हमीद दलवाई आणि मुस्लीम सत्यशोधकची धर्मचिकित्सा

-

धर्मचिकित्सा ही समाजप्रबोधनासाठी पूर्वअट असते. धर्माची चिरेबंदी चौकट खिळखिळी केल्याशिवाय सामाजिक सुधारणा होऊ शकत नाही. धर्मचिकित्सा करताना धर्मग्रंथ, धार्मिक परंपरा व संस्कृती, धार्मिक कायदे, धार्मिक राज्यकर्ते व समाजातील नेत्यांची विचारसरणी यांची चिकित्सा आवश्यक ठरते. धर्मग्रंथ हा त्यातील प्रमुख स्तंभ असतो. मुस्लीम समाज हा पोथीनिष्ठ, व्यतिनिष्ठ, परंपरानिष्ठ असल्याने हमीद दलवाईंनी धर्मचिकित्सा करताना या सर्वांची चिकित्सा केली आहे. हमीदभाईंच्या चिकित्सेत मुस्लीम जमातवाद, धार्मिक मूलतत्त्ववाद आणि धर्मवादी राजकारणाचा समावेश आढळून येतो.

धर्मप्रधानता आणि बहुधार्मिकता हे भारतीय समाजाचे आजही ठळक वैशिष्ट्य राहिले आहे. यात धार्मिक सद्भाव आणि सहिष्णुता जशी दिसून येते तसेच धर्मवर्चस्व, धार्मिक अस्मिता आणि उच्छाद याचाही अप्रिय इतिहास आहे. भारतावरील इंग्रजांची दीर्घकालीन सत्ता हा देशावरील निर्विवाद मोठा आघात आहे. तथापि, या ब्रिटिश अमलात अनेक प्रकारच्या अन्यायी, विषमतावर्धक, शोषणाधारित परस्परांविरुद्ध वातावरण निर्माण करण्यात ब्रिटिश काळात यश आले आणि अशा अनेक कालबाह्य, पुरुषप्रधान, धर्मप्रधान व जाचक प्रथांवर बंदी घालण्यात आली. स्वातंत्र्य आंदोलन काळातील उदारमतवादी नेतृत्वातून प्रागतिक, आधुनिकतावादी विचारांना बढावा मिळाला. परिणामी, देश स्वतंत्र झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या राज्यघटनेने वैश्विक मानवतावादी मूल्यांचा अंगीकार केला. प्राचीन, धर्माधिष्ठित समाजाला आधुनिक, संविधानाधिष्ठित समाजात परावर्तित करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. यातून प्राचीनता आणि आधुनिकता, धर्माधिष्ठित समाज आणि धर्मनिरपेक्ष समाज, अंधश्रद्ध समाज आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज, प्रतिगामी आणि पुरोगामी अशा परस्परांविरुद्ध, विसंगत विचारमूल्यांत संघर्ष होणे हे स्वाभाविक असल्याची जाणीव संविधानकर्ते आणि उदारमतवादी नेतृत्वाला होती. सामाजिक सुधारणा आणि सामाजिक अभिसरणातील संभाव्य अडचणींची पूर्वकल्पना होतीच. त्यामुळे सजगपणे आणि जाणीवपूर्वक आधुनिकतावादी विचारांचा पुरस्कार करण्याचे धोरण आखण्यात आले. या इतिहासाची कल्पना समाजप्रबोधन चळवळीतील कार्यकर्त्यांना आहेच.

देशाचे स्वातंत्र्य हा आनंदाचा आणि त्याचवेळी  देशाची फाळणी हा वेदनेचा अनुभव अजूनही भारतीय राजकारणातील कळीचा मुद्दा आहे. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यातील अविश्वास आणि अस्मितांचे वर्चस्व हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू समाजातील सुधारणेचे प्रयत्न होत असतानाच मुस्लीम समाजातील परंपरावादी प्रभुत्व हे हिंदू-मुस्लीम समस्यांचे मूळ आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न सर्व धर्मवाद्यांनी हाणून पाडले. हिंदू समाजातील महिलांवरील अन्याय व विषमता दूर करण्यासाठी हिंदू कोड बिल अस्तित्वात आले. मात्र, मुस्लीम समाजासाठी ब्रिटिश काळात अस्तित्वात आलेला शरीयत अ‍ॅक्ट १९३७ कायम ठेवला. पुढे त्यालाच मुस्लीम व्यतिगत कायदा संबोधण्यात आले. हिंदू-मुस्लीम प्रश्न अधिक जटिल करण्यात हाही भाग महत्त्वाचा आहे. हिंदू-समाजातील धर्मचिकित्सा आणि उदारमतवादी परंपरा या समाजात विवेकनिष्ठ समाजप्रबोधन प्रबळ करीत असताना मुस्लीम समाजातील परंपरावादी, जमातवादी मानसिकता भारतीय समाजाचे भवितव्य धोक्यात आणू शकते याची जाणीव हमीद दलवाईंना झाली.

