माणसाला पाणी दे, तिला बसव. या सगळ्यातून ती माणसावर प्रेम करायला आम्हाला शिकवायची. या संस्कारांत वाढत असताना एका बाजूला जातीचा पगडा होता, तर दुसर्‍या बाजूला आजीची शिकवण अशी समानतेची होती. ती कायम तळातल्या वर्गात मिसळायची. त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबत राहायची, खायची, प्यायची. मी विचार केला, तिने बाबासाहेब अभ्यासले नाहीत. त्यांच्या विचारांची उंची तिला माहीत नव्हती; फक्त ती नाव ऐकून होती. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आजी जे सांगते शेतात राबा, शिका, गुण्या-गोविंदाने एकत्र राहा, हे तर बाबासाहेबांचे विचार आहेत. याच विचारसंस्कारांमुळे मी पुढे बाबासाहेबांच्या विचारांकडे ओढला गेलो. पुढे हळूहळू वाचनातून, वृत्तपत्रांतून पूर्णवेळ काम करताना ही जाणीव वाढत गेली. कणकवलीत परिवर्तन चळवळीशी जोडून घेताना कवी आ. सो. शेवरे, कवी उत्तम पवार या दलित विद्रोही चळवळीतील मित्रांशी जोडला गेलो. त्यातूनच माझी सामाजिक जाणीव वाढत गेली.

मी जसजसे अधिकाधिक वाचन करत गेलो, तसं माझ्या लक्षात आलं की, हे जे काही सर्व आजूबाजूला भेदाचं राजकारण चालू आहे, त्यासाठी संविधानाची जपणूक ही एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे. समाजातील कुठल्याही जाती-धर्मातील लोकांनी संविधानावर विश्वास ठेवला तरच लोकशाही टिकू शकते. जर लोकशाही टिकली नाही, तर आपला देश आणि त्यातील प्रत्येक माणूस अडचणीत येणार, हे नक्की. म्हणूनच बाबासाहेबांचे हे विचार कुठेतरी मांडायला हवेत, असं प्रकर्षाने वाटायला लागलं आणि त्यातूनच ‘युगानुयुगे तूच’ या कवितेची निर्मिती झाली. प्रारंभी त्या अनुषंगाने विचार सुरू झाल्याने कवितेत ती मांडणी काही तुकड्या-तुकड्यांच्या स्वरुपात केली गेली. हा काळ होता 2013 चा. एके दिवशी सकाळीच 14 एप्रिलच्या निमित्ताने ‘युगानुयुगे तूच’च्या प्रारंभीच्या ओळी सुचल्या. माझ्या सवयीप्रमाणे मी त्या पुन्हा-पुन्हा लिहिल्या. मग लक्षात येत गेले. मला बाबासाहेबांचे जे विचार सांगावेसे वाटतात, तेच खर्‍या अर्थाने कवितेतून उतरत आहेत. मग त्यानंतर कवितेच्या पुढील भागाला लिहायला प्रारंभ केला. परंतु दीर्घ कविता लिहिताना कवीची प्रचंड दमछाक होते. बाबासाहेबांवरील कविता लिहिताना तिची रचना अथवा आराखडा कसा असावा, याबाबत विचार चालू होता. आपल्याकडे असा समज आहे की, कवीला प्रतिभेची दैवी देणगी वगैरे असते. त्यातून तो लिहितो आणि तो मोकळा होतो. मला मात्र तसे वाटत नाही.

