राहुल विद्या माने -

लातूरसारख्या गावातून एका निरक्षर, गरीब मुस्लिम कुटुंबातून आलेल्या रुक्सानाने संघर्ष करीत शिक्षण घेतले. शिक्षणाच्या जोरावर मिळालेल्या नोकरीवर समाधान मानता समाजातील चुकीच्या रुढी, परंपरा, अन्यार दूर व्हावा यासाठी त्या शिक्षणाचा वापर करीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून केलेल्या “संघर्ष” या कार्यकर्तीच्या मुलाखतीतून चितारललेला आहे.
परिवर्तनाचा विचार पहिल्यांदा कसा कळला, भेटीला आला?
माझ्या घरात मुळातच शैक्षणिक वातावरण नव्हतं. माझी आई खैरूनबी मैनोद्दिन मुल्ला ही निरक्षर; तर वडील मैनोद्दिन घुडूभाई मुल्ला यांचं शिक्षण चौथीपर्यंत. गरिबी होतीच. त्यामुळं मला असं वाटायचं की, एवढी तुमची गरिबी आहे आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली नाही, तरीपण तुम्ही एका कर्मकांडासाठी उसनं-पासनं घेऊन सगळं करायचं आणि त्याचा उपभोग कुटुंबीयांना न मिळता बुवा-बाबांना, आजूबाजूच्या लोकांना मिळायचा. त्यामुळं खूप त्रास व्हायचा. खूप संकटांना तोंड द्यावं लागायचं. त्याचवेळी माझ्या शाळेतील शिक्षिकांना पाहून वाटायचं की त्यांच्यासारखं व्हावं, खूप शिकावं. त्यांच्या बोलण्यात यायचं की, ‘मुलींनी खूप शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, म्हणजे संकटांना तोंड देता येईल.’ माझ्या शाळेतल्या मराठी पुस्तकात रझिया पटेल यांचा ‘जोखड’ नावाचा धडा होता. त्याच्यात असं होतं की, बाईच्या अंगावरले सर्व दागिने हे परंपरांनी त्यांना पुरुषी बंधनात बांधून ठेवण्यासाठी घालायला दिले जातात. माझी बहीण एक होती. माझ्यापेक्षा एका वर्गाने मोठी होती. ती नेहमी असले दागिने वगैरे मागायची; मी मात्र पुस्तकेच मागायचे. आठवी झाल्यानंतर तिचं लग्न झालं; पण माझं असं पक्क ठरलं होतं की आपण लवकर लग्नच करायचं नाही.
म्हणजे चुकीच्या परंपरांविरुद्ध मनात असलेला राग हा तुमची ‘घडण’ होण्याची सुरुवात म्हणता येईल का?
हो. हा राग मी आईशी बोलून दाखवायचे; पण ती काही उघड पाठिंबा द्यायची नाही. मग मी आठवीच्या पुढे आल्यावर; जेव्हा म्हणतात की वयात आल्यानंतर त्यावेळेला ‘तू बुरखा घातला पाहिजे’, ‘असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे.’ त्यावेळेला मी असं विचारायचे की, ‘बुरखा घातला तर काय होते आणि नाही घातला तर काय होते?’ त्यावेळेला मला उत्तर यायचं की, ‘नाही घातला तर लोकं नावं ठेवतील…’ लोक नाव ठेवतील किंवा दुसर्याचे समाधान करण्यासाठी खूपजण, असं वागतात. दुसरं कारण असं सांगितलं जायचं की, ‘पुरुषाची वाईट नजर असते. त्याच्यापासून जपायचं असतं.’ त्यावेळी बलात्काराच्या बर्याचशा बातम्या पेपरमध्ये येत. ते बलात्कार काय हे सुद्धा मला माहीत नव्हतं, इज्जत म्हणजे काय हे कळत नव्हतं, ‘खानदान का नाम बदनाम होता है,’ असं म्हणायचे. मग मी घरच्यांना सांगायचे, ‘त्यानं जर छेड काढली तर त्याला धडा शिकवायची हिम्मत माझ्यात आहे. एवढ्यासाठी जर बुरखा घालायचा तर मी आहे ना समर्थ.’
शिक्षणात पुढं जायचं आहे, हे ठरवून झालं की ते जमलं?
त्याच काळात भारत साक्षरता अभियानात गावोगावी जाऊन गाणी म्हणणं, असं काम आम्ही करायचो. त्यात बीड जिल्ह्यातल्या राडी गावी जाण्याचं ठरलं, त्यावेळी माझी माधव बावगे सरांशी भेट झाली. मी सातवीमध्ये होते. तिकडून परत येताना उशीर झाला. उशीर झाला म्हणून घरचे रागावतील म्हणून मी रडायला लागले; पण तेव्हा सर माझ्या घरी सोडायला आले. तेव्हापासून घरच्यांचा विश्वास बावगे सरांवर बसला. मला जन्म देणारा पिता आणि दिशा देणारे सर, असे दोन वडील म्हणता येईल. मी पण घरच्यांना शब्द दिला की, जोपर्यंत मी चुकीचं वागणार नाही, तोपर्यंत मी शिकत राहणार. बावगे सर आणि माझ्या शाळेतल्या मॅडम यांच्यामुळे मला शिक्षणात पुढे जाणं शक्य झालं. शाळेसाठी मी लातूरमधल्या देशीकेंद्र शाळेत होते. दहावीनंतर लातूरच्याच शाहू कॉलेजमध्ये गेले. मग मी बी. ए., डी. एड., एम. ए. (इंग्रजी), एलएल. बी. झाले. तिथं बावगे सर मला एन.एस.एस. आणि इतर कार्यक्रमात सहभाग घ्यायला प्रोत्साहन द्यायचे. मला अनेक कार्यक्रम कसे आयोजित कसे केले जातात, हे समजून घ्यायची आवड होती, आहे. जग फिरायची मला खूप आवड आहे.
