प्रभाकर नानावटी -
कुपवाडाजवळील चोगुल गावातील रस्ते इतके अरुंद आहेत की दोन जणसुद्धा एकमेकांबरोबर चालू शकत नाहीत. तेथे एक दीड मजली इमारत आहे व तेथेच गुलाम रसूल उर्फ लसाये (चिंतामुक्त) बाबा राहतो.
त्याच्या घराचे दरवाजे सदैव उघडे असतात, असे त्याच्या अनुयायांचे म्हणणे आहे. ते घर त्याच्या बहिणीचे आहे. काश्मिरी विटा व काँक्रीटमधील टिपिकल काश्मिरी स्टाइलने बांधलेले. मुलांना खेळण्यासाठी घरासमोर अंगण. व्हरांड्यात हुक्क्याची सोय. जवळच फक्त चेहरा उघडे ठेवलेल्या दोन बुरखाधारी महिला त्याची वाट पहात होते. ते एकमेकांशी बोलत होते, परंतु लक्ष मात्र ‘लसाये बाबा’च्या प्रतीक्षेत.
त्यातील एक बाई लांबच्या श्रीनगरहून आलेली होती. ‘बाबा आज फार रागात आहेत. खोलीच्या बाहेर येऊन दर्शन देणार नाहीत. मी अजून वाट पाहते. जर आज आले नाहीत तर उद्या सकाळी लवकर येईन. त्यांना न बघता मी श्रीनगरला परत जाऊ शकत नाही’, ती सांगत होती.
काश्मिरी संस्कृतीमध्ये पीर व बाबा या नावांना आध्यात्मिक व सांस्कृतिक असा वेगळा अर्थ आहे. पीर हा शब्द पर्शियन असून त्याचा अर्थ अध्यात्माचा मार्गदर्शक वा संत असा होतो. बाबा हा शब्द प्रेमाने आध्यात्मिकदृष्ट्या वयस्कर व्यक्तींना संबोधण्यासाठी वापरला जातो. पवित्र व संतपदाला पोचलेल्यांसाठीही वापरला जातो.
भेटण्यासाठी आलेल्यांच्याकडे बघत श्रीनगरची बाई सांगत होती, “जर बाबाला खरोखरच तुमच्याकडे लक्ष द्यावेसे वाटल्यास व तुमच्याबद्दल त्याला काळजी वाटत असल्यास तो नकीच तुम्हाला बोलवील.” तिची गुलाम रसूलवरील श्रद्धा अटळ होती.
मुख्य रस्त्याच्या दरवाज्याजवळ चोगुल गावचे सर्व जण गुलाम रसूलचे तारीफ करत होते. “रसूलचे वडील शेतकरी होते. तो त्यांचा एकुलता मुलगा होता. बाकीच्या चार मुली. १९६० मध्ये तो मॅट्रिक परीक्षा पास झाला. त्यानंतर मात्र तो सगळ्या गोष्टींचा त्याग करू लागला. तो जंगलात गेला. तेथे त्याने बारा वर्षे ध्यान व तपस्या केली. तेथून परतल्यानंतर तो पूर्णपणे बदललेला होता. तो कुणाकडूनही एक पैसा घेत नव्हता व काहीही मागत नव्हता. त्याच्या मनात आल्यास तो फक्त तुमच्या प्रश्नांना उत्तर देत होता.” दुकानदार सांगत होता.
श्रीनगरपासून उत्तरेकडे ८० किलोमीटर्सवर चोगुल हे गाव पीरपंजालच्या पर्वतांच्या रांगेत ५३०० फूट उंचीवर आहे. या पर्वतावरील दाट वाढलेल्या गवतामुळे गुरे व मेंढी चरत असतात. शेतकरी भातशेती करतात व बहुतेकांचे सफरचंदच्या बागा असतात. याच पर्वतांच्या रांगेत ‘लसाई (चिंतामुक्त) बाब’ १२ वर्षे एकांतात ध्यान करत होता व तेथेच त्याला दैवी साक्षात्कार झाला म्हणे.