भारतीय समाजात आधुनिकतावादी, धर्मनिरपेक्ष आणि समतेवर आधारित विचार प्रवाह सुदृढ व्हावा यासाठी हमीद दलवाईंनी ८ एप्रिल १९६६ रोजी सात मुस्लीम महिलांचा ऐतिहासिक मोर्चा मुंबई विधानसभेवर नेऊन मुस्लीम व्यतिगत कायद्यात सुधारणा करावी, तोंडी एकतर्फी तलाक पद्धत, बहुपत्नीत्व, मूल दत्तक घेण्यास मज्जाव आणि हलाला सारख्या तरतुदी रद्द करण्याची मागणी केली. हा महिला मुतीचा ऐतिहासिक मोर्चा इस्लामच्या जगतातील पहिलीच घटना होती. हमीद दलवाईंची भूमिका अशी होती की, माणसाच्या दुनियेत माणसांनीच न्यायाचे राज्य आणले पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कुठलाही धर्म, रूढी, परंपरा यांचा अडसर येऊ नये. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या धर्माचे परीक्षण करावे व हा देश धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र व्हावा. प्रा. अ. भि. शहा आणि हमीद दलवाई यांच्या पुढाकारातून सेक्युलॅरिझम, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही, व्यतिस्वातंत्र्य आणि धर्मचिकित्सा करणारी ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. सेक्युलॅरिस्ट आणि ह्युमॅनिस्ट व्यतिमत्त्व असणार्‍या दलवाईंच्या लक्षात आले की, या आधुनिकतावादी विचारांचा प्रसार करणार्‍या इंडियन सेक्युलर सोसायटीकडे मुस्लीम समाज पाठ फिरवतोय. आपला ज्या समाजात जन्म झाला त्याच समाजात विवेकनिष्ठ आधुनिकतावादी विचारांची अधिक गरज आहे. या समाजात विज्ञाननिष्ठांची वानवा आणि पोथीनिष्ठ परंपरावाद्यांची मुबलकता आहे. मुस्लीम समाजात आधुनिकीकरणासाठी संघटनात्मक प्रयत्नांची जास्त गरज आहे. यातून पुढे २२ मार्च १९७० रोजी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. मानवतावादी, धर्मनिरपेक्ष, आधुनिकतावादी हमीद दलवाईंना ‘मुस्लीम’ नाव घेऊन चळवळ उभी करण्यात स्वारस्य नव्हते. परंतु प्राधान्याने मुस्लीम समाजात कामाची गरज असल्याने दुसरा पर्याय नव्हता. तसेच इंडियन सेक्युलर सोसायटीमार्फत कार्य करताना त्यांना आलेला अनुभव लक्षात घेऊन त्यांनी ‘मुस्लीम’ हे नाव धारण केलेली मुस्लीम सत्यशोधक मंडळ ही संघटना स्थापन केली. मंडळाचा हेतू स्पष्टपणे समजून घेण्यासाठी या मंडळाचा जाहीरनामा अभ्यासायला हवा. हा जाहीरनामा म्हणतो, “भारतीय मुस्लीम समाजापुढे स्वातंत्र्योत्तर काळात नवी आव्हाने उभी राहिली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर सय्यद अहमदखान यांचा मुस्लीम समाजाच्या धार्मिक आणि ऐहिक दृष्टिकोनातून मूलभूत बदल घडवून आणण्याचा आरंभीचा प्रयत्न वगळल्यास एरवी निराशाच पदरी येते. भारतीय मुस्लीम समाज या सर्व काळात आपल्या अल्पसंख्याक स्थानाविषयी विनाकारण अतीव जाणीव बाळगून आपल्या सनातन, परंपरागत श्रद्धा कवटाळून असलेला आणि बहुसंख्य हिंदू समाजाविरोधी आंदोलने करीत राहिला. सर सय्यद अहमदखानांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या मुस्लीम सुधारणांचा गाडादेखील अखेरीला विभतवादाच्या दलदलीत रुतून गेला. पाकिस्तानची निर्मिती आणि भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधातील तफावतीचा इतिहास सर्वांना माहीत आहेच.

