हेमंत धानोरकर -
– निशा भोसले
मी अंनिसला काय दिले माहीत नाही; पण मला डॉक्टर दाभोलकर आणि अंनिसने विवेकी जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान दिले. विवेकी माणूस घडविले. असे सांगत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आपल्या जीवनातील स्थान स्पष्ट करणार्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या निशाताई भोसले यांची मुलाखत हेमंत धानोरकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीतून सामोरा आलेला त्यांचा जीवनप्रवास अंनिसच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे…
नमस्ते निशाताई! अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांना आपला जीवनप्रवास कळावा यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. आपल्या मुलाखतीची सुरुवात आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून करू या!
निशाताई – माढा तालुक्यातील सीना नदीच्या काठी ‘केवड’ या गावी शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेतीचे कष्टप्रद जीवन आणि वारकरी संप्रदायाची परंपरा यामुळे बालपणातच वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि संतांचे विचार यांच्याशी माझा परिचय घडू लागला. वडील दर महिन्याला पंढरीची वारी करत असत. कधी पायी तर कधी रेल्वेनेही ते पंढरपूरला जात असत. दर एकादशीला आमच्या वाड्यात भजनी मंडळ जमत असे. मग रात्री उशिरापर्यंत टाळ-मृदंगांच्या तालावर भजने ऐकायला मिळत. संत तुकारामांची, नामदेवांची भजने सतत कानावर पडत.
माझे वडील जेव्हा रेल्वेने पंढरपूरला जात, तेव्हा नेहमीच आईला व आम्हा भावंडांनाही सोबत नेत असत. रेल्वेचा हा प्रवास आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील वातावरण ही आमच्यासाठी अनुभवांची पर्वणीच होती. तर कधी मामाच्या गावी बैलगाडीने जाण्याचीही मजा आम्ही घ्यायचो. आमच्या बालपणातील घडलेला प्रवास एवढाच.
शेतकरी कुटुंबातील वडीलही कष्टाळू शेतकरी होते. साधा, सरळमार्गी स्वभाव असल्यामुळे गावात सर्वांनाच त्यांचा आधार वाटत असे. वडिलांसोबत माझी आई, इतर भावंडे आणि घरातील इतर सर्व जण शेतीच्या कामात सतत व्यस्त असत.
घरातल्या सर्वच मुलांनी व मुलींनीही उच्च शिक्षण घ्यावे, अशी माझ्या आईची इच्छा होती. मुलींना शिक्षण घेण्यास प्रतिबंध करणार्या त्या काळात मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरणारी माझी आई म्हणजे माझ्यासाठी सावित्रीबाई सारखीच होती. परंतु आमच्या गावात शाळा नसल्यामुळे मला शाळेत जाण्यासाठी गाव सोडणे भाग पडले. शाळेत जाण्याच्या वयाआधीच सवय लागावी म्हणून मला मावशीकडे नेऊन सोडण्यात आले.
करमाळा तालुक्यातील कुंकवासाठी प्रसिद्ध असलेले केम हे माझ्या मावशीचे गाव होते. या गावात चांगली शाळा होती. माझा मोठा भाऊही याच शाळेत होता. आता माझाही याच शाळेत प्रवेश होणार होता. मावशीचं मोठं घरही होतं. पण मावशी बालविधवा होती. विधवांचे जीवन किती खडतर असतं याची पुसटशी जाणीव मला शाळेत जाण्याआधीच मावशीच्या सोबत राहताना येत होती. समाजसुधारकांनी विधवा पुनर्विवाहाची चळवळ सुरू केल्यामुळे त्यांना झालेला विरोध, विधवांचे प्रश्न, केशवपन असे मुद्दे शाळेत शिकताना मावशीचा चेहरा डोळ्यांसमोर येत असे. त्यामुळे त्याचे गांभीर्य लवकर समजत असे.
विधवा असल्यामुळे गावातील रस्त्यांवर चप्पल घालून चालायचे नाही, दुकानात किंवा बाजारात वस्तू खरेदीला जायचे नाही, अशा अनेक अन्यायकारक नियमानुसार खडतर जीवन माझी मावशी जगत होती. गावातील इतर विधवांप्रमाणेच सततचे देवधर्म, कर्मकांड, रूढी-परंपरा पाळणे आणि वेगवेगळ्या ग्रंथांची पारायणे अशा धार्मिक कृत्यांमध्ये मावशीने स्वतःला गुंतवून ठेवले होते. तिच्यासोबत राहायला गेल्याने तिला आनंदच झाला.
मी पहिलीपासून १० वीपर्यंत मावशीकडे राहिले. ७-८ वीच्या वयात घरातल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदार्या पार पाडू लागल्याने नेतृत्व आणि जबाबदार्या यांचे शिक्षण मिळू लागले. घरात येणार्या व जाणार्या धान्याच्या पोत्यांचा हिशेब ठेवणे, दर महिन्याचा खर्च काढणे, त्यासाठी किती धान्य विकावे लागेल याचा अंदाज करणे अशी अनेक महत्त्वाची कामे मी करत असे. यातूनच माझा स्वभाव जिज्ञासू आणि चिकित्सक बनत गेला. पुस्तकांतलं विज्ञान कळू लागल्यावर मावशीसोबत ग्रंथांमधील पुराणकथा आणि अवैज्ञानिक गोष्टींबाबत मी वाद घालू लागले. पोथीत काय खोटं लिहिलं आहे का? असं पुटपुटत शेवटी मावशी वादात माघार घेत असे. अंधश्रद्धांचं मूळ असलेल्या ग्रंथप्रामाण्य या शब्दाची व्याख्या खूप उशिरा कळली. परंतु कोणत्याही धार्मिक व्यक्तीवर ग्रंथप्रामाण्याचा पगडा किती जबरदस्त असतो हे मावशीसोबत जगताना कळालं.
आपल्या शिक्षणाबाबत थोडं सांगाल का?
माझ्या गावातली मॅट्रिक परीक्षा पास होणारी पहिली मुलगी मीच होते. आता पुढे कॉलेजला शिक्षण घेण्याची इच्छा मनात आली. मी आईकडे हट्ट धरला की मला एवढ्यात लग्न करायचं नाही, भावाप्रमाणे मलाही १५ वी पर्यंत शिकायचे आहे. आईचा पाठिंबा होता, पण वडील तयार नव्हते. मुलीच्या जातीने लवकरात लवकर सासरी जावं असं त्यांना वाटत होतं. शेवटी आईच्या प्रयत्नांतून मला कॉलेजच्या शिक्षणाची परवानगी मिळाली. मोठा भाऊ सोलापुरात पोलीस खात्यात नोकरी करत होता. त्यामुळे राहण्याची सोय झालेली होती. सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेज येथे कला शाखेत बी. ए. च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला.
आता जग अजून बदललं. ग्रामीण जीवनाच्या अंधश्रद्धाळू वातावरणातून सोलापूरच्या शहरी व आधुनिकतेच्या वातावरणात प्रवेश झाला. त्यातच आई-वडील किंवा मावशी अशा परंपरानिष्ठ ग्रंथप्रामाण्यवादी स्वभावाच्या लोकांऐवजी नवीन विचारांचे नव्या जमान्याचे मित्र-मैत्रिणी, कॉलेजचे वातावरण आणि दिशा देणारी पुस्तकं यांनी माझं विश्वच बदलून गेलं.