या सर्व तुमच्या प्रश्न करण्याच्या किंवा बंडखोर स्वभावासमोर आई–वडिलांचे वागणे किंवा प्रतिसाद कसा असायचा ?
ं आम्ही मूळचे भंगार किणी या अक्कलकोट तालुका, सोलापूर जिल्ह्यातील गावचे. वडील-आई दोघांची खूप धडपड. वडील माझे एका खेड्यातून लातूरला कामाला आलेले. एका हॉटेलमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. नंतर एका डालडा बनवण्याच्या कारखान्यात त्यांना नोकरी लागली. आजारी पडल्यामुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली. माझ्या वडिलांचा बालविवाह होता. मला दोन आई होत्या; म्हणजे पहिल्या पत्नीला मूल झालं नाही म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या आईशी लग्न केलं. त्यामुळं त्यांच्यावर दोघींची जबाबदारी होती. सगळ्या मुलांना शिकवायचं, ही त्यांची नेहमी इच्छा असायची; पण परिस्थिती अवघड होती. मी सहावी-सातवीला असताना आमच्या कुटुंबाचं भागत नव्हतं, म्हणून वडील आणि मोठी आई पुण्यात हिंजवडीला गेले. तिथं ते पाईपलाईनच्या कामाचे कंत्राट घ्यायचे. तिथल्या पुढारलेल्या महिलांना पाहिल्यावर त्यांना वाटायचं की, माझी मुलगी पण त्यांच्यासारखी व्हावी; पण आमचे पाहुणे सांगायचे की पोरीच्या जातीला कशाला शिकवायचं म्हणून. त्यातच त्यांची घालमेल व्हायची; पण त्यांनी कधी विरोध केला नाही. माझे वडील 2005 मध्ये गेले आणि आई 2014 मध्ये कॅन्सरने गेली. मला चार भाऊ आणि दोन बहिणी आहेत. बहिणीचे पती सुद्धा अलिकडे वारले. तिला मुलं आहेत. ती जास्त शिकली नाही. आज ती म्हणते, ‘तुझ्यासारखं शिकले असते, तर बरं झालं असतं.’ आज माझी मुले, सय्यद अरमान इम्रान आणि सय्यद अब्राहम इम्रान अनुक्रमे नववी आणि तिसरीमध्ये शिकत आहेत. त्यांच्या भोवती मात्र आज शैक्षणिक आणि चळवळीचे वातावरण असल्याने त्यांनी भरपूर शिकावे, असे मनोमन वाटते.
शिक्षण सुरू असताना तरुण वयात पुस्तकाच्या बाहेर वैचारिक प्रेरणास्रोत कुठे–कुठे भेटले?
मला प्रेरणा मिळण्याचे एकमेव स्थान होतं लातूरचे शाहू कॉलेज आणि तेथील बावगे सर. एन.एस.एस.चे जे कॅम्प होत असत, त्यामध्ये बरेच लोक यायचे. त्यावेळी किरण बेदीचं पुस्तक वाचलं होतं. बाबा आमटेंच्या सोमनाथ शिबिरात, ‘आनंदवन’मध्ये गेले. स्काउट-गाईडच्या राष्ट्रीय शिबिरासाठी पाटणा इथे गेले. ‘आनंदवन’मध्ये अॅड. असीम सरोदे, नाना पाटेकर यायचे, बोलायचे. अशी माणसे आल्यामुळे प्रेरणा मिळायची.
राष्ट्र सेवा दलामध्ये सुद्धा दहा-दहा दिवसांची शिबिरे असायची. तेव्हा दररोज कुणीतरी बोलायला तिथे यायचे आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळायचे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1993 ला लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप झाला होता. तेव्हा ‘महाराष्ट्र अंनिस’ने लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशांना भूकंपाचा मानसिक धक्का किती बसला, याचा अभ्यास करण्यासाठी ‘निरामय मानसिकता पुनर्वसन’ हा प्रकल्प विविध टप्प्यांत राबवला गेला होता. त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. प्रदीप पाटकर, प्रसन्न दाभोलकर, मिलिंद देशमुख, मिलिंद जोशी, सुनीती लिमये, पराग मुळे, जितेंद्र आलासे असे अनेकजण महाराष्ट्रातून आले होते. त्यामध्ये, आम्ही भूकंपामुळे मानसिक आघात झालेल्या लोकांचे समुपदेशन आणि इतर कार्यक्रम करायचो. आम्ही पूर्ण टीम काम करत होतो… पुण्याची आणि लातूरच्या शाहू कॉलेजची टीम होती. लागू सरांना, एक अभिनेता-कार्यकर्ता म्हणून ऐकणे हाच एक अनुभव होता. जिथं-जिथं ‘अंनिस’चे कार्यक्रम असायचे, त्यात जे व्याख्याते असायचे, ते नेहमीच प्रेरणादायी असायचे.
