..आणि भानामती थांबली

सुजाता म्हेत्रे -

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याचा पूर्व भाग, म्हणजे एके काळचा दुष्काळी पण सध्या द्राक्षभूमी म्हणवून घेणारा, निर्यातक्षम द्राक्षांमधून परकीय चलन मिळवून देणारा भाग समजला जातो. कठोर परिश्रम आणि आधुनिक विज्ञान यांच्या साहाय्याने आकाशाला कवेत घेण्याची जिद्द इथल्या अगदी तरुण शेतकर्‍यांतही आहे. त्यामुळे सधन भागामधे भेडसावणारे, आर्थिक सुबत्तेमुळे येणारे प्रश्न या भागामधे तसे कमीच आहेत. तरीही काही प्रमाणात ते डोके वर काढतातच.

तासगाव पूर्व भागातील एका छोट्या खेडेगावात एका कुटुंबामध्ये भानामती होतेय अशी तक्रार तासगाव पोलिसात आली. पोलीस आणि त्यांची तपास पद्धती यामध्ये ही गोष्ट बसणारी नसल्याने त्यांच्याकडूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आपण जावे, असे सुचविण्यात आल्याने तक्रारदाराने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहूल थोरात यांना फोन करून तक्रार नोंद केली. पाच एप्रिलचा पुण्यातील कार्यक्रम आटोपून ते सांगलीला येत असतानाच सहा एप्रिलला सकाळी हा फोन आला.

फोनवरून वर्णन केलेल्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राहुल थोरात यांनी तासगाव शाखेच्या कार्यकर्त्या सुजाता म्हेत्रे यांना ती माहिती कळवली आणि त्या कुटुंबाला भेट देण्याविषयी सूचना केल्या. तासगावचे कार्यकर्ते अमर खोत, सुजाता म्हेत्रे आणि सुनीता म्हेत्रे यांनी त्या ठिकाणी जाण्याची तयारी केली. परंतु तक्रार करणार्‍या लोकांचे फोन बंद असल्याने कदाचित त्यांचा निर्णय बदलला असण्याची शक्यता लक्षात घेऊन तिकडे जाणे रद्द केले. काही वेळाने पुन्हा त्यांचा फोन आला आणि ‘स्वतःची गाडी घेऊन आम्ही तुम्हाला न्यायला येतोय’, असे सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुजाता म्हेत्रे आणि सुनीता म्हेत्रे या दोघींनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्याचे ठरवले. तिथे गेल्यानंतर परिस्थिती पाहिली.

घरातील सर्व साहित्य त्यांनी अंगणात, पटांगणात आणून ठेवले होते. फक्त जेवण करण्यासाठीचे साहित्य इतकेच घरात होते. बाकी सर्व साहित्य त्यांनी बाहेर मांडलेले होते. संपूर्ण कुटुंब एका दहशतीखाली होते. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वस्तूला, केव्हाही आग लागण्याची शक्यता ते आम्हाला सांगत होते.

घरातील सर्व मंडळींना एकत्र बसून आम्ही सुरुवातीपासून घडणार्‍या प्रकाराची माहिती घेतली, तर समजले की जवळपास आठ-नऊ महिने पूर्वीपासून या गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला घरावर काही दगड पडलेनंतर कडबा रचलेली गंजी पेटली, त्यानंतर काही महिन्यानंतर दुसर्‍यांदा गंजी पेटली, तिसर्‍यांदा गंजी पेटली, चौथ्यांदा गंजी पेटली. या चार वेळा गंज्या पेटल्यानंतर परत घरावर दगड पडणे आणि त्यानंतर घरातल्या वस्तू पेटणे सुरू झाले. घरातील वस्तू, यामध्ये कपडे, अंथरुण, गादी, उशी अशा काही वस्तू पेटायला सुरुवात झाली.

त्यानंतर घरातील महिलांचे दोरीवरील कपडे आपोआप पेटू लागले. याच्याही पुढे जाऊन काही महिलांच्या अंगावरचे कपडे पेटणे सुरू झाले. अंगावरची साडी पेटायला सुरुवात झाल्यानंतर घरातील सगळेच लोक भयभीत झाले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.

ही माहिती ऐकून घेतल्यानंतर काही परिस्थितीजन्य पुरावेही तिथे पाहायला मिळाले. जळालेले कपडे जळालेले अंथरूण आणि काही ठिकाणी ठेवलेला कापूर आपोआप पेटलेला होता, त्याची राख. जळालेल्या काही साड्या पण पाहायला मिळाल्या.