आपला विवाह कसा झाला याविषयी सांगा.
बी. ए. च्या तृतीय वर्षाला असताना प्रकाश भोसले या तरुणाशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत व सहजीवनात झालं. प्रकाश भोसले ‘पीएसआय’ या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. परीक्षा पास झाल्यावर त्यांची ट्रेनिंग झाली. ट्रेनिंग करून परतल्यानंतर आमचं लग्न झाले.
आमचं लग्न लव्ह प्लस ऑरेंज असे होते; पण त्या काळात पोलीस ऑफिसर झालेल्या मुलाला भरपूर हुंडा देऊन मुली मिळत. मी मात्र प्रकाश भोसले यांना स्पष्ट भाषेत ‘मी हुंडा देणार नाही. घरून एक चमचाही आणणार नाही. सोनं-नाणं काहीही नाही’, असे बजावले, तरीही त्यांना ते मान्य होते. लग्नाचाही खर्च त्यांनीच केला. ट्रेनिंग संपल्यावर त्यांची नेमणूक मुंबईला झाली. माझे भाऊपण पोलीस खात्यातच होते; पण ते मुंबईबाहेर होते. सुरुवातीला आम्हाला कुर्ला (पूर्व), नेहरूनगर इथे पोलीस वार्टर मिळाली आणि मी १९७५ साली मुंबईत राहायला आले. एक छोटं खेडेगाव ते राज्याची राजधानी असा चढत्या क्रमाने आयुष्य चालले होते. सर्वसामान्य संसाराप्रमाणेच मूल, त्यांच्या शाळा, अभ्यास इ. रुटीन चालू होते.
पोलीस अधिकार्याशी आपले लग्न झाल्यानंतर कौटुंबिक आयुष्य कसे होते?
फक्त इतर कुटुंबं आणि पोलिसांची कुटुंब यांच्यात एक फरक होता. तो म्हणजे जेव्हा सणवार असे, एखादा उत्सव गणेशोत्सवासारखा तर यांना बंदोबस्त असे. गणपती उत्सवात तर दोन-दोन दिवस घरी यायला मिळत नसे, तेव्हा मुलांना घेऊन आम्हा बायकांनाच बाहेर पडावे लागे. अशावेळी आम्ही शेजारणी मिळून जात असू.
मुंबईत बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगलीत आम्हाला त्याचा खूप त्रास झाला. अनेकांची मुलं शाळेत अडकली होती. आमची मुलं राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे शिकत होती. ती मोठ्या मुलांबरोबर घरी पोचली. पण शेजारणीच्या मुलाची ट्रीप गेली होती. लॅण्डलाईन फोन आमच्याकडे होता. सगळ्याजणी एकत्र जमून होतो. सगळे पुरुष बंदोबस्तासाठी बाहेर पडले होते. त्यांच्याबद्दल काहीच कळत नव्हते. तशातच रात्री आमच्या पोलीस बिल्डींगवर दगडफेक होऊ लागली. लोक जोरजोरात ओरडत होते. आम्ही मागच्या बाजूच्या लोकांना समोर घेऊन दरवाजे, खिडक्या बंद करून बसून ठेवले होते. वेळ आणि संधी मिळेल तसे पोलीस ऑफिसर फोन करून विचारपूस करीत होते आणि स्वत: ठीक असल्याचे सांगत होते. तेव्हा पोलीस खात्यातील नोकरी नसती तर बरं झालं असतं वाटलं, पण तेवढंच.
मुंबईत राहात असताना आपण सामाजिक कामातही सहभागी होत होता त्याविषयी थोडंसं सांगा.
मुंबईत असताना एका प्रसंगामुळे मृणाल गोरेंच्या स्वाधार संस्थेला मदत मागण्यासाठी गेल्यावर तिथली कामाची पद्धत फारच आवडली. मेधा पाटकर यांच्या आई (नाव आठवत नाही .. इंदूताई) हमीद दलवाई यांच्या भगिनी फातिमा खडस यांच्याबरोबर जवळजवळ ५ ते ६ वर्षे काम केले. त्या कामामुळे शहर असो की खेडे, स्त्रियांचे प्रश्न पितृसत्ताक पद्धतीमुळे सगळीकडे सारखेच असतात, हे लक्षात आले. या सबंध जीवनकालात वैचारिक बदल खूप मोठ्या प्रमाणात झाले.
आपले सासरे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, रॉयवादी, पुरोगामी विचारांचे होते त्यांच्याविषयी थोडे सांगा?
माझे सासरे भाई भोसले हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला होता. तेव्हा त्यांच्या खोलीत यशवंतराव चव्हाण होते. ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते, एस. एम. जोशी यांच्या संपर्कातही ते सतत असायचे. माझ्या सासूबाई महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका होत्या. सासरे पूर्णवेळ समाजकार्यात असत. पूर्णत: बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिक होते. घरात देवघर नाही. उपास-तापास, पूजा-अर्चा काहीही होत नव्हतं. वार, वेळ, तिथी, मुहूर्त याचा उच्चारही घरात होत नव्हता. सुरुवातीला मला थोडं वेगळं वाटायचं; पण जसजशी विचार करू लागले, आमचे कुटुंब मुक्त जीवन जगणारे, माणसांशी माणसासारखे वागणारे, आणि सर्व रूढी-परंपरांच्या जोखडात अडकलेल्या स्त्रिया-पुरुष बघितले की वाटायचं, आपल्या घरातील माणसे जगतात तेच खरे जगणे आहे. ते नंतर रॉईस्ट एम. एन. रॉय यांच्या विचारांकडे वळले गेले. रॅडिकल हुमॅनिस्ट नावाच्या संस्थेचे ते आजीव सभासद होते. त्यात न्या. जहागीरदार, न्या. व्ही. एम. तारकुंडे, कर्णिक, पारीख अशी माणसं होती. या प्रत्येकाशी तसेच लक्ष्मणशास्त्री जोशी, यशवंतराव चव्हाण या सर्व महान विचारवंताशी नेत्यांशी प्रत्यक्ष गप्पा मारण्याची, भेटण्याची संधी मला सासरे भाई भोसले यांच्यामुळे मिळाली. आणि माझ्या पुरोगामी, विवेकी बुद्धिप्रामाण्यवादी विचारांच्या कक्षा रुंदावत गेल्या. पुढे जी मी अंनिसमध्ये काम केले त्याची ही सगळी पार्श्वभूमी आहे.
आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत कशा सामील झालात हे जाणणे आम्हाला उत्सुकतेचे वाटते.