लहानपणापासून मी ज्या-ज्या वातावरणात राहिले, त्यातून मी शिकत राहिले. मी मोमेडीयन वातावरणात राहण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. आमच्या नातेवाईकांत, मैत्रिणीमध्ये फार कट्टर लोक होते. त्यात, मी मराठी शाळेमध्ये पुढे शिकले, त्याचा खूप फायदा झाला. उर्दूमध्ये राहिले असते तर फक्त धार्मिक शिक्षण घेत राहिले असते.
पारंपरिक मराठी समाजामध्ये कोणत्या परंपरा तुम्हाला चुकीच्या वाटत राहिलेल्या आहेत, ज्याच्याबद्दल तुम्ही व्यक्त व्हायला सुरू झालात, विचार करायला सुरू झालात?
सगळ्यात पहिलं म्हणजे मासिक पाळी. तिच्याशी संबंधित गैरसमजुतीमुळे मी खूप सहन केलं आहे; आणि माझ्या मैत्रिणींनी सुद्धा. मी यामध्ये खूप संघर्ष केला आहे. मी जेव्हा लहान होते, तेव्हा माझी आई पाळी आल्यामुळे बाजूला बसायची. तेव्हा आम्ही भावंडे तिच्याजवळ गेलो, तर आम्हाला फटके बसायचे आणि तिला का स्पर्श केला, म्हणून आम्हाला आंघोळ करायला लागायची; पण हे जेव्हा माझ्या बाबतीत होऊ लागलं, तेव्हा मला प्रचंड अपमान सहन करायला लागायचा आणि अत्यंत वाईट वाटायचं. मला बाजूला बसवायचे, आपले कपडे-भांडे स्वतः धुवावे लागायचे. माझे अंथरूण धुताना मी रडायचे. मोहरममध्ये पाळी येऊ नये म्हणून मला गोळ्या घ्यायला लावायचे. एकदा तर मला खूप त्रास झाला आणि हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं. माझ्या मैत्रिणीच्या घरातसुद्धा असंच व्हायचं. आज-काल या विषयाबद्दल बरंच काही बोललं जातं, सोशल मीडिया किंवा इतर अनेक पद्धतीने….स्वच्छतेच्या सवयी आम्ही नीट पाळत नसायचो. आजपण आम्हाला भीती आहे की, कदाचित त्या काळात चांगल्या सवयी नसतील, तर आम्हाला पण पुढे कर्करोग होण्याचा धोका आहे. आज पॅड असेल किंवा संबंधित सोयींमुळे; आता त्या सवयी लावून घेणं खूप सोपं झालं आहे. आज सुद्धा काही काळजी घेतली नाही तर जंतुसंसर्ग होऊ शकतो.
त्यानंतर उपवासाची – रोजा – परंपरा आहे. ‘जन्नत’चे स्वप्न दाखवून हे सर्व केलं जातं. धर्माच्या परंपराचा पगडा सगळ्यांवर कायम ठेवण्यासाठी हे उपवास केले जातात. आपल्या उपवासात शाबूदाणा, चिप्स किंवा इतर कोणतेही पोषकमूल्य नसलेले खूप खाल्ले जाते. फळे खायला पाहिजेत. आणखी एक म्हणजे सोवळ्याची परंपरा. मी सगळ्यांना सांगत गेले. बर्याच परंपरा या दुसर्याला खूष करण्यासाठी केल्या जातात. प्रत्येक घरात या विषयावर उद्रेक करून चालणार नाही. समजून-उमजून आपण काम केले पाहिजे; भांडण करून चालणार नाही.
महिला मुस्लिम असतील किंवा हिंदू; त्या अंधश्रद्धेच्या बळी असतात आणि वाहकसुद्धा; मग या बाबतीत सर्वांत मोठे आव्हान काय वाटले?
आपले आजी-आजोबा आहेत. त्यांच्यात बदलाची फार मोठी अपेक्षा करू नये. आपल्या आई-वडिलांसमोर दुसरी बाजू पटवून सांगणे गरजेचे आहे; पण आपल्या बरोबरच्या पिढीला हक्कानं बदलायला सांगणं गरजेचं आहे आणि आपणही आधुनिक मूल्यांबाबत कृतिशील राहिलं पाहिजे, तरच आपल्या पुढील पिढीच्या मुलांना सांगायची सुद्धा गरज नाही. ते आपल्या कृतीनं आपोआप शिकतात. महिला अंधश्रद्धेला पटकन बळी पडतात आणि पुढच्या पिढीपर्यंत पटकन ते विचार प्रवाही करतात.