भारताला सर्वधर्मीय राष्ट्रीयता निर्माण करण्याच्या झालेल्या सर्व प्रयत्नांत एक मूलभूत चूक सतत होत राहिली आहे. ती अशी की, हिंदू समाजाला आधुनिक, विशाल आणि पुरोगामी बनवण्याच्या आड येणार्‍या जुनाट धर्मनिष्ठा बदलण्याचा एक सततचा प्रयत्न चालला असतानाच मुस्लीम समाजाच्या कालविसंगत अशा परंपरागत श्रद्धांना हात न लावण्याचा आटापिटा मुस्लीम समाजाकडून करण्यात येत होता आणि बहुसंख्य हिंदू समाजातील परिवर्तनवादी मंडळीदेखील या प्रक्रियेला कळत नकळत हातभार लावीत होती. आजदेखील या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. याचा परिणाम म्हणजे हिंदू समाजात आधुनिक राष्ट्रवादाचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि समानतेच्या आधुनिक मानवी मूल्यांचे प्रवाह तुलनेने अधिक बळकट होत गेले आणि मुस्लीम समाज मात्र आपल्या जुन्याच श्रद्धांना चिकटून राहिला. सुशिक्षित मुस्लिमांची मजल यामुळे विभतवादी प्रवृत्तीपलीकडे कधी जाऊ शकली नाही. बदललेल्या परिस्थितीचे आव्हान यामुळेच मुस्लीम समाज स्वीकारू शकला नाही.

भारतात हिंदू आणि मुसलमान समाजातील ही प्रबोधनाची दरी भरून काढल्याशिवाय खर्‍या अर्थाने या दोन्ही समाजाचे संबंध सुधारणार नाहीत; राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार नाही आणि नव्या भारतातील प्रजासत्ताकात मुस्लीम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय घटक म्हणून नांदू शकणार नाही. आपण लोकशाही जीवनपद्धती स्वीकारलेली असल्याने या प्रबोधनाची निकड निर्माण झालेली आहे. त्याशिवाय समाजातील सर्व क्षेत्रांत स्त्री-पुरुष समानता निर्माण होणार नाही व लोकशाहीचा पाया कमकुवतच राहील. हे कार्य व्हावे म्हणून मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. सत्यशोधक शब्दाला महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक विशिष्ट अर्थ आहे. त्यामागे सामाजिक सुधारणांच्या प्रखर आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. या मंडळाचे ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ हे नाव ठेवताना महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची जाणीव या मंडळाच्या संस्थापक सभासदांपुढे आहे. वास्तविक स्वातंत्र्यानंतर अशी वेगळी सुधारणावादी का होईना, विशिष्ट धर्मगटांसाठी मंडळे काढण्याची आवश्यकता असायला नको होती याची जाणीव आहे; परंतु मुस्लीम समाजाच्या प्रबोधनावर भर देण्यासाठी आज तरी मंडळाचे कार्यक्षेत्र त्या समाजापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. जेव्हा सामाजिक बदलाची ही दरी नष्ट होईल तेव्हा हे मंडळ मुस्लीम समाजापुरते कार्य करणार नाही. आधुनिक विचारांच्या सर्वधर्मीय राष्ट्रवादी परंपरा मानणार्‍या सर्वच भारतीयांच्या इच्छा-आकांक्षांनुसार एखाद्या नव्या आंदोलनात मंडळाच्या वेगळ्या अस्तित्वाची आवश्यकता उरणार नाही. ती अवस्था यावी आणि लवकर यावी म्हणून हे मंडळ कार्य करत राहील.”

मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना १९७० ची आणि हमीद दलवाईंचा मृत्यू ३ मे १९७७ चा. हमीद दलवाईंना मुस्लीम सत्यशोधकसाठी एक दशकाचाही कार्यकाळ मिळाला नाही. मात्र, या काळात त्यांनी केलेले मूलभूत कार्य हे आजही मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे वैचारिक अधिष्ठान आहे.

धर्मचिकित्सा ही समाजप्रबोधनासाठी पूर्वअट असते. धर्माची चिरेबंदी चौकट खिळखिळी केल्याशिवाय सामाजिक सुधारणा होऊ शकत नाही. धर्मचिकित्सा करताना धर्मग्रंथ, धार्मिक परंपरा व संस्कृती, धार्मिक कायदे, धार्मिक राज्यकर्ते व समाजातील नेत्यांची विचारसरणी यांची चिकित्सा आवश्यक ठरते. धर्मग्रंथ हा त्यातील प्रमुख स्तंभ असतो. मुस्लीम समाजाच्या संदर्भात विचार केल्यास १) कुराण, २) हदीस (मोहम्मद पैगंबरांचे विचार व वर्तन यांचे संकलन), ३) शरीयत (कायदे), ४) खलिफा, मुल्ला, मौलवी, उलेमा तथा धार्मिक नेते यांचा समावेश होतो. या सर्व घटकांचा प्रभाव मुस्लीम समाजात दिसून येतो. याचाच अर्थ मुस्लीम समाज हा पोथीनिष्ठ, व्यतिनिष्ठ, परंपरानिष्ठ असल्याने हमीद दलवाईंनी धर्मचिकित्सा करताना या सर्वांची चिकित्सा केली आहे. हमीदभाईंच्या चिकित्सेत मुस्लीम जमातवाद, धार्मिक मूलतत्त्ववाद आणि धर्मवादी राजकारणाचा समावेश आढळून येतो.