१९९४ मध्ये मी मुलांना घेऊन मुंबईहून सोलापूरला शिफ्ट झाले. कारण प्रकाश एकटाच मुलगा. त्याचे आई-वडील थकले होते. त्यात सासूबाईंना अल्झायमर झाला. प्रकाशनी मुंबईबाहेर बदली मागितली; पण बाहेरचा माणूस मुंबईत टिकत नाही म्हणून त्यांची बदली होऊ शकली नाही. सोलापूरला आल्यावर मुले मोठी होती. फार जबाबदारी नव्हती. मी इकडे पूर्णवेळ समाजकार्य कारायचे असे ठरवले. १९९५ ला जवळ असलेल्या कॉलेजमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा (१ वर्षाचा) होता. त्याला अॅडमिशन घेतले होते. २१ सप्टेंबरला नेहमीप्रमाणे वर्गात गेले, तर सर्व मुलं-मुली ‘गणपतीने दूध पिले’ यावर जोरजोरात चर्चा करीत होती. कोणाच्या घरी कुठे, कसा गणपती दूध पितो हे सांगत होते. थोड्या वेळातच नेमके काय घडले याचा उलगडा झाला. आणि मी त्यांना म्हटले, ‘असे गणपती (मूर्ती) कसा दूध पिणार? शक्य आहे का? त्यावर कुणाकुणाच्या गणपतीने दूध पिले हे सगळेजण सांगू लागले. मी विचारले की, तुमच्यापैकी किती जणांना हे खोटं वाटतंय? तर खरं सांगते, कुणालाही हे खोटं वाटत नव्हतं. मला फार नवल वाटलंं. पत्रकारिता शिकायला आलेली मुलं जराही चिकित्सक असू नयेत?
माझ्या स्वत:च्या लग्नानंतर सगळं आयुष्य कोणतीही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा न पाळता पार पडले होते; पण तेव्हा मला असे कधी वाटले नव्हते की, आपण जे करत नाही ते करू नका असे लोकांनाही सांगावे; पण त्या दिवशी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि सातासमुद्रापलीकडच्या गणपतीने दूध पिल्याच्या बातम्या (अफवाच) देशभर वार्याच्या वेगाने पसरल्या. मी खूप अस्वस्थ झाले. वाटलं की आपणच सगळ्यांना ओरडून सांगावे, हे खोटे आहे. यावर विश्वास ठेवू नका; पण माझे कोण ऐकणार होते? इतका साधा विचार लोकांनी का करू नये? दुपारनंतर टी.व्ही.त बातमी पाहिली. गणपती दूध पितो याच्यामागचे वैज्ञानिक कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सप्रयोग सिद्ध करून दाखवले. आणि मला ‘युरेका युरेका’चे फीलिंग आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार मला आपला वाटला. होळकरांच्या संघटनेत काम करावे असे मला मनोमन वाटू लागले.
त्या दिवसापासून माझी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शोध मोहीम सुरू झाली आणि एके दिवशी एका कार्यक्रमात सोलापूर अंनिसच्या कार्यकर्त्या शालिनी ओक आणि मी शेजारी बसलो होतो. तू काय करतेस अशी ओळख करून देताना तिने सांगितले की, मी अंनिसमध्ये काम करते. मला खूप आनंद झाला. मी लगेच सोलापूर शाखेची सभासद झाले आणि पुढल्या महिन्यात डॉ. दाभोलकर एका कार्यक्रमासाठी सोलापुरात आले असता त्यांची भेट झाली. त्यांना मी म्हणाले की, मला तुमच्या समितीत काम करायचं आहे.’ इथे काम काय आहे? कसं करायचं हे सगळं विचारून घेतले आणि मला एक दिशा मिळाली.
अंनिसच्या शनिशिंगणापूर आंदोलनात आपला सक्रिय सहभाग होता, त्याबद्दल काही आठवणी सांगाल का?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडली गेल्यावर मी झोकून देऊन काम करू लागले. शनिशिंगणापूरच्या सत्याग्रहासंबंधी डॉक्टर बोलले, तेव्हा त्या क्षणीच मी सामील होणार असल्याचे डॉक्टरांना सांगितले. शनिशिंगणापूर आंदोलनाची समता यात्रा पंढरपुरातून सुरू होऊन शनिशिंगणापूरला जाऊन सत्याग्रह करणार होती. यासाठी सोलापुरातून मी, शालिनी ओक, प्रीती श्रीराम अशा तीन कार्यकर्त्या यात्रेत सामील झालो. आणि यात्रेदरम्यान अहमदनगरमध्ये ऊसतोड कामगार व स्त्रिया यांच्यासमोर आमचा एक कार्यक्रम होता. मोठ्या संख्येने स्त्रिया उपस्थित होते. डॉ. दाभोलकर मला म्हणाले, ‘महिलांच्या दुय्यमत्वावर बोला तुम्ही.’ मी धाडस करून अर्धा तास बोलले. हेच माझे ‘अंनिस’मधले पहिले भाषण होय. डॉक्टरांना माझे भाषण आवडले. ते खूप खूष झाले. तुम्ही छान बोलता, असे म्हणाले. तिथेच यांना शिक्षकांच्या शिबिरामध्ये बोलवत जा, असे कार्यकर्त्यांना सांगितले. पुढे एकदा त्यामध्ये महात्मा फुले वाड्यात बोलण्याची संधी डॉक्टरांनी मला दिली होती.
शनिशिंगणापूर आंदोलनाची पंढरपूरवरून निघालेली ती समता सत्याग्रह यात्रा नगरला पोचली. अंनिसचे कार्यकर्ते चोरी करायला शनिशिंगणापूरला जाणार आहेत अशी चुकीची बातमी एका वर्तमानपत्राने दिल्यामुळे महाराष्ट्रात हलकल्लोळ माजला होता. सरकारने नरेंद्र दाभोलकरांना नगर जिल्हा बंदी केली होती. त्यामुळे नगरकडे जाणार्या मार्गावर पोलीस प्रत्येक गाडी थांबवून डॉ. दाभोलकर गाडीत आहेत का विचारायचे. आमच्याच गाडीत डॉक्टर होते. पण पोलिसांनी विचारले, तेव्हा मी पटकन सांगितलं, डॉ. दाभोलकर आज नगरला येणार नाहीत. पोलिसांनी डॉक्टरांना ओळखले नाही. आमची गाडी निघाली. डॉक्टर हसायला लागले.
नगरमध्ये कलेक्टर कचेरीसमोर अंनिसचे धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते. राज्यभरातून अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते. अचानक समोरून आमच्या अंगावर काळ्या शाईने भरलेले फुगे फेकले गेले. अचानक धपाधप फुगे आल्याने धावपळ झाली. सगळ्यांचे कपडे खराब झाले. तसेच जाऊन कलेक्टरसोा समोर उभे राहिलो. त्या वेळी आमच्याबरोबर डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू, माजी कुलगुरू दत्तप्रसाद दाभोलकर होते. या प्रसंगानंतर ते अतिशय काळजीयुक्त सुरात पन्नालाल सुराणा यांना म्हणाले की, “या सत्याग्रहाने नरेंद्रने आपले शत्रू खूप वाढवले आहेत. आता याच्या जीवाचा धोका अधिक वाढला आहे.” आणि हे शेवटी २० ऑगस्ट २०१३ ला खरे ठरले.
नगरवरून शनिशिंगणापूरला सत्याग्रह करायला निघाल्यानंतर आमच्या पहिल्या जथ्याला पोलिसांनी अटक केली आणि आम्हाला नगरच्या मुख्य कारागृहात घेऊन गेले. आम्ही एक रात्र दोन दिवस जेलमध्ये काढले. रात्री झोपताना काही हवं नको बघायला स्वत: जेलरसाहेब आले. सकाळी डॉ. श्रीराम लागूंच्या मुळे आम्हा सर्वांनाच बराकीच्या बाहेर काढले आणि जेलरच्या ऑफिसमध्ये नेले. जेलर साहेबांच्या कुटुंबीयांना डॉ. लागूंना बघायचे होते, भेटायचे होते. त्यांनी घरूनच नाष्टा मागवला आणि म्हणाले, “तुम्ही एवढी मोठी माणसं, त्यात वयाचे ज्येष्ठ, मला रात्रभर झोप आली नाही. आता तुम्हा सर्वांना सुखरूप पाहिले. तेव्हा बरे वाटले.” अशा प्रकारे जिथे पाऊल टाकतानाच आम्ही निश्चित होते की आज नाही तर उद्या आपण नकी बाहेर येणार आहोत; पण असे हजारो आहेत आतमध्ये की, न्यायाची वाट बघत त्यांचं आयुष्य सरत असेल.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील आपल्या कामाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आनंद वाटेल. कृपया बोलाल का?
मी अंनिसमध्ये महिला विभाग, प्रशिक्षण विभाग, विविध उपक्रम विभाग तसेच विज्ञानबोध वाहिनी यात काम केले. समाजसुधारकांचा वारसा, प्रबोधन यात्रा, बुवाबाजी विरुद्ध मोहीम, महिला परिषदा, शैक्षणिक परिषद, महिला जाहीरनामा महाराष्ट्रभर पोचविणे इ. मध्ये भाग घेतला. अनेक बुवांचा भांडाफोड, भानामती प्रकरणे सोडवणे, महिलांचे जटानिर्मूलन तसेच शाळा, कॉलेज, एन.एन. एस., चमत्कार सादरीकरण, अंनिसच्या सर्व विषयांवर अनेक व्याख्याने, सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार अभियानांतर्गत कार्यक्रम केले. आजही करत आहे.
विज्ञानबोध वाहिनीबरोबर आपण राज्यभर दौरा केला होता, त्याविषयी सांगाल का?
मला सर्वांत आवडलेला अंनिसचा विभाग म्हणजे विज्ञानबोध वाहिनी. नाशिकच्या राज्य कार्यकारिणीमध्ये ही गाडी महाराष्ट्रभर आदिवासी एरियात फिरणार आहे हे समजले आणि मी व वंदना शिंदे (ठाणे) दोघींनी डॉक्टरांना भेटून आम्हीही या गाडीसोबत जायला तयार आहोत असे सांगितले. डॉक्टर दाभोलकरांनी आम्हा दोघींना याची संपूर्ण जबाबदारी दिली. या गाडीसोबतची आमची टीम – संजय कांबळे, विवेक सांबरे, हेमंत धानोरकर अशी छान टीम होती. तो अनुभव फार वेगळा होता. एका वेगळ्या महाराष्ट्राचा, तिथल्या नैसर्गिक, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करता आला. अजून तो समाज आपल्यामागे कितीतरी पावलं नाही, कोस आहे. कधी त्यांच्यामधली आणि आपल्यातली दरी संपणार? अनेक आदिवासी आश्रम शाळांमध्ये टॉयलेट, बाथरूमची सोय नाही. पण तिथल्या शाळेतली मुलं लाजरी, बुजरी असली, तरी हुशार होती. शिक्षिका त्यांच्या अडचणी सांगत. मुलं त्यांच्या अडचणी सांगत. अनेक प्रश्न असत त्यांचे. आमची गाडी निघाल्यावर कित्येक शाळेतल्या मुलींच्या व आमच्याही डोळ्यांत पाणी येत असे. महाराष्ट्राच्या अंतरंगात वावरतोय असे वाटत होते. एरवी आपल्याला काय त्यांचे जीवन कळणार? पण डॉक्टरांच्या कार्यामुळे हे पहायला, त्यांच्यापर्यंत काहीतरी सांगायला मिळालंं. खूप सुंदर, सुखद अनुभव होता.
डॉ. दाभोलकर यांच्या काही आठवणी सांगाल का?
गेली २४/२५ वर्षे अंनिस म्हणजे जगण्याचा मार्गच झाला होता. जसजशी चळवळ वाढत गेली तसतसे माझी व्यक्तिमत्त्व चहुबाजूंनी घडत गेलं. काम करताना मजा येऊ लागली. तशातच अचानक माझ्या कुटुंबात एक संकट आले. माझे पती प्रकाश यांनी अंनिसच्या कामावरून सतत काही तरी बोलायला सुरुवात केली. मला कळेना, ते स्वत: नास्तिक आहेत. एवढी वर्षे त्यांना माझ्या कामाबद्दल कौतुक होतं. सहकार्य करीत असत. अत्यंत वेगळे वागायला लागले. अचानक स्वभाव एकदम बदलला? माझ्याशी, मुलांशी अत्यंत वाईट वागायला लागले. सतत संशय घ्यायला लागले. एके दिवशी त्यांनी डॉ. दाभोलकरांना फोन केला. त्यांनाही काहीतरी बोलले. कारण मला डॉक्टरांचा फोन आला. मी पुण्यात होते. डॉक्टर म्हणाले, तुम्ही साधनाच्या ऑफिसमध्ये या. मला तुमच्याशी बोलायचंय. मी गेले. त्यांनी विचारले, “तुमचे मिस्टर कसे आहेत?” मी त्यांना सर्वकाही सांगितले. वर्तनातील, स्वभावातील बदल, आमच्याशी वागण्यात झालेला बदल सांगितले. तेव्हा दाभोलकर म्हणाले, त्यांना मानसिक समस्या झालेली दिसतेय. तुम्ही त्यांना ताबडतोब मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जावा. थोडे दिवस औषध घेतले की ते पूर्ववत होतील. आम्ही प्रकाश यांना परोपरीने समजावले व त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले. त्यांनी औषधे दिली व घाबरू नका लवकरच व्यवस्थित होतील, असे सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी मला योग्य वेळी, योग्य सल्ला दिल्यामुळे प्रकाश यांची प्रकृती ठीक झाली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आपल्या कार्यकर्त्याला काही अडचण आहे का? ते जाणून घेणे त्याला मानसिक आधार देणे, प्रसंगी आर्थिक किंवा कोणतीही मदत करणं हे किती सहज करत असत. ते जर तेव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला नसता, तर माझे अंनिसचे काम थांबलेच असते. पण प्रकाशचे काय? आणि कुटुंब विस्कटले असते, ते वेगळेच. या प्रसंगांनंतर डॉ. दाभोलकरांबद्दलचा आदर हजार पटींनी वाढला.