परवाच आम्ही, मी शिक्षक म्हणून काम करत असलेल्या पानगावमध्ये एका महिलेवर करणी-भानामती केल्याचा आरोप सुद्धा केला गेला आणि तिच्यावर बहिष्कार सुद्धा टाकला गेला, त्या ठिकाणी गेलो होतो. यामध्ये जादूटोणाविरोधी आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यातूनच आपल्याला महिला या प्रकारात किती अडकलेल्या आहेत, याची कल्पना येते. म्हणून मी वयोवृद्ध असतील त्यांच्या नादाला न लागता जी शाळेतील मुलं आहेत, कॉलेजमधील मुलं आहेत, त्यांच्यासमवेतच काम करत राहते.
सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरच आणखी कोणत्या महिलांचे काम तुम्हाला आदर्श, प्रेरणादायी राहिलेले आहे?
मलाला युसुफजाई आहेत. मंदाकिनी आमटे आहेत. राणी बंग आहेत. पल्लवी आमटे आहेत. किरण बेदींचा माझ्यावर प्रभाव आहे. मिशेल ओबामा हे आहेत. अॅसिड हल्ल्यात वाचलेल्या महिला, अशा अनेक महिला आहेत. तृतीयपंथी समाजातील लोक आहेत.
‘अंनिस’मधले तुमचे आवडते उपक्रम कोणते आणि तुमचा विशेष सहभाग असलेल्या उपक्रमाच्या आठवणी काय आहेत ?
सगळ्यात जास्त सहभाग म्हणजे ‘विज्ञानबोध वाहिनी.’ 2003 मध्ये सलग 45 दिवस या कामाचे प्रशिक्षण, प्रचार, अभियानासाठी मी आणि आमच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा हलकुडे शिक्षण विभागाकडून ‘अंनिस’च्या या मोहिमेवर डेप्युटेशनवर होतो. मग लातूर जिल्ह्यातील एकही मोठं गाव, तालुका असा सोडला नाही की, जिथे आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन संबंधित कार्यक्रम घेतला नाही. यामध्ये ‘वयात येताना’ हा मुलींसाठीचा उपक्रम ‘स्लाईड शो’सह आपण घेतो. संध्याकाळी आम्ही गावात जाहीर कार्यक्रम घ्यायचो. त्यावेळी गावकरी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक या सगळ्यांसमोर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे सादरीकरण करायचो. त्यासाठी सलग 45 दिवस आम्ही फिरत होतो. अतिशय कमी झोप त्या काळात मिळाली; पण शिकायला प्रचंड मिळाले. माझ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड विकास या काळात झाला.
या व इतर विषयांच्या पलिकडे ‘महिला आणि अंधश्रद्धा’ हा विषय माझा आवडीचा आहे आणि या विषयावर संवाद साधायला, काम करायला मला आवडते. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मी गणेशोत्सव, नवरात्री या काळात मला तरुणींशी या विषयांवर संवाद साधून तरुण लोकांची ऊर्जा विघातक ते विधायक अशा पद्धतीने मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असतो. अशा जीवन बदलून टाकणार्या उपक्रमांमुळे असं वाटतं की, माझ्या स्ट्रगलला या पूर्णविराम चळवळीत मिळाला.
‘अंनिस’बरोबरच दुसर्या कोणत्या संघटनांशी तुम्ही कामाच्या ओघात जोडले गेला आहात?
CasteTribe Organisation या संस्थेबरोबर मी काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोचवण्याचे काम करणारी ही संस्था आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानशी मी जोडले गेलेली आहे. तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाशी संबंध आला. हमीद दलवाई यांच्याबद्दल जाणून घेण्याच्या निमित्ताने मी त्यांच्याशी जोडले गेले आणि आता त्यांचेही काम पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. आता अलिकडे लॉकडाऊनमध्ये सुद्धा या मंडळाने माझा ‘मुस्लिम महिला आणि अंधश्रद्धा’ आणि इतर विषयावर वेबिनार आयोजित केला आहे. हमीद दलवाई यांची मुलगी ईला यांनी सुद्धा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मुस्लिम महिला’ या विषयावर बोलायला प्रोत्साहित केले. बर्याच मुस्लिम महिला आंधळेपणाने बुरख्याचे समर्थन करतात. ते मला पटत नाही.
मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी; आणि त्यातही विशेषतः मुस्लिम महिलांच्या विकासासाठी कोणत्या तीन मुख्य गोष्टी तुम्हाला करणे गरजेचे आहे, असं तुमचं मत आहे?
पहिली म्हणजे शिक्षणाचा प्रसार व्हायला पाहिजे. मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले पाहिजे. त्यामुळे जागरुकता वाढते आणि फार फरक पडतो. मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक स्वतःची वेगळी ओळख किंवा स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. यामागे धार्मिक कट्टरता आणि मृत्यूनंतर स्वर्गाचा मोह (जन्नत) ही कारणे जबाबदार आहेत. त्याच्यानंतर स्वतःची सकारात्मक ओळख तयार करण्यासाठी ते गंभीर नाहीत. समजा एखादा संवेदनशील प्रश्न समोर आला, तर धार्मिक पगड्याला सार्वजनिकदृष्ट्या झुगारून देण्याचे धैर्य मुस्लिम समाजातील लोक दाखवत नाहीत.