चोगुल हे गाव काश्मीरमध्ये दुधापासून बनविलेल्या चीजसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. गावातील अनेक दुकानदार चीजची विक्री किंवा उत्पादन करतात. काही व्यापारी येथील चीजची निर्यातही करतात. दाढी वाढविलेला एक व्यापारी आधुनिक संत असलेल्या बाबाबद्दल सांगत होता, “बाबा ७०च्या दशकात मॅट्रिक पास झाला (त्या काळी मॅट्रिक पास होण्याला जास्त महत्त्व होते). जर तो संसाराचा त्याग केला नसता तर गव्हर्नमेंटमध्ये आतापर्यंत उच्च अधिकारी झाला असता.”
परंतु या वर्षीच्या एप्रिल महिन्यात सुफी पंथातील एक ७२ वर्षांची वृद्ध महिला त्याला भेटायला आली. तेव्हा त्याने त्याच्या खोलीत तिच्यावर कुर्हाडीने वार केला, असा आरोप तिने केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे खरे असल्याचे आढळले.
तिच्या डोक्याला मार बसला. गंभीर दुखापतीमुळे कुपवाड येथील सरकारी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तिला भरती करावी लागली व त्यातच तिचा मृत्यू झाला. गुलाम रसूलला अटक करण्यात आली. पोलिसांच्या अधिकृत माहितीप्रमाणे जेथे गुलाम रसूल रहात होता ती खोली त्याच्या बहिणीच्या चोगुलच्या घराचा हिस्सा आहे. ती खोली अव्यवस्थित, सगळीकडे जुनाट कपड्यांचे गठ्ठे व वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्हाडीने भरलेली होती. तेथे चाकू-सुर्या होत्या, काठ्या होत्या. रसूल हा आपल्या अनुयायांवर चाकूने हल्ला करायचा व काठ्याने मारायचा. व त्याचे अनुयायी कुठलेही तक्रार न करता आनंदाने मार सहनही करायचे. त्यांच्या मते, मार म्हणजे बाबांची कृपादृष्टी.
गेली कित्येक वर्षे हा बाबा काश्मिरी पारंपरिक लांब झग्यासारखा ‘फेरान’ वापरत आहे. कधीच कात्रीचा स्पर्श न झालेले डोक्यावरील केस व दाढी होती. स्थानिकांच्या मते, त्याचे अनुयायी त्याला आय फोन देतात व हा बाबा त्यांना जमिनीवर आपटून फोडून टाकतो. कित्येक अनुयायी त्याच्याकडे इंजेक्शन सिरिंज आणून त्याच्या हाताने शरीराच्या कुठल्याही भागाला टोचण्याचे आग्रह करतात. बाबा भक्तानी दिलेल्या नोटा फाडून तुकडे करतो.
पोलीस कस्टडीतील जेलची हवा खाऊन बाबा परत त्याच्या खोलीत आला. पोलिसांकडून अजून रीतसर खटला भरायला वेळ लागणार होता. त्याचे अनुयायी ‘त्यांनी गुन्हा केला आहे’ यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पोलीस तपासाची काही गरज नाही असेच त्यांना वाटत होते. टीव्ही व वृत्तपत्रातील बातम्या म्हणजे बाबाच्या विरोधातील पत्रकारांचे कारस्थान असून सर्व काही फुगवून सांगितले जात आहे, याबद्दल दुमत नव्हते. या उलट या गुन्ह्याला ती एक दैवी कृती आहे असेच समजत होते.
“पीर भडक डोक्याची असतात, हे सर्वांना माहीत आहे. ती म्हातारी बाई त्याला भेटण्यासाठी अडून बसली. हे त्याला आवडले नाही. अशा पीरांना ईश्वराचे रक्षक कवच असते. त्याला राग आला म्हणून त्याने त्या बाईला कुर्हाडीने मारले. यात त्याची काय चूक? एक भक्त त्याची बाजू घेत सांगत होता. कुर्हाडाऐवजी काठीने मारायला हवे होते.” गुन्हा सौम्य करण्याच्या प्रयत्नातील दुसरा भक्त.
“दररोज शेकडो भक्त त्याला येऊन भेटतात. तो त्यांच्याकडून काहीही मागत नाही. भक्त मात्र काही ना काही तरी मागत असतात. कुणाला मूल हवे असते, कुणाला घरातली भांडणं मिटवायची असतात, कुणाला नैराश्यातून बाहेर पडायचे असते, कुणाला रोगमुक्त व्हायचे असते. हे सर्व त्याच्या शिफावर (healing power) विश्वास ठेऊन आलेले असतात. मी स्वतः तेथे जातो.” एक जण सांगत होता.