डॉ. दाभोलकरांसोबत १७-१८ वर्षे काम करायला मिळाले. त्यांच्या दिवसभराच्या दिनचर्येमधूनही कार्यकर्त्याला खूप शिकायला मिळत असे. एका प्रसंगाने मी अंनिसशी जोडले गेले आणि माझ्या विचारांची डॉक्टरांच्या विचारांशी नाळ जोडली गेली. डॉक्टर म्हणायचे, तुम्हाला जोपर्यंत या कामात आनंद मिळतो तोपर्यंत तुम्ही हे काम करा. मला तर या वयातही अंनिसच्या कार्यक्रमाला जाताना दुप्पट उत्साह येतो. माझ्या कामाची पावती म्हणून ‘अंनिस’चा सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार, आधारवड, आधारस्तंभ पुरस्कार, तसेच इतर सामाजिक संस्थांचे जिज्ञाऊ सन्मान पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ती सन्मान पुरस्कार, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार इ. पुरस्कार मिळाले आहेत.
भानामतीच्या अनेक घटनांचा आपण उलगडा केला आहे त्यातील एखादा अनुभव सांगाल का?
भानामती हा प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी डॉ. दाभोलकरांनी ‘भानामतीविरुद्ध धडक मोहीम’ हाती घेतली होती. आमच्या सोलापूर स्थानिक शाखेतही काही भानामतीच्या तक्रारी येत असत. उदा. घरावर दगड पडणे, घरातील कपडे अचानक पेटणे अशा बाबतीत प्रत्यक्ष त्या कुटुंबात जाऊन आम्ही त्या केसेस सोडवल्या आहेत.
अगदी अलीकडची एक भानामतीची केस आमच्याकडे आली. पंढरपूरजवळील एका छोट्या गावातील कुटुंबात घरातील वस्तू घराबाहेर पडत. नोटांचे तुकडे केले जात. कधी टी.व्ही.चा रिमोट तर कधी आजीचं मंगळसूत्र गायब होत असे. एक-दोन दिवसांनी परत शेतात, अंगणात ते सापडत असे. आम्ही सोलापूर शाखेचे तीन-चार कार्यकर्ते त्यांच्या घरी पोचलो. तिथे होणारा प्रकार ऐकला. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बसवून काय काय घडते ते विचारले. त्याचवेळी प्रत्येकाच्या चेहर्याकडे आमचे लक्ष होतेच. काय घडत असेल घरात, तर घरातील वस्तू घराबाहेर पडत. नोटांचे तुकडे केले जात. कधी टी.व्ही.चा रिमोट तर कधी आजीचं मंगळसूत्र गायब होत असे. एक-दोन दिवसांनी परत शेतात, अंगणात सापडत असे; पण बर्याचदा या गायब झालेल्या वस्तू ५ वीत शिकत असलेल्या रमेश नावाच्या मुलाला सापडत असत. नंतर घरातील मोबाईल गायब होऊ लागले. मोबाईल सापडला तरी सिमकार्डचे तुकडे सापडत असत. वडिलांच्या मोबाईलवर काकांच्या मोबाईलमधून मेसेज आला की, तुमच्या रमेशला आम्ही मारून टाकणार आहोत. तो मेसेज सगळ्यांनी वाचला. नंतर त्या सीमचे तुकडे सापडले. बाहेर लावलेल्या गाडीवर तुमच्या नातवाला मारून टाकू अशी चिठ्ठी मिळाली होती. दोन-तीन बुवांनी मंत्रून, लिंबू नारळ दिले होते; पण हा प्रकार थांबत नव्हता. एका मांत्रिकाने २५००० रुपये मागितले व सांगितले, मी या काळ्या जादूचा बंदोबस्त करतो. त्या मुलाच्या मामाने मला फोन करून सांगितले, तुम्ही लगेच या. कारण तो बुवा दोन-तीन दिवसांनी येणार आहे.
आम्ही घरातील प्रत्येकाची स्वतंत्र मुलाखत घेतली. आजी-आजोबा घाबरलेले. नातवाच्या जिवाला धोका आहे म्हणून. वडील साधे शेतकरी, आई गृहिणी. एक बहीण ९ वीत, दुसरी ७ वीत होती. दोन काका पुण्यात, तेही आलेले. एकाची पत्नी ग्रॅज्युएट. अगदी साधं कुटुंब. कोणाशी वैर नाही, भांडण नाही आणि हा भयानक प्रकार एका सकाळी घडला. शेतात घर होते. त्यामुळे घराच्या बाजूला कोणीतरी पाण्याच्या मोटारीची वायर कापली होती आणि लाईव्ह वायर घरात जाणार्या वाटेवर टाकली होती. रमेशनेच घरातील सर्वांना ते दाखवले.
माझ्या लक्षात सर्व गोष्टी आल्या होत्या. सर्वांत शेवटी रमेशला बोलावले. त्याच्या ७ वीच्या बहिणीने त्याला मोबाईल गेम खेळायला आवडते असे आम्हाला अगोदरच सांगितले होते. आमच्या अभ्यासासाठी (कोविड काळात) काकांनी स्मार्ट फोन घेऊन दिला आहे. पण काकांनी गेमचे अॅप लॉक केले होते. हा सतत मोबाईलवर काहीतरी करीत असतो. वस्तू गायब होतात. सीमचे तुकडे पडतात, हे तर सर्वांनीच सांगितले. शेजार्यांच्या मोबाईलमधले सीमकार्ड त्यांच्याच अंगणात पडलेले मिळाले. मी रमेशला शाळा, अभ्यास, खेळ, मित्र, मोबाईल गेम याबद्दल विचारले. तुला मोबाईल ऑपरेट करता येतो का? यावर तो पटकन म्हणाला, मला एक मिनिटात मोबाईलमधलं सीम काढून परत बसवता येतं. कोणतंही अॅप उघडता येते. मी लगेच विचारले की, सकाळी वायर कापलेली कात्री कुठे ठेवली आहेस? तो पटकन् म्हणाला, आजोबांच्या पलंगाखाली. दुसर्या सेकंदाला त्याच्या चूक लक्षात आली. कसली कात्री? मी काही नाही केलं? म्हणून प्रचंड घाबरला. मी जवळ घेऊन त्याला शांत केले. ८५-९० टके मार्क घेणारा मुलगा. त्याला सांगितलं की, तू जे बोललास ते मी रेकॉर्ड केलंय. आजपासून घरातील कोणतीही वस्तू किंवा सीमकार्ड तोडायची नाही, कपडे फाडायचे नाहीत. त्याने सगळेच कबूल केले. मी आता काही करणार नाही. तू करत होता हे कोणालाही सांगणार नाही. तूही बोलू नको; पण पुन्हा असे काही केलेस, तर पोलिसांच्या ताब्यात देईन. तो म्हणाला, मी गेम खेळण्यासाठी सीम काढून बघत होतो. आता करणार नाही. आम्ही बाहेर आलो. त्याला प्रेमाने बोलल्याने तोही शांत झाला होता. घरातील सर्वांना सांगितलं की आजपासून तुमच्या घरात काहीही होणार नाही. कोणत्याही बाबाला पैसे देऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि घरच्यांसमोर रमेशचे कौतुक केले. खूप हुशार आहे. त्याला कोणी काही करणार नाही त्याच्या बहिणीपण हुशार आहेत. या गोष्टीला तीन वर्षे झाली. रमेशही मला फोन करतो. घरचे फोन करतात. पुन्हा कधीच काही घडले नाही. असे बोलताना खूप छान वाटते.