कवी, लेखकाला आपल्या साहित्यकृतीतून ठरवून विधानंही करायची असतात, राजकारणही करायचं असतं. आपण कविता कोणासाठी लिहितो आणि कोणत्या वर्गाच्या बाजूने लिहितो, ही गोष्ट कवितेच्या निर्मितीसाठी महत्त्वाची असते, याची जाणीवच जर लिहिताना नसेल तर तो कवी तळाच्या वर्गाच्या बाजूने उभा राहणार नाही; म्हणूनच बाबासाहेबांनी समाजाला दिलेले विचार मी कसे दीर्घ कवितेतून मांडू शकतो, त्यासाठी काय लिहायला हवं, असा विचार केल्यावर लक्षात आलं की, बाबासाहेबांवर आतापर्यंत खूप कविता लिहिल्या गेल्यात. त्या सगळ्यांबद्दल मला प्रचंड आदरच आहे. कारण त्या कवींच्या कवितेला माझाही एक शब्द जोडला गेला. इतरांनी बाबासाहेबांवर लिहिताना त्यांच्या मानसिकतेतून कविता लिहिली आणि मी माझ्या मानसिकतेतून लिहिली. कोणी म्हणत असेल की अमक्यासारखी जमली नाही, तमक्यासारखी कविता वाटत नाही किंवा बाबासाहेबांनी जो विचार दलित बांधवांना दिला, तशी लिहिली नाही. पण मला इथे अतिशय नम्रपणे सांगावेसे वाटते की, आधीची मानसिकता ओलांडून नव्याने लिहिलं जायला हवं आणि दलित विद्रोही कवींनी कविता लिहिणे आणि मी कविता लिहिणे यात फरक राहणारच आहे. बाबासाहेब आपल्याला कसे भेटले, हे स्वतःच्या भाषेत सांगितले पाहिजे; आणि तेही अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने. अशी माझी त्यांच्यावर कविता लिहिण्याची धारणा होती. अशिक्षित, वंचित वर्ग आहे, ज्याच्यापर्यंत अजून हा विचार पोेचला नाही किंवा उच्चवर्गातील वर्गाला किंवा समाजातील सर्व समाजघटकांना बाबासाहेबांचे विचार कळायला हवेत. त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत अजून बाबासाहेबांचा विचार पोेचला नाही, नेमके बाबासाहेब कळले नाहीत, ज्यांना बाबासाहेबांमुळे काय आधार मिळाला आहे, कसं जगायला सांगितलं तरी त्यांच्या कृतीत बाबासाहेबांचे विचार उतरत नाहीत, त्यांनाही बाबासाहेबांचे विचार सांगणे महत्त्वाचे आहे.

म्हणूनच बाबासाहेबांचा संविधानविचार, दलितसंघर्ष, चवदार तळ्याचा संघर्ष या प्रश्नांबरोबरच बाबासाहेबांची शेतीविषयक भूमिका, महिलांना दिलेले स्वातंत्र्य, त्यांचे शिक्षण, कामगारांविषयी विचारधारा हे सगळं कवितेतून आलं पाहिजे; किंबहुना या सगळ्यांपलिकडे सुद्धा बाबासाहेब काय आहेत, हे सांगितले पाहिजे, असं वाटलं.

त्यामुळेच दुर्दैवाने सगळ्या जात-धर्म समूहातील जनतेने ज्या प्रतिष्ठेने बाबासाहेबांकडे पाहायला पाहिजे, तेवढे पाहिले गेले नाही, असं मला कवितेच्या निर्मितीच्या यावेळी वाटू लागलं, म्हणूनच बाबासाहेब सर्वांचे कसे आहेत, हा विचार माझ्या मनात येऊ लागला. आपण जी निर्मिती करतो, ती विशिष्ट वर्गासाठी का करायची? माझ्यासारखा कवी या जगातला माणूस एक आहे, असंच म्हणतो आणि त्याच विचारांतून कवितेची निर्मितीही करतो. त्यामुळे बाबासाहेबांनी एकूण माणसांसाठी काय केले आहे, हा विचार करूनच ‘युगानुयुगे तू’ या कवितेची निर्मिती केली आहे