हा पीर फारच साध्या गोष्टींची मागणी करतो. काही वेळा फटाके, काही वेळा काठी तर काही वेळा कुर्हाड. भक्त खुषीने या गोष्टी आणून देतात. ते सर्व त्याच्या खोलीत आहेत. त्या खोलीत कुणालाही प्रवेश नाही. काही वर्षापूर्वी धडम, धडम आवाज आल्यामुळे मिलिटरीतील जवान तेथे आले. त्याच्या खोलीची झडती घेतली. तो फटाक्याचा आवाज होता हे कळल्यानंतर ते निमूटपणे निघून गेले. एक दुकानदार सांगत होता.
रसूलच्या बाबतीतील एवढ्याच गोष्टी विचित्र नसून आणखी भरपूर विक्षिप्त गोष्टी आहेत.
“काही महिन्यापूर्वी माझा एक मित्र भल्या पहाटे बाबाच्या दर्शनासाठी आला होता. बाबानी त्याच्या खिशात हात घातले व खिशातील ३० हजार रुपये बाहेर काढले व बघता बघता त्याचे तुकडे करून फेकून दिले. माझ्या मित्राने एक शब्दही बोलला नाही व त्याला त्याबद्दल काहीच वाटले नाही.” चीजची विक्री करणारा व्यापारी सांगत होता.
अजून एका घटनेत एक पोलीस अधिकारी त्याला अटक करण्यासाठी गेला होता. “बाबाला राग आला व तो मला मारण्याच्या पवित्र्यात होता. अटक केल्यानंतर त्याचे अनुयायी त्याला भेटण्यासाठी वा काही अन्नपदार्थ देण्यासाठी मोठ्या संख्येने गोळा झाले. त्याच्या मुखदर्शनासाठी ते उत्सुक होते.” अजून एक वरिष्ठ अधिकारी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. बाबा काही तरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता व तो काय बोलत आहे हे कळतच नव्हते. एक पोलीस अधिकारी सांगत होता. या घटनेला समाजमाध्यमांवर भरपूर प्रसिद्धी मिळाल्यामुळे या सुफी बाबाला इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (The Institute of Mental Health and Neurosciences, Kashmir) येथे भरती करण्यात आले. ही एक श्रीनगरमधील मानसिक रुग्णावर उपचार करणारे हॉस्पिटल आहे. तेथील एका डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे त्याला भेटण्यासाठी आलेल्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील वरच्या पदावरील गण्य व्यक्ती येऊ लागल्यामुळे त्याला एका स्वतंत्र खोलीत शिफ्ट करण्याची त्यांच्यावर वेळ आली. तो तेथे जेमतेम पंधरा दिवस होता. तेथील डॉक्टरांच्या अहवालाप्रमाणे तो स्किझोफ्रेनिक मनोरुग्ण आहे.
महिलेवर कुर्हाडीने हल्ला केल्याचा आरोप रसूलवर झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया पाहून वरिष्ठ नागरी अधिकारी आश्चर्यचकित झाला. “मी काही लोकांचा दावा ऐकला की त्याच्यामुळे मरण पावलेली स्त्री खरोखर भाग्यवान होती”, तो पुढे म्हणाला. काश्मिरी सुफीवादाचे अनेक विद्वान मानतात की मानसिक बिघाड आणि आध्यात्मिक प्रगती यांच्यात एक फारच पातळ रेषा आहे. त्या त्या संस्कृतीवर आणि इतिहासावर ते अवलंबून असते. अनेक लोकांसाठी तर्कशून्यतेच्या पलीकडे तर्कशुद्धता नसून तर्कशुद्धतेच्या पलीकडे अतिंद्रिय शक्ती आहे, असे एका तज्ज्ञाचे मत आहे.
श्रीनगर येथील मेडिकल कॉलेजचे मनोविकार तज्ज्ञ, अर्षद हुसेन यांनी समाजमाध्यमांवरील चर्चेत भाग घेताना रसूलच्या वर्तणुकीवरून काही निष्कर्ष काढले. आपल्या संस्कृतीत स्पिरिच्युअॅलिटी व स्किझोफ्रेनिया या दोन्हीत फरकच केला जात नाही. खरे पाहता स्पिरिच्युअॅलिटी व हिंसा हे दोन्ही एकमेकाच्या विरोधार्थी शब्द आहेत. स्पिरिच्युअॅलिटीमध्ये आंतरिक शांतीप्रमाणे बाह्य शांतीची सुद्धा अपेक्षा असते. जेव्हा त्याचा दुरुपयोग- शारीरिक, भावनिक व शाब्दिक होत असल्यास त्यातून उपचार न होता आणखी इजा होण्याची शक्यता जास्त असते.