बुवा भांडाफोडीच्या काही केसेस सांगाल का?
महिलांचे शोषण करणारा सोलापूर जिल्ह्यातील बाळूमामा ऊर्फ मनोहर भोसले यांचा भांडाफोड आम्ही केला होता. मनोहर भोसले उर्फ बाळूमामा याचा करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे मोठा मठ आहे. तिथे तो यज्ञ, पूजा, हवन करीत असे. आजारी लोकांचे आजार त्याच्या भंडार्याच्या प्रसादाने बरे होतात. त्याच्या अंगात बाळूमामा आहेत, हे सर्व दूर पसरवले होते. टी.व्ही. वर बाळूमामा नावाच्या मालिकेचा तो निर्माता होता. लोक त्याला घरी बोलवून त्याचे चरण धुवून पूजा करीत असत. एका माणसाची पत्नी आजारी होती म्हणून तो तिला बाळूमामाकडे घेऊन गेला होता. त्याच्याकडून पूजा घालण्यासाठी त्याने एक लाख रुपये घेतले होते. बायकोचा त्रास कमी झाला नाही म्हणून त्याने मठात जाऊन बुवाला पैसे परत मागितले. पण मनोहर भोसले उर्फ बाळूमामा याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या माणसाने पोलिसात जाण्याची धमकी दिली. तेव्हा बुवाच्या मठातील गुंडांनी त्याला बेदम मारले. हा मला खंडणी मागतोय म्हणून पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली. मनोहर मामाला आमदारांचा पाठिंबा असल्याने त्या माणसाची खरी केस दाखल करून घेतली नाही. तो माणूस आमच्या ‘अंनिस’कडे आला. त्याला आम्ही सांगितले की, तुझ्या माहितीतील मनोहरमामाकडून फसवणूक झालेले दुसरे कोणी असेल तर त्याला तक्रार अर्ज द्यायला सांग. तेव्हा त्याने बारामतीतील एकाकडून वडिलांचा कॅन्सर बरा करतो, म्हणून तीस हजार रुपये घेतले होते. पण ते बरे झाले नाहीत. बारामती पुणे जिल्ह्यात येते. आम्ही तो अर्ज घेऊन सोलापूर ग्रामीण एस. पी. कडे गेलो. तसेच आम्ही मनोहरमामाच्या उंदरगावातील आश्रमामध्ये काय चालते हे पाहण्यासाठी त्याच्या गावी गेलो होतो.
दरम्यान मनोहरमामाबद्दल पेपरमध्ये बातम्या येत होत्या. त्यात फसवणूक झालेल्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर सातारच्या एका बाईंनी बुवा विरुद्ध बलात्काराचा आरोप केला. दरम्यान, बुवा फरार झाला, पण दोन-तीन दिवसात बारामती पोलिसांनी त्याला उचलला. या वेळी पुणे अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनीही बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. अशा प्रकारे बाळूमामाच्या नावाने मोठी बुवाबाजी करणार्या मनोहरबाबाचा भांडाफोड झाला.
२०१७ साली अकलकोट येथील हातचलाखी करून, करणी काढून देतो, असे सांगून फसविणार्या कोनाळी येथील सिद्धमल्लया व त्याची साथीदार यांना पोलिसांच्या मदतीने रंगेहाथ पकडले. त्याची केस अकलकोट कोर्टात चालू आहे. कायदा होण्यापूर्वीही अनेक छोट्या-मोठ्या बाबींचा उदा. बोटाने ऑपरेशन करणारा अस्लमबाबा ब्रेडवाला याचाही आम्ही सोलापूर शाखेने भांडाफोड केला होता.
आपल्या सोलापूर शाखेच्या कामाबद्दल थोडं सांगाल का?
सोलापूर शाखेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तरुणांची संख्या खूप छान वाढली आहे. खूप आश्वासक वाटतं की, आपल्यानंतरची फळी आपण तयार करू शकलो. डॉ. दाभोलकर कोणताही नवीन प्रयोग; जसे विज्ञान बोध वाहिनी, महिला महोत्सव, नभांगणसारखे कार्यक्रम सोलापूर शाखेतून सुरू झाले. सोलापूर शाखा लीड शाखा आहे. आजही उत्तम काम चालले आहे. तरुण कार्यकर्ते जोमाने काम करतात. गरज पडली, तर आम्ही मार्गदर्शन करतो; शिवाय शाळा, कॉलेजमध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रम मागतात, तेव्हा व्याख्यानाला जाणे, कायदा जनजागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन अभियान यात सक्रिय सहभाग आहेच.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर आपली काय भावना होती?
डॉक्टरांचा खून म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा धका होता. खुनाच्या काही महिने आधी डॉक्टरांबद्दलची एक आठवण सांगते. माझी एक शाळेतील मैत्रीण मला मार्च २०१३ मध्ये एका लग्नात भेटली. आम्ही दोघी आनंदाने भेटलो. अनेक वर्षांनंतरची भेट होती. खूप जवळची मैत्रीण होती. तू काय करतेस विचारल्यावर म्हणाली,‘मी गेली ७-८ वर्षे एका धार्मिक संस्थेत काम करते. मला विचारल्यावर मी सांगितले, मी डॉ. नरेंद्र दाभोलकरांसोबत अंनिसमध्ये काम करते. विजेचा झटका बसावा तसा तिनं माझ्या हातातील हात काढून घेतला आणि म्हणाली, “बापरे! म्हणजे आपण दोघी दुश्मन आहोत!” मी म्हटलं, “अगं, काय बोलतेस? आपण तर एके काळच्या जिवलग मैत्रिणी आहोत.” ती जे म्हणाली, त्याचा प्रत्यय आपल्याला २० ऑगस्ट २०१३ रोजीच आला.
ती म्हणाली, “डॉ. दाभोलकर हिंदू धर्म बुडवणारे आहेत. त्यांच्या डोक्यातून नेहमी हिंदू धर्माबद्दलच वाईट गोष्टी निघतात. हिंदू धर्म संपवायला निघालेल्या डॉ. दाभोलकरांना संपवणं हेच आपलं पहिलं काम आहे, हे आम्हाला सत्संगमध्ये रोज सांगतात.” ती झटकन निघून गेली. मी तिला शोधले; पण ती हॉलमधून निघून गेली होती. ही घटना मी कार्यकारिणीमध्ये सर्वांसमोर डॉक्टरांना सांगितली आणि ‘डॉक्टर तुम्ही स्वत:ला जपले पाहिजे’, असे म्हटल्यावर डॉ. नेहमीप्रमाणे हसले आणि म्हणाले, ‘काही नाही हो, मला असे रोज एक-दोन तरी फोन येतातच.’
वाईट याचे वाटते की, जो समाज अंध रूढींच्या विळख्यातून बाहेर यावा, त्यांची लुबाडणूक, फसवणूक थांबावी. त्यांनी विचार करायला शिकावे म्हणून आयुष्य पणाला लावले त्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांना त्याच समाजातील बहुजन समाजातील व्यक्तीने शब्दप्रामाण्यावर विश्वास ठेवून जो माणूस माहीतही नाही त्याला धर्मांधतेने बधिर झालेल्या मेंदूने शांतपणे गोळी घातली!!