हमीद दलवाईंनी केलेल्या धर्मचिकित्सेच्या एकूणच मांडणीचा परामर्श घेणे आवश्यक आहे. मात्र, शब्दमर्यादा लक्षात घेता त्यांच्या निवडक मांडणीतून दिशा स्पष्ट होते. दलवाई म्हणतात, “प्रेषिताविषयी मला अतिशय आदर आहे आणि इतिहासात उदयाला आलेल्या सर्वश्रेष्ठ व्यतींपैकी ते एक आहेत असे मी मानतो; पण प्रेषित स्वतःच सांगत त्याप्रमाणे ते ‘केवळ एक माणूस’ होते आणि मानवी प्रकृतीत असलेली दौर्बल्ये त्यांच्याही ठिकाणी होती.” हमीद दलवाईंनी आपल्या कार्याची सुरुवात मुस्लीम महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडून केली. तेव्हा मुस्लीम धर्मवाद्यांनी त्यांना इस्लामचा शत्रू ठरवले. हमीद दलवाई मुस्लीम नाहीत म्हणून त्यांना मुस्लीम प्रश्नांवर बोलण्याचा अधिकारच नाही अशी भूमिका घेतली तेव्हा दलवाईंचे प्रतिपादन असे होते, “इस्लामने अनेक पत्नीत्वाला केवळ अनुज्ञा दिली आहे, ते बंधनकारक आहे असे म्हटले नाही. अशा स्थितीत मुस्लिमांच्या अनेक पत्नीत्वाला बंदी घालावी अशी मागणी करणार्‍याचे मुस्लिमत्व आपोआप नष्ट कसे होते, हे मला समजत नाही.” सामाजिक सुधारणेचे कार्य मानवतावादी दृष्टिकोनातून व्हायला हवे. धर्मांधतेच्या विळख्यातून सामान्य लोकांना मुत करणे हेच खरी मानवतावादी सेवा आहे, अशी दलवाईंची भूमिका होती. ते म्हणतात, “इस्लामला मानवतेचा अंगीकार करायला लावणे, हे काम इतके मोठे आहे आणि कठीण आहे की, कोणीही एक माणूस त्याला पुरा पडणार नाही, याची मला जाणीव आहे. पण म्हणूनच या देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने या कामाचे महत्त्व किती आहे हे ओळखणार्‍या प्रत्येक व्यतीने हे काम हाती घेतले पाहिजे. मी माझ्या अल्प कुवतीनुसार या कामाला वाहून घेतले आहे.”

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सामाजिक सुधारणा किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना अशी भूमिका होती की आपण आपल्या घरात लागलेली आग विझविण्याचे काम केले पाहिजे. आपल्या घरातील कचरा झाडून घेतला पाहिजे. इतरांच्या घरातील कचरा दाखवून आपले घर स्वच्छ होणार नाही. हाच विचार हमीद दलवाईंनीही मांडला होता. हमीद दलवाई हे निःसंशयपणे निधर्मी आणि निरीश्वरवादी होते, मात्र संपूर्ण समाज निधर्मी किंवा निरीश्वरवादी व्हावा असा त्यांचा आग्रह नव्हता. संविधानाने दिलेले धर्मपालनाचे किंवा धर्म न पालनाचे स्वातंत्र्य त्यांना मान्यच होते. धर्मात काही चांगल्या गोष्टी असतात त्यांच्याशी मतभेद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, ज्या गोष्टी अन्याय, विषमता आणि शोषणास कारणीभूत आहेत त्या दूर केल्या पाहिजेत ही भूमिका मांडताना दलवाई म्हणतात, “भारतातील मुस्लीम संस्कृतीने मला घडविले आहे. या संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या आहेत त्यांचा मला अभिमान आहे आणि तिच्यात ज्या विद्रूप गोष्टी आहेत, त्यांची मला लाज वाटते.” ज्या समाजात धर्मचिकित्सेची परंपरा नाही त्या समाजात विवेकनिष्ठ धर्मचिकित्सा करताना दलवाईचे मुस्लिमत्व धर्मवादी समाजाने नाकारणे हे स्वाभाविक आहे. तेव्हा दलवाईंनी स्पष्टपणे सांगितले, “मी मुसलमान आहे, पण माझा ईश्वरावर विश्वास नाही आणि म्हणून महंमद ईश्वराचा प्रेषित होता आणि कुराण हा दैवी संदेश आहे या गोष्टींवरही माझा विश्वास नाही.” आपण मुस्लीम आहोत किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार इतरांना नाही. माझे आई-वडील मुस्लीम होते आणि मुस्लीम संस्कृतीत मी वाढलो हे मी मुस्लीम असण्यासाठी पुरेसे आहे. एका कार्यक्रमात औरंगाबादचे महंमद समी कॉन्ट्रॅक्टर यांनी दलवाईना विचारले, “आपण स्वतःला मुसलमान समजता का? असल्यास नमाज, रोजा, कुराण आणि आखरित याबद्दल आपली धारणा काय आहे?” तेव्हा हमीद दलवाईंनी उत्तर दिले, “मी नमाज पढत नाही, उपवास करीत नाही. कारण हे ईश्वरनिर्मित नसून महंमदनिर्मित आहे असे मी मानतो. यामुळे आखरितवर माझा विश्वास नाही, हे ओघानेच आले आणि तरीही मी मुसलमान आहे, कारण, मी मुस्लीम समाजात जन्माला आलो आहे. नेहरू निरीश्वरवादी होते आणि तरीही ज्या अर्थाने हिंदू होते त्या अर्थाने मी मुसलमान आहे. कारण, मुस्लीम अथवा हिंदू असणे याची केवळ पोथीबद्ध व्याख्या मी मान्य करीत नाही, ती अधिक व्यापक आहे असे मी मानतो.”