तसेच मुस्लिम समाजातील लोक समाजातील सर्व स्तरांतील उच्च स्तरावर पोचण्याचा प्रयत्न करीत नाहीत. शास्त्रज्ञ, वकील, पत्रकार, न्यायाधीश किंवा अधिकारी आणि इतर अनेक क्षेत्रात उच्च पदांवर मुस्लिम लोक कमी आहेत, याची खंत वाटते. परिवर्तन-सामाजिक क्षेत्रात सुद्धा मुस्लिम कमी आहेत. शिक्षण वाढले पाहिजे. प्रगतिशील ओळख निर्माण करण्याचा सर्व मुस्लिम लोकांचा प्रयत्न हवा. मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो; पण मुलींना शिक्षण देण्याचा विचार हा समाज करत नाही. कमीत कमी लग्नाच्या वयात येण्यापर्यंत मुस्लिम मुले-मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये राहिल्या पाहिजेत.
तिसरा प्रश्न म्हणजे बेरोजगारी आहे. कोणतेही काम करायची लाज मुस्लिम समाजात नाही; पण कमी वयात काही तरी काम करायला लागले की, पैसा हातात आल्यावर युवक व्यसनाधीन होतात आणि गुन्हेगारीकडे वळतात. हे सुद्धा थांबायला हवे.
अजून एक म्हणजे मुस्लिम समाजामध्ये पुरुष, पत्नी किंवा दांपत्याला खाजगीपणा (प्रायव्हसी) या मानवी मूल्याबद्दल जागरुकता कमी आहे. ती वाढायला पाहिजे.
मुस्लिम समाजातील बरेच जण लैंगिक शिक्षणाला विरोध करतात. त्यामुळे माध्यमिक शाळेपासूनच लैंगिक शिक्षणाचा आग्रह ‘अंनिस’ने धरावा अशी माझी भूमिका आहे. मी माझ्या मुलांना सुद्धा सांगत असते, थोडं-थोडं…
आजच्या आधुनिकीकरणाच्या जगामध्ये कृषी–ग्रामीण संस्कृती, परंपरांमधल्या कोणकोणत्या परंपरा आपण जोपासल्या पाहिजेत?
ज्या काही पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आहेत, ‘अंनिस’ने त्यांना काही तडा दिलेला नाही; पण त्याच परंपरा साजर्या करण्यासाठी पर्यायी मार्ग आपण देतो. वटसावित्रीला वडाचे झाड लावायला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे आणि झाडाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे. मराठवाड्यात वेळ अमावस्या, बैलपोळा आहे. त्याला आपण कधीही विरोध करत नाही; उलट आपण शेतीची संस्कृती साजरी करायला पुढाकार घेतो. नवरात्रीच्या काळात अनवाणी चालण्याच्या प्रथेला आम्ही विरोध करत नाही; पण सर्वांना प्रश्न विचारायला आणि डोळसपणे या फॅड/फॅशनकडे पाहण्यास आपण लोकांना आवाहन करतो. तीच गोष्ट नवरात्रीमध्ये. दररोज वेगळ्या रंगांच्या साड्या घालणे ही सुद्धा ‘मार्केटिंग’च्या एका कल्पनेतून आलेली आहे. नवरात्रीमध्ये महिला कडक उपवास करतात. त्यावर कोणतेही पोषण होत नाही, म्हणून आम्ही समजून द्यायचा प्रयत्न करतो. परंपरांना आपण विरोध करत नाही; पण जे थोतांड आहे, त्या महिलांना गुरफटून टाकणार्या गोष्टींना आमचा विरोध आहे.
वैचारिक पातळीवर आपण चळवळ म्हणून समृद्ध काम करतो. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि भौतिक जीवनाशी जोडले गेलेले मुद्दे या विषयांवर काम करायला काही अडचणी येतात का ?
निश्चितच. चळवळीमध्ये शिक्षण घेण्याला प्रोत्साहन दिले जाते. तसे वातावरण तयार केले जाते. आरोग्य विभागामध्ये ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर आपण काम करतो. पुरुषांच्या आरोग्यावर सुद्धा खरंच आता विचार व्हायला पाहिजे. महिला बोलतात, मन मोकळे करतात; पण पुरुष बर्याच वेळा व्यक्त होऊ शकत नाहीत. आपल्या चळवळीला कुठलंही आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळं प्रत्येकाला आपलं करिअर, घर सांभाळून काम करावं लागतं. भौतिक प्रश्न सोडवण्यासाठी किंवा संसाधनं उभी करण्यासाठी; मग ते कार्यकर्त्यांचं असू दे किंवा संस्थात्मक मार्गानं, आपण कमीच पडतो. मला असं वाटतं की, जिथे-जिथे शाखा आहे, गाव आणि तालुका पातळीवर संघटनेचे कार्यालय असावे. तिथे एक-दोन कार्यकर्ते जे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी काम असावे आणि हे सर्व सांभाळण्यासाठी निधी उभारण्याचे स्वातंत्र्य स्थानिक शाखेला असावे. आपल्या हक्काच्या कार्यालयात पुस्तकविक्रीची सोय असावी. तीच जागा वाचनालय म्हणून वापरता येईल. अशा बहुउद्देशीय स्वरुपाची जागा प्रत्येक शाखेकडे असावी. त्यामुळे सगळ्यांना एकत्र येण्यास आणि काम संघटित होण्यास मदत होईल.
