‘मोशो’च्या ११ लघु बोधकथा

मुकेश माचकर -

| | सहनशक्ती

बादशहाने वजीराला विचारले, “राज्यकर्त्याची सगळ्यांत मोठी ताकद कशात असते?”

वजीर म्हणाला, “प्रजेच्या सहनशक्तीत आणि चतुर राज्यकर्ता ती नेहमीच अधूनमधून तपासून पाहत असतो हुजूर.”

बादशहा म्हणाला, “नेहमीप्रमाणे मला तुझं उत्तर पटलेलं नाही.”

वजीर म्हणाला, “हुजूर, जे आपल्याला कळत नाही, ते आपल्याला पटलेलं नाही, असं म्हणणं सोपं असतं आणि त्यातून फुकाचा आबही शिल्लक राहतो. तुम्हाला कार्यानुभवातूनच समजवावं लागेल. मी सांगतो तसा एक फतवा काढा.”

बादशहाने अतिशय शंकाकुल मनाने ‘तो’ फतवा काढला. राजधानीच्या मधोमध एक नदी होती. तिच्यावर एकच पूल होता. तो राज्यातला सगळ्यांत महत्त्वाचा पूल होता. जवळपास सगळ्या प्रजाजनांना त्याचा वापर करायला लागत होता. ‘त्या पुलाचा वापर करणार्‍या प्रत्येकाला दोन अशर्फींचा कर द्यावा लागेल,’ असा तो फतवा होता. असा फतवा निघाला, तर प्रजेत प्रचंड असंतोष निर्माण होईल, अशी राजाला भीती वाटत होती. मात्र, तसं काही झालं नाही. लोक निमूटपणे कर भरू लागले.

बादशहा चकित झाला. वजीराला म्हणाला, “तुझा मुद्दा खरा ठरतोय बहुतेक.”

वजीर म्हणाला, “हुजूर, खेळ आत्ता कुठे सुरू झालाय. आता हा कर दहापट करा. उद्यापासून २० अशर्फी द्यायला सांगा प्रत्येकाला.”

बादशहा म्हणाला, “तू माझं सिंहासन उलथवायला निघालायस की काय?”

वजीर गालातल्या गालात हसला.

कर दसपट झाला. लोकांनी खळखळ करत का होईना, तो भरायला सुरुवात केली. अत्यावश्यक काम असेल, तेव्हाच लोक पुलाचा वापर करायला लागले. नदीतल्या नावाड्यांना बरकत आली.

काही दिवसांनी हा कर चाळीस अशर्फींवर गेला, तरीही लोक रांगा लावून कर भरत होते. त्यानंतर वजीराने बादशहाला भयंकर भासणारा हुकूम काढायला लावला. ‘पूल वापरणार्‍याला चाळीस अशर्फींचा कर द्यावा लागेल; शिवाय जोड्याचे दहा फटके खावे लागतील,’ असा तो हुकूम होता.

तो अमलात येऊन एक दिवस होतो ना होतो, तोच राजवाड्यासमोर प्रजाजनांची प्रचंड गर्दी गोळा झाली. बादशहा सचिंत मनाने बसला होता. वजीर आला. बादशहा म्हणाला, “हे तू काय करून ठेवलंयस? पाहतोस ना बाहेर सगळ्या राज्यातली प्रजा गोळा झालीये. कर भरा आणि वर दहा जोडे खा, हे कोणती प्रजा सहन करेल?”

वजीर म्हणाला, “हुजूर, ते काय म्हणताहेत ते न ऐकताच तुम्ही मला बोल का लावताय? मी त्यांची मागणी आत्ताच ऐकून आलोय आणि ती पूर्ण करण्याचं आश्वासनही देऊन आलोय.”

बादशहा थरथरत म्हणाला, “काय होती ती मागणी?”

वजीर हसून म्हणाला, “हुजूर, त्यांची फक्त इतकीच तक्रार होती की पुलावर दोन्ही बाजूला एकेकच कर्मचारी आहे. तोच कर घेतो, तोच जोडे मारतो. त्यात खूप वेळ जातो. मोठ्या रांगेत खूप वेळ थांबावं लागतं. जोडे मारण्यासाठी दोन्ही टोकांना वेगळा कर्मचारी नेमला, तर आमचा खोळंबा होणार नाही.”


| | अग्नी

सुफींमध्ये अशी मान्यता आहे की, अग्नीचा शोध नूर नावाच्या संताला लागला. त्याच्या शिष्यांनी त्याला सांगितलं की, हा फार समाजोपयोगी शोध आहे, तो आपण लोकांपर्यंत न्यायला हवा.

