राहुल विद्या माने -
डॉ. गौहर रझा यांनी लिहिलेल्या ‘मिथकोंसे विज्ञान तक’ हे पुस्तक आजकालच्या छद्मविज्ञानाने भारलेल्या आणि देशभरात द्वेषपूर्ण, धर्मांध वातावरणात धुंद झालेल्या लोकांना समजून घेण्यासाठी महत्त्वाचे मानसशास्त्रीय, सांस्कृतिक असे होकायंत्र म्हणावे लागेल. विश्वाचा जन्म कसा झाला, माणसाची उत्क्रांती कशी झाली आणि आपल्या जगाचे नियमन करणारे मॉडेल्स कोणकोणते आहेत यावर विविध धर्मातील, पंथातील मिथकांनी वेळोवेळी करोडो लोकांच्या धारणा विकसित केल्या आहेत. एका बाजूला तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार आणि दुसर्या बाजूला भावना दुखावल्याच्या नावावर वैज्ञानिक दृष्टिकोनाला जबरदस्त नकार-हे आजच्या काळातील वैशिष्ट्य आहे. हे या पुस्तकातील विश्लेषण केलेला महत्त्वाचा विरोधाभास आहे.
डॉ. गौहर ऱझा यांनी आपल्या इतिहासात धर्माने जी भूमिका बजावली ती भूमिका विज्ञान बजावत आहे का याबद्दल मानसिक गरजांच्या अंगाने विवेचन केले आहे. ते म्हणतात, “फक्त विश्वातील रहस्य उलगडणे तेवढीच माणसांची इच्छा नसते; तर काही रहस्यांशी, तो स्वतःला, स्वतःच्या भावनांच्या आधारावर, जोडूनही घेऊ इच्छितो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा समाजात बुद्धीची गरज पार पाडू शकला, पण भावनेची गरज पार पाडू शकला नाही. एकोणिसाव्या शतकापासून धर्माच्या या भावनात्मक भूमिकेला पर्याय, सर्जनशील साहित्यात आणि कलेच्या सर्जनशील उपक्रमांमध्ये शोधण्याचा आग्रह धरत आले आहेत. धर्म आणि विज्ञान यांच्यातील संबंधावर व्यापक विचार करण्यासाठी या समस्येचा सण करणं अनिवार्य आहे.”
‘विज्ञान म्हणजे काय’ हे समजून घेतानाच मग विविध देश, समुदाय, पंथ-धर्म यांच्या चष्म्यातून पुढे मग युरोपियन, भारतीय, इस्लामिक आणि वैदिक हे सर्व दृष्टिकोन घडत गेले. त्याचवेळी डॉ. ऱझा हे सुद्धा सांगतात की, आजकालच्या ज्या विविध ज्ञानाच्या शाखा आणि उपशाखा आहेत त्यांची मूळ सूत्रे आणि त्याबद्दलची आवश्यक तर्कसंगतता, भौतिकवाद, अनुभवजन्य सिद्धांत आणि वैज्ञानिक विचारसरणी हे सुद्धा त्या त्या धार्मिक तत्त्वज्ञानाच्या परंपरेत कुठेतरी दिसतात, पण ती पुढे विज्ञानाच्या आधुनिक मूल्यमापन करण्याच्या निकषांपुढे टिकू शकली नाहीत. पण सर्व धर्मांच्या इतिहासात त्याची काही स्पंदने निश्चितच आपल्याला दिसतात. प्राचीन अशा ग्रीक, भारतीय, प्राचीन इस्लामिक या तत्त्वज्ञानात याची काही सूत्रे सापडतात, पण त्यालाच वैज्ञानिक ज्ञानव्यवस्था समजण्याचा किंवा तसा अपप्रचार करण्याचा आत्मप्रौढी मिरवणारा राजकीय प्रपोगंडाने भारलेला प्रयत्न आजकाल सर्रास होताना दिसतो. हे सगळे समजून घेताना लोकायत (चार्वाक) तत्त्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान, अॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान, अल-हसन-इब्न अल-हेथम चे तत्वज्ञान, मार्क्सवादी तत्त्वज्ञान आणि विसाव्या शतकातील विज्ञानाचे समाजशास्त्र व विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचा इतिहास मांडणार्या अभ्यासपूर्ण मांडणीचा सारांशरूपाने आढावा लेखकाने घेतला आहे. विज्ञानाची प्रगती समजून घेण्यासाठी सर्वसाधारण धोपट मार्गाने वाटचाल करणारे विज्ञान आणि एखाद्या क्रांतिकारी शोधाने पूर्णपणे इतिहासाचे वळण बदलून टाकणारे विज्ञान अशी मांडणी करता येईल. याबद्दल हे कसे होते ते सोपे करून सांगितले आहे.