युवक–युवतींमध्ये विवेकवादी चळवळीचे काम पुढे कसे नेता येईल ?
बर्याच वेळा आपण कमी पडतो. ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे चालवला जाणारा ‘विवेक वाहिनी’ उपक्रम राबविणार्या महाविद्यालयांची संख्या वाढायला हवी. त्याचबरोबर या ‘विवेक-वाहिन्या’ ज्या महाविद्यालयांत आहेत, त्याच्या आसपासच्या भागातील जी तरुण मंडळे आहेत, त्यांच्याशी जोडली गेली पाहिजेत. दोन्हींच्या संयुक्त उपक्रमांतून विवेकवादी चळवळीचे कार्यक्रम, विचार पुढे नेता येईल. महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात ‘विवेक वाहिनी’ व्हायला पाहिजे. ‘अंनिस’च्या युवा उपक्रम विभागाने यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.
महिलांच्या प्रश्नावर काम पुढे नेण्यासाठी सर्व चळवळींतील तरुण कार्यकर्त्यांना काय सांगाल ?
महिलांच्या प्रश्नावर काम पुढे नेण्यासाठी सर्व चळवळींतील तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी. स्वतःपासून कामाची सुरुवात हेच याचे उत्तर आहे. महिलांना शिक्षणाच्या प्रवासात टिकवून ठेवणे आवश्यक आहे. महिलांना कर्मकांडात न गुंतवता वाचनाकडे त्यांचे मन कसे गुंतवता येईल, याकडे लक्ष देणे. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यावर भर देणे.
प्रचंड वेगाने सतत पसरत असलेल्या समाजमाध्यमांतील माहितीच्या दुष्प्रचाराला कसे तोंड देता येईल?
त्याच्यासाठी सर्वप्रथम स्वतःला सोशल मीडियाशी जोडून घेऊन सतत काहीतरी घडामोडी होत असतात, त्यावर व्यक्त व्हायला पाहिजे. लोकांचे सर्वेक्षण घेऊन किंवा त्यांचे अभिप्राय घेऊन आपण थांबायला नको; त्यावर प्रतिसाद दिला पाहिजे. अफवा असतील किंवा चुकीची माहिती आहे, त्याबद्दल स्पष्टीकरण देणारी माहिती सतत दिली पाहिजे. यासाठी युवकांचे प्रशिक्षण होण्याची गरज आहे. आम्ही यासाठी निश्चितच काहीतरी करायचा प्रयत्न करू.
सहिष्णुतेची पातळी कमी झालेली असताना आणि धार्मिक उन्माद वाढीस लागलेले असताना धर्माची विधायक चिकित्सा करण्याच्या अंगाने काय आव्हाने आहेत?
जे-जे लोक धर्माचा उन्माद पसरवतात, त्यांचा धर्माचा व इतिहासाचा अर्धवट अभ्यास असतो. उदा. टिपू सुलतानच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिम तरुण पोरं हिरवे झेंडे घेऊन फिरतात. शिवजयंतीला हिंदू तरुण भगवे झेंडे घेऊन फिरतात. शिवाजी महाराजांचा संघर्ष हिंदू-मुस्लिम झगडा हा नव्हता, तर स्वराज्य स्थापना हे ध्येय त्यामागे होते. आजकालची प्रसारमाध्यमे सुद्धा लोकांचे ज्ञान न वाढवता केवळ अर्धवट माहिती देण्याच्या मागे असतात. माध्यमे सुद्धा कोणत्या तरी धर्माबद्दल सतत मारा करून लोकांना संमोहित करतात. लोकशाहीचा एक स्तंभ म्हणून यात बदल होणे महत्त्वाचे आहे.
चळवळीतील कार्यकर्त्यांचे जीवन हे प्रचंड उर्जेच्या घडामोडींचे आणि समाजाशी जोडले गेलेले असते; पण त्या कामाची प्रतिमा ही लोकांमध्ये बर्याच वेळा सकारात्मक नसते, ते कसं बदलता येईल?