नूर म्हणाला, “लोकांना त्यांच्या उपयोगाचं आणि गरजेचं काय आहे, हे कळतं का, याविषयी मला शंका आहे.”

पण, शिष्यांच्या आग्रहापुढे त्याचं काही चाललं नाही. नूर आणि त्याचे शिष्य एका कबिल्यापाशी पोचले. त्या कबिल्यातल्या माणसांना गोळा करून त्यांनी सांगितलं की, साक्षात् अग्नी निर्माण करण्याचा शोध आमच्या गुरूंना लागला आहे.

तात्काळ त्या कबिल्याने नूरच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्याला वंदन केलं.

नूरचे शिष्य म्हणाले, “गुरुदेव, ती विद्या तुम्हाला सोपवू इच्छितात.”

कबिलेवाले तात्काळ मागे सरकले, म्हणाले, “आम्ही पापी आहोत. आम्हाला अंधारच बरा. तीच आमची लायकी आहे. तुमच्यासारख्या महापुरुषाचं दर्शन झालं, यातच आमच्या जन्माचं सार्थक झालं, आम्हाला त्यापलीकडे काही नको.”

नूर आणि शिष्य दुसर्‍या कबिल्याकडे गेले. तिथे त्यांनी तीच माहिती दिली. तात्काळ तिथले कबिलेवाले शस्त्र उपसून धावून आले. त्यांचा नायक म्हणाला, “अरे पाखंड्यांनो, तुम्हाला लाज नाही वाटत, हे असलं काहीतरी येऊन सांगायला. माणसाने अग्नी निर्माण करावा, अशी परमेश्वराची इच्छा असती तर त्याने किंवा प्रेषितांनी सोपवला नसता का तो माणसाकडे? परमेश्वरी व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचा हा उद्योग सांगितला होता कुणी तुम्हाला? पुन्हा इकडे आलात तर हातपाय छाटून, डोळे काढून, जीभ छाटून वाळवंटात फेकून देऊ तुम्हाला!”

नूर आणि शिष्य तिसर्‍या कबिल्याकडे गेले. तिथेही त्यांनी तीच माहिती दिली.

तिथल्या कबिलाप्रमुखाने सगळं ऐकल्यानंतर अग्नी चेतवण्याच्या विद्येचा स्वीकार करायची तयारी दर्शवली. नूरला आश्चर्य वाटलं. पण, शिष्य खूष झाले.

सगळे मुक्कामी परतले. अग्नीच्या विधीचा स्वीकार करण्याची समाजाची तयारी झालेली नसताना उगाच विषाची परीक्षा नको म्हणून प्रसारकार्य थांबवण्यात आलं.

अनेक वर्षांनंतर काही शिष्यांच्या मनात आलं की, आपण ज्या तीन कबिल्यांकडे अग्नी चेतवण्याचं ज्ञान घेऊन गेलो होतो, त्यांच्यात काही परिवर्तन झालंय का, ते पाहायला काय हरकत आहे?

ते पहिल्या कबिल्यात गेले. तिथं अग्नीचं मंदिर बनवण्यात आलं होतं. फक्त पुजार्‍यालाच अग्नी चेतवण्याचा अधिकार होता आणि अग्नीची पूजा करणारे लोक मात्र अजूनही अंधारातच राहत होते.

दुसर्‍या कबिल्यातले लोकही अर्थातच अंधारातच राहत होते आणि त्यांच्या शास्त्रांमध्ये नूरची ‘सैतानाचा हस्तक’ अशी प्रतिमा प्रस्थापित झाली होती.

तिसर्‍या कबिल्याने अग्नीचा स्वीकार केलेला असल्याने त्यांच्याकडून नूरच्या शिष्यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्या कबिल्याने अग्नीचा जोरदार वापर चालवला होता, शत्रूंना जाळून ठार मारण्याकरिता आणि त्यांची घरं, गावं, शहरं, जंगलं पेटवून देण्याकरिता.