हमीद दलवाई यांचे विचार आणि वर्तन हे आतबाहेर एकात्म होते. ग्रंथप्रामाण्य झुगारून देऊन चिकित्सा करणारे ते पहिलेच क्रांतिकारक समाजसुधारक होते. तरीही संपूर्ण मुस्लीम समाजाने नास्तिक व अश्रद्ध झालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता. समाजाचे आमूलाग्र परिवर्तन होणे आवश्यक आहे इतकेच मान्य असणार्‍या कार्यकर्त्यांनी आरंभ म्हणून कोणताही छोटासा कार्यक्रम घ्यावा, सामाजिक सुधारणेस प्रारंभ करावा असे आवाहन करीत. त्यांनी समान नागरी कायदा, आधुनिक शिक्षण, कुटुंब नियोजन,  धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्यासाठी कार्य केले. धर्मवादी मुस्लीम नेत्यांचा ढोंगीपणा दाखवून दिला. हमीद दलवाईंचे तर्कशुद्ध, बुद्धिप्रमाण्य विचार त्यांच्या जीवितकार्यात, आजारपणात आणि निधनानंतरही डोकावतात. त्यांनी आजारपणाच्या शेवटी आपले मृत्युपत्र लिहून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रा. अ. भि. शहा, मा. शरद पवार आणि संपादक गोविंदराव तळवलकर यांना सोपवली होती. ते मृत्युपत्र असे…

हमीद दलवाई यांची अखेरची इच्छा – मृत्युपत्र

‘मृत्यूनंतर माझे शव माझ्या गावी नेऊ नये. विद्युत दाहिनीत माझ्या शवाचे दहन करावे. मुसलमान किंवा हिंदू, कोणत्याही पद्धतीने कोणताही धार्मिक संस्कार अगर श्रद्धांजलीची भाषणे करू नयेत. मी निरीश्वरवादी म्हणून जगलो व निरीश्वरवादी म्हणूनच मला मरायचे आहे. माझे स्मारक उभारू नये.’

‘या देशात इस्लामिक संशोधन संस्था स्थापन व्हावी, ही माझी आवडती इच्छा. काही खाजगी व निमसरकारी यंत्रणांनी चालविलेल्या तशा काही संस्था आहेत, पण त्यांच्या कामाने माझे समाधान झालेले नाही. इस्लाम व त्याची संस्कृती सुधारू इच्छिणार्‍या माझ्या मित्रांनी अशी संस्था स्थापन करावी. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अशा मूलभूत चळवळींचे, तसेच शहरी व सुशिक्षित मुसलमानांनी चालविलेल्या मुस्लीम राष्ट्रवादी, जातीय चळवळीचे प्रतिबिंब या संशोधनात दिसले पाहिजे. इस्लामच्या समस्यांना वाहिलेले एक नियतकालिकही या संस्थेने सुरू करावे. जगातल्या इस्लामिक चळवळीची दखल त्या नियतकालिकांनी घ्यावी.’

‘मी सुखाने जगलो. माझी आता कोणाही विरुद्ध तक्रार नाही. माझ्याशी मतभेद असलेल्यांशी मी झगडलो, पण माझा कोणाही विरुद्ध आकस नाही. म्हणून त्यांच्याशीही वैयतिक संबंध ठेवण्याचा मी प्रयत्न केला.’

हमीद दलवाई
मुंबई, ९ एप्रिल १९७७.

हे मृत्युपत्र हमीद दलवाईंचा इहवादी दृष्टिकोन आणि मरणोत्तर जीवनाकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट करते. हमीदभाई मरणोत्तर देहदान करण्याच्या विचाराचे होते, परंतु जवळपास दोन-तीन वर्षांचे आजारपण, सततचे डायलेसीस आणि मृत्यूसमयी झालेली कावीळ यामुळे देहदान करण्याची इच्छा बाजूला ठेवणे अपरिहार्य होते. हमीद दलवाईंचे विचार, भूमिका आणि मानवताभिमुख कार्य हेच मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्याचे अधिष्ठान आहे.