बाबासाहेबांनी वारंवार ‘शिका, संघटित, व्हा आणि संघर्ष करा,’ असं सांगितलं; विशेषकरून त्या काळच्या सगळ्या दलित, उपेक्षितांना हे आग्रहाने सांगितलं ते खरंच आहे. पण ज्या माणसाने देशाची घटना लिहिली, अशी व्यक्ती एका विशिष्ट वर्गाला हे का सांगेल, असा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. त्या काळात दलितांना असा विचार देणे गरजेचे होते. परंतु बाबासाहेबांचा हा विचार संघर्ष करणार्‍या सर्वांसाठी आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळेच मला वाटतं, हा विचार त्यांनी, जो संघर्ष करून पुढे जाऊ पाहतोय, उभा राहू पाहतोय, त्या प्रत्येकाला सांगितलेला आहे. माणसाचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं आहेच. कारण शिक्षण संघटन आणि संघर्षासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव तुमच्यात असणे गरजेचे असते. बाबासाहेब म्हणतात, “गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्यायला हवी.” बाबासाहेब व इतर नेत्यांमध्ये नेमका कोणता महत्त्वाचा फरक आहे, याचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये सर्वच नेते हे स्वातंत्र्यासाठी लढत होते; पण त्या काळात एकमेव बाबासाहेब स्वातंत्र्याबरोबरच माणसाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचाही विचार करत होते आणि त्यासाठी संघर्षही करत होते. असा दुहेरी स्वातंत्र्याचा त्यांचा संघर्ष प्रकर्षाने या काळात मांडायला हवा, म्हणून अशा गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून देणारा माणूस आपलाच असायला हवा. कारण माणूस जो गुलाम आहे, त्याला बंधनमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, अशी जाणीवच आपल्या मनात नसेल तर आपल्या जगण्यालाही काही अर्थ नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करून ही गुलामीची जाणीव करून देणे, ही आजच्या काळाची गरज आहे. या काळासंदर्भातील हे प्रश्न कविता लिहिताना माझ्या डोक्यात होते. कारण कोणतीही कविता प्रश्न उपस्थित करण्यासाठीच लिहिली जावी. कविता काही मनोरंजनासाठी लिहिली जात नाही.

आज सगळ्या महिलांना जे अधिकार मिळाले, त्यांच्या मुळाशी बाबासाहेब आहेत. त्या काळी स्त्रियांना अधिकार नव्हते.प्रचंड विरोध पत्करून बाबासाहेबांनी ते मिळवून दिलेत. हे करताना त्यांनी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट केली की, त्यांनी ‘महिलांना माणूस म्हणून बघा,’ हा विचार आपल्याला दिला. एखाद्या स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिलं की, इतरही स्वातंत्र्याच्या गोष्टी तिला आपोआप मिळतात. पुरुषाबरोबर तिला अधिकार प्राप्त होतात आणि अशावेळी पुरुषाकडेही पूर्वग्रहदूषित नजरेने बाईने पाहायला नको, याचेही भान बाईत येत जाते. ‘युगानुयुगे तूच’ संग्राहामध्ये माझा आजपासून सुरू झालेला हा भाग बाबासाहेबांनी दिलेल्या महिलांच्या अधिकारांपर्यंत येतो.

गेल्या आठ-दहा वर्षांत; विशेषत: 2014 नंतर आणि 90 च्या दशकातील बाबरी प्रकरणापासून भारतीय एकात्मतेचा नकाशाच बदलला आहे. ज्या पद्धतीने दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या झाली, लेखकांनाही संरक्षण दिले गेले आहे. धर्माचा अजेंडा राबवला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी कोणती कविता लिहिणार होतो, असा प्रश्न मला पडतो. ‘लोकशाही धोक्यात आली आहे’, ‘संविधानबदल करायला पाहिजे,’ अशी विधाने होत आहेत. दाभोलकरांच्या स्मृतीदिनी त्यांच्यावर नक्षली म्हणून चर्चा घेतली जाते, अशा वेळी कोणत्या महापुरुषावर कविता लिहिणं गरजेचं होतं? तर याचं उत्तर बाबासाहेबांवर हेच येतं. कारण बाबासाहेब तुम्हाला माणसाकडून माणसाकडे घेऊन जातात!