आजकालच्या युवकांच्या जीवनात ‘करिअर’ नावाच्या गोष्टीने अतिक्रमण केले आहे. शिक्षण घेताना आणि त्यानंतर प्रचंड दबाव, ताणाखाली सर्व युवक असतात. नोकरी करत असताना ते त्यांच्या कामाचा आनंद लुटू शकत नाहीत. आमच्या वेळी महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धा, शिबिरं यामध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. जिल्हा-विभाग-राज्य पातळीवर आम्ही जायचो वेगवेगळ्या कॅम्पमध्ये. विविध राज्यांतील लोकांना भेटायचो. त्यांच्याबरोबर संवाद साधायचो, त्यांना समजून घ्यायचो. अशा प्रकारचे वातावरण आजकालच्या शिक्षणात दिसत नाही. आजकालच्या तरुणांना असं पोषक वातावरण मिळत नसल्यामुळं आणि पालकांचा दबाव प्रचंड असतो, त्यामुळं ते एक तर घुसमटले किंवा भरकटले जातात. आपला समाज, आपला भारत समजून घेण्यासाठीची संधी खूप कमी मिळते. त्यामुळे सहिष्णुतेऐवजी उन्माद वाढतो. त्यामुळे ऊर्जावान असे काही त्यांना वातवरण मिळत नाही. म्हणून कार्यकर्ते म्हणून दुसरे कुणी काम करतात, त्यांच्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन साचलेपणाचा राहतो. एकमेकांना समजून घेण्याच्या संधी कमी झाल्याने आणि प्रत्येकाचे जीवन आत्मकेंद्री झाल्यामुळे सुद्धा हे झाले आहे. शाळा-कॉलेजच्या पातळीवर कॅम्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे आणि भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पुढील काळात युवक आणि शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मानवी मूल्ये कशी पोचवता येतील, या दृष्टीने ‘अंनिस’चे काम वाढायला हवे.
तुम्ही याबाबत काही प्रयत्न व उपक्रम सुरू केले आहेत का?
आम्ही शाळेत जेव्हा तीळगूळ देण्याचा कार्यक्रम करतो, तेव्हा काही मुस्लिम मुले, महिला तीळगूळ खात नाहीत. तेव्हा मी स्वतः माझ्या मुलांना शाळेत घेऊन जात असे आणि त्यांच्याबरोबर तीळगूळ खाऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करत असे. बरेचसे मुस्लिम लोक ‘वेळ अमावास्ये’चे शेतातील जेवण खात नाहीत. ‘अपने में वो नहीं खाते,’ असं म्हणतात. पण आपल्या सर्वांची शेती संस्कृती साजरी करण्यासाठी खायला काय हरकत आहे? अशा अनेक गैरसमजुती प्रत्येक जातीमधल्या, धर्मामधल्या लोकांमध्ये आहेत. त्या दूर व्हायला पाहिजेत. शाळापातळीवर यासाठी उपक्रम हाती घ्यायला पाहिजेत. आम्ही यासाठी सत्यशोधक प्रज्ञा परीक्षा, विज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित करत असतो आणि करत राहू. आपण जर पुढे होऊन मुलांच्या शिकण्याचे कौतुक केले तर लहान मुले छान प्रतिसाद देतात.
बर्याच कार्यकर्त्यांना व्यक्तिगत जीवनात पुरोगामी विचार पूर्णपणे जगण्यासाठी अनेक भावनिक बंधने असल्यामुळे अडचणी येतात, त्यांची द्विधा मनःस्थिती होते, त्या सर्व कार्यकर्त्यांना काय सांगाल?
यासाठी तरुणांनी या चळवळीमधले पुरोगामी वैचारिक साहित्य वाचले पाहिजे. त्यांनी वाचनावर जास्तीत जास्त भर द्यावा. ‘अंनिस’चे वार्तापत्र असेल किंवा इतर पुस्तके असतील, त्यांचे नियमित वाचन करून समजून घ्यावे. त्यामुळे केवळ कुणाचे आंधळे अनुकरण न करता स्वतःची मते तयार करावीत, स्वतःचे विचार जोपासावेत. त्यामुळे कार्यकर्त्याच्या भूमिकेत जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्या कुटुंबाबद्दल आपल्याला माहिती असते. त्यामुळे त्यांना जसे समजेल, पटेल, रुचेल, असा हळूहळू संवाद साधावा. ज्यांना वाचनात गती नाही किंवा वाचन आवडत नाही, त्यांनी सोशल मीडियावर विचारवंत, कार्यकर्ते, ऐतिहासिक योगदान दिलेल्या लोकांबद्दल बरेच ऐकण्यासारखे, पाहण्यासारखे ऑडिओ/ व्हिडिओ उपलब्ध असतात. त्यांच्या माध्यमातून आपला विकास करावा. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांना दोष देत न बसता, मी माझ्या आयुष्यात याचा जास्तीत जास्त कसा अवलंब करू शकेन, याबद्दल विचार करावा आणि कृती करावी. आपल्या आजी- आजोबांना बदलण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या आई-वडिलांना एखाद्या विषयातील दुसरी बाजू समजावून सांगावी. त्यापुढे जाऊन आपल्या बरोबरच्या मित्र-सहकार्यांना बदलण्यासाठी आग्रह धरावा. पुढच्या पिढीतील लहान मुलांना फक्त त्यासाठी प्रोत्साहित करावे, तरच ते होईल.
मुस्लिम समाजातील सकारात्मक चाली–रीती कोणत्या सांगता येतील?