एरव्ही तेही अंधारातच राहत होते!


| | तेरा

१३ हा अशुभ आकडा आहे, अशी अनेकांची समजूत असते. एका माणसाचीही तशीच समजूत होती. पण, तो स्वत:ला वैज्ञानिक विचारांचा श्रद्धावान माणूस मानत होता. ‘आपली श्रद्धा आपण केवळ परंपरा म्हणून स्वीकारत नाही, तर शास्त्रकाट्याच्या कसोटीवर तोलून पाहतो, तिच्यासाठी योग्य शास्त्रीय पुरावे शोधतो,’ अशीही त्याची ठाम श्रद्धा होती.

त्यामुळेच १३ हा आकडा अशुभ आहे, ही केवळ आपली समजूत आहे, अशी कोणाची समजूत होऊ नये, यासाठी त्याने माहितीच्या आणि तथ्यांच्या आधारावर हा आकडा अशुभ असल्याचं सिद्ध करायचं ठरवलं. १३ तारखेला जगभरात घडलेले सगळे घातपात, अपघात, उत्पातांची माहिती त्याने गोळा केली. आपल्या देशात १३ तारखेला किती लोक कशाकशाने मरण पावले, याची माहिती गोळा केली. कोणकोणते गुन्हे १३ तारखेला घडले, याचाही तपशील जमवला आणि त्याने हे सप्रमाण सिद्ध केलं की, १३ तारखेला जगात अनेक आपत्ती ओढवल्या आहेत, अनेक माणसं वेगवेगळ्या कारणांनी मरण पावलेली आहेत, १३ नंबरच्या गाड्यांना अपघात झाले आहेत, १३ नंबरच्या खोल्यांमध्ये गुन्हे घडलेले आहेत, हे सगळं लक्षात घेता १३ हा आकडा अशुभ आहे, हे आता निर्विवादपणे सिद्ध झालं आहे.

१३ हा आकडा अशुभ आहे, असं मानणार्‍या सगळ्यांना हे संशोधन पटलं आणि आपल्या परंपरेतून आलेलं ‘दिव्य ज्ञान’ या माणसाने कसं शास्त्रीय पद्धतीने सिद्ध केलं, याबद्दल त्याचे सत्कार केले गेले. असा माणूस ‘नोबेल’साठी निवडला गेला पाहिजे, किमानपक्षी ‘नासा’ किंवा ‘युनेस्को’मध्ये त्याला शिफारसपत्रांच्या विभागाचा प्रमुख बनवला पाहिजे, असंच त्याच्या चाहत्यांना वाटत होतं.

फक्त एक गोष्ट त्याच्या आणि त्याच्या चाहत्यांच्या लक्षात आलीच नाही… त्याने केलेलं ‘क्रांतिकारक’ संशोधन जसंच्या तसं एक, दोन, १०, २०, ३१ अशा कोणत्याही तारखेच्या बाबतीत करता येईल आणि त्या तारखेला घडलेले अपघात, घातपात, वाईट घटनांच्या आधारावर कोणतीही तारीख शास्त्रशुद्धपणे अशुभ घोषित करता येईल, हे त्यांच्या गावीही नव्हतं!


| | तीन माणसं

जगात तीन प्रकारची माणसं असतात…

पहिल्या प्रकाराची माणसं म्हणतात, ‘सत्य जिथे कुठे असेल तिथे, त्याच्या बाजूला मी पोचेन. कारण मी नेहमी सत्याच्या बाजूने असलं पाहिजे.’

दुसर्‍या प्रकारची माणसं म्हणतात, ‘सत्य जिथे कुठे असेल, तिथून त्याने माझ्या बाजूला येऊन उभं राहावं. कारण मला सत्याच्या बाजूने उभं राहायचं आहे.’

तिसर्‍या प्रकारची माणसं सगळ्यात जास्त आहेत. ती म्हणतात, ‘माझ्या बाजूला जे आहे किंवा मी ज्याच्या बाजूला आहे, तेच सत्य आहे. मी अमक्या धर्मात जन्मल्यामुळे मुळातच सत्याच्या बाजूनेच जन्माला आलो आहे.’


| | सेटिंग

मुल्ला नसरुद्दीन मृत्युशय्येवर होता. धर्मोपदेशक त्याच्याकडून अखेरची प्रार्थना वदवून घ्यायला गेला.