आपला कधीतरी घात होणार हे काय डॉक्टरांना कळत नव्हते; पण ते आपल्या कार्यापासून, विचारांपासून तसूभरही ढळले नाहीत. विचलित झाले नाहीत. म्हणून आम्ही कार्यकर्ते काही काळ खचलो; पण लगेच सावरलो. त्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या विवेकी विचारांचे बळ मिळाले. घटना तर घडली. ‘आमचा माणूस मारला’ पण त्यांचे विचार आम्हा कार्यकर्त्यांच्या मनामनात जिवंत आहेत. डॉक्टरांची निर्धार सभा सोलापुरात १४ ऑगस्टला किर्लोस्कर हॉलमध्ये झाली. ७०० ते ७५० इतके लोक होते. कार्यकर्ते बोलले, हळवे झाले. अनेक समविचारी बोलले. मी त्या वेळी सोलापूर शहर शाखेची कार्याध्यक्ष होते. मी बोलले, “समाजातील प्रस्थापित वर्गाविरुद्ध बंड करणार्यास जगभरात संपविण्यात आले आहे. समाज परिवर्तन करणार्या व्यक्तीची सर्वांत जास्त भीती धर्ममार्तंडांना वाटते. म्हणूनच सॉक्रेटिस, गॅलिलिओ ते तुकाराम आणि आता दाभोलकर अशी माणसं मारली गेली; पण आपण तो माणूस नाही परत आणू शकत; पण त्यांचे विचार पेरू शकतो. तू बरोबर होतास अशी गॅलिलिओची माफी पोपनी ३५० वर्षांनंतर आत्ता मागितली. आपल्यापुढे हे आव्हान आहे की, महाराष्ट्र एवढा अंधश्रद्धामुक्त, विवेकी बनवू की, एक दिवस सनातन्यांना दाभोलकरांची माफी मागावी लागेल.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमच्या जीवनात काय स्थान आहे?
मी अंनिसला काय दिले माहीत नाही; पण मला डॉक्टर दाभोलकर आणि अंनिसने विवेकी जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान दिले. विवेकी माणूस घडविले. ‘आम्ही बि घडलो तुम्ही बी घडा ना’ असे म्हणत माझे काम आजही सुरू आहे. १५-२० दिवस अंनिसचे काम केले नाही, तर चैन पडत नाही. अंनिस आहे म्हणून माझे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहते. नरेंद्र दाभोलकरांनी आम्हाला दिलेले विचार पेरण्याचे काम चिकाटीने चालू आहे. ते माझ्या अंतापर्यंत चालूच राहणार!
माझा आवडता संत तुकारामांचा हा अभंग माझ्या जीवनाचे तत्व आहे.
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू.
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन.
शब्दे वेचू धन जन लोकां.”
आपल्या कामाच्या एकूण वाटचालीबद्दल शेवटी काय सांगाल?
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू झाली तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये फार फरक आहे. १९८९ साली चळवळ सुरू झाली तेव्हापासून ते २०१३ साली डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येपर्यंतची सामाजिक व राजकीय परिस्थिती ही चळवळीला पोषक होती आणि धर्मांधतेचं वातावरण एवढं दूषित नव्हतं जेवढं आज दूषित झालेलं आहे. आजच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आम्ही करतो असं सांगताना सुद्धा मनामध्ये भीती वाटावी अशी परिस्थिती दिवसेंदिवस येत चाललेली आहे. अशावेळी नवीन कार्यकर्त्यांना अतिशय सावधगिरीने व पूर्ण तयारीनिशी काम करावे लागेल. आपण काम करताना आपल्या कुठल्याही शब्द किंवा कृतीमुळे सनातनी वृत्तीच्या लोकांना आपल्यावर हल्ला करण्याची किंवा टीका करण्याची संधी मिळता कामा नये याची काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर आपले नातेवाईक, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कामाच्या ठिकाणी आपल्या सहकार्यांना आपल्या चळवळीबद्दल आत्मीयता वाटावी आणि त्यांनी आपल्याला सहकार्य करावे असेच संबंध निर्माण करावे लागतील. आपण जरी आशावादी असलो, सकारात्मक दिशेने चालत असलो, तरी सध्याचे राजकारण आणि त्याला जोडून निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती हे अगदी विपरीत आहे आणि म्हणून नवीन कार्यकर्त्यांना आमच्या पिढीपेक्षा दुपटीने अधिक सजगपणे आणि अधिक प्रभावीपणे काम करावे लागेल तरच आपल्याला हवा तसा विज्ञानवादी, विवेकी आणि निर्भय असा समाज निर्माण करता येईल.
हे असे आहे, परंतु हे असे असणार नाही.
दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही…
निशाताई भोसले : ९७६४४ ७६४७६
संवादक – हेमंत धानोरकर : ९९६०० ९६०६२
विज्ञान बोध वाहिनी – एक कुटुंब
२००२ ते २००९ या काळात अंनिसच्या विज्ञान बोधवाहिनी या प्रकल्पात निशाताई पूर्णवेळ सहभागी होत्या. या प्रकल्पाची सोलापूर जिल्ह्यातूनच सुरुवात झाली होती. विज्ञान बोध वाहिनी म्हणजे अंनिसचा अतिशय आगळावेगळा प्रकल्प होता. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातही गाडी फिरत असे. आणि रोज एका शाळेत शाळेतील मुलांची एकप्रकारे विज्ञान जत्रा भरत असे. हसतखेळत विज्ञान, चमत्कारामागील विज्ञान, वयात येताना मुलींसाठी, वयात येताना मुलांसाठी ‘खगोलशास्त्र प्रदर्शन’ अशा विविध वैज्ञानिक कार्यक्रमाद्वारे दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम या उपक्रमात होत असे. या उपक्रमात प्रा. प. रा. आर्डे सर, निशाताई भोसले, वंदनाताई शिंदे, माई संजय कांबळे, विवेक सांबरे, भास्कर सदाकळे, हेमंत धानोरकर, पद्माकर कांबळे, रोहित पारधे असे अनेक कार्यकर्ते काम करत होते.
निशाताई भोसले, वंदनाताई (माई) आणि प्रा. प. रा. आर्डे सर कोणत्याही मानधनाशिवाय आपला संपूर्ण वेळ विज्ञान बोध वाहिनीसाठी देत असत. निशाताई व वंदनाताई या दोघींनीही विज्ञान बोध वाहिनीत काम करताना स्वतःच्या कुटुंबातील आर्थिक संपन्नतेचा व सुखी जीवनाची जाणीवही कधी इतरांना होऊ दिली नाही. अतिशय सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच सर्वांसोबत मिळेल त्या परिस्थितीमध्ये राहणे, मिळेल ते खाणे, साध्या गाड्यांमधून सततचा प्रवास, आदिवासी भाग, घनदाट जंगलं असो की अतिशय खराब रस्त्यांवरचा प्रवास… त्यांनी कधीही तक्रार केली नाही. कितीही अडचणी आल्या तरी या दोघींचा उत्साह कमी होत नसे. उलट त्यांनीच इतर सर्व कार्यकर्त्यांना एवढा लळा लावला की निशाताई आणि वंदनाताई म्हणजे या विज्ञान बोध वाहिनीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दोन आईच होत्या आणि अजूनही विज्ञान बोध वाहिनीचे सर्व कार्यकर्ते निशाताई आणि वंदनाताई यांच्याशी संपर्कात आहेत.