काश्मीरच्या इतिहासात कित्येक विक्षिप्त साधू-साधकांचे चरित्रे वाचायला मिळतील. यातील प्रत्येक जण ‘आपल्याला दैवी शक्ती लाभली आहे’ असेच दावा करतो व आपल्या बोलण्या-वागण्याचे समर्थन करतो. यातील बहुतेक जण आपण परमेश्वराशी संवाद साधत असतो, असे म्हणत काहीही करत राहण्याचे स्वातंत्र्य घेत असतात. त्यांच्या या तथाकथित स्पिरिच्युअल गोष्टी विवेकी माणसांना उबग आणणारे असले, तरी त्यांचा धंदा जोरात, पिढ्यान्पिढ्या चालत असतो.
यापैकी बरेच स्किझोफ्रेनिक्स सामान्यपणे फाटक्या कपड्यांमध्ये एखाद्या भिकार्यासारखे रस्त्यावर फिरतात, इतरांच्या भिकेवर जगतात. त्यांचे विक्षिप्त वर्तन समाज सहनही करतो व उत्तेजनही देतो. कारण त्यांच्यात दैवी शक्ती आहे, हा समज काहीही केल्या दूर करता येत नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीला अध्यात्माचा साज चढविला जातो. त्या कृतीचे वेगवेगळे (आध्यात्मिक) अर्थ लावले जातात. तथापि, काश्मीरमधील प्रशासन ज्या पद्धतीने स्किझोफ्रेनिक पीर-बाबा आणि एक सामान्य स्किझोफ्रेनिक यांना हाताळतात त्यामध्ये फरक असल्याचे दिसते. खुनासारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले अनेक स्किझोफ्रेनिक्स अनेक दशकांपासून श्रीनगरच्या मनोरुग्णालयात तडफडून आहेत, रुग्णालयाने न्यायालयांना ते मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीत अशी माहिती देऊनही काही कृती करत नाहीत. न्यायालयही त्यांना कोणताही दिलासा देत नाही. गुलाम रसूलचे प्रकरण ‘स्पेशल’ असल्याचे दिसते, कारण तो एक पीर-बाबा आहे.
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथील २० वर्षे वयाचा मुसादिक बशीर हा इंजिनिअरिंग विद्यार्थी रस्त्यावर फिरत राहणार्या स्किझोफ्रेनिक भटक्यांना लहानपणापासून बघत होता. मागच्या वर्षी अशा भटक्यांच्यासाठी काही तरी करायला हवे असे त्यांनी व त्याच्या मित्रांनी मनावर घेतले. त्यांच्या अंघोळीची, केस कापण्याची सोय करणे, दोन वेळचे खाणे-पिणे बघणे इत्यादी गोष्टी ते करू लागले. ते सामान्य लोकासारखे दिसावेत याची काळजी घेतली. पहिल्या पहिल्यांदा बशीर व त्याच्या मित्रांनी स्थानिक नसलेल्या भटक्यांच्याकडे जास्त लक्ष दिले. स्थानिकांकडून त्याला या दैवी शक्ती असलेल्या फकिरांच्या भानगडीत पडू नका असा इशाराही दिला गेला. तरीसुद्धा हे विद्यार्थी त्यांचे न ऐकता सरसकट सर्व भटक्यांना आधार देऊ लागले. त्यांच्यात दैवी शक्ती आहे. म्हणून त्यांच्या विक्षिप्तपणाला उत्तेजन न देता हे भटके मनोरुग्ण असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे यावर त्यांनी भर दिला.