मुल्लाने आधी देवाची प्रार्थना केली, “देवा, तुझ्याकडे येतोय रे, मला सांभाळून घे.” पाठोपाठ त्याने सैतानाची प्रार्थना केली, “सैताना, तुझ्याकडे येतोय रे, मला सांभाळून घे.”

चक्रावून गेलेल्या धर्मोपदेशकानं विचारलं, “मरणाच्या चाहुलाने तुमच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का नसरुद्दीन?”

मुल्ला म्हणाला, “अरे बाबा, मरतंय कोण? मी की तू? वरही आपल्यासारखीच लोकशाही असेल, तर आत्ता तिथे नेमकी कोणाची सत्ता असेल ते इथे बसून सांगता येईल का? आपण आपली दोन्हीकडे ‘सेटिंग’ लावून ठेवलेली बरी!


| | बटण

पिंटुकले वकील कपाळाला हात लावून बसले होते.

मुल्ला नसरुद्दीननं विचारलं, “काय झालं?”

पिंटुकले वकील म्हणाले, “माझ्याकडं एक वकीलपत्र आलं आहे. अशील गरीब आहेत माझे. पण, त्यांची बाजू सत्याची आहे. समोर एक धनाढ्य पार्टी आहे. तिचे वकील आहेत अ‍ॅड. धटिंगण.”

मुल्ला म्हणाला, “असो. त्याने काय फरक पडतो?”

पिंटुकले वकील म्हणाले, “धटिंगणांचे रेकॉर्ड आहे, ते आजवर एकही खटला हरलेले नाहीत आयुष्यात. ते असा काही युक्तिवाद करतात की न्यायमूर्तींना त्यात फटही सापडत नाही. दहा दिवसांनी कोर्टात उभा राहणारा हा खटलाही ते हरणार नाहीत. माझ्या अशिलाला आयुष्यातून उठवतील.”

मुल्ला म्हणाला, “मला धटिंगण वकिलांना कोर्टात पाहायचंय. दोन-चार दिवस नीट निरीक्षण करायचंय त्यांचं.”

पिंटुकले वकिलांनी तशी व्यवस्था केली. पाचव्या दिवशी मुल्ला म्हणाला, “खटल्याच्या दिवशी एकच करायचं. धटिंगण वकिलांचा जो ड्रायव्हर आत त्यांचा कोट घेऊन येतो, त्याला बाहेरच थांबवून चहा प्यायला घेऊन जायचं.”

तेही सोप्पं होतं. ड्रायव्हर चहा पीत असताना मुल्लानं अचानक मुंगळा चावल्याचं नाटक करून त्याच्या पायावर पाय मारला. त्या गडबडीत त्याच्या हातातून पडलेला कोट त्याला उचलून दिला. ड्रायव्हर गेल्यावर तो डोळे मिचकावून पिंटुकले वकिलांना म्हणाला, “तुमचं काम झालं. खटला तुम्हीच जिंकणार.”

तसंच झालं.

का, कोण जाणे? धटिंगण वकिलांना आज बोलायला शब्दच सापडत नव्हते. त्यांचं सगळं शब्दभांडार आटलं होतं. त्यांच्या विचारांमध्येही सुसंगती नव्हती. ते चाचपडत होते. न्यायाधीशही त्यांची ही निष्प्रभ स्थिती पाहून चक्रावले होते.

पिंटुकले वकिलांनी बाहेर पडल्यावर मुल्लाचे हात कृतज्ञतेने हातात घेऊन विचारलं, “हा चमत्कार कसा घडवला?”

मुल्ला म्हणाला, “माणूस कळत-नकळत सवयीचा गुलाम असतो. धटिंगणांचं निरीक्षण केलं, तेव्हा लक्षात आलं की ते समोरच्या वकिलाचा युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी सुरू असताना कोटाच्या वरच्या बटणाशी चाळा करतात, ते गोल-गोल फिरवत राहतात. त्याबरोबर त्यांचं विचारचक्र फिरतं आणि त्यांचा युक्तिवाद मनात आकार घेतो मी फक्त आज ते बटण तोडलं!!”


| | पोपट

नगरात एक जगद्विख्यात जादूगार आला… म्हणजे तो जगद्विख्यात आहे, असं त्याच्या प्रसिद्धिपत्रकांमध्ये म्हटलं होतं. तसे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मेसेज फिरले होते, तशा पोस्टींची ‘फेसबुक’वर रेलचेल झाली होती…

त्याने भूतकाळात जादूचे बरेच प्रयोग केले होते… नकोशी माणसं मोठ्या संख्येने गायब करण्याच्या जादूत त्याचा हातखंडा होता म्हणे!