कुठे गडबड होते त्यावर डॉ. रझा नेमकेपणाने बोट ठेवतात. वैज्ञानिक पद्धती समजून घेण्याच्या मार्गातील मुख्य अडथळा म्हणजे, सामान्य लोकांपर्यंत ती सोप्या भाषेत पोचतच नाही. बहुतेक वेळा सामान्य लोकांपर्यंत वैज्ञानिक तर्क आणि निष्कर्षच पोचतात. त्यामुळे कार्यपद्धती ही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आत्मसात करू शकत नाही. दुसरे, वैज्ञानिक कार्यपद्धती ही बर्याच वेळा लोकांच्या तात्कालिक फायदा-तोट्याचा विषय असेल तर मात्र ती जास्त कौतुकाने पाहिली जाते. त्यातही त्यातील तंत्रज्ञानाची कार्यक्षमता हे विज्ञान असल्याचे मानले जाते व हा फरक बर्याच जणांना कळलेला नसतो. वैज्ञानिक पद्धती समजून घेण्यासाठी किमान परिसरातील काही गोष्टींमध्ये असलेले कार्यकारण संबंध यांच्याबद्दल कुतूहल, थोडी माहिती आणि अशा प्रक्रियांबद्दल काही प्राथमिक शब्दावली आत्मसात असण्याची गरज असते. उदा. वेळ-वजन-लांबी इ. कशा मोजल्या जातात याविषयी थोडीतरी व्यावहारिक अंगाने माहिती असल्याशिवाय त्याचा वापर करून विज्ञान शिक्षण-संशोधनात कसा होत असेल ते सांगता येणार नाही. वैज्ञानिक सुद्धा अनेक मार्गाने निसर्गातील किंवा आपल्या आयुष्यातील गूढ, गुंतागुंतीच्या समस्यांचा वेध घेत असतात. तसेच नवीन शोध लावण्यासाठी बर्याच वेळा नवीन संशोधन पद्धतींचा वापर करावा लागतो. प्रत्येक विज्ञान विषयात अशा संशोधन पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. वैज्ञानिक, संशोधक यांच्या स्वतःच्या सुद्धा काही धारणा असतात. त्यामुळे सुद्धा सत्याचा शोध घेण्याच्या पद्धती समजून घेणे अवघड जाऊ शकते.
डॉ. ऱझा यांनी आणखी एक महत्त्वाची काळजी या पुस्तकात व्यक्त केली आहे. समाजात सगळीकडे सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत सतत धार्मिक- पौराणिक संदेशांचा ऑडिओ-व्हिज्युअल मारा होत असतो. यातून प्रत्येक नागरिकाला कोणत्या ना कोणत्यातरी धर्माच्या कोणत्यातरी कथेची आठवण करून द्यायचं काम निरंतर होत असते. विशेषतः एखाद्या सणाच्या-उत्सवाच्या काळात तर कोणीच त्यापासून सुटूच शकत नाही. धार्मिक-आध्यात्मिक प्रतीके, पुतळे, चित्रे, संदेश, त्यांची प्रतीके या सगळ्यांचा मारा होत असतो. सातत्याने अशा वातावरणात राहिल्यावर सामान्य नागरिक आपसूकच भोंदूगिरी, अंधश्रद्धा, छद्मविज्ञान, प्राचीन इतिहासाबद्दल आत्मप्रौढी याला बळी पडतात. एका अहंगंडाचे आणि असुरक्षिततेचे शिकार होतात. आपल्या आजूबाजूला माध्यमे, शाळा-कॉलेज-विद्यापीठे तसेच संग्रहालये, सार्वजनिक ठिकाणे या सर्वांमध्ये आधुनिक विज्ञानातील प्रगती याबद्दल अद्ययावत माहिती देणारी अनेक ठिकाणे आपल्या आजूबाजूला आहेत, पण धार्मिक संदेशांचा मारा खूपच मोठा आहे. विवेकी-वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण अशा वातावरणात होणे खूप अवघड होऊन बसते. याला तोंड देण्यासाठी याबद्दल आपल्यासारख्या विवेकाची जोपासना करणार्या लोकांनी काय काय करता येईल याबद्दल चिंतन केले पाहिजे. हा दृष्टिकोन समाजात नसल्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, सांस्कृतिक विविधता आणि तर्कनिष्ठ विचारांचे प्रचार करणारे कार्यकर्ते, पत्रकार, ब्लॉगर्स यांच्यावर हिंसक हल्ले आणि अनेक वेळा खूनसुद्धा करण्यात आले. भारतातील डॉ. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-लंकेश, तर बांगलादेश मधील ब्लॉगर्स, अनेक राज्यांतील-देशांतील पत्रकार-मानवाधिकार कार्यकर्ते यांचे हत्यासत्र त्याची साक्ष आहे याबद्दल डॉ. ऱझा चिंतेने बोलतात.
पुस्तकाच्या उत्तरार्धात विविध देशांत, धर्मात ब्रह्मांडाला आणि जीवसृष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न याबद्दल चर्चा आहे. आफ्रिकेतील आणि भारतातील आदिवासी समाज यांच्या पारंपरिक समजुती, इराक (पूर्वीचा मेसोपोटेमिया) मधील मिथके, ग्रीक तत्त्वज्ञानातील मूलसूत्रे, इजिप्तच्या इतिहासातील महत्त्वाच्या मान्यता प्राप्त असलेल्या कथा, अब्राहमिक धर्म (इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू), हिंदू, जैन, बुद्ध यांच्या पुराणातील-तत्त्वज्ञानातील मिथके यासह अनेक सांस्कृतिक इतिहासातील मिथकांचा आढावा घेतला आहे. ही सर्व मांडणी झाल्यावर जाणवते की, या सर्व देवताकेंद्रित मानव अस्तित्वाच्या मांडणीपासून ते खगोलशास्त्रात सांगितलेले विश्वकेंद्रित जगातील मानवी व सजीव सृष्टीची उत्क्रांती आणि वैज्ञानिक प्रगती अशी मांडणी झाली आहे.
ज्याप्रमाणे प्राचीन मिथके आणि तत्त्वज्ञानाचे विविध प्रवाह यांच्या दृष्टिकोनातून विश्वाची कशी निर्मिती झाली यावर चर्चा या पुस्तकात आहे. त्याचप्रमाणे आधुनिक विज्ञान याकडे कसे पाहते हे सांगणे सुद्धा या पुस्तकाच्या केंद्रीभूत मांडणीचा भाग आहे. विश्वाला चालवणारे मूलभूत नियम कोणते, विविध वैश्विक घटनांचा अर्थ कसा लावावा याबद्दल मागील पाच-सहा शतकांपासून अनेक जण काम करत आहेत. टायको ब्राहे, केप्लर, कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, लेब्रीज आणि अलीकडच्या काळात लेमेत्रे, हबल, आईन्स्टाईन, प्लॅन्क, हायजेनबर्ग असे अनेक शास्त्रज्ञ किंवा तत्त्वज्ञ यांनी विविध पातळींवर मूलभूत, क्रांतिकारी वैज्ञानिक विचार मांडला.
वैज्ञानिक पद्धती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक जीवनशैली याचा अत्युच्च उत्कर्षबिंदू काय असू शकतो हे या पुस्तकातील डार्विनने उत्क्रांतीच्या नियमाचा शोध कसा लावला याचा धांडोळा घेणार्या प्रकरणावरून कळते. अतिशय रोचक, रंजक पद्धतीने डार्विनने अनेक वर्षे अभ्यास करून, जगभर प्रवास करून आणि विविध विद्याशाखांतील तत्त्वांची चिकित्सा करून उत्क्रांतीबद्दल मांडणी केली होती. यातून एक महत्त्वाचे वैज्ञानिक मूल्य पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे, “विज्ञानात नव्या संशोधनातून, नव्या आकड्यांमधून, नव्या शोधांमधून, जे नवीन सत्य समोर येतं, ते जुन्या सत्याची जागा घेतं. नवनवीन निरीक्षणे, नवनवीन आकडेवारी, नवनवीन मॉडेल्स यातून नवीन वैज्ञानिक ज्ञानाचा जन्म होतो आणि त्यातून नव्या वैज्ञानिक ज्ञानव्यवस्था उदयास येतात.
धर्म हे ‘का’ या प्रश्नाचे उत्तर प्राचीन इतिहासाच्या ज्ञानाच्या अति आत्मविश्वासाच्या ठामपणे देतात, तर विज्ञान हे ‘कसं’ याचं उत्तर आधुनिक परिवर्तनशील अशा पुराव्यांसह पण साशंक सावधतेने देते याबद्दल विवेचन डॉ. रझा यांनी केलं आहे. यातील काही वाक्ये सुविचार म्हणून लक्षात ठेवावी अशी आहेत. “विज्ञानात जे शोधले जाईल, ते सामान्य ज्ञान बनते”; “विज्ञान हे निसर्गाच्या नियमांना समजावून घेण्याच्या, त्यातली कोडी सोडवण्याच्या आणि रहस्य उघडण्याच्या प्रयत्नांचे आणि आपल्या निष्कर्षांना वारंवार तपासून पाहण्याचं सुद्धा नाव आहे;” “विज्ञानाचे नियम किंवा निष्कर्ष ठिकाण समुदाय, जाती, रंगभेद किंवा देशानुसार बदलत नाहीत;” “विज्ञानात दैवी शक्ती किंवा आस्थेची काही शक्यता नाही;” वैज्ञानिक संशोधनात वय, पद किंवा इतर कोणत्याही प्रकारे कनिष्ठ असलेल्या व्यक्तीला सुद्धा तिचं म्हणणं मांडण्यासाठी संपूर्ण लोकशाही स्वातंत्र्य असतं; “कोणताही वैज्ञानिक हा भूतकाळातील वैज्ञानिकाच्या ग्रंथाचा श्रद्धा म्हणून डोक्यावर घेऊन नाचत नाही.” याविरुद्ध समाजात छद्म-विज्ञान आणि अंधश्रद्धा यांचे स्तोम माजविणार्या लोकांच्या प्रचारातील या संदर्भातील विरुद्ध मांडणी काय असते हे सुद्धा त्यांनी मांडले आहे. हे सगळं समजावून सांगताना डॉ. रझा यांनी विज्ञान आणि न-विज्ञान (छद्म-विज्ञान) यांच्यातील फरक सुद्धा तुलनात्मक कोष्टकातून सोपं करून समजावून सांगितलं आहे.
या पुस्तकाच्या मिथकांपासून विज्ञानापर्यंत या मराठी अनुवादित आवृत्तीचे (अनुवादक – श्री. विक्रम) प्रकाशन स्वत: डॉ. गौहर ऱझा यांनी वर्धा येथील सेवाग्राम आश्रम येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये केले होते. विविध धर्मांतील मिथके, त्यांची विश्वाच्या प्रवासाबद्दल कल्पित कहाण्या आणि त्याने प्रभावित असलेली प्रत्येक संस्कृतीची वाटचाल या सर्वांच्या दृष्टिकोनातून आजकालच्या काळातील मूलभूत विज्ञान आणि त्यावरील आक्रमणांना समजून घेणे या पुस्तकामुळे सोपे जाते. या पुस्तकात ‘विज्ञान म्हणजे काय?’ याबद्दल विविध बुद्धिवादी विचारवंतांनी, विज्ञान साहित्यिकांनी आणि तत्त्वज्ञ यांच्या मांडणीबद्दल चर्चा केली आहे. “विज्ञान म्हणजे काय?” हे समजून घेण्यासाठी विज्ञान म्हणजे हे फक्त नैसर्गिक घटनांना उलगडून दाखवणारे शिस्तबद्ध नियमांचे सूत्र, प्रमेय किंवा सैद्धांतिक स्पष्टीकरण नाही तर त्यावर सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि तात्त्विक मुद्यांना स्पर्श केल्याशिवाय ते होणार नाही. सध्याच्या छद्मविज्ञान, भोंदूगिरी आणि आधुनिक विज्ञानाची झालर घालून लोकांना फसवणार्या अंधश्रद्धा वाढत असताना अशा पुस्तकांचे सर्वत्र स्वागत आणि वाचन व्हावे, असे मनापासून वाटते.