गेल्या दहा वर्षांत जे काही चाललं आहे, नवा राष्ट्रवाद आणला जातो आहे; राष्ट्रवाद म्हणजे तुम्हाला तुमची जात-धर्म बळकट करणे नव्हे; परंतु तसेच प्रयत्न होताहेत. आम्हाला मात्र आमचा राष्ट्रवाद, म्हणजे या देशातली बहुसांस्कृतिकता महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. हाच या देशाचा राष्ट्रवाद आहे. हे सांगण्यासाठी बाबासाहेबांवर कवितानिर्मिती करण्यावाचून पर्याय राहत नाही. आजकाल छोट्या-छोट्या मुलांच्या हातात चाकू, सुरे दिले जातात. महिलांच्या हातात तलवारी दिल्या जातात. त्यांच्याकडून कवायती करून घेतल्या जातात. अशा वेळी माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, आपण कुठे चाललो आहोत? माणूस पशू झाला, असेही म्हणता येत नाही. कारण एखादं जनावर जर मरून पडलं तर त्याच्या शेजारून जाणार्‍या दुसर्‍या जनावरांच्या डोळ्यात पाणी येतं. आपण तर माणूस आहोत, माणसाला संपविण्याची भाषा केली जाते, त्यांच्यावर संशय घेऊन घरात बसून मारले जाते. अशा वेळी मी कशाची निर्मिती करणार? कोणता विचार इतरांसमोर पोचवणार? मला वाटतं आज खर्‍या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला पाहिजे.

आजपर्यंत खूप शेतीविषयक संशोधन झाले; परंतु बाबासाहेबांनी शेतीविषयक दिलेला विचार महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितले की, शेतीला व्यावसायिकतेची जोड द्या. याचा अर्थ त्याचे औद्योगिकीकरण करा, असे नव्हे. औद्योगिकीकरणाने भांडवलशाही येते. भांडवलशाहीची मिजास येते. तशी आज शेतकर्‍यांची अतिशय भयानक परिस्थिती आहे. कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि राजकारणी त्याचा गैरफायदा घेत आहेत. सत्तेवर कोणतेही सरकार असो, सगळेच राजकारणासाठी त्याचा गैरफायदा घेतात. बाबासाहेबांनी दिलेल्या शेतीविचाराला जर भारतातील शेती जोडली असती तर या देशातील शेतकर्‍याला आत्महत्या करावी लागली नसती, असं मला वाटतं. दुर्दैवाने अशा महामानवाचे विचार समजून घेण्याऐवजी आपण ते विचार समजून घ्यायचेच नाही, असाच मेंदूवर नकारात्मकतेचा स्तर चढवून घेतला आहे. त्यामुळे आपल्याला गेल्या दहा वर्षांत काय चाललंय, कोणते सरकार काय करते, हे कळू शकत नाही. इतर वर्गानेही आपापले महापुरुष वाटून घेतले आहेत; पण बाबासाहेबांचे अनुयायीही म्हणविणारे जातीयवादी सरकारच्या वळचणीला जाऊन बसले आहेत; उलट सर्वांनीच बाबासाहेबांचे विचार अनुकरणातून आणायची वेळ आली आहे. पण याउलट बाबासाहेबांच्या नावाचा सतत ढोल वाजवून राजकीय फायदे घेतले जात आहेत. कोणत्याही मंचावर जाऊन धर्माचे पोवाडे गाणारे आणि राजकीय पोळी भाजणारे लोक असतील तर यापुढे सगळं कठीणच आहे.अशा वेळी प्रत्येक जागृत, संवेदनशील कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांचा समतेचा विचार पोेचवला पाहिजे. अलिकडल्या राजकारण्यांना स्वतःची प्रतिमा निर्माण करणे आणि ती फडकवणे उत्तम जमते. पण एक लक्षात घ्यायला हवे की, हिटलरदेखील स्वतःची प्रतिमा निर्माण करत होता. आपण पशुपक्ष्यांपेक्षाही दयाळू आहोत, हे दाखवण्यासाठी मोरालाही दाणे घातल्याचे दाखविणारा फोटो देशातील सर्वोच्च माणूस सर्व मीडियांवर झळकवतो आणि आपण किती संवेदनशील आहोत, अशी प्रतिमा निर्माण करून त्याचे प्रदर्शनही मांडतो, तेव्हा अशा खोटी संवेदनशीलता दाखवणार्‍या माणसापासून आपण सावध राहिले पाहिजे, हा विचारही बाबासाहेबांनी आपल्याला दिला. पण दुर्दैवाने बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणार्‍यांनीही फक्त प्रतिमापूजन केले. त्यांच्या नावाचा जयघोष केला; मात्र अपवाद वगळता बहुसंख्य त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्यापासून लांब लिहिले. अशावेळी माझ्यासारखा कवी काय करू शकतो? तर जगातला समग्र माणूस एकच आहे, असा संदेश देणार्‍या बाबासाहेबांचे विचार पोेचवण्यासाठी ‘युगानुयुगे तूच’सारख्या कवितेचीच निर्मिती करू शकतो ना? या काळात असं लेखन करण्याशिवाय कवीकडे दुसरा पर्याय नाही.