या नगरात तो माणसाचा पोपट बनवण्याचा जबरदस्त प्रयोग सादर करणार होता. प्रयोगाच्या दिवशी जवळपास सगळं नगर भव्य मैदानात लोटलं होतं. सगळ्यांनी भरपूर पैसे मोजून, चढ्या दरानं, ब्लॅकमध्ये तिकिटं काढली होती.

जादूगार आला, त्यानं बराच वेळ वेगवेगळ्या विषयांवर मतप्रदर्शन केलं, अधूनमधून भावूक होऊन डोळ्यांतलं पाणी टिपलं, कधी-कधी आक्रमक होऊन काल्पनिक म्यानातून काल्पनिक तलवार उपसली…

…लोक चुळबुळू लागले, तेव्हा मागून कुणीतरी जादूची आठवण करून दिली. मग जादूगारानं प्रेक्षागृहातल्या एका माणसाला बोलावलं, त्याच्यावर मखमली आवरण घातलं आणि तो दिव्यांच्या उघडझापेत, संगीताच्या तालावर जादूची छडी फिरवत मंत्र पुटपुटायला लागला…

सगळ्या प्रेक्षकांनी श्वास रोखून धरले. मंत्र पूर्ण झाल्यावर ‘गिली-गिली.. गिली-गिली.. छूऽऽ’ असं म्हणत त्यानं ते आवरण खेचून काढलं आणि तो टाळ्यांचा गजर स्वीकारण्यासाठी झुकून उभा राहिला…

…पण, आवरणाखालचा माणूस तसाच होता… त्याचा काही पोपट झाला नव्हता…

…प्रेक्षागारात सुन्न शांतता पसरली…

…जादूगार पुढं आला आणि म्हणाला, “काय झालं?”

एकानं ओरडून सांगितलं, “अहो, त्या माणसाचा पोपट झालाच नाही.”

जादूगार हसून म्हणाला, “पण, तुमचा झाला की नाही? इथं जमलेल्या हजारो प्रेक्षकांचा ‘पोपट’ झाला की नाही? एका माणसाचा पोपट बनवण्याची करामत तर कोणताही फुटकळ जादूगार करून दाखवेल. हजारो लोकांचा ‘पोपट’ करून दाखवायला मोठी कला लागते. आता सांगा, ही मोठी जादू आहे की नाही?…”

…सगळ्यांनी ‘हो, हो’ म्हणून माना डोलावल्या आणि टाळ्यांचा कडकडाट केला.


| | सात्विक संताप

मोठे वकील रिटायर झाले. त्यांच्या निरोप समारंभात छोट्या वकिलानं त्यांना गाठलं आणि म्हणाला, “इतकी वर्षं तुम्हाला आदर्श मानून मी शिक्षण घेतलंय. तुमच्यासारखंच वकिलीत नाव कमावण्याची इच्छा आहे. तुमच्याइतकंच यशस्वी होण्यासाठी काय गुरुमंत्र द्याल?”

मोठे वकील म्हणाले, “जर केसमध्ये कायदा तुझ्या बाजूनं असेल, तर न्यायाधीशापुढे कायद्याचा कीस काढ, प्रतिस्पर्धी वकिलावर कायदा, कायदा, कायदा आदळत राहा.”

छोटा वकील म्हणाला, “पण, कायदा माझ्या बाजूने नसेल तर…?”

“तर न्यायाधीशांच्या भावनेला हात घाल.” मोठे वकील म्हणाले, “त्यांच्या मनात करुणा, दया निर्माण करण्याचा प्रयत्न कर. कवितेच्या ओळी बोल, रडून दाखव, नाट्यमय संवाद बोल, काय वाट्टेल ते कर, पण न्यायाधीशांच्या हृदयाला पाझर फोड.”