काही वेळ इतरत्र पाहणी गेल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विशिष्ट पद्धतीनुसार आमची चौकशी सुरू झाली. एकेका व्यक्तीला समोर घेऊन आम्ही प्रश्न विचारणे सुरू केले. त्यातून अनेक गोष्टींची माहिती मिळत गेली अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला. घरातील सर्व व्यक्तींच्या मुलाखती घेऊन झाल्या. बरीच माहिती एकत्र झाली.

यानंतर शेवटी सर्व कुटुंबीय, भानामतीचा प्रकार पहायला आलेले बाहेरचे लोक आणि आजूबाजूचे शेजारी या सर्वांना एकत्र बसवून जे काही आम्ही पाहिलं आणि जे काही सत्य होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला.

एखादी घटना घडते आणि तिच्या पाठीमागचे कारण समजत नाही तोपर्यंत तो चमत्कार असतो. आपल्या घरामध्ये घटना घडत होत्या, पण त्याच्या पाठीमागचे कारण कोणीही शोधले नाही. त्यामुळे आपल्याला ते चमत्कार वाटत होते.

आपल्या घरावर कुणीतरी करणी केली किंवा कोणीतरी भानामती केली किंवा कुणीतरी वाईट शक्तीचा प्रयोग आपल्या घरावरी करतो असा त्यातून निष्कर्ष आपण काढत होतात. पण आम्ही इथे आल्यानंतर त्याच्या पाठीमागची कारणे शोधली. कोणतीही घटना घडत असताना तिला कुठला ना कुठला तरी कार्यकारणभाव असल्याशिवाय ती घडत नसते. अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याच्या पाठीमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत असते.

‘घरावर दगड पडणे किंवा एखादी वस्तू पेटणे या पाठीमागे कोणतीही वाईट शक्ती असत नाही. अगदी विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर एखादी वस्तू जेव्हा हालचाल करते त्या वेळेला तिला कोणती ना कोणती ऊर्जा द्यावी लागत असते. दगड खालून वर, घरावर जाऊन पडत असताना त्याला कोणीतरी माणसाचा हात लावावा लागेल, माणसाची स्नायू ऊर्जा वापरावी लागेल, ही ऊर्जा दिल्याशिवाय तो इतक्या वर जाऊ शकत नाही, हेच ध्यानात घेतले पाहिजे. ही करणी असत नाही, कोणतीही भानामती असत नाही, यामागे फक्त मानवी मेंदू आणि मानवी हातच असतात, असा एक निष्कर्ष निघतो’, हे त्यांना सांगितले.

यामध्ये या गोष्टी घडवून आणणारी व्यक्ती घरातील किंवा घराशेजारील, आजूबाजूची कुठली असेल यावर आपण सर्वांनी लक्ष ठेवा आणि अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत यासाठी सावध रहा. पुन्हा अशा गोष्टी घडल्या तर ताबडतोब अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळवा, आम्ही परत येऊ’, असा विश्वास दिला. वातावरण बरेचसे सैल झालेले दिसले. घरातील मंडळीना आमचे विचार काहीसे समजल्याचे जाणवले. “असा प्रकार पुन्हा घडल्यास कळवतो, तेव्हाही आपण या. आपले उपकार होतील.” कुटुंब प्रमुखांनी कृतज्ञतेच्या भाषेत आमचे आभार मानले.

आज या गोष्टीला दहा दिवस झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या दरम्यान चार-पाच वेळा फोन करून चौकशी केली गेली, तर कुटुंबप्रमुखांनी सांगितले, “आपण येऊन गेल्यापासून एकदाही तसा कुठलाच प्रकार घडला नाही.”

अशा प्रकारे त्या कुटुंबातील भानामती पळाली.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात, वासुदेव गुरव सर, अमर खोत, नूतन परीट मॅडम, सुनीता म्हेत्रे मॅडम, सुजाता म्हेत्रे यांनी पाठपुरावा केला.

अशा घटना आपल्या आजूबाजूला, तासगावच्या आसपास, आपल्या माहितीमध्ये, कुठे घडत असतील तर त्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला द्यावी असे आवाहन सुजाता म्हेत्रे, अमर खोत, वासुदेव गुरव सर यांनी केले आहे.

सुजाता म्हेत्रे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ]