आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण आदरांजली!

सावनी गोडबोले -

(ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच संगीत, साहित्य, रंगभूमी अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दि. १५ मे २०२६ रोजी ठाणे येथे निधन झाले. लोकांमध्ये मनोविकारांबद्दल असणार्‍या भीतीमुळे मानसिक आरोग्याबद्दल असलेले प्रचंड गैरसमज दूर करत मानसशास्त्र लोकांपर्यंत नेण्याचे तसेच व्यसनमुक्तीचे काम त्यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला साहाय्यभूत ठरणारी अशीच ही कामे होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंनिवाचे संपादक मंडळ डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत त्यांच्या कामाचा अल्पसा परिचय देणारा सावनी गोडबोले यांचा लेख देत आहोत – संपादक मंडळ)           

            डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याबद्दल किती लिहावे तितके कमीच वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व, काम आणि सामाजिक योगदान आहे. मुंबईच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्याची गरज जाणवली. आणि त्याचबरोबर जाणवला तो मानसिक आजाराबद्दल समाजाचा असलेला नकारात्मक दृष्टिकोन. म्हणूनच त्यांनी फक्त औषधांद्वारे ‘रुग्णांवर’ (मानसिक रुग्णांना ते शुभार्थी म्हणत!) उपचार केले नाहीत. ठाण्यातील त्यांनी उभारलेल्या आयपीएच या संस्थेत त्यांनी सुरू केलेले उपक्रम त्यांच्या व्यवसायातील कौशल्याची आणि सामाजिक जाणीवेची  साक्ष देतात. नैराश्य, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता, अपस्मार अशा अनेक आजारांच्या रुग्णांसाठी पालक, इतर मदतनीस, समुपदेशक यांच्या मदतीने स्व-मदत गट आज तिथे कार्यरत आहेत. अनेक शुभार्थींना व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले, समाजात मानाने जगायला शिकवले. ‘मुक्तांगण’ या पुण्याच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेपासून त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली. कोरोना काळात आणि त्यानंतरही नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या अनेकांना डॉ. नाडकर्णी यांच्या पॉड्कास्टनी आशेचा हात दिला आहे.

            डॉ. आनंद नाडकर्णी यांनी REBT (म्हणजेच विवेकी विचारपद्धतीचे) प्रशिक्षण देऊन समुपदेशकांची फळी निर्माण केली. महाराष्ट्रातील तरुणाई आणि त्यांच्या पालकांना व्यवसाय प्रबोधन घडवण्यासाठी ‘वेध’ नावाचा अनोखा उपक्रम राबवला. यशस्वी व्यतींची मुलाखत मंचावर घेत त्यांच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन, समाजापरी कृतज्ञता अशी मूल्ये रुजवली. बहुरंगी बहर या वयम मासिकासोबत घेतलेल्या उपक्रमाद्वारे अगदी सातवी- आठवीतल्या मुलांना देखील विवेकनिष्ठ विचार दिला. आणि ही सर्व कामे उत्तम नियोजनबद्ध प्रकारे करताना अनेक पुस्तकांचे, नाटकांचे, दिवाळी अंकातून लेखन चालू होते. एका देवस्थानात प्रवेशावर असलेले निर्बंध पाहिल्यावर देवाचे दर्शन नाकारून देवळाबाहेर बसून त्याचे रेखाचित्र काढले! रुग्णाच्या श्रद्धेचा उपयोग ते त्याला सकारात्मक, उन्नत विचारांकडे नेण्यासाठी खुबीने करत. त्यांच्या अकृत्रिम स्नेहभावनेमुळे अनेकांना ते आपले घरचे सदस्य वाटले नसते तरच नवल!

            अगदी शेवटच्या दिवसातही शरीराच्या वेदनेचा लवलेश चेहर्‍यावर दिसू न देता मुलाखत देणे, वेदान्त विचार ह्यांची कार्यशाळा घेणे हे सारे त्यांच्या कर्मयोगी संतत्वाची साक्ष पटवून देते.

-सावनी गोडबोले


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]