मुस्लीम सत्यशोधक मंडळ मुस्लीम समाजाला नास्तिक होण्यास सांगते, ते इस्लामला नष्ट करायला निघाले आहेत, असा दुष्ट अपप्रचार सनातनी व जमातवादी मुस्लीम करतात. ज्यात अजिबात तथ्य नाही. मंडळ समाजाने धर्मनिरपेक्ष वृत्ती अंगी बाळगावी यासाठी प्रयत्न करते. आस्तिक किंवा नास्तिक असणे हा व्यतिस्वातंत्र्याचा भाग आहे आणि या स्वातंत्र्याचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. मंडळास असे वाटते की, धर्माचे दोन भाग असतात. एक परलोकाविषयीचा व दुसरा इहलोकाविषयीचा. म्हणजे, मुस्लिमांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास इबादत आणि आदत असे ते दोन भाग असतात. पहिल्यात व्यतीचा परमेश्वराशी संबंध असतो व दुसर्‍यात व्यतीचा इतर माणसांशी, समाजाशी व देशाशी संबंध असतो. समाज धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर बनला पाहिजे याचा अर्थ या दोन्ही भागांची त्यांनी गल्लत करू नये. ते संपूर्णपणे वेगळे ठेवायला हवे. तथापि, या दोन्ही भागांचा मिळून धर्म आहे असे मुस्लीम समजतात. ‘आदत’ हा दुसरा भाग परिवर्तनीय असावा, तो कालसापेक्ष करावा असा मंडळाचा आग्रह असतो. मात्र, त्याविरुद्ध मुस्लीम समाजात अपप्रचार केला जातो. ‘इबादत’चा भाग हाच खरा धर्म म्हणता येईल. कोणी कशावर श्रद्धा ठेवावी किंवा त्याची कशी आराधना करावी याबद्दल मंडळ सल्ला देत नाही. उलट, इबादतचा भाग हा मुस्लिमांचाच काय सर्व धर्मियांचाच संविधानिक हक आहे, तो नाकारता येणार नाही असे मंडळाचे म्हणणे आहे. समाजाने खर्‍या अर्थाने सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष बनणे म्हणजे आपला इबादतचा भाग व आदतचा भाग हे वेगळे व स्वतंत्र आहेत असे मानणे आणि इबादत व आदतची गल्लत न करणे. इबादतच्या मर्यादा ठरवून घेणे. आदतचे क्षेत्र हे परिवर्तनीय आणि व्यापक असल्यामुळे ते शासनाच्या अखत्यारीत ठेवणे. याचाच अर्थ, सेक्युलॅरिझम मान्य करणे होय. धर्मसंस्थेच्या निर्मितीची कारणे, मानवाची ईश्वरविषयक कल्पना, मानवाची ईश्वरोपासना ही त्याची आध्यात्मिक भूकही असू शकते. एवढ्या बाबतीतच धर्माची कार्यक्षेत्र मर्यादित असावे आणि इतर सर्व क्षेत्रांत धर्माचा हस्तक्षेपास मज्जाव करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता स्वीकारणे होय. मात्र, असे घडताना दिसत नाही. ऐतिहासिक परिस्थितीमुळे इस्लाम धर्माची बांधणीच अशी झाली आहे की, वरील दोन्ही भागांना मिळून धर्म असे संबोधण्यात येते. हे दोन्ही भाग एकमेकांशी इतके एकरूप व संलग्न झाले आहेत की त्यांचे विभाजन करणेच अवघड होऊन बसते. एवढेच काय, धर्माचे असे दोन भाग पाडणे किंवा विभाजन करणे म्हणजे हीसुद्धा धर्मातील ढवळाढवळ व हस्तक्षेप आहे असे धर्मगुरू, मुल्ला, उलेमा समजतात. त्यांच्या मते, हा अधिकार फक्त उलेमांचाच आहे! तेच फक्त धर्माचा अर्थ सांगू शकतात. धर्म कशाला म्हणायचे व कशाला म्हणू नये हा ठरवण्याचा सर्व अधिकार त्यांचाच आहे. या क्षेत्रात फक्त त्यांचीच मतेदारी निर्माण झाली आहे व ती मतेदारीही धर्माचाच एक भाग होऊन बसली आहे. मुस्लीम सत्यशोधक मंडळ धर्माबाबतची ही मतेदारीच तोडू इच्छिते. कोणालाही आणि मंडळालासुद्धा धर्मावर, धर्माच्या अर्थावर व धर्म म्हणजे नेमके काय हे सर्व सांगण्याचा अधिकार असायला पाहिजे. त्या हकाला अनुसरूनच मंडळाने धर्माचे हे दोन भाग मानले आहेत. यावर उलेमा व त्यांचे समर्थक मंडळावर चवताळून उठतात, अपप्रचार करतात आणि ते स्वाभाविक आहे. यामुळेच सर्वसामान्य मुस्लीम जनतेलाही या तथाकथित पारंपरिक धर्माच्या म्हणजे धर्मगुरूंच्या, मुल्ला-मौलवींच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न मंडळ करीत असते. अशा रीतीने एकदा मुस्लीम समाज या धर्मगुरूंच्या व राजकारण खेळणार्‍या जातीयवाद्यांच्या पकडीतून निसटला की त्याला ज्ञानाची, माहितीची इतर दारे उघडतील. असे झाले तर लोकशाही व समाजाचे हित कशात आहे हे समजायला लागेल. अर्थात, हे सर्व घडायला फार काळ लागेल. ती हळूहळू होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे; पण म्हणून मुस्लीम समाजाने थांबून चालणार नाही. त्याने धर्मनिरपेक्षतेच्या – सेक्युलॅरिझमच्या दिशेने झपाट्याने चालू लागले पाहिजे, न पेक्षा मुसलमान व जग यांच्यात न संपणारे अंतर पडेल आणि समाज बौद्धिकदृष्ट्या मागे राहील.