कोणतीही कलाकृती निर्माण करताना कितीही नाकारलं, तरी बाह्यजगाचे आक्रमण तुमच्यावर होत असते. अर्थात, कितीही बाह्य दबाव झुगारायचा ठरवले, तरी महामानवावर कविता लिहिताना तो येतोच, असा अनुभव ‘युगानुयुगे तूच’ या कवितानिर्मितीच्या मधल्या टप्प्यावर आला. ‘युगानुयुगे तूच’चा पहिला भाग लिहिला आणि तो प्रसिद्ध झाला. ज्यांनी माझं कौतुक केलं, त्यातील काही लोकांनी स्वतःची अस्मिता कुरवाळायला प्रारंभ केला. साहित्यातील जातीयवादी राजकारण किती टोकाचं असतं आणि अशा राजकारणात मनाने खंबीर राहणारा कवी, लेखक नसेल तर तो आयुष्यभर एक शब्द उच्चारायचा सोडूनच द्या; तो काही लिहिणारही नाही. याचा अनुभव मी प्रथमच ‘युगानुयुगे तूच’ या कवितालेखनाच्या निर्मितीच्या वेळी घेतला. पण मी गलितगात्र झालो नाही. असे जातीयवादाचे कळप आयुष्यभर अस्मिता कुरवाळीत असतात, हे मी वेगवेगळ्या स्तरातील, जातीतील ‘बिचार्‍या बापड्या’ साहित्यिकांना याआधीच पाहिले होते. हे साहित्यिक स्वतःवर एवढे प्रेम करतात की, एखादा महानायक म्हणजे आपलीच अस्मिता, असा गैरसमज करून घेतात आणि त्या महानायकाविषयी इतरांनी एखादा शब्द लिहिला, तर त्याला तो शब्द लिहिण्याचा अधिकारच काय, असा थेट जाहीरपणे तुम्हाला सवाल करतात; पण खरं तर अशा छोट्या मानसिकतेतून जर आपण सर्वच बाहेर पडलो नाही, तर आपल्याबरोबर आपण ज्या वर्गाला पुढे घेऊन जात आहोत, त्या वर्गाचे भविष्य काही खरं नसतं, याची जाणीवच अशा लोकांना कधी होत नाही. हे यानिमित्ताने मी पुन्हा अनुभवले आहे. पण अशा लोकांना हे माहीत नाही की, आपलं असंच अज्ञान जपत फक्त अस्मितांवर जगत राहिलो तर आपला श्वासोच्छवासही कुणाच्या तरी खासगी मुठीत कधी जाईल, ते आपल्याला कळणारही नाही! अर्थात, अशा घटना वारंवार घडत आहेत. जे लोक संविधान बदलायला निघाले, त्याच लोकांच्या चरणांशी सत्तेच्या लोभापायी अनेक लोक, आम्ही महानायक यांचे वारसदार सांगत बसलेले दिसतात. अनेक लोक थेट दिल्लीतील राष्ट्रपती भवनमध्ये वावर करून वेगवेगळे लाभ उठविताना आपण पाहिले आहेत आणि ते लाभ उठून स्थिरस्थावर झाल्यावर महानायकावर कविता लिहिण्याचा इतरांना – माझ्यासारख्या कवीला -हक्क नाही, असं सांगताना माझा चळवळीशी काही संबंध होता का, याचाही शोध घेताना दिसतात. यात वाईट गोष्ट अशी की, ज्या लोकांबरोबर तीस वर्षे चळवळीत काम केलं, ‘युगानुयुगे तूच’ पुस्तक येईपर्यंतही त्या चळवळीत मी अतिशय प्रामाणिक होतो. हे पुस्तक लिहायला लागल्यापासून मात्र माझा चळवळीशी काहीच संबंध नाही, याचीही आवई माझ्या जवळच्या मित्रांकडून उठवली गेली. खरं तर याचं मला हसू येतं. कारण अज्ञानात सुख असतं आणि ते सुख अनेक लोक मिळविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. त्यांना त्या सुखातच आपण डोंगर पार केल्याचं समाधान मिळत असेल तर ते त्यांना मिळू द्यायचं. माझ्या ‘युगानयुगे तूच’ संग्रहातील काही विभाग आधी प्रसिद्ध झाले. त्यानंतर खूप चांगल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातून आल्या. पण काही वर्ग मात्र यामुळे दुखावला. त्यांनी खासगीत ‘ही काय कविता आहे का?’ अशा शेलक्या शब्दात ताशेरे ओढायला सुरुवात केली, तर काहींनी दुसर्‍यांना पुढे करून मला शिवीगाळ करण्यापर्यंत आपलं धाडस दाखवलं. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागातून; किंबहुना जगभरातून वेगवेगळ्या भाषेत बाबासाहेबांच्या विचाराचं स्मरण करणारे ग्रंथ निघाले. या ग्रंथामध्ये पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या ‘जडण-घडण’ मासिकाच्या विशेषांकाचा समावेश होता. या अंकाच्या संपादकांनी माझी 14 एप्रिलच्या निमित्ताने 13 एप्रिल 2013 या दिवशी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘संवाद’ पुरवणीत प्रसिद्ध झालेला ‘युगानुयुगे तूच’मधील एक अंश माझ्या पूर्वपरवानगीने प्रसिद्ध केला. तो अंक कुठल्यातरी वृत्तपत्रीय संपादकाच्या वाचनात आला. त्या संपादकाने कवितेच्या खाली माझा संपर्क असलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करून मला माझी पहिली जात विचारली. मी विचारलं त्याला, “माझी जात शोधून काय करायचे आहे तुम्हाला?” “काय करायचं ते नंतर सांगतो; पण तुमच्या आडनावावरून तुम्ही आमच्यातले वाटत नाही,” असं म्हणताच मी त्या महाशयांना विचारलं, “तुमच्यातले’ आणि ‘आमच्यातले’ हे नेमकं काय असतं? हे मला जरा नीट समजावून सांगाल का?” त्यावर ते म्हणाले, “वाटलंच होतं एवढा माज असणारा माणूसच बाबासाहेबांना ‘अरे-तुरे’ म्हणू शकतो.” मी डोकं शांत ठेवत म्हणालो, “बाबासाहेबांना मी कुठे ‘अरे-तुरे’ केलं आहे. त्यावर ते म्हणाले, “तुमची जी कविता ‘जडण-घडण’मध्ये प्रसिद्ध झाली आहे ना, त्यात तुम्ही बाबासाहेबांना ‘अरे-तुरे’ केले आहे.” मी म्हटलं, “साहेब, त्या कवितेचा अर्धाअधिक भाग लिहूनपण झाला आहे. पण त्या कवितेत कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नाही, तरी ती बाबासाहेबांविषयी आहे. कारण आपल्या बापाला बापच म्हणायची आमची ही परंपराच आहे. बापाला बापाच्या उंचीच्या नजरेने बघितलं की, तो किती विशाल आहे, हे कळतं. मराठी साहित्यात नामदेव ढसाळ, अरुण काळे अशा दिग्गज कवींनी बाबासाहेबांना कवितेत एकेरी संबोधले. यामागं त्यांचं प्रेम होतं.” या माझ्या बोलण्यावर ते संपादक महाशय खूप खवळले. माझ्या मागील सगळ्या पिढ्या काढल्या आणि, “तू आमची औलादच नाहीस,” असंही सांगितलं. शेवटी मी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणालो, “साहेब, शांत व्हा. मीही पूर्णवेळ पत्रकारितेत काम करतो. तुमचा पत्ता कळवून ठेवा, ‘युगानुयुगे तूच’ कविता पूर्ण झाल्यावर आधी वाचायला तुम्हाला पाठवीन आणि तुम्ही परमिशन दिली तरच पुढे ती प्रकाशित केली जाईल,” एवढंच सांगून मी फोन ठेवून दिला. असे अनेक प्रसंग आहेत या कवितेच्या निर्मितीप्रक्रियेला रोखून धरणारे. पुढे कधीतरी याविषयी माझी ‘जात शोधली जाते तेव्हा,’ असा एखादा दीर्घ लेखही लिहायचा माझ्या मनात विचार चालू आहे. तूर्तास एवढेच; पण या सगळ्यांतून लक्षात आलं असेलच की, कवीला कवितानिर्मितीतून त्या त्या काळाचं राजकारण खेळायचं असतं आणि माझ्या प्रत्येक कवितेतील विधान हे एक राजकीय विधानच असतं.