या दोघींमुळे विज्ञान बोध वाहिनी हा एक छोटा परिवारच बनला होता.
विवेकवादाची तिसरी पिढी
निशाताई भोसले या स्वतः गेली अनेक वर्ष अंनिसच्या विवेकवादाच्या चळवळीत काम करत आहेत. त्यांच्या पती प्रकाश भोसले यांनीही त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ दिलेली आहे आणि यामुळेच निशाताई गेली तीस वर्षे चळवळीमध्ये अतिशय प्रभावीपणे काम करू शकल्या. त्यांची तीन मुलं स्वप्नाली, अभिजीत आणि प्रियांका. मुलगी स्वप्नाली डॉक्टर आहेत आणि मुलगा अभिजीत सिव्हिल इंजिनियर आहेत; तर प्रियांका या वकील आहेत. ही तीन्ही मुलं बालपणापासूनच निशाताईंच्या वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त जीवनशैलीचा स्वीकार करणारी आणि आपल्या आवतीभोवतीच्या वातावरणात असणार्या अंधश्रद्धांना ठामपणे परंतु विनम्रतेने नकार देणारी अशा स्वभावाची आहेत. निशाताईंनी आपल्या तीन्ही मुलांना हे शिकवले की जरी तुम्ही अंधश्रद्धाळू नसाल जरी तुमचा ईश्वरावर दैवी शक्तीवर विश्वास नसेल, तरीही इतरांच्या विश्वासावर आघात होईल किंवा इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं कोणतंही वर्तन तुमच्याकडून घडू देऊ नका आणि हा उपदेश या तीन्ही मुलांनी जपलेला आहे.
त्यांच्या तिसर्या पिढीतही या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचंड प्रभाव आहे. निशाताईंचा नातू स्वप्नालीचा मुलगा यश, अभिजितची मुलगी सई आणि प्रियांकाचा मुलगा अर्जुन यांनाही आजीच्या अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकवादाचा प्रसार, प्रचार या कामांबाबत आदर तर आहेच, परंतु त्यांच्या जीवनातील अनेक घटनांमध्ये सुद्धा ते आजीप्रमाणेच ठामपणे अंधश्रद्धांना विरोध करतात.
निशाताई नेहमी म्हणतात की, वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त शाळेत शिकवला म्हणून समजणार नाही किंवा आपल्या चळवळींच्या माध्यमातून त्याचा आपण खूप मर्यादेमध्ये प्रसार करू शकतो. परंतु खर्या अर्थाने जर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचा असेल तर त्याचं अनौपचारिक शिक्षण हे घरात आई-वडील, आजी-आजोबा यांच्याकडूनच मिळू शकते. विवेकी समाजासाठी विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनयुक्त कुटुंब बनणे हे फार आवश्यक आहे.
वंदनाताई व निशाताई यांची जोडी
निशाताई आणि वंदनाताई शिंदे (माई) या दोघींची अंधश्रद्धा निर्मूलन समितीतली जोडी पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या दोघींचं नातं मैत्रिणी म्हणा की बहिणी म्हणा इतकं पकं आहे की महाराष्ट्रात कोणत्याही गावातल्या अंनिस कार्यकर्त्याला आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांना या दोघींचं नावही माहीत आहे आणि चांगला परिचय हे आहे. या दोघींचेही खास वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरातील सर्वांशी सहज मैत्री करणे. जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी राहण्याचा किंवा जेवण्याचा प्रसंग येत असेल तेव्हा या थेट स्वयंपाकघरात घुसतात आणि कार्यकर्त्याच्या घरातील लहान मुले आणि स्त्रिया यांच्याशी त्यांची एवढी छान गट्टी जमते की त्या घरातील कुणीही या दोघींना विसरू शकत नाही.
‘अंनिस’सोबत इतर अनेक पुरोगामी चळवळींमध्ये या दोघी मिळून काम करतात. स्वराज इंडिया, निर्भय बनो अशा अनेक आंदोलनात त्या सहभागी आहेत. २ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२२ या काळात भारत जोडो यात्रेतही या दोघी सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर ते नांदेड पायी प्रवास या दोघींनी केलेला आहे.
या दोघी सोबत असताना ज्या पद्धतीने एकमेकींना सांभाळून घेतात, एकमेकींची काळजी घेतात, यावरून इतरांनी शिकण्यासारखं आहे की रक्ताची नसलेली नाती सुद्धा किती छान जपता येतात आणि टिकवता येतात. संघटना वाढण्यासाठी अशीच नाती निर्माण करायला यायला हवीत आणि मनात कोणतीही कटुता न येऊ देता ती टिकवायला हवीत असा संदेश या दोघींच्या मैत्रीतून आपणांस मिळतो.
निशाताईंचे पती प्रकाश भोसले यांचे पुस्तक
मा. प्रकाश भोसले (सेवानिवृत्त डीवाय.एस.पी, मुंबई पोलीस) यांना घराण्याचा एक वेगळा वारसा मिळालेला आहे. त्यांचे वडील हे स्वातंत्र्यसैनिक सेवाभावी कार्यकर्ते होते. लोकनेते मा. यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर त्यांनी सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेतला होता. अनुवंशिकतेतून आलेली सेवाभावी वृत्ती भोसले यांच्या कार्यात व लेखनात जागोजागी आढळते.या पुस्तकातील गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था हाताळण्याच्या घटना मुंबई या शहरातील निव्वळ गुन्हेगारी विषयक नव्हे तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबी वाचकांपुढे उलगडून दाखवितात. मुंबईतील विलासी जीवन एका बाजूला तर झोपडपट्टीतील दारिद्र्य, गरिबी दुसर्या बाजूला या सर्वांचे चित्रण वाचावयाला मिळते. प्रत्येक घटना पाल्हाळिकपणे न मांडता मुद्देसुदपणे नेमक्या शब्दात मांडलेली आहे. शिवाय प्रत्येक घटनेमध्ये गुन्हेगारी कथांना आवश्यक असलेला सस्पेन्स राखण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. पुस्तकातील सगळ्याच घटना वाचनीय आहेत. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे वर्दीतील माणूसपण जाणवते. यामधील एका प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वेगळीच प्रतिमा उभी केलेली आहे.प्रत्येक जीवनाभिमुख काम करणार्या पोलिसांचे आयुष्य एखाद्या कादंबरीसारखे वाचनीय व पुढील तरुण अधिकार्यांना मार्गदर्शक ठरते. याची प्रचिती वर्दीतील माणूस या छोट्याखानी पुस्तकातून वाचकास येईल.
– सुरेश खोपडे (निवृत्त) आय.पी.एस.
परिवर्तन अकादमी प्रकाशन, सोलापूर