अशा सुसंस्कृत विचारातून केवळ मुसलमानांचे हित आहे, त्यांचा इबादत हक अबाधित राहणार आहे असे नव्हे, तर मुस्लीम हे या देशाचे एक प्रमुख जबाबदार घटक आहेत आणि या देशाचे शिल्पकार म्हणूनही त्यांना योगदान करता येईल. देशातील लोकशाही व संविधान यशस्वी करण्याची जाणीव मुस्लीम समाजाने ठेवली पाहिजे. त्यासाठी ही धर्मनिरपेक्षता आवश्यक असल्याने तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच एक आदर्श असा भारतीय समाज घडवण्यासाठी की जो न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर उभारलेला असेल असा नवसमाज उभारण्यासाठीच धर्मनिरपेक्षता आवश्यक असल्याने मुस्लिमांनी आपला वाटा उचलला पाहिजे.

हे सर्व घडून आणण्यासाठी, समाज धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी मुस्लिमांनी आपल्या धार्मिक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल केला पाहिजे. मुल्ला, मौलवी सांगतात तेच खरे मानण्याची वृत्ती सोडून दिली पाहिजे. आपल्या इबादतचे स्वातंत्र्य जपले पाहिजे व आदतच्या भागातील राजसत्तेचे सार्वभौमत्व मान्य केले पाहिजे. तरच मुस्लिमांनी सेक्युलॅरिझमची कल्पना स्वीकारली असे होईल. त्याचवेळी त्यांच्यावर असलेला धर्माचा पगडा दूर होऊन त्यांची मानसिक गुलामगिरीतून मुक्तता होईल. धर्मनिरपेक्ष भारतीय नागरिक म्हणून ते राहू शकतील. धर्मनिरपेक्षतेचा मुस्लिमांमध्ये प्रचार करण्याचा त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा आणि कालसापेक्ष घडवून आणण्याचा मंडळ प्रयत्न करत आहे. धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानाधिकार यासाठीच पारंपरिक, कालबाह्य शरीयतवर आधारित कौटुंबिक कायद्याच्या जागी मुस्लीम सत्यशोधक मंडळ समान नागरी कायद्याचा आग्रह धरते. हा समान नागरी कायदा केवळ महिलांना समानाधिकार देण्याबाबत नाही तर तथाकथित धर्मापलीकडची, आधुनिकतेची दृष्टी देणारा ठरणार आहे.

आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर धर्मग्रंथात सापडणार नाही. आधुनिक काळातील प्रश्न आधुनिक, तर्कशुद्ध  विचारातून शोधावी लागतील. धर्मापलीकडची दृष्टी स्वीकारल्याशिवाय आपले ऐहिक प्रश्न सुटणार नाहीत हा एक संदेश मुस्लीम सत्यशोधक मंडळ देण्याचा प्रयत्न करते.

रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात सुबोध थरवल यांनी हमीदभाईंना प्रश्न विचारला होता, “इस्लाम हा जास्तीत जास्त लोकशाहीवादी आणि समताप्रधान धर्म आहे. यावर आपले मत काय?” तेव्हा हमीद दलवाई यांनी दिलेले उत्तर होते, “कुठलाच धर्म लोकशाहीवादी तसेच समतावादी नाही. इस्लामही याला अपवाद नाही. धर्म आध्यात्मिक पायावर समाजाची उभारणी करीत असतात, ते मध्ययुगीन आहेत आणि लोकशाही, स्वातंत्र्य, समानता या आधुनिक कल्पना आहेत. धर्माच्या पायावर आता सुसंस्कृत समाजव्यवस्था निर्माण होऊ शकणार नाही, हे आपण सगळ्यांनी ओळखले पाहिजे.”