आता या सगळ्या परिस्थितीवर बाबासाहेबांचे विचार आणि भोवतालची परिस्थिती यांच्यात काही सुसंगती ठेवणे, ही आजच्या काळाची गरज आहे. मला वाटतं, परिवर्तन चळवळीत काम करणारा कोणताही कार्यकर्ता असेल किंवा बाबासाहेबांचे विचार प्रमाण मानून एखादा कवी, लेखक लेखन करत असेल तर त्याला ही सुसंगती ठेवण्यासाठी स्वतःलाच पुढाकार घ्यायला हवा. आता यासंदर्भात मी जो विचार करतो, तो माझ्या कृतीत येतो का, हा मूळ कळीचा मुद्दा आहे की, मी ‘युगानुयुगे तूच’ ही कविता लिहून माझं कर्तव्य संपलं, असं म्हणायचं? मी जे विचार लिहितो, त्याची कृती मला महत्त्वाची वाटते. जातीच्या उतरंडीवर तळातल्या वर्गात माझा जन्म झाला नसेल. परंतु जातीच्या उतरंडीवरची भेदाची जी भावना आहे. ती संपविण्यासाठी मी थेट किती सहभाग घेतो, यालाही इथं महत्त्व आहे. व्यक्तिगत पातळीवर सर्व माणूस एकच आहे, अशी भावना मनात ठेवून सर्व समाजाला एकाच भावनेने; म्हणजे निव्वळ माणूस म्हणून पाहणं, हे महत्त्वाचं ठरतं. शोषित वर्ग आहे त्या समाजात जास्तीत जास्त मिसळणे आणि त्या वर्गाला आपल्या सोबत घेऊन भेदाच्या पलिकडे जाऊन त्याला व्यापकपट उपलब्ध करून देणे, हाही बाबासाहेबांचा कृतिशील विचार आहे. दुसर्‍या बाजूला सांस्कृतिक घटना या भेद निर्माण करणार्‍या असतात. तोंडात संविधान आणि कृती मात्र संविधानाच्या विरोधात, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांपासून कायमच दूर राहणे आणि दुसर्‍या बाजूला परिवर्तनाचा विचार घेऊन काम करणार्‍या सांस्कृतिक चळवळींना, कार्यकर्त्यांना जोडून घेणे आणि त्यांच्यासोबत काम करणे, ही पण गोष्ट मला महत्त्वाची वाटते. खरं तर माझ्या कवितेचा मूळ गाभाच हा आहे की, बाबासाहेब सर्वांचे आहेत आणि ते कसे आहेत, याचीच मांडणी या कवितेत झाल्यामुळे तशा प्रकारची कृती मला महत्त्वाची वाटते.

मी माझ्या पुढील लेखनाच्या वाटचालीचा विचार करताना 2014 नंतर जी आपल्या देशात परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या विघटनावर भाष्य करणारी दीर्घ कविता लिहिणे मला महत्त्वाचे वाटते आणि त्यादृष्टीने सध्या माझे काम चालू आहे.

संपर्क : 9404395155


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]