अलीकडेच जुन्या श्रीनगरमधील नवाकदल या भागातील एका कुटुंबीयांचा फोन त्यांना आला. त्या कुटुंबीयांनी गेली कित्येक वर्षे अंघोळ न केलेल्या त्यांच्या एका नातेवाइकाला आंघोळ घालण्याची विनंती या मित्रांना केली. जेव्हा हे मित्र त्याचे केस कापण्याचे प्रयत्न करू लागले तेव्हा त्याने इंग्रजीमध्ये ‘मला या जगात रहायचे नाही, मला एकट्याला सोडा’ या अर्थाची बडबड केली. थोडी खोलवर माहिती घेतल्यावर हा पाश्मिना लोकरीच्या शालचा व्यापारी होता व २५ वर्षांपूर्वी व्यापारात खोट आल्यामुळे त्याला ३० लाखांचे नुकसान झाले व त्याचे मानसिक संतुलन बिघडले. तेव्हापासून तो अशा भणंग अवस्थेत रस्त्यावर जगू लागला. त्याच्याकडे ही मित्रमंडळी संवेदनशीलतेने बघू लागल्यानंतर काही दिवसात तो माणसात आला व व्यवस्थितपणे राहू लागला.
मनोविकार तज्ज्ञ, अर्षद हुसेन यांच्या मते, रस्त्यावर दिसणार्या या भणंगांपैकी ९० टके जणांना घराचा आसरा व प्राथमिक अवस्थेतच मानसिक विकारावर उपचार मिळाल्यास ते सुद्धा चारचौघांसारखे जीवन जगले असते. काही जणांना हॉस्पिटलमधील उपचाराची गरज असते. परंतु मुळातच मानसोपचार करणार्या हॉस्पिटल्सची व घरातच उपचार करणार्यांची वानवा असल्यामुळे घरदार सोडून भणंग जीवन जगणार्यांची संख्या वाढत आहे. कमीत कमी मानसोपचार करणाऱे हॉस्पिटल्स तरी हवेत.
२० वर्षे वयाचा एक तरुण कायम एकलकोंडा व विस्कटलेल्या स्थितीत रहायचा. तो स्वतःच कायम बडबड करत राहायचा व कायम कुठेतरी भटकत रहायचा. नंतरच्या काळात तर पॉलिथिनच्या फाटके शीट्सचे छप्पर असलेल्या झोपडीत रहायला लागला. घरच्यांनी कितीही आग्रह केला तरी तो हट्टाने पेटून उठत होता व घरी येणे सोडून दिला. आता तो ३० वर्षांचा आहे व घरच्यांनी त्याची आशा सोडली आहे. डॉक्टरला विचारल्यावर ‘बहुतेक ही केस स्किझोफ्रेनियाची असावी व त्याला मानसोपचाराची गरज आहे’, असे सांगितले. कुटुंबीयांशी चर्चा करताना डॉक्टरांनी काही आधुनिक औषधांची नावेही सुचविली.
“६ महिन्यांनंतर त्या कुटुंबातील एक जण मला भेटायला आला. त्यांचे काका पूर्ण बरे झाले आहेत. सगळे शेजारपाजारचे हा एक चमत्कार आहे असेच म्हणतात. परंतु आम्हाला माहीत आहे की, योग्य औषधोपचाराने असलेही मनोविकार नकीच कमी होतात.” डॉक्टर सांगत होते.
परंतु मुसादिक बशीरसारखे तरुण किती काळ हे काम करू शकतील, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. महत्त्वाचे म्हणजे या भटक्यांमध्ये किती जण स्किझोफ्रेनिक आहेत व किती जण आणखी कुठल्या मनोविकाराने आजारी आहेत याची कल्पना येत नाही. काही जण त्यांच्या या समाजकार्याचे कौतुक करत असले, तरी आताच काही बुजुर्ग अध्यात्माच्या प्रांतात ढवळाढवळ करू नका असेही सांगत आहेत. “परंतु आम्हाला या लोकांना उपचाराची गरज आहे व त्यांच्यासाठी हॉस्पिटल्स नसले, तरी मानसोपचाराच्या सुविधा असलेल्या केंद्रांची गरज आहे.” कार्यकर्ता सांगत होता.
काश्मिरी समाजामध्ये तथाकथित आध्यात्मिकतेत बुडालेले गुलाम रसूलसारखे पीर-बाबा व मानसिक संतुलन बिघडलेले इतर भटके यांच्यामध्ये फारच धूसर पडदा असल्यामुळे या तरुणांचे काम फारच कठीण होत जाणार आहे याबद्दल शंका नसावी.
– प्रभाकर नानावटी
(संदर्भ : आउटलूक वरुन साभार)