मुस्लीम सत्यशोधक मंडळाची धर्माकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी ही मानवताभिमुख आहे. याच कारणांसाठी धार्मिक सण अधिकाधिक मानवताभिमुख करण्याच्या प्रयत्न मंडळ करीत असते. बकरी ईद हा मुस्लीम समाजातील एक महत्त्वाचा सण आहे. इस्लाम पूर्व काळातील आख्यायिकेवर आधारित असलेला हा सण त्याग, बलिदान आणि समर्पणाची शिकवण देतो. मात्र समाज प्राण्यांची आहुती देऊन हा सण साजरा करतो. मुस्लीम सत्यशोधक मंडळाने गेल्या पंधरा वर्षांपासून हा सण रतदान अभियान सप्ताह राबवून साजरा करते. गेल्या काही वर्षांपासून मरणोत्तर अवयव व देहदान संकल्प करण्यात येतो. याबाबत धर्मग्रंथ किंवा धर्माधिष्ठित संस्कृती काय सांगते, हे पाहिल्यास आपण पुढे जाण्याऐवजी कित्येक शतकं मागे जाण्याचीच शक्यता आहे. धर्मग्रंथात, परंपरेत आणि संस्कृतीत अनेक चमत्कार आणि अंधश्रद्धांचा भरणा आहे. आज अशा धर्माधिष्ठित श्रद्धा आणि अंधश्रद्धा अप्रस्तुत ठरतात त्याला विरोध करून पर्याय देण्यासाठी मंडळाने तिमिरभेद मंच स्थापन केला आहे. धर्माची सकारात्मक व नकारात्मक चिकित्सा करून आजच्या काळात जे प्रस्तुत, योग्य, कालसुसंगत आणि विवेकी आहे, त्याचा स्वीकार आणि जे कालबाह्य, निरुपयोगी आहे त्यावर बहिष्कार ही भूमिका घेऊन मंडळ कार्य करते. धर्माकडून आलेला धर्मचौकटीतील विवाह विचार बाजूला ठेवून मुस्लीम सत्यशोधक मंडळ आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन आणि पाठिंबा देते. धर्माने घालून दिलेल्या मर्यादा आवश्यक तेव्हा ओलांडण्याचे धाडस दाखवते.

एक महत्त्वाची बाब सर्वश्रुत आहे. ती म्हणजे, इस्लामची धर्मवादी परंपरा केवळ बुद्धिवादाला विरोध करणारी आहे असे नाही तर धर्मातीत लोकशाहीच्या विकासालाही ती प्रतिकूल असल्याचे निदर्शनास येणार्‍या घटना खुद्द मुस्लीम देशात घडतानाचा अनुभव आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान वगैरे शेजारच्या मुस्लीम देशात तसेच हीच धर्मवादी मानसिकता असणार्‍या भारतातील नागरिक जीवनात व्यती किवा देशातील संपूर्ण जनता देखील सार्वभौम आहे, हे इस्लामला मान्य नाही. येथे सर्वोच्च न्यायालय किंवा संसदेपेक्षा शरीयतला प्राधान्य देण्यात येते हे शहाबानो, शबानाबानो आणि शायराबानो प्रकरणात मुस्लीम धर्मवाद्यांनी दाखवून दिले आहे. तसेच ‘स्वर्ग, पृथ्वी व यांच्या दरम्यानचे सर्व काही यावर मनुष्याची अधिसत्ता नसून ती अल्लाहची अधिसत्ता आहे’, हे वारंवार सांगण्यात येते, जे समाजाला आधुनिकता स्वीकारण्यास प्रतिबंध करते.

मुस्लीम सत्यशोधक मंडळ सातत्याने आधुनिकतेची कास धरून वाटचाल करते. धर्मचिकित्सेपेक्षा, धर्मवर्चस्ववाद आणि धर्मवादी राजकारणाची चिरफाड करते. हमीदभाईंच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, “सामाजिक सुधारणेचा विचार मांडताना किंवा विशिष्ट सामाजिक सुधारणेचा आग्रही पुरस्कार करताना धर्माचा पाया घेऊ नका. धार्मिक पुनरुत्थानाचा पाया घेतला की प्रबोधनाची भूमिका मागे पडते.” हा विचार महत्त्वाचा वाटतो. चांगल्याचे समर्थन आणि वाईटाचे निर्मूलन हा धर्मचिकित्सेचा आधार ठरवून धर्माची रेषा पुसण्यापेक्षा आधुनिकता आणि मानवतेची रेषा रेखाटण्यात मंडळाची शती वापरण्यात येते.

-डॉ. शमसुद्दिन तांबोळी, पुणे

अध्यक्ष - मुस्लीम सत्यशोधक मंडळ
ई-मेल : tambolimmrediffmail.com
मो. ९८२२६ ७९३९१

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]