छोटा वकील म्हणाला, “पण, माझी केस न्यायाधीशांची सहानुभूतीही मिळवण्यासारखी नसली तर…?”

मोठे वकील डोळे मोठ्ठे करून म्हणाले, “तर मग एकच काम कर, टेबलावर जोरजोराने मुठी आपट. दुसर्‍या दिवशी हात बँडेजमध्ये गेला तरी बेहत्तर..! अशा आवेशाने मुठी वळून-वळून आपट टेबलावर. असा धिंगाणा केला की लोकांना वाटतं, ज्याअर्थी हा एवढी भयंकर आदळआपट करतोय, त्याअर्थी याची बाजू सत्याची असणारच, त्याशिवाय का याला एवढा सात्विक संताप आलाय!!!”


| | विश्वगुरू

विश्वगुरू एकदा मनोरुग्णालयाला भेट देण्यासाठी गेले.

मनोरुग्णांसाठी असलेल्या सेवा-सुविधांची त्यांनी पाहणी केली. डॉक्टरांशी चर्चा करताना त्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारला, “इथे तुम्ही उपचार करता त्याने रुग्ण खडखडीत बरा झाल्याची, बाहेरच्या जगात परत गेल्याची काही उदाहरणं आहेत का?”

डॉक्टर अभिमानाने म्हणाले, “अर्थातच आहेत. खरंतर अशाच एका रुग्णाची आजच घरी रवानगी होणार आहे. तो कार्यक्रम तुमच्या हस्ते व्हावा, अशी आमची इच्छा आहे.”

विश्वगुरूंनी ‘त्या’ रुग्णाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तो आला. समोर बसला. विश्वगुरूंनी त्याला नाव, गाव, शिक्षण वगैरे माहिती विचारली. त्याने ती सगळी माहिती अगदी संगतवार दिली. तो इथे रुग्ण म्हणून भरती झाला होता, यावर कोणाचा विश्वासही बसला नसता. प्रश्नावली संपल्यावर तो म्हणाला, “महोदय, तुम्ही मला बरेच प्रश्न विचारलेत; पण आपला परिचय दिला नाहीत. तुम्ही कोण आहात?”

ते म्हणाले, “मी विश्वगुरू.”

तो बरा झालेला रुग्ण गालातल्या गालात हसून म्हणाला, “काळजी करू नका. तुम्ही योग्य जागी आहात. डॉक्टर फार चांगले आहेत इथले. करतील सगळं व्यवस्थित. अहो, मीही दोन वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा विश्वगुरूच होतो.”


| १० | चॉकलेट

थोरला फजलू धाकट्या नीलोफरला धोपटत होता, तेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजे मुल्ला नसरुद्दीनने फजलूला हाताला धरून दूर खेचलं आणि विचारलं, “का मारतोयस तिला?”

तो म्हणाला, “माझ्या हातातलं चॉकलेट संपल्यानंतर तिच्या हातातलं चॉकलेट मागितलं तर ती देईना, म्हणून दिले दोन दणके.”

“गाढवा, धाकटी बहीण आहे ना तुझी ती? लहान मुलांशी प्रेमाने नाही वागता येत? सरळ मारहाण करतोस,” असं म्हणत मुल्लाने फजलूला चार दणके दिले. रडत-रडत फजलूने विचारलं, “अब्बाजान, केवढे दुटप्पी आहात तुम्ही? ‘लहान मुलांशी प्रेमाने वागायचं असतं, मारहाण करायची नसते,’ असं सांगत मला चोपलत तुम्ही. मी लहान नाहीये का तुमच्यापेक्षा?”

मुल्ला विचारात पडला. पण चटकन् म्हणाला, “फरक आहे, दोन्हींत फरक आहे. तू स्वार्थापोटी मारतोयस तिला आणि मी तुला चांगलं वळण लागावं म्हणून मारतोय.”

दोन दिवसांनी पुन्हा तोच प्रसंग घडला

फजलू नीलोफरला फटके मारत होता.

मुल्लाने त्याला हाताला धरून खेचलं आणि विचारलं, “का मारतोयस तिला?”

फजलू ऐटीत म्हणाला, “तुम्ही मध्ये पडू नका अब्बा. मोठ्या माणसांनी सांगितलेलं ऐकावं, त्यांनी चॉकलेट मागितलं तर लगेच द्यावं, असं चांगलं वळण लावतोय मी तिला!”


| ११ | आय.टी. सेल

गावात मोठे ज्ञानी सत्पुरुष आले आहेत, हे ऐकून शेखचिल्ली त्यांना भेटायला गेला.

साधूमहाराजांनी त्याला प्रेमानं जवळ बसवलं आणि विचारलं, “बोल बेटा, काय अडचण आहे तुझी?”

शेखचिल्ली म्हणाला, “महाराज, मला सगळं गाव मूर्ख, बेअक्कल, बावळट म्हणून हिणवतं. मला ते सहन होत नाही. माझी सुटका करा.”

साधूमहाराज म्हणाले, “पण, असं का म्हणतात सगळे?”

शेखचिल्ली म्हणाला, “महाराज, मी काही हुशार नाही. वेडाबागडाच आहे. पण, तरीही कोणी बावळटा, मूर्खा, वेड्या म्हटलं की राग येतोच. आता तर गुडघ्याएवढी पोरंही मला ‘ए खुळ्या’ म्हणतात. मला सोडवा महाराज, यातून मला सोडवा.”

महाराज म्हणाले, “तुझ्या सुटकेचा मार्ग तुझ्याच हातात आहे. तू हुशार हो, अभ्यास कर. कष्ट कर.”

शेखचिल्ली म्हणाला, “मी मुळातच मठ्ठ आणि आळशी आहे.”

महाराज म्हणाले, “मग मी तुला सांगतो, तो उपाय तू फक्त एक वर्ष, खरंतर काही महिनेच तू निष्ठेने केलास तर तुला मूर्ख म्हणण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.”

“तुम्ही सांगाल ते मी नक्की करेन,” शेखचिल्लीने वचन दिलं.

महाराज म्हणाले, “मग ऐक. यापुढे कोणीही काहीही म्हटलं की तू मी सांगतो त्यातली काही वाक्यं बोलायची… कधी म्हणायचं, ‘तेव्हा कुठे होतात?’ कधी म्हणायचं, ‘त्यांना जाऊन सांगा.’ कधी म्हणायचं, ‘देशद्रोही आहात.’ कधी म्हणायचं, ‘तद्दन बोगस आहे हे. पुरावा काय आहे याचा?’ शिवाय सतत गू, गटार, घाण, अळ्या, किडे असली गलिच्छ भाषा वापरायची.”

शेखचिल्ली एकदम आक्रसून म्हणाला, “पण, समोरचा बरोबर बोलत असेल तर…”

महाराज म्हणाले, “समोरचा हुशार असणार म्हणूनच तर हा उपाय योजायचा. हेच या उपायाचं वैशिष्ट्य आहे… समोरचा जे काही बोलेल त्याला आक्रमकपणे आडवं जायचं, बस्स. सभ्यता पूर्णपणे सोडायची. तर्क फाट्यावर मारायचा.”

शेखचिल्लीनं मान डोलावली. तो आनंदाने निघून गेला. महाराजांचाही मुक्काम दोन-चार दिवसांत हलला.

साधारण वर्षभराने महाराज पुन्हा त्या गावी आले, तेव्हा त्यांना कळलं की शेखचिल्ली आता एका आयटी सेलचा प्रमुख आहे. ते भेटायला गेले, तेव्हा शेखचिल्ली महाराजांच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, “महाराज, तुमच्या कृपेनेच हा चमत्कार घडला. मी वर्षभरापूर्वी होतो, तसाच आहे. माझ्या अकलेत पाच पैशांची भर पडलेली नाही. फक्त तुम्ही सांगितल्यानुसार वागू लागलो आणि एवढी प्रगती झाली.”

महाराज म्हणाले, “मला तुझा अभिमान वाटतो शेखचिल्ली!”

तो सवयीने म्हणाला, “हे त्यांना जाऊन सांग लिब्रांडू थेरड्या!”

मग त्याने जीभ चावली, दोघे हसू लागले.

मुकेश माचकर (संपादक, साप्ता. मार्मिक)

(रेखाचित्रे – विजय नांगरे)

मुकेश माचकर (संपादक, साप्ता. मार्मिक)

(रेखाचित्रे विजय नांगरे)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]