मुस्लिम समाज जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता मानत नाही. समाजनिर्मित व्यवस्थेतून जाती निर्माण झाल्या आणि त्याचे समर्थन इस्लाम करत नाही. विवाह हा करार मानून विवाहाच्या वेळी मुलीची संमती (consent) अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धर्माचा दृष्टिकोन व्यापक आहे; पण काही ठिकाणी माणसे संकुचित वागताना दिसतात. इस्लाम धर्मात कर्जावर व्याज न घेणे, न फसवणे आणि नीतिमत्तेला खूप स्थान आहे. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक ‘जकात’ आहे, आणि ज्यामध्ये गरजू व गोरगरिबांना मदत करणे अपेक्षित आहे. धनसंचय आणि संपत्ती साठा करायला इस्लाममध्ये मनाई आहे.
सक्रिय कार्यकर्ता आणि कौटुंबिक जीवन याची सांगड कशी घालता येईल?
कार्यकर्त्याचे जीवन जगणे आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे हे एक कौशल्य आहे. अर्थात हे थोडेसे अवघड; पण अशक्य नाही. शहीद डॉ. दाभोलकर यांनी अगोदर आपले कुटुंब, नोकरी, उद्योग, व्यवसाय आणि नंतर चळवळीचे काम असा प्राधान्यक्रम दिला आहे. तेच मी माझ्या आयुष्यात अवलंबले आहे. मी विद्यार्थी जीवन, महाविद्यालयात खूप झपाटल्यागत काम केले. आई-वडिलांचा एकदा आपल्यावर विश्वास बसला की, मग जग आपलेच आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. सुरुवातीला भरपूर विरोध झाला कुटुंबाकडून; पण एकदा आपल्या कामाबद्दलची खात्री पटली, तर मग मार्ग सुकर होतो. लग्नानंतर मग परिस्थिती अवघड होत जाते. तेव्हा संयमाची, नम्रतेची भूमिका घ्यावी लागते. नवीन घर, नवीन माणसे, त्यांचा विश्वास कमवायला वेळ लागतो. आपल्या कामाचे स्वरूप, त्याची पारदर्शकता पटली की, मग त्रास कमी होत जातो. यात आपल्या कामाची गती थोडी मंदावते; पण चळवळीशी नाळ जोडून ठेवली की, पुढचा मार्ग व्यवस्थितरित्या पार पाडता येतो. कुटुंबाचा विश्वास बसेपर्यंत तरुण-तरुणींनी आपल्या घराच्या परिस्थितीनुसार आपल्या वागण्यातील प्रतिसाद ठरवणे गरजेचे आहे. जास्त भावूक सुद्धा व्हायचे नाही आणि आपल्या विचारांना मूठमाती सुद्धा द्यायची नाही. आपल्या कौशल्याने, हातोटीने सुवर्णमध्य साधावा, असे वाटते. भावनिक प्रसंगी संवेदनशीलतेने आणि संवादाने घरातील वातावरण शांत करावे लागते.
करिअर आणि कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे जीवन या दोन्हींचा मेळ तुम्ही कसा घातला ?
करिअर घडवणे आणि कार्यकर्ता म्हणून जगणे यात संतुलन राखणे 100 टक्के शक्य आहे. ते मी केलेले आहे. कार्यकर्ता म्हणून आपल्याला प्रत्यक्ष ‘फील्ड’वर जे अनुभव येतात, त्या अनुभवाची शिदोरी ‘करिअर’ घडवताना प्रभावी साधन म्हणून उपयोगी ठरते. आपल्या करिअरमध्ये कार्यकर्ता असणे हे कधीच अडथळा ठरत नाही; उलट त्या करिअरमध्ये कृतीची जोड मिळते. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष, अनुभवाचे ज्ञान प्रभावी ठरू शकते. अनेक तरुण-तरुणी करिअरच्या नावाखाली चांगल्या चळवळीशी नाते जोडत नाहीत आणि सतत पुस्तकी ज्ञानात गुंतून राहतात; पण प्रत्यक्षात जेव्हा एखाद्या संधीसाठी असलेल्या मुलाखतीसाठी जातात, तेव्हा त्यामध्ये एखादा कार्यकर्ताच बाजी मारताना दिसतो. कारण त्यांच्या ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड असते. म्हणून करिअर आणि कार्यकर्ता यांच्या मिलाफातून आयुष्य उजळूनच निघते, यावर माझा ठाम विश्वास आहे.
निवडक पुरस्कार
नेहरू युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा पुरस्कार, 2004
भारत जोडो युवा अकादमीतर्फे मराठवाडा स्तरीय ‘झेप’ पुरस्कार, 2010
राष्ट्र सेवा दलातर्फे दिला जाणारा ‘साने गुरुजी समाजशिक्षक पुरस्कार’, 2015
महाराष्ट्र राज्यस्तरीय ‘सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार’, 2017
वंचित विकासतर्फे ‘कै. सुचिता नाईक स्मरणार्थ ‘आपुलकी पुरस्कार’, 2017
महात्मा फुले आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार, 2018
रुक्साना मुल्ला, लातूर
संपर्क : 